मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य|

श्री शंकराचार्य वंदना - अध्याय सत्ताविसावा

निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.


जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधारा ॥१॥
कळले आचार्यांसी स्पष्ट । काळ झाला मनी अधीर । बत्तीस वर्षे झाली पार । आता देणे दृढ आलिंगन ॥२॥
आचार्य राखिती पूर्ण मौन । देती सर्वास आशीर्वचन । अंतरी सतत लागले ध्यान । जीवनमुक्ताचे अंतीम दिन ॥३॥
आठविती शिवगुरुंचे शब्द । मृत्यू तर तुझा सुहृद । येता होऊ नको हतबुद्ध । मृत्यूवर मात करी सुबुद्ध ॥४॥
तसेच आठविती काळाचे शब्द । येईन जेव्हां परतून । देईन दृढ आलिंगन । होणार नाही पराभूत ॥५॥
काळ म्हणजे परमेश्वर । सोडी इथेच देह नश्वर । चैतन्यास दावी आपुले घर । जेथूनी आले, तेथेच जाणे ॥६॥
देह म्हणजे पंचमहाभूत । होती जैशी एकत्र । तैसी तैसी आकृति उमटत । म्हणती कुरुप वा सुंदर ॥७॥
परी चैतन्याचे रुप निराळे । मोहक सुंदर आगळे । भरुनी राही विश्व सगळे । तेणे अनाहत नाद गगनांत ॥८॥
वायूची लहर खेळे । तेजाचे रुप सळसळे । जल सर्वत्र खळखळे । सुगंधाची लाट पृथ्वीमुळे ॥९॥
परी संसारी वेळ कोण । चैतन्याशी हितगुज करण्या । धाव धावे विषयी रमण्या । जड द्रव्याचे आकर्षण ॥१०॥
चैतन्य जाता निघून । काय करायचे देह जपून । अग्नीस करुन अर्पण । राहू देऊ नये शेष ॥११॥
अस्थि रक्षा सर्व कांही । जलामध्यें सोडून पाही । स्थूल देहाची नामनिशाणी । मिटवावी संपूर्ण ॥१२॥
परी वेडे भाविक जन । दात, नख, केस ठेवती जपून । अथवा समाधी बांधून । अनित्यासी देती नित्यत्व ॥१३॥
हेच टाळायाचे मज । सांगितले कित्येकदा गूज । मरणार्‍याचे काय काज । जपावे त्याचे जीवनतत्व ॥१४॥
परी होऊनि भावनाविवश । विसरती धर्माचा आदेश । आणि ज्ञानियांचा उपदेश । बांधति भव्य समाधिस्थळ ॥१५॥
जरी हे सर्व टाळायाचे । संन्यासधर्मा पाळायाचे । ईशान्य दिशेस धरायचे । चालत राहणे अखंड ॥१६॥
आठवावी स्मृतिवचने । संन्याशाचे कैसे वागणे । देह पडेल तेथे पडू देणे । नाही कोठे गुंतून पडणे ॥१७॥
जरी नाही कोठे गुंतणे । कैलासासी संलग्न होणे । अंतःकरणाचे हेच सांगणे । त्यासाठी हवी कांची सोडणे ॥१८॥
देहासह की देहविरहीत । कांची क्षेत्रातून गाठणे केदार । आचार्यांचा गहन विचार । कोणा कैसा कळावा ॥१९॥
कामाक्षी मंदीराचे मागील बाजूस । शंकराचार्य घालून सिद्धासनास । सांगे कांची पीठाचा इतिहास । पावले विदेह मुक्तीस ॥२०॥
कोणी म्हणति आचार्य । जाऊन केदारक्षेत्रांत । ध्यानस्थ झाले गुहेत । तेथेच त्यांची समाधी ॥२१॥
कोणी म्हणती हिमालयांत । आचार्य झाले कोठे गुप्त । कोणासी नाही माहीत । केव्हां झाले स्वरुपी लीन ॥२२॥
समन्वयवादी देती निर्णय । सोडून देह कांचीत । आत्मज्योती चारी पीठात । झाली एकाच वेळी प्रज्वलित ॥२३॥
अलौकिक व्यक्तिमत्व आचार्यांचे । अलौकिक तैसेच जग सोडणे । ज्या ज्या क्षेत्री चालली चरणे । श्रद्धेने मस्तक नमविणे ॥२४॥
आचार्यांचा अखंड प्रवास । कांची क्षेत्री गेला संपुष्टास । विजययात्रांचा इतिहास । नंतर नाही उपलब्ध ॥२५॥
ज्योतीने ज्योत उजळत । तेजोमय केला देश भारत । मठ स्थापुनि चारी दिशांत । वैदिकधर्म केला प्रतिष्ठित ॥२६॥
