तो हरिणीग्रहणार्थी अत्युग्रप्रकृति लांडगासा च
गेला तें चि कराया दुःशासन दुष्ट दांडगा साच. ॥१॥
कृष्णेसि म्हणे, ‘ चा, द्यूतीं तुज जिंकिलें, भज कुरूंतें,
कुरुपतिस पहा, लज्जा त्यज, सेवावें सुखें शतगुरूंतें. ’ ॥२॥
त्या दुष्टोक्तश्रवणें पांडूंची संकटीं पडे जाया;
संरक्षणार्थ धांवे धृतराष्ट्राच्या स्त्रियांकडे जाया. ॥३॥
पळतां धावोनि तिला, त्या केशांतें धरूनि, आकर्षी,
ज्यां राजसूययज्ञीं अभिषेचिति बहु महर्षि नाकर्षी. ॥४॥
कृष्णा म्हणे, ‘ सभेंत न न्यावें मज, मीं रजस्वला, आंगा
आच्छादन एकांवर, नेतोसि असीस आग्रहें कां ? गा ! ’ ॥५॥
दुष्ट म्हणे, ‘ स्वसभेला तुजला नेतों चि, दूरसी अस कीं
एकांवरा अस; तुझीं अंगें नग्नें असोंत हीं असकीं. ’ ॥६॥
देवी म्हणे ‘ अनार्या ! नाहीं च तुझ्या मनांत पापदर,
ओढूं नको फरफरां, घेऊं दे सावरूनि हा पदर. ’ ॥७॥
अधम म्हणे, ‘ द्यूतजिता दासी तूं, लाजसी कशाला गे !
चाल उगीच, प्रभुसीं हठ करितां पाठिला कशा लागे. ’ ॥८॥
कृष्णा म्हणे, ‘ पति कसें पाहुनि हें कर्म साहतील ? न द्या
पद सर्पशिरीं, तुमच्या रक्तांच्या स्पष्ट वाहतील नद्या. ॥९॥
गुरुजनसभेंत कैसा नेसी ओढूनि काय हा, नीच्या !
करितोसि कर्म दुष्टा ! प्राप्त्यर्थ बळें चि कायहानीच्या ? ॥१०॥
धर्म परम सूक्ष्म असे, धर्मात्मा धर्मनृप नसे चुकला;
सावध व्हा, कंठीं यमपाश कसे घालितां ? अहा ! उकला. ’ ॥११॥
ओढुनि सभेंत नेली तेव्हां ती द्रौपदी ह्मणे, “ कुरुची
कीर्ति बुडाली, हा ! धिक् ! कुरुवृद्धांला हि मानली कुरुची. ॥१२॥
हा ! भीष्मद्रोण कसें न ह्मणति, ‘ हे सहजमित्र ! सत्व ! रहा. ’
अन्यायें बुडणार व्यसनीं कुरुराजवंश सत्वर हा. ॥१३॥
अन्यायाचळभिदुरें विदुरें अनवरतशुद्धसत्वरतें
जाऊं दिलें कसें, जें गेलें सोडूनि सख्य सत्वर, तें ? ॥१४॥
कारुणरसें भरले होते, जे दुर्बळांसि उद्धरिते,
झाले कसे अकस्मात् ते केवळ कुरुगुरु प्रबुद्ध रिते ? ” ॥१५॥
प्रेरियले भेदाया पतिधैर्याद्विरदकट कटाक्ष तिनें,
र्पथम न म्हणति श्रीच्या, म्हणति स्त्रीच्या चि ‘ कटकटा ’ क्षतिनें. ॥१६॥
पेटे पांडवकोपानळ, कृष्णादृष्टि होय तद्धमनी;
काय करितील हो ! ते निजमर्यादागुणें चि बद्ध मनीं ? ॥१७॥
दुःसासनासि म्हणती भीमादिक निजमनांत, ‘ हे बाळ !
