सभापर्व - अध्याय दुसरा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


मग जिष्णु उत्तरेला जिंकाया भीम वासवाशेला,
सहदेव दक्षिणेला, वरुणदिशेला हि नकुळ तो गेला. ॥१॥
कवि म्हणति, ‘ चतुर्भुजभुज जे धर्मसहायदक्ष, अजित रणीं
ते हे; कीं चतुराशासुखद चतुर्मूर्ति होय अजि तरणी. ’ ॥२॥
हरिति रिपूण्चे मदगद, पद न, दयासिंधु ते सुजनमहित,
झाले केवळ न दरद, बदरद हि न गांजिला प्रणत अहित. ॥३॥
करुनि चतुर्दिग्विजय द्रविणाचे अमित राशि जोडूनीं,
ते स्वपुराला आले, विजित नृपांचेम हि मन न मोडूनीं. ॥४॥
तैसें चि आणिलें बहु वित्त युधिष्ठिरपुरास दास - जितें
अजितें, अजि ! तें त्या तत्प्रेम अशा कौतुकीं सदा सजितें. ॥५॥
धर्मपरें धर्मपरा धन दिधल्या काय दोष ? कर दे, हें
किति ? दासदास्य हि करी श्रीश श्रीचित्ततोषकर देहें. ॥६॥
धर्म प्रभु, न पर प्रभु, जेणें केला प्रसिद्ध तो कर - द,
मोट्यांमोट्यांला ही बुडतां व्यसनाब्धिमाजि जो कर - द. ॥७॥
धर्म म्हणे, ‘ देवा ! तुज दीक्षा साजेल, मज, न यज्ञाची;
हो साम्राट् सर्वेशा ! दृष्टि निवो सर्व - सव - नयज्ञाची. ’ ॥८॥
कृष्ण म्हणे, ‘ राया ! तूं उचित अनुद्धत, न उद्धत क्रतुला;
योग्य न दुग्धस्थानीं योजाया प्रिय हि शुद्ध तक्र तुला. ॥९॥
देवा ! सेवा चि भली दे मज, दुसरी न घेववे दीक्षा;
सुखकीर्तिहेतु आह्माम तव नव - सव - भूमिदेव - वेदीक्षा. ॥१०॥
करिन ब्राह्मणपादप्रक्षाळन, सावडीन मीं उष्टीं;
सर्व हि करीन, देहीं फळ हें चि, न अन्यथा वृथा - पुष्टीं. ॥११॥
कृतकृत यांत आम्हीं, हो तूं सम्राट प्रभो ! अगा ! धवळा
हो त्वद्यशें त्रिलोकी राया ! कुरुसत्तमा ! अगाधवळा. ॥१२॥
जैसी यज्ञेशाज्ञा झाली कुरुसत्तमा अतिप्राज्ञा,
तैसी च तत्कुळोत्तमधौम्यद्वैपायनादिविप्राज्ञा. ॥१३॥
धर्में सवोत्सवोत्सुक नृप आणविले स्वदूत धाडूनीं,
विप्र क्षत्रिय वैश्य हि सच्छूद्र हि भूवरील झाडूनीं. ॥१४॥
भीष्म, सकळत्रसुत धृतराष्ट्र, कृप, द्रोण, विदुर, पुरवासी
धर्में आणविले मृग, जाणों प्रेषूनि नकुळ - सु - रवासी. ॥१५॥
सवसाहित्य किति वदूं ? राबति भुज जेथ साधु - सुर - तरुचे,
ज्या खटपटेपुढें न श्रीशास श्रीस ही न सुरत रुचे. ॥१६॥
रामादि सर्व यादव, शिशुपाळादिक नृपाळ बहु आले,
अर्पुनि उपायनें बहु धर्मकृतें आदरें बहुत धाले. ॥१७॥
अध्वर्यु याज्ञवल्क्य, ब्रह्मा श्रीव्यास, पैलमुनि होता,
सुमुनि सुसामानामा सामग यज्ञात जाहला होता. ॥१८॥
जेथ सभासद नारद, फार दयाज्ञान ज्यांत वास करी,
जेथें विप्रपदाब्जप्रक्षाळन तीर्थपाद देव करी; ॥१९॥
जेथें साहित्यासि श्रीभीष्म द्रोण विदुर बहु जपती,
न विसंबति क्षण जसे गुणबदपत्यासि वृद्ध मनुज - पती. ॥२०॥
यजमान हि गुरुदेववद्विजभक्त अजातशत्रु, तज्जाया
मूर्तिमती श्रद्धासी, आले गुण ज्या सुधेत मज्जाया. ॥२१॥
वाढी स्वमायसी कीं मूर्तिमती सुरभी गायसी ते तें,
जें जो इच्छी, ईतें गाय भुवन, जेंवि गाय सीतेतें. ॥२२॥
यनामें सफळ सकळ सव, सगुणब्रह्म ज्यांत राबे तें.
