श्री शंकराचार्य वंदना - अध्याय पंचविसावा
निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.
जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधारा ॥१॥
जगद्गुरुंच्या सान्निध्यांत । नित्य राहणे हेच शिक्षण । बालस्वामी करिती ग्रहण । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥
मुख्य पांच स्थापिले मठ । वेदान्त धर्माचे पंचप्राण । मठाधिकारी नेमले सुजाण । कार्य चालावे अखंडित ॥३॥
जाणत होते आचार्य । चार शिष्य चार मठावर । सर्वांचा हवा एक विचार । तेव्हांच घडेल धर्मप्रसार ॥४॥
प्रत्येक मठाचे क्षेत्र निश्चित । तेथे राहावे कार्यमग्न । तेथूनच घ्यावे दक्षिणादान । क्षेत्री निर्मावे मठ नवीन ॥५॥
धर्माचा असावा अभिमान । राखावे परी सदा भान । करु नये कुणाचा अपमान । असावे सर्वसमावेशक ॥६॥
जो खरा अद्वैताभिमानी । राहील त्याची मधुर वाणी । गुंतणार ना मानापमानी । कर्मफल संन्यासी वृत्तीचा ॥७॥
शांत सौम्य आचरण । शोभे पीठाधीश स्वामीस । अस्तित्वेहि सामान्य जनास । लाभावे शांती प्रेम आधार ॥८॥
चारी दिशांचे मठाधिकारी । जानति मनोगत अंतरी । वागू पाहति आचार्यांपरी । आपापल्या मठ क्षेत्री ॥९॥
नास्तिकांचा प्रभाव संपला । वेदान्त चंडांशु प्रखर झाला । सर्वत्र पुन्हा होऊ लागला । वेदान्ताचा जयघोष ॥१०॥
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर । व्यापू पाहती प्रत्येकाचे अंतर । तेणे धर्माचा पडोनि विसर । चिंता, शोक, मोहादि अनावर ॥११॥
श्रुतिस्मृतींची थोर शिकवण । विसरत होते सकल जन । आचार्यांनी केले जागृत भान । आणि चित्त संस्कारित ॥१२॥
मातापित्यांना करावे वंदन । गुरुसी द्यावा सदैव मान । स्वधर्माचा असावा अभिमान । काम करावे आसक्तिवाचून ॥१३॥
चारी मठांतून हाच आदेश । पीठाधिकारी देती सर्वास । वाढे लोकांस विश्वास । मानिती हे खरे धर्मपीठ ॥१४॥
कांची मठाअंत बालस्वामी । घेती मनीच्या शंका फेडुनि । आचार्यांना प्रश्न विचारुनि । जेव्हां मिळेल संधी ॥१५॥
असाच केला एकदां प्रश्न । ‘ अवतार मानिलात बुद्धदेव । शून्यवादाचा केला पराभव । नव्हे कां हे परस्परविरुद्ध ? ’ ॥१६॥
जगद्गुरु सांगती समजावून । ‘ घातलास ना वाद सतत । माझ्याशी तीन दिनपर्यंत । परी झालास प्रेमे अधीन ॥१७॥
वादंग झाला तत्त्वावरुन । एकमेकां ना लेखिले हीन । अरे सांगून गेले विद्वान । वादे वादे जायते तत्त्वबोधः ॥१८॥
आपणा दोघात झाला वाद । सत्य शाश्वत उरले काय । श्रुतिमत जे दोघांसी मान्य । संपले तेथेच मतभेद ॥१९॥
बुद्धावतार झाला भूतकाली । त्यांचे अनुयायी माझे भोवती । वेदान्तधर्माची हानी करिती । शून्य वादाच्या प्रतिपादने ॥२०॥
परी ना जाणले त्यांनी तत्व । सिद्धार्थ बनला संन्यासी । त्यागुनि राज्य, पत्नी, पुत्रासी । तपाचरणे तो वैदिक मुनी ॥२१॥