हूं; सुप्त सर्पिणीतें मेली मानूनि ओढ हेबाळ. ’ ॥१८॥
केश धरुनि दुःशासन तीस बळें फिरफिरोनि दे हिसके,
भावितमःप्रशमीं न, क्षम ही होऊन तेज देहि, सके. ॥१९॥
‘ दासी दासी ’ ऐसें असकृत् तो खळ ह्मणे सहास तितें;
जाणों क्षमालि सिकवी, ‘ जें जें अरि करिल तूं सहा सति ! तें. ’ ॥२०॥
‘ दासी दासी ’ म्हणतां दुर्योधन कर्ण शकुनि मानवती;
हांसति खळ, सभ्य रडति, दुष्टें छळितां सभेंत मानवती. ॥२१॥
गांगेय ह्मणे, “ सुभगे ! धर्म परम सूक्ष्म, यास्तव स्पष्ट,
‘ ऐसें चि ’ असें मजला वदवेना, हा विचार बहु कष्ट. ॥२२॥
वदला ‘ जितोऽस्मि ’ ऐसें धर्म; शकुनिनें तयावरि स्वमतें
पण करविला तुझा, यावरुनि तरि न तूं जिता असें गमतें. ॥२३॥
द्यूतांत परस्वपण स्थापाया निःस्व जन नव्हे शक्त,
स्त्रीचें भर्तृवशत्व हि पाहोनि न मीं वदों शकें व्यक्त. ” ॥२४॥
कुरुवृद्ध असें बोले, उपहासें ताप ते कितव देती.
सभ्यांसि निर्णयार्थ प्रार्थुनि पुनरपि अशंकित वदे ती - ॥२५॥
‘ द्यूतीं अनतिनिपुणनृप कितवानीं आणिला बळें चि कसा ?
दावुनि कर्पूर जसा घालावा लोचनीं खळें चिकसा, ॥२६॥
केलें तसें चि; हरिलें कपटें सर्वस्व, सेवटील पणें
नृप जिंकिला शकुनिनें; याला नरकीं च सेवटीं लपणें. ॥२७॥
केलें स्वपरिभवांत द्यूत, पुन्हां भूप दावु दारपण,
या बुद्धिनें शकुनिनें दाखविलें आपुलें उदारपण. ॥२८॥
ऐसें असतां द्यूतीं अजिता मीं कीं जिता ? करा सवदा
पुण्याचा, पुसिलें हें सत्य पहा, जोडिल्यें करास, वदा. ॥२९॥
कुरुगुरुवचन तसें जरि संदिग्ध वदाल तरि न भागावें;
अजि सभ्य हो ! जरि गुरु हि न हरि संदेह, तरि नभा गावें. ’ ॥३०॥
न वदे कोण्ही हि किमपि, दुःशासन घाबरी करी तीतें;
‘ तद्रीति सम ’ कवि म्हणो, ‘ ग्रामहरीच्या बरीक रीतीतें. ’ ॥३१॥
तें पाहुनि भीम म्हणे, ‘ राया ! आम्हांसमक्ष कृष्णेची
हे दुर्दशा बरी कीं ? पूर्ति असे कीं न अक्षतृष्णेची ? ॥३२॥
आहेत कितव पुष्कळ, पुष्कळ त्यांच्या गृहांत बटकी ही,
स्नेहें ते हि न त्यांतें पण करिति, मदुक्ति काय लटकी ही ? ॥३३॥
श्री बुडविली महेंद्राश्रीतुल्या, मज इची नसे परवा;
पर वामलोचनेच्या ऐकों न शकें चि या विलाप - रवा. ॥३४॥
या साध्वीस न दुःखद परकर चि, तुझा स्व - कीर्ति - हानि - कर
हा निकर पातकांचा; कैसा केला खळें महा - निकर ? ॥३५॥
रे सहदेवा ! सत्वर पुष्कळसा अग्नि आण, जा च कसा,
जाळूं याचे हे कर, आम्हां हा सोसवेल जाच कसा ? ’ ॥३६॥
श्वेताश्व म्हणे, ‘ बापा ! भीमा ! जीमाजि वास अ - शिवाचा
केवळ बाळपणीं ही वदलासि न तूं कधीं हि असि वाचा. ॥३७॥
द्यूतीं स्वधर्मगौरवधन बहुधा त्वां हि सर्व हारविलें;
उक्तींत तें दिसेना लेश, जसें भित्तिचित्र सारविलें. ॥३८॥
क्षात्रव्रत स्मरोनि द्यूतीं पाचारिलें म्हणुनि आला,
व्यसनी स्वयें नव्हे हा आर्य, अतिक्रमिसि कां बुधा ! याला ? ॥३९॥
सद्गुण सौसेव्य हा गुरुदेवप्रिय यासि, जेंवि हार वुनीं
घालिसि तापांत कसा ? गति कोण पुढें स्वसत्व हारवुनीं ? ॥४०॥
आम्हां व्यसनार्ताम्ची धर्मस्थिति हे चि बाज, पावें गा !
त्वां मोडावें न इला, स्वस्वास्थ्यसुखार्थ बा ! जपावें गा ! ॥४१॥
हें काय बरें ? या गुरुघातें रिपु परम मुदित होतील;
स्वमुखीं विष, अमृतरस व्याळमुखीं, कोण सुज्ञ ओतील ? ’ ॥४२॥
भीम म्हणे, ‘ न विनवितें जरि फार असें चि मन हि, कर करुनीं
भस्म, ललाटीं धरितों, कीं करितों प्रथम बद्ध करकरुनीं. ’ ॥४३॥
निववी असुरांत जसा साधु प्रह्लादराय कवि - कर्ण
धृतराष्ट्रसुतांत तसा एक चि नयनिपुणनायक विकर्ण. ॥४४॥
भीष्मधृतराष्ट्रविदुरद्रोणकृपनृपांसि बोल तो लावी
कीं, ‘ समयीं न वदावी तरि मग केव्हां सदुक्ति बोलावी ? ॥४५॥
बोला हो ! बोला हो ! बोला हो ! सर्व सभ्य बोला हो !
असमयमौनें तुमच्या सुज्ञपणाच्या न हानि मोला हो. ॥४६॥
श्रवण तरि करा, मज जें सुचलेंसे, तें चि भीड तोडूनीं
वदतों, पद तों गुरुचें न शिवों द्यावें शिखीसि, सोडूनीं. ॥४७॥
च्यार व्यसनें मृगया, स्त्री, पान, द्यूत यांत जो सक्त,
तो धर्मच्युत, तत्कृत सत्कृत न, महाजनांत हें व्यक्त. ॥४८॥
धर्म द्यूतव्यसनीं झाला कितवांसि वश, पराभूत;
कां हो ! भ्रांत करीना स्वमतात्यशुचिक्रियापरा भूत ? ॥४९॥
धर्म जयाच्या नादीं लावुनि, जिंकूनि शकुनिनें आर्या
पण आपण चि करविली पांचांचि आपुली सती भार्या. ॥५०॥
अन्यर्त्विगननुमत जें द्रव्य न होता असोनि, होमुनि तें
होइल सभेंत बहुमत तो एकातरि हि काय हो ! मुनितें ? ॥५१॥
द्यूतीं साधारण धन, पण करुनि, नव्हे चि एक हारविता.
गिळिल दुराग्रहराहु, त्यजिना परि मद्विचार हा रविता. ॥५२॥
सभ्यांमाजि वदाया विहित असें बोलतां चि अजि तत्व,
हरिकीर्ति सती हे ही तुल्या, यांचें समान अ - जितत्व. ’ ॥५३॥
तें साधु ‘ साधु ! साधु ! ’ ध्वनि करिती म्हणति, ‘ बोल कानांहीं
प्यावे असे चि, तूं कीं विदुर, तिजा स्पष्ट बोलका नाहीं. ॥५४॥
न्यायमृकंडुसुताच्या दुस्तरधृतराष्ट्रजाब्धिसाधुवटा !
सभ्या ! भला भला ! विधु लाजेल तुझ्या चि मानसा धुवटा. ’ ॥५५॥
कर्ण म्हणे, “ वाचाळा ! रे ! सर्वस्वग्लहांत हे आली;
अजिता कसी ? तुझी मति मतिमंदा ! विदुरबुद्धिची आली. ॥५६॥
वरकड हे काय मुके ? वक्ता धर्मज्ञ तूं चि ? बैस उगा.
न भला स्वभाव ह अतुज बालिशजनपंक्तिला न बैसउ गा ! ॥५७॥
न वदति सभ्य, न पांडव, जरि हे कृष्णा म्हणे, ‘ अहो ! सांगा ’
अजिता असती तरि हे तैसें चि स्पष्ट न वदते कां गा ! ॥५८॥
म्हणसील ‘ सभेंत सती नाणावी, ‘ तरि सती न हे अ -सती;
असतो एक सतीचा उपभोक्ता, पांच ते इला असती. ॥५९॥
आनयन सभेंत इचें, कीं हें एकांबरत्व न विचित्र;
नग्नत्व हि नवल नव्हे; न चुना बहु नासिकेसि ज्या श्वित्र. ॥६०॥
सस्त्रीक सधन पांडव शकुनिजित स्पष्ट, काय बोलसि ? रे !
दे तो सभेंत लघुता, जो स्वाविषयीं बळें चि बोल शिरे. ॥६१॥
दुःशासना ! न याचे ऐकावे फोल बोल; हा बाळ
गीष्पतिपुढें मिरवितो साक्षरता दाखवूनि गावाळ. ॥६२॥
वदतो बुधांत भलतें, बोलाया न स्त्रियांत हि सकोनीं;
हूं घे पांडववस्त्रें, या दासीचें हि वस्त्र हिसकोनीं. ” ॥६३॥
तें ऐकतां चि वस्त्रें टाकुनि, उघडे चि पांच ही बसले.
भीष्म म्हणे, ‘ हें दुःसह, हृदयांत असा न शरकदंब सले. ॥६४॥
माहात्म्य सतीचें हो, देवा ! पावो न आस विलयाला;
हे आपणासि ह्मणत्ये बाळमृगी, स्पष्ट आसविल याला. ’ ॥६५॥
दुःशासन सोडाया झोंबे स्वकुळाहितोदया लुगड्या,
तेव्हां स्मरली कृष्णा, दीनांचिया दयालु गड्या. ॥६६॥
तो दुर्जन आधीं ही साधूंच्या करुनि हानि रीतीची,
नग्न सभेंत कराया पाहे खळ धरुनि हा निरी तीची. ॥६७॥
जैं दुर्दशा कराया दुर्दैवें सिद्ध नीच हा केला,
तैं दीनबंधुला ती कृष्णा मारी मनीं च हाकेला. ॥६८॥
“ हे नाथ ! रमानाथ ! व्रजनाथ ! हरे ! मुकुंड ! कंसारे !
गोविंद ! कृष्ण ! केशव ! दीनार्तिहरस्त्वमेव संसारे. ॥६९॥
काळें हि सख्या ! न तुझ्या दासीस पहावयास हि सकावें,
त्वद्भगिनीवस्त्र खळें नग्न करायास काय हिसकावें ? ॥७०॥
जीहुनि नसे सुभद्रा तुज बहुमान्या, अकीर्ति हे तीची;
धांव दयाब्धे ! होत्ये विश्वांत तुझ्या अकीर्ति हेतीची. ॥७१॥
झालासि त्राता चि, न, होउनि विधिच्या अधीन, होगलिता;
बिरुदावली तुझी हे गजवरवरदा ! कधीं न हो गलिता. ॥७२॥
‘ भगिनी ’ ऐसें वदल्यें, परि फार चि लाजल्यें, न हें लटिक;
प्रभुजी ! रक्षा, तुमच्या दासांची मीं लहानसी बटिक. ॥७३॥
जिंकिल काय खळा तो, जिंकी द्यूतीं न धर्म जो डावा ?
सुज्ञें पंकपतितपरधेनूद्धरणें हि धर्म जोडावा. ॥७४॥
भागा, या, गाय तसी मीं, न धरी अघमयास हा यवन;
गुरुजनसद पाळक, परि झालें या निर्दया सहाय वन. ॥७५॥
कीर्त्यर्थ उद्धरीं मज, उद्धरिलें जेंवि सागरीं महिला;
त्वद्दासांची होती त्या अमृतीं, आजि या गरीं महिला. ॥७६॥
बा ! ढळतां तिल हि पदर भावि व्यजनासि साग रामा जी,
ती खळसभेंत उघडी पडत्ये न पडोनि सागरामाजी. ॥७७॥
भो भगवन् ! भो वत्सल ! भो हतचाणूरमल्ल ! भागावें.