त्या क्रतुच्या वर्णावें कीर्तिसुधेतें, न अन्य राबेतें. ॥२३॥
इतुक्या चि राजसूयक्रतुच्या या वर्णनें रसिक हर्षो;
काय डरडरां ढेंकर देउनि चातक म्हणे, ‘ बहु वर्षो ? ’ ॥२४॥
तें यजनकर्म झालें पूर्ण सविधि परमशुद्ध रायाचें.
उद्धरिलें भगवंतें भरताचें गोत्र उद्धरायाचें. ॥२५॥
तेव्हां देवर्षि मनीं आणी कीं, ‘ क्षत्र सर्व शुद्ध - रणें
उद्धरणार प्रभु, परि आधीं शिशुपाळ आजि उद्धरणें. ’ ॥२६॥
धर्मासि म्हणे, ‘ राया ! आले यज्ञोत्सवार्थ नगरा जे
यांमध्यें पूजावा त्वां प्रथम श्रेष्ट, सर्व मग राजे. ’ ॥२७॥
धर्म म्हणे भीष्मातें, ‘ सांगा जी ! मज तुम्हींच जें विहित,
सांगत आलां पूर्वीं जैसें मद्भावुकार्थ जेंवि हित. ’ ॥२८॥
भीष्म ह्मणे, “ वत्सा ! जरि पुससी ‘ सर्वांत कोण पूज्य ’ असें,
तरि वासुदेव आधीं पूजावा त्वां विशुद्ध - भक्ति - रसें. ॥२९॥
ज्योतिर्गणांत रविसा, तेजस्वी कृष्ण या सदांत पहा;
तेज अहा ! क्षिप्र बहा, अर्घ वहा, एक पूज्य वृष्णिप हा. ” ॥३०॥
पूजी प्रभुला प्रेमें व्हाया दृक्कामपूर्ति सहदेव.
पूजित झाले सस्थिरचर त्या श्रीविश्वमूर्तिसह देव. ॥३१॥
नारदभीष्मप्रमुखां साधूंच्या होय दृष्टिलाभा जी
भा जीमूतश्याम प्रभुची ती चैद्यदृष्टिला भाजी. ॥३२॥
भगवत्सत्कृति पाहुनि कोपे शिशुपाळ सत्समाज्यांत,
दुष्टीं जसी पिशाची भरती दुर्बुद्धि तत्समा ज्यांत. ॥३३॥
धर्मासि करी सज्जनवृंदीं पाण्यापरीस पातळ, तें
वदवेना; सन्निंदावागनुवादें हि पाप आतळतें. ॥३४॥
गांजी पुष्कळ लावुनि मूर्खपण तशा सभेंत शांतनवा;
परि साहे, कीं, जन्मापासुनि बहु शांत, तो न शांत नवा. ॥३५॥
त्रिजगत्पूज्यपद प्रभु गुरु पुण्यश्लोक सार्वभौम खरा,
त्या निंदी श्रीकृष्णा कीर्तिश्रीशांतिभूतिच्या मखरा. ॥३६॥
बहु सांत्वन धर्म करी, न शमे, न वळे परंतु तो चैद्य.
मरणारा रोग्याला काय करिल जाणता भला वैद्य ? ॥३७॥
भीष्म ह्मणे, ‘ खळसांत्वन कां करितो ? याचिया नसे कानें
हें ऐकिलें, निवे घृत कढलें तोयाचिया न सेकावें. ’ ॥३८॥
क्षोभे बहु या वचनें, त्याल औपमान दुष्ट कुतरें च;
विस्तर असो, तयाचा उतरी, शिर हरुनि शौरिसुत, रेंच. ॥३९॥
सोसुनि शत अपराध प्रभुनें शिशुपाळ मारिला चक्रें;
केला पात्र सुगतिला, जी प्रार्थावी गति स्वयें शक्रें. ॥४०॥
शिरलें तद्देहोत्थित तेज प्रभुच्या मुखीं, पदा नमुनीं,
मानिति मनांत त्या वरचरितास महावरप्रदान मुनी. ॥४१॥
देवर्षिप्रमुख सुजन म्हणती, ‘ जीवांसि एक हरि हित रे !
अद्भुत महिमा याचा, भक्त तरे, करुनि वैर अरि हि तरे. ’ ॥४२॥
ऐसें सद्यश निर्मुनि, नेउनि सिद्धीस दासयागा त्या,
केली हृष्टा वाणी कविच्या हि तिच्या सदा सया गात्या. ॥४३॥
धर्में विप्रादि सकळ पूजुनि आनंदवूनि बोळविले,
भूदेवपदरजांत स्वजनाकरवीं हि देह घोळविले. ॥४४॥
प्रभु हि स्वपुरा गेला, दुर्योधन शकुनि राहिले होते.
त्या मयसभेसि डोळे धृतराष्ट्रें काय वाहिले हो ! ते. ॥४५॥
घेतां निरोप सांगे व्यास मुनीश्वर युधिष्ठिरासि असें :-
‘ वत्सा ! होणार पुढें क्षत्रक्षय, फार सावधान असें. ॥४६॥
कारण करूनि तुजला क्षत्रक्षय करिल काळ, हें चुकवी
ऐसा कोण त्रिजगीं ? म्हणती दुर्वार भाविला सु - कवी. ॥४७॥
दुर्योधनापराधें क्षत्रक्षय भीमजिष्णुबाहुबळें
होणार, वा ! त्रयोदशवर्षांतीं आटतील वीरबळें. ॥४८॥
क्षत्रक्षयीं कुरुपते ! धर्मा ! तुजला निमित्त जो कर्ता,
स्वप्नांत निज सुदुर्लभ दर्शन देईल तो जगद्भर्ता. ॥४९॥
ऐसें भावि कथुनि मुनि गेला कैलासपर्वता, राया !
प्रभुला विनउनि, अयशोभीत निजसुपौत्र सर्व ताराया. ॥५०॥
धर्म म्हणे, ‘ भ्राते हो ! क्षत्रक्षय मन्निमित्त होयाचा;
अयश नसावें, त्यजितों जीवित, उपयोग काय हो ! याचा ? ’ ॥५१॥
जिष्णु म्हणे, ‘ मतिनाशकमोहीं द्यावें न चित्त अजि राया !
कश्मळपंकें भरितां पटुबुद्धिनटी त्यजील अजिरा या. ॥५२॥
बुध मतिकवचें व्यसनीं स्वपरपरित्राण कीं करी; राया !
बुधविबुधसाधुमान्या ! रक्षीं सत्स्वर्द्रुमा शरीरा या. ’ ॥५३॥
धर्म म्हणे, ‘ व्हाल तुम्हीं जरि मज अनुकूळ तरि करीन असें
ज्ञातींसीं इतरांसीं वर्तेन तसें, तयांसि इष्ट जसें. ॥५४॥
कथिली दुर्व्यसनांची भेदमयी बुद्धि हे खनि पटूनीं;
शिवखनिसम मति धरितों मीं निजपरभेदलेख निपटूनीं. ’ ॥५५॥
विग्रहकारण भेद त्यागावा, युक्ति हे नपा सुचली.
भीमार्जुनादिसाधुस्वांतासि सुधेपरीस ती रुचली. ॥५६॥
आधीं च धर्म नयरुचि, सर्वत्र सम, क्षमी, कृती, करुण,
स्थिर ज्यापुढें विवेक व्यक्त सदा, जेंवि रविपुढें अरुण. ॥५७॥
तत्साधुत्व किति वदों ? स्वगुरूंच्या हितवचा सिकविल्याला
जपला जो रात्रिंदिव, दृढसद्गुणसुकवचासि कवि ल्याला. ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP