श्री शंकराचार्य वंदना - अध्याय आठवा
निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र
जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधारा ॥१॥
संन्यास घेण्या सम्मती । मातेने शंकरा कैसी दिधली । कथा संक्षेपे वर्णिली । सप्तमाध्यायी श्रद्धेने ॥२॥
संन्यासदीक्षा गुरुकडून । घेणे वाटे शंकरा उचित । परोक्ष ज्ञान जरी प्राप्त । वावी अपरोक्षानुभूती ॥३॥
संन्यास म्हणजे काय । सम्यक् न्यास म्हणजे संन्यास । जे ते योग्य तेथे ठेवण्यास । हवे वैराग्य आणि ज्ञान ॥४॥
श्रीगोविंदयतींच्या शोधास । मज जाणे उत्तरदिशेस । मातेची व्यवस्था करण्यास । हवा थोडा कालावधी ॥५॥
अग्रहाराचा हक्क कुलास । चालविण्या कुटुंब चरितार्थ । आवश्यक तितुके द्रव्य अर्थ । मिळेल मातेस, चिंता व्यर्थ ॥६॥
बोलावुनि आप्त इष्टास । सांगोनि व्यवस्था शिष्टांस । मातेस न पडोत सायास । विनवी शंकर प्रत्येका ॥७॥
परी मातेचे थकले शरीर । आचरता नित्याचे व्यवहार । जाणे रोज नदीवर । कैसा त्रास चुकणार ? ॥८॥
हळूं, हळूं, थांबत, थांबत । सावकाश पाऊल उचलत । वृद्धत्वावर करीत मात । आर्याम्बा गाठी पूर्णाकांठ ॥९॥
शंकर होईल खिन्न पाहुनि । आई होईल कां बापुडवाणी । कोणास सांगेल आणा पाणी । काय करावा उपाय ? ॥१०॥
एकांती चिंतन करी शंकर । कर्ता करविता तो ईश्वर । त्यालाच उचलणे चिंताभार । मी तर भक्त पामर ॥११॥
परमेश्वराची करी आळवणी । जाणतोस ना सारी कहाणी । पूर्णेस आणावे येथे अंगणी । टळावे कष्ट आईचे ॥१२॥
प्रार्थना ऐकता म्हणती कोणी । कैसी ही विचित्र मागणी । नदी कैसी येईल अंगणी । हवी कराया समजावणी ॥१३॥
दुसरे कोणी देती स्मरण । शंकरे धरिता लक्ष्मीचरण । स्तवने झाली ब्राह्मणा प्रसन्न । तैसेच कांही घडेलही ॥१४॥
लोकप्रवादा दुर्लक्षुनि । अनन्यभावे ईश्वरा वंदूनि । शंकर करी आर्त विनवणी । पूर्ण निष्ठा धरुनि मनी ॥१५॥
पावसाळ्याचे होते दिवस । पूर्णेस आला महापूर । दगडबांधे करित दूर । धावे पात्र बदलुनि ॥१६॥
बघता बघता प्रवाह आला । आर्याम्बेच्या घराशी वळला । स्तंभित करी सकलाला । सेवेस्तव जणु आसुसला ॥१७॥
शंकर झाला सद्गदित । मायेसह पूर्णेस पूजित । परमेश्वरासी जोडूनि हात । म्हणे कृपा आपुली अपार ॥१८॥
निरोप घेऊनि मातेचा । समय कालडी सोडण्याचा । गंभीर तैसा उत्कटतेचा । प्रसंग एकमेवाद्वितीय तो ॥१९॥
एकाकी मी आजपासूनि । आई नको आणू मनी । चाललो जरी संन्यास घेऊनि । कर्तव्या न विसरेन ॥२०॥
असो दिवस अथवा रात्र । आधारास्तव जर स्मरशील । धावत येईन मी तत्काल । सार्थ करीन तुझे बोल ॥२१॥
रुढी असतील कांही । संन्याशास अधिकार नाहीं । परी वचन देतो आई । करीन तुझे अंत्यसंस्कार ॥२२॥
आता देई आशिर्वाद । पित्याचे होवो पूर्ण स्वप्न । वैदिकधर्माचे सुस्थापन । वेदमातेचे फिटोत पांग ॥२३॥
उदासीन तरीहि प्रसन्न । आर्याम्बेचे भरले नयन । कर्तव्यदक्ष अंतःकरण । उमटले बोल ‘ विजयी भव ’ ॥२४॥
घेवोनि मोजके सामान । सकल जनांचे आशीर्वचन । शंकरे ठेविले प्रस्थान । उत्तरदिशेने प्रवास सुरु ॥२५॥
पूजावा केशवराज प्रथम । सोडन्यापूर्वी ग्राम धाम । पूजावे दैवत सार्वभौम । मंदिरी प्रवेशला शंकर ॥२६॥
पुजारी सांगे हात जोडून । पूर्णेने बदलता पात्र । मंदीर झाले उपेक्षित । कैसे होईल पुन्हा स्थापित ॥२७॥
शंकर सांगे पुजार्यास । कर्ता करविता केशवराज । तुमचे आमुचे एक काज । श्रद्धेनें करावे पूजन ॥२८॥
भोवताली जमले भाविक जन । त्या सर्वांशी प्रेमे बोलून । स्वतः मूर्ती सुस्थानी स्थापून । जिर्णोद्धाराचा शुभारंभ ॥२९॥
उध्वस्त वैदिक धर्मास । पुनरपि करण्या प्रस्थापित । जीवनकार्याची सुरुवात । केशवराज हे निमित्त ॥३०॥
उत्तर दिशेस कोणीकडे । गोविंदयती राहती तिकडे । शंकराचे पाऊल पडे । दृढपणे गुरुंच्या शोधार्थ ॥३१॥
होता ऐकून शंकर । गोविंदयतींचे चरित्र सुंदर । साक्षात पातंजलीचा अवतार । मानिती त्यांना आदरे ॥३२॥
यतिवरांचे शोधून स्थान । मनःपूर्वक त्यांना विनवून । संन्यासदीक्षा त्यांचेकडून । घ्यावी आपण विधीपूर्वक ॥३३॥
चालला वेगे शंकर । शांत धीर आणि गंभीर । कृतनिश्चय मनी खंबीर । अवर्णनीय पदक्षेप ॥३४॥
मस्तकाचे केलेले मुंडन । भगवे वस्त्र परिधान । दंड कमंडलु हाती धरुन । साकारले जणूं चैतन्य ॥३५॥
इतक्या बालवयात संन्यास । कोणी दिधला असेल यास । येवढे तीव्र तपसायास । कोणत्या उद्देशे करीत हा ॥३६॥
पहाता शंकराचे अद्भुत बाल्य । सर्वांचे मनी उपजे वात्सल्य । वाटे हा आपुलाच पाल्य । प्रेमे अर्पिती भिक्षा त्यास ॥३७॥
परी न थांबे कोठे शंकर । चालत राही तो झरझर । नगरे अरण्ये करी पार । ध्येय ना विसरे क्षणभर ॥३८॥
नामस्मरण अथवा चिंतन । सदाशिवाचे करी भजन । किती चाललो नुरे भान । देह थकता विश्राम ॥३९॥
शिव शिव म्हणे वाचे । सच्चिदानंद रुप तयाचे । आठवीत प्रेमे मनी साचे । उल्हसित राखी वृत्ति सदा ॥४०॥
बहर येई कवित्वाला । छंद लागला वाणीला । वारंवार गाई चरण पहिला । चिदानंदरुपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥४१॥
मनी जो चरण स्फुरला । तीच सोबत शंकराला । धीर देई चित्ताला । मार्ग चालता एकला ॥४२॥
गोविंदयती भेटले कां ? । वृतान्त काय त्या भेटीचा । कथा भाग शंकर चरित्राचा । जाणावा पुढील अध्यायी ॥४३॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । आठवा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । करण्या ग्रंथ पूर्ण सार्थ ॥४४॥
शुभं भवतुं । शुभं भवतुं । शुभं भवतुं ।
N/A
References : N/A
Last Updated : March 19, 2017
TOP