विश्वें तुझें चि, दु़सरें न, यश श्रीप्राणवल्लभा ! गावें. ॥७८॥
आजि असत्परपुरुषस्पर्श, न अपराध अन्य केला हो !
झांका प्रसादपदरें न कुजनदृक्स्पर्श कन्यकेला हो. ” ॥७९॥
अवतरला उतराया जो दुःसह दुष्टभार महिवरला,
अहिवरलास्यपटु प्रभु करुणोक्तें द्वारकेंत गहिवरला. ॥८०॥
परमेश्वर रूप धरी स्वपर - जन - हितोदया लुगडियांचें,
निववाया सभ्यांसह नयन मन हि तो दयालु गडियांचें. ॥८१॥
हा अंबरावतार श्रितलज्जारक्षणार्थ अकरावा,
प्रभुमत असें, ‘ सदवनीं आग्रह वेषीं कदापि न करावा. ’ ॥८२॥
शेले, शालू, साड्या, क्षीरोदक, लांबरुंद पाटावें,
झाला अनंत वस्त्रें, कीं तीस अनाथसें न वाटावें. ॥८३॥
पदसेवार्थ चि भजती अनवरत महाविभूति ज्या निपट,
तो कृष्णावपु झांकी होवूनि महाविभूतिजानि पट. ॥८४॥
पहिलें वसन व्यसनप्रतिपादनपटु करें कुमति सोडी,
तों दुसरें आहे चि प्रथमाधिक वस्त्र, त्यास ही ओढी. ॥८५॥
कृष्णादेहसदंबररत्नाकर त्यासि खळभुजा टिटवी,
उपसी, परि गांभीर्यें आपण न ‘ उहूं ’ म्हणोनि तो विटवी. ॥८६॥
मानिति माया केवळ अल्प सभेंतील भूमितळ पट, हो !
म्हणति अदित्यादि सत्या, ‘ या मेल्यांचें समूळ तळपट हो. ’ ॥८७॥
जें झांकिलें अनंतें दिव्यें भव्यें सदंबरें सुघडें,
तें साधुकाय काय क्षुद्रमति करील नागवें उघडें ? ॥८८॥
तो शतशः पट झटझट फेडुनि भागे, सभेंत वेडावे,
किति खळबळ ? जळनिधिचें किति दुस्तरतर तरंग फेडावे ? ॥८९॥
होय सभेंत ‘ हलहला ’ स्वन, कृष्णेसि प्रशंसिती राजे;
‘ छी ! ’ ते हि खळासि म्हणति, गेले भवनदपरप्रतीरा जे. ॥९०॥
भीम म्हणे, ‘ राजे हो ! तरि पूर्वजगति न हो मला, परिसा,
जरि दुःशासन - वक्षःक्षतज न सेवीन मीं स्वयें हरिसा. ’ ॥९१॥
सभ्य सकळ ‘ साधु ! ’ म्हणति भीमातें, ‘ धिक् ! ’ खळास ही ह्मणती;
हरि ! हरि ! हरि - हरिणांत चि त्यांची केली च त्या जनें गणती. ॥९२॥
तेव्हां विदुर म्हणे, “ हो ! प्रश्नोत्तर द्या, न सत्य बुडवावें,
कीं देवभोग्य दाम न बालें सुज्ञांसमक्ष तुडवावें. ॥९३॥
प्रह्लादसुत विरोचन, विप्र सुधन्वा सुशील आंगिरस;
प्राणपणवृत्त यांचें परिसा हो ! यापुढें अमृत विरस. ॥९४॥
स्वकरग्रहणोद्युक्तां त्या दोघांला हि केशिनी कन्या
प्रार्थुनि म्हणे, ‘ भजेन, श्रेष्ठ उभयतांत, जो, तया धन्या. ’ ॥९५॥
‘ मीं वर, ’ म्हणे सुधन्वा कीं साक्षात् तात अंगिरा ज्याचा;
‘ मीं वर, ’ म्हणे विरोचन कीं तो सुत साधुसंगि राज्याचा. ॥९६॥
‘ श्रेष्ठ नव्हेसा झालों तरि यावज्जीव मीं तुझा दास, ’
ऐसा प्राणपण तिहीं केला हो ! करुनिया विवादास. ॥९७॥
विप्र म्हणे, ‘ चाल, पुसों दोघे ही हें तुझ्या चि बापाला;
मज मान्य तदुक्त असे, कीं तो भीतो अकीर्ति - पापाला. ’ ॥९८॥
प्रह्लादास म्हणे मुनि, ‘ जें सत्य असेल सांग कविपा ! तें;
वदतां अयथार्थ तुझा मूर्धा शतधा फुटेल पवि - पातें. ’ ॥९९॥
जाय पुसाया त्यांतें, ज्या सुतपोराशि कश्यपा दास
जितसे षडरि भजति, येमनियम हि, होऊनि वश्य पादास. ॥१००॥
प्रह्लाद म्हणे, ‘ स्वामी ! वक्ता अस्पष्ट कीं मृषा वक्ता
प्रेत्यगति कसी त्याची ? हें सांगावें तुम्हीं मला भक्ता. ’ ॥१०१॥
कश्यप म्हणे, ‘ कळोनि न बोले जो स्पष्ट, त्यास वरुणाचे
दशशत पाश करकरुनि बांधिति पापकृददृष्टकरुणाचे. ॥१०२॥
जो साक्षी अनृत वदे, वत्सा ! त्याची हि होय ती च गती;
वर्षांतीं एक सुटे, एवं च सहस्र अब्द ते तगती. ॥१०३॥
जेथें धर्मिष्ठाला खोटेपण लावितो स्वयें खोटा,
तेथ अवचनें, अनृतें, संदिग्धें घात होतसे मोटा. ॥१०४॥
हें धर्मशल्य दूर न करितां, दुरितार्धभाग भर्त्याला,
उरल्या दुरितार्धाचा सभ्यांला पाद, पाद कर्त्याला. ॥१०५॥
भूतपुरुष सप्त, तसे भावी ही सातजण, असे चवदा
वदतां अनृत बुडवि तो, याकरितां साधु हो ! खरें च वदा. ॥१०६॥
हृतधन, हतपुत्र, ऋणी, व्याघ्र - नृप - ग्रस्त, साक्षिहत, बा ! हे
समदुःख; असी च स्त्री सुतहीना कीं जिला सवत आहे; ॥१०७॥
हीं दुःखें पडति गळां त्याच्या, जो पुरुष बोलतो लटिकें;
वत्सा ! पळ हि व्नोदाकरितां हि तशासमीप तूं न टिकें. ’ ॥१०८॥
प्रार्थुनि आज्याला, ज्या राज्या माजानिसेवकें उक्ती
आइकिल्या, त्या वारिल्या, भवतरि देवर्षिच्या जशा युक्ती. ॥१०९॥
प्रर्हाद म्हणे, ‘ पुत्रा ! आवडतो धर्म, तेंवि तूं न मज;
तुजपरिस हा सुधन्वा श्रेयान् स्वमनांत हें बरें समज. ॥११०॥
याचा चि पिता श्रेयान्, न तुझा श्रेयान् पिता; तुझी माता
न श्रेयसी तसी, जसि याची माता; यथार्थ हें ताता ! ॥१११॥
त्वत्प्राणेश सुधन्वा, जा दास्य करीं जपोनि आमरण;
विप्रचरणपरिचरण चि कामद; पुरवील काय काम रण ? ’ ॥११२॥
विप्र ह्मणे, ‘ साधो ! त्वां त्यजिला नंदन हि, धर्म न त्यजिला;
घे सुत दिला. ’ तिला कां न जपेल मुकुंद मान्य सत्य जिला ? ॥११३॥
ऐसी कथा असे हो ! उपेक्षितां जीवनासि गाय मुके,
मौनशिशुचे चि घेतां त्यागुनि सत्यामृतासि काय मुके ? ” ॥११४॥
आर्येला मानियलें बहु पाहुनि सज्जनीं चमत्कृतिला;
खळचि न मानिति; जैसे बहुदूषणसज्जन नीच मत्कृतिला. ॥११५॥
कोण्ही हि दयाळु न ती, त्या पंकातूनि गाय काढी गा !
