श्री शंकराचार्य वंदना - अध्याय पंधरावा
निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.
जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधारा ॥१॥
कैसी भवानी प्रसन्न झाली । ज्ञानभिक्षा शंकरा घाली । बुद्धीस परिपक्वता आली । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥
निर्विशेष ब्रह्माहुनि शक्ति । निराळी नसे केव्हांही । परमसत्य हेचि पाही । शंकराचार्य उमजले ॥३॥
प्रत्येकास हे कां न कळे । जन्मे सत्य घेऊनि संगे । कोणत्या उपासनेने उमगे । येईल प्रत्यक्ष अनुभूति ॥४॥
काशीक्षेत्री घडली उपासना । बोधक ठरली आचार्यांना । चित्तशुद्धीस्तव नाना साधना । अंती जाणविती अद्वैता ॥५॥
हवे कर्म हवी भक्ति । परी ती आहेत साधने । चित्तशुद्धी साधे तेणे । पायाभूत जी आत्मज्ञाना ॥६॥
आदिशक्ति माता भवानी । आचार्यांवर प्रसन्न होऊनि । साक्षात्कारे देई उघडुनि । ज्ञानचक्षुंचे दिव्य द्वार ॥७॥
ज्ञाचचक्षु ऐसा उघडता । सरली सर्व समूळ चिंता । उत्तर येऊ लागले हाता । कोणत्याहि कूटाचे ॥८॥
श्रुतिस्मृतीतील सिद्धान्तांचे । स्वतःच करणे पूर्ण मंडन । आणि करावे उलटे खंडन । धरोनि तर्क प्रतिपक्षाचा ॥९॥
ऐशापरी निदिध्यासने । भाष्य उमलले बुद्धीत । जे प्रतिपादिले तर्कसंगत । अजोड मानिती पंडीत ॥१०॥
सामान्यांसाठी सोपा मार्ग । कधी रचिती सुंदर काव्य । स्तोत्रे भक्तिमार्गास्तव । लिहिली प्रसंगानुरुप ॥११॥
काशीचे मूळ दैवतास । स्तोत्र कालभैरवाष्टक रचुन । अन्नपूर्णा स्तोत्र गाऊन । वंदिले भक्तिनें सर्वांस्तव ॥१२॥
ध्यानस्थ बसता आचार्य । मनी प्रकटले गोविंदाचार्य । देती आदेश अनिवार्य । ‘ जावे बदरीक्षेत्रास ’ ॥१३॥
पूर्ण होईल आता मनोगत । आनंदित झाले शंकराचार्य । भेटतील कां गौडपादाचार्य । परमाचार्य मजसि जे ॥१४॥
सोडणे मज काशीक्षेत्र । सुटेल कां ते खरेच ? । उलगडे सारे काशीतच । प्रत्येकासी हे कूट ॥१५॥
काशी म्हणजे खरे काय । दोन अक्षरी सत्य दडले । काशीत जे मज लाभले । सर्वांसि तेचि सांगावे ॥१६॥
ऐसा करिता सहज विचार । ‘ काशीपंचक ’ रचना सुंदर । स्फुरली अंतरी मनोहर । रुप काशीचे स्पष्ट करी ॥१७॥
सोत्रातून केला साधा बोध । स्वतःत घ्यावा काशी शोध । तेणे उपजेल अंतरी प्रमोद । देह हेचि काशीक्षेत्र ॥१८॥
वसली तीर्थे अंतरात । गंगा म्हणजे ज्ञानाचा स्रोत । गुरुपदध्यान प्रयाग क्षेत्र । गया म्हणजे श्रद्धा दृढ ॥१९॥
साक्षी सार्या विश्वाचा । विश्वेश्वर म्हणजे अंतरात्मा । विराजमान देही असता । देहचि जाणा तीर्थक्षेत्र ॥२०॥
एकदां कोणी भाविक दीन । पुसे शंकरास विनवून । पूजेच्या यथार्थ सामग्रीवीण । कैसे पूजावे विश्वेश्वरा ॥२१॥