दुःखे पोळता चित्तशुद्धी । वैराग्ये प्रगटली ज्ञानबुद्धी । अश्वत्थाखाली अनुभूति । अंती प्रगटला गौतम बुद्ध ॥२२॥
जैसी जेव्हां समाजस्थिती । तीजनुसार पृथ्वीवर । भगवंत घेई अवतार । कधी पूर्ण कधी अंश ॥२३॥
बुद्धापूर्वी कृष्णावतार । संहारकर्ता काल मात्र । जगास देई गीताशास्त्र । खल निर्दालन, सज्जन तारण ॥२४॥
लोटला काळ वाढले मांसाशन । मुख्या प्राण्यांचा व्यर्थ संहार । चालला यज्ञाच्या नांवावर । हा नव्हता वैदिक धर्म ॥२५॥
तामस आहारे तामस वृत्ति । वाढल्या समाज चित्ती । कधी ना वाटे कोणा तृप्ती । जणूं लोपली दैवी संपत्ती ॥२६॥
आसुरीवृत्तिचा करण्या नाश । क्रोध - लोभाचे तुटावे पाश । सर्वांभूती पाहावा ईश । सांगण्या घेतला बुद्धावतार ॥२७॥
कृष्णावतारी शास्त्र बोलणे । बुद्धावतारी मौन राखणे । आचरणाने जागा शिकविणे । कां न मस्तक नमवावे ? ॥२८॥
हे सूक्ष्म तत्त्व न जाणतां । बुद्धानुयायांनी भुलविले समस्ता । म्हणती गौतमाचा धर्म वेगळा । वैदिक मता न मानणारा ॥२९॥
म्हणून लागले करावे । बौद्धमताचे सशास्त्र खंडन । आणि वेदान्तधर्माचे मंडन । अद्वैत तत्त्वानुसार ॥३०॥
बाळा नीट समजून घे । बुद्धानुयायांचे शून्यत्व । वेदान्त्याचे पूर्णत्व । दृष्टीकोनांतील भिन्नत्व ॥३१॥
बघ हा पेला अर्धा भरला । पाहाणार्याचा दृष्टीकोन वेगळा । कोणी म्हणे अर्धा भरला । कोणी म्हणे अर्धा रिकामा ॥३२॥
ब्रह्मदृष्टीनें पाहता पूर्णत्व । शून्य दृष्टीनें पाहता शून्यत्व । व्यावहारिक सत्तेने सुखदुःख । परमार्थतः सच्चिदानंद ॥३३॥
श्रुतींना मानिती ते आस्तिक । श्रुतींना नाकारिती ते नास्तिक । आस्तिक अनुभवती ते पूर्णत्व । नास्तिक म्हणती अखेर शून्य ॥३४॥
याचसाठी अरे बाळा । मांडुक्यावर सुवर्ण सोप्या । गौडपादांनी कारिका रचिल्या । जोपासली वेदान्त परंपरा ॥३५॥
तुजहि करणे तेचि कार्य । वेदान्ताचे सर्व तथ्य । जग मिथ्या ब्रह्म सत्य । अनुभवावे स्वस्वरुप ॥३६॥
स्वस्वरुपाची ओळख पटता । कोणत्याहि भेदास नुरेल थारा । बुद्धीत होईल स्पष्ट सारा । पंथोपपंथांचा समन्वय ’ ॥३७॥
बालस्वामींचे झाले समाधान । वैदिकधर्माचे जेथे आचरण । पंथ विसरुनी धरावे चरण । कळले मजला गुरुवर्य ॥३८॥
श्री शंकराचार्य ध्यानमग्न । असता, जमुनि शिष्यगण । पूर्व प्रसंगांचे करुनि स्मरण । कथा सांगति अविस्मरणीय ॥३९॥
कथेतून चर्चा सुरु । चर्चेतून तत्वमंथन । मंथनातून शंका परिहार । संतोष पावे श्रोतृगण ॥४०॥
अशाच कांही सुंदर स्मृति । सांगती आचार्यांची महती । कधी एखादी चमत्कृति । जाणावे पुढील अध्यायी ॥४१॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । पंचविसावा अध्याय येथे समाप्त । कृपा होवो सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥४२॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।
N/A
References : N/A
Last Updated : March 21, 2017
TOP