भी कृष्णा त्या मूर्ता पापांच्या त्रासदायका ढीगा. ॥११६॥
देवी म्हणे ‘ रहा क्षण, करिसी निरयार्थ काय जोडि, खळा !
सभ्योक्त आयकों दे, रे ! न शिळेला अपाय जो डिखळा. ॥११७॥
पुसिलें तें सांगा जी ! अजि सभ्य ! तुह्मांसि विनवित्यें नमुनी
न वदावें हें सद्व्रत; परि यांसि सभेंत आणिती न मुनी. ’ ॥११८॥
ऐसें वदतां, वोढुनि पाडी, ओढी तशा हि पतितेतें;
विषसें गिळिती तीचें पडणें रडणें तदीय पति ते तें. ॥११९॥
कृष्णा म्हणे, ‘ अहा ! जी ! द्रुपदसुता, धर्मनृपतिची भार्या,
श्रीमद्यदुनाथसखी, मानवल्या सर्वदा जिला आर्या, ॥१२०॥
तीला खळ ओढितसे वात हि न विशंक जीस आतळला;
न व्हता ताप, कटाहीं जरि असता सुचिर काय हा तळला. ॥१२१॥
केला तत्प अनघजन तैलाच्या तापल्या हि न कटाहें;
कुरुगुरु धन्य ! सहाता न जनें धिक्कारिला हि नकटा हें. ॥१२२॥
कष्टें सांचविलें यश बुडवितसें मंद मत्त, पाहूनी
साहति कसें नवल हें, ज्यांचेम तप उग्र मत्तपाहूनीं ? ॥१२३॥
सांगा यांची दासी कीं मीं दासी नव्हें ? मता निवडा.
श्रवणीं धरूनि सूक्ता राजसभा शोभते न तानिवडा. ’ ॥१२४॥
भीष्म म्हणे, ‘ गे बाई ! वदलों पहिलें चि सूक्ष्म धर्म - गती,
ज्ञात्यांला हि कळेना, इतरांसि कळेल काय गे ! मग ती ? ॥१२५॥
बळवान् वक्ता असतां होय अधर्म हि सुधर्मसा धन्ये !
दुर्बळ वक्ता असतां, धर्म हि होतो अधर्मसा कन्ये ! ’ ॥१२६॥
श्रीभीष्माशय हा कीं, ‘ अजिता म्हणतां चि हे अतिक्रुद्धा
जाळील कौरवांतें, अन्यायें गांजिली सती शुद्धा. ॥१२७॥
द्रौपद्यपमानज कीं कुरुनाशज दोष गुरु ? न हें समजे.
कौरवनाश चि होतो, उरतात उदंड दुष्ट यांसम जे. ॥१२८॥
पांडव अशस्त्र केवळ परदास हि, धार्तराष्ट्र तत्स्वामी;
कृष्णेस हि दोषावह तन्नाश, नसो कळंक तद्धामीं. ॥१२९॥
खळलय होणार चि, मग तप बुडवावें किमर्थ सांचविलें ? ’
ऐसें चिंतुनि भीष्में स्पष्ट न बोलोनि त्यांस वांचविलें. ॥१३०॥
‘ जें व्यसनीं सद्वृत्त त्यागावें, तें च कर्म अति नीच;
अत्याज्ज धर्मपथ, हें तुज कथिलें, न वदतां हि, पतिनीं च. ॥१३१॥
वत्से ! सत्सेव्य त्वत्सत्वा दृग्दोषलव नसो, सकता
न सहाया शांत हि या व्यसना, अन्यत्र हे न सोसकता. ॥१३२॥
सांगो धर्म जिता तूं कीं अजिता हें, प्रमाण तें चि सति !
सत्वसुधानदि कृष्णे ! व्यसुसे द्रोणादि सभ्य हे दिसती. ’ ॥१३३॥