करुणासागर बोले शंकर । चित्ती होऊन अति हळूवार । पूजेचे कोणतेहि उपचार । करावे उत्पन्न मनोभावे ॥२२॥
भक्त करिती जे कांही अर्पण । बाळगुनि श्रद्धा भक्ति अनन्य । विश्वेश्वरासी सर्वथा मान्य । ‘ मानसपूजा ’ श्रेष्ठ साधन ॥२३॥
गंगेचे करुनि स्तवन । रचिले मधुर गंगास्तोत्र । महागणेशपंचरत्नस्तोत्र । वंदिता आदरे धुंडीराज ॥२४॥
सजीव अथवा निर्जीव । आचार्य घेती सर्वांचा निरोप । करुनि विश्वेश्वरा चंदनलेप । ठेविती सुमुहूर्ती प्रस्थान ॥२५॥
पद्मपादादि अनेक शिष्य । सदा आचार्यांच्या बरोबर । प्रत्येकाची निष्ठा प्रखर । आचार्य सेवेसी सदा तत्पर ॥२६॥
सोडुनि मोकळे मैदान । करणे होते गिर्यारोहण । यात्रा जरी अति कठीण । चित्त सर्वांचे श्रद्धा पूर्ण ॥२७॥
मनी उठता सद्भावना । अंतर्यामीची ती प्रेरणा । सदैव करी मार्गदर्शना । जेणे विघ्नांचे हरण ॥२८॥
पूजिला जो विश्वेश्वर । तोचि घेऊनि जाणार । सर्व संकटे हरणार । केदारनाथा भेटवील ॥२९॥
सुरु झाला प्रवास नीट । काशी हरिद्वार ऋषिकेश । झाला बदरीक्षेत्रात प्रवेश । योग्य समयी आचार्यांचा ॥३०॥
क्षेत्री दोन सुंदर पर्वत । एक नर दुजा नारायण । पडता पहिले सूर्यकिरण । दिसे शोभा अवर्णनीय ॥३१॥
उभे जणूं सुवर्णाचे पर्वत । परी सूर्य येता वर किंचित् । वाटे ओघळते तेथे रजत । अलौकिक वैभव सृष्टीचे ॥३२॥
जरी पर्वता नाम हिमालय । तो तर सौंदर्याचे आलय । साधका साधण्या मनोलय । निसर्ग देई पूर्ण साथ ॥३३॥
शिष्यांनी साधावा मनोलय । स्वये पुजावे परात्पर गुरुवर्य । कारिकांवर करुनि भाष्य । गौडपादे रचिल्या ज्या ॥३४॥
कैसे सुचति ऐसे विचार । भोवती येवढी सृष्टी सुंदर । तरी कैसे भोगापासून दूर । साधक आणि शंकराचार्य ॥३५॥
व्यवहारी लोकांचे अज्ञान । न कळे साधकांचे मन । ब्रह्मानंदी जे सदा मग्न । होती सहज ऐशास्थळी ॥३६॥
अलकनंदेचा खळाळ । वाटे आदिशक्तिचा कल्लोळ । भक्तिभावाची घेऊनि माळ । धावे भेटाया नारायणा ॥३७॥
हिमालयाची उत्तुंग शिखरे । जणूं सांगति उच्चस्वरे । पळती दूर षड्रिपु सारे । यारे आनंद लुटाया ॥३८॥
ऐशा सुंदर शांत प्रदेशी । शिष्यगणांसह येता शंकर । भेटाया जे उत्सुक अनावर । विनविती चला मंदिरी ॥३९॥
तत्पकुंडी करुनि स्नान । घ्यावया नारायणाचे दर्शन । ठेवोनि चित्त शांत प्रसन्न । मंदिरी प्रवेशिती आचार्य ॥४०॥
घडले काय देवालयी । तैसेच बदरी क्षेत्रामाजी । कथा आचार्यांच्या भ्रमणाची । जाणावी पुढील अध्यायी ॥४१॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । पंधरावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥४२॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।
N/A
References : N/A
Last Updated : March 21, 2017
TOP