पूर्णत्वा जाता आपुले ध्येय । कोणीही अवतार ना रेंगाळत । आपुल्या मूळ परमात्म स्वरुपात । विलीन होती तत्काळ ॥२७॥
तैसेच श्री शंकराचार्य । अमर करुनि शांकर वेदान्त । मिळून गेले शिवरुपात । अद्वैतासी परम स्थान ॥२८॥
कैसे फेडावे त्यांचे ऋण । कैसे करावे नामस्मरण । कोणते ठेवावे आचरण । भांबावले भक्त शिष्यगण ॥२९॥
आचार्य गेले निघोन । जाहले प्रत्येक मन खिन्न । परी आचार्यांचे शब्द आठवून । लागती जोमानें कार्यास ॥३०॥
शिष्यांच्या मनी एकच भाव । जगती नाही अन्य कोणी । भगवत् पादाचार्य शंकरावाणी । जगद्गुरु हे ज्ञानखाणी ॥३१॥
‘ आचार्याः शंकराचार्याः । सन्तु जन्मनि जन्मनि ’ । हीच करिती मागणी । नारायणाचे चरणी ॥३२॥
येथून पुढे भविष्यांत । पेलवे ना ज्यांना अद्वैत । मत्सर होऊन जागृत । धिःकारतील आचार्य भाष्य ॥३३॥
परी पुन्हां उगवेल ज्ञानसूर्य । भाष्यकाराते वाट पुसत । अजाण भक्तांसि सांगेल सार्थ । ज्ञानेश्वरी नामे गीतेचा भावार्थ ॥३४॥
विज्ञान युगांतील विचारवंत । पाश्चात्य विचारांचे पंडीत । विविधतेतून एकात्मतेचा मंत्र । म्हणतील दिधला शंकराचार्ये ॥३५॥
परी पदवी मंडित विद्वान । म्हणतील आचार्या बौद्ध प्रच्छन्न । कुणी म्हणतील संन्यासी धूर्त । देतील दूषणे अनंत ॥३६॥
देशोदेशींचे तत्वज्ञ । मानोत कोणताहि पंथ । परी आचार्यप्रणित अद्वैतमत । सर्वा दिसे अग्रगण्य ॥३७॥
विरोधी भक्तिने कोणी प्रेरित । आचार्य मताचे करण्या खंडन । उठेल परी करोनि मंडन । म्हणतील एकमेवाद्वितीय हे ॥३८॥
भक्तीमार्गाचे प्रेमळ साधक । आचार्यांची स्तोत्रे सुंदर । हृदयी ठेवतील निरंतर । उपासनेचे श्रेष्ठ साधन ॥३९॥
आचार्य म्हणजे एकत्व । आचार्य म्हणजे अभेदत्व । आचार्य म्हणजे समानत्व । आचार्य म्हणजे साक्षात् ज्ञान ॥४०॥
केले सर्वास खुले द्वार । मुक्तिचा प्रत्येकास अधिकार । बंधाचा सदा धिक्कार । स्वतंत्रतेचा पुरस्कार ॥४१॥
मुक्तिचा सदा जयजयकार । आत्मतेजाचा जणूं सागर । वंदिले मी आदि शंकर । कलियुगातील ज्ञानावतार ॥४२॥
जरी नाही मज अधिकार । सर्वांच्या कृपेने येथवर । वर्णिला आदि शंकरावतार । त्यांनीच दिले लेखनबळ ॥४३॥
जरी पावले स्त्रीजन्मा । कार्य करुन घेतले उमारमणा । चालले शोधित पाऊलखुणा । कळले स्त्रीधर्म नाही उणा ॥४४॥
रुढींनी दिला नकार । श्रुतिस्मृतींनी दिला अधिकार । आत्मज्ञानाच्या मार्गावर । स्त्री पुरुष भेद निराधार ॥४५॥
त्रुटी आधळतील विद्वाना । नम्रत्वे करिते क्षमायाचना । अंतरीचा भाव जाणा । हीच अखेर प्रार्थना ॥४६॥
लेखन करिता आनंद । मनन करिता आनंद । भोगला आनंदी - आनंद । आता थांबली लेखणी ॥४७॥
झाली ग्रंथ संपादणी । प्रसन्न होता शूलपाणी । वृत्ति आता उदासवाणी । सांभाळा गुरुवरा शंकरा ॥४८॥
निर्मला होऊन पदी लीन । विनवी उरले जे जीवन । कर्मभोग सारे संपून । लाभो अंती स्वस्वरुप ॥४९॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । सत्ताविसावा अध्याय येथे समाप्त । कृपा जी आपुली झाली प्राप्त । तेणे ग्रंथ झाला समाप्त ॥५०॥
शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु ।
इति श्री आदि शंकर लीलामृत ग्रंथः समाप्तः ।
( एकूण ओवी संख्या १२११ )
॥ श्री गुरुदेव दत्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP