श्री शंकराचार्य वंदना - अध्याय दहावा
निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र.
जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥
मार्ग चालता प्रौढत्व । शंकरास जगदानुभवे कळे तत्व । गुरु गोविंदयतींचे माहात्म्य । वर्णिले नवव्या अध्यायी ॥२॥
गोविंदयति पुसति प्रश्न । बाळा सांग रे तू कोण । पटविण्या अंतरीची खूण । शंकर गाई आत्मषट्क ॥३॥
अहंकार अथवा बुद्धि मन । मी नाही अंतःकरण । तसाच नाही पंचप्राण । रुप माजेह सत्चित्घन ॥४॥
ज्ञानेन्द्रिय अथवा कर्मेन्द्रिय । वायू तेज जल वा भौम । मी नाही महाभूत । रुप माझे सच्चिदानंद ॥५॥
लोभमोहादि मनोभाव । पापपुण्यासि नाही ठाव । पुरुषार्थाहि नसे वाव । रुप माझे म्हणजे शिव ॥६॥
मार्गी जे स्फुरले स्तोत्र । शंकर गाई उस्फूर्त । मधुर स्वर भाव आर्त । सर्व झाले मंत्रमुग्ध ॥७॥
संपता स्तोत्र सुंदर । नतमस्तक झाला शंकर । गोविंदयतींच्या पायावर । स्वतःस अर्पिले शिष्यभावे ॥८॥
कळली अंतरीची खूण स्पष्ट । गोविंयति झाले संतुष्ट । संपले आता पाहणे वाट । समोर उभा पट्टशिष्य ॥९॥
सांभाळित लोकव्यवहार । म्हणति प्रेमे सर्वांसमोर । वाट पाहिली आजवर । भेटलास बाळा शिष्यवर ॥१०॥
तुझे मनोरथ पूर्ण करीन । संप्रदायाचे सर्व ज्ञान । तुझ्या हाती सोपवीन । वैदिकधर्मा प्रस्थापी ॥११॥
दण्डग्रहणादि चिन्हांकित । संन्यास दिधला विधीपूर्वक । नाम दिधले नवीन । श्रीमत् शंकर भगवत् पादाचार्य ॥१२॥
गुरुशिष्याची अपूर्व जोडी । वेदान्ताची समान गोडी । शास्त्रातील गूढ कोडी । गुरु सांगे उलगडोनि ॥१३॥
प्रथम वर्षी शिकवला हठयोग । दुसरे वर्षी राजयोग । तिसरे वर्षी ज्ञानयोग । शंकर करी आत्मसात ॥१४॥
अनुभूतीसह अध्यात्म । गुरुकडून होता प्राप्त । संशय होऊनि सारे समाप्त । अनुभवले जीव तोच शिव ॥१५॥
गाईल्या स्तोत्राचे मर्म । शंकर मनी ठसले पूर्ण । आत्मज्ञाने भरे अंतःकरण । उमजे निर्वाणातील पूर्णत्व ॥१६॥
शंकर जणू ज्ञानातीत । गोविंदयति समाधान पावत । नर्मदातीरी आपुल्या गुहेत । पुन्हा बैसले समाधिस्थ ॥१७॥
संकल्प शंकराच्या कसोटीचा । क्षण कठोर परीक्षेचा । सिद्धी - शास्त्र - तत्त्व सर्वांचा । समन्वय साधेल हा कैसा ॥१८॥
जरी कसोटीस पुरा उतरेल । नर्मदाकांठ सोडून जाईल । काशीक्षेत्री पुढे होईल । शंकराचे कार्य विस्तारित ॥१९॥
वर्षाऋतुचा होता समय । नर्मदा वाहे दुथडी भरुन । सविकल्प समाधी लावून । गुहेत बैसले गोविंदयति ॥२०॥
अचानक येई महापूर । पाणी गुहेपर्यंत घाटावर । चढत चालले भराभर । भयभीत झाले सर्वजण ॥२१॥
शंकरास म्हणति सांग सांग । नर्मदेचा दिसतो वेगळा रंग । जरी ना केला समाधिभंग । यतिवर कैसे वाचतील ? ॥२२॥
तुज घेणे निर्णय कांही । काय करु सांग लवलाही । कालक्षेप करणे योग्य नाहीं । पूर वाढतो क्षणोक्षणी ॥२३॥
होऊ नका गलितगात्र । शंकर म्हणे आठवा शास्त्रा । माता कां गिलते कधी पुत्रा । आतुर ती चरणास्नाना ॥२४॥
कमंडलु ठेविला गुहाद्वारी । तेथेच बैसला हात जोडुनि । प्रार्थी मधुर स्तोत्र गाऊनी । विनवी अनावर नर्मदेसी ॥२५॥
कैसा शंकराचा विश्वास । पूर्वी वळविले पूर्णेस । आता अडविणे नर्मदेस । होईल कां तो यशस्वी ? ॥२६॥
गुहेपर्यंत येई पाणी । कमंडलुत शिरता थबकुनि । संपूर्ण संतुष्ट होऊनि । परते मागे क्षणोक्षणी ॥२७॥
गाऊनि नर्मदाष्टक आर्त स्वरे । शिष्योत्तम तो संकट निवारे । हळूंहळूं नर्मदा ओसरे । गुरु समाधि ना भंगली ॥२८॥
निश्चये कैसा बैसला शंकर । चित्त विचलित ना क्षणभर । लोक करिती जयजयकार । वार्ता पसरे सभोवार ॥२९॥
संकल्प समाधिचे उत्थान । गोविंदयति सोडून आसन । विचारती कां जमले जन । कशास्तव हा जयघोष ॥३०॥
जन सगळे अचंबित । सांगति घडला वृत्तान्त । जल कैसे अडवले कमंडलुत । वर्णन पूर्ण रसभरित ॥३१॥
शिष्याचा तो पराक्रम । गोविंदयतींसी सांगावा यथाक्रम । प्रत्येकास हवा अग्रक्रम । शंकर मात्र उभा मौन ॥३२॥
ऐकुनि प्रसंग सविस्तर । म्हणति उतरला पुरेपूर । कसोटीस माझ्या शंकर । खरा भगवद् पादाचार्य ॥३३॥
यतिवर्यांना पडला मोह । शंकराचा प्रेमळ संग । कां करावा आत्ताच भंग ? । आश्रमी रंगाचा बेरंग ॥३४॥
लोकांचि मति झाली गुंग । स्मरति तो अघटित प्रसंग । शंकराचे गुण गाण्यात दंग । म्हणति खराच शिष्योत्तम ॥३५॥
गोविंदयति विचारात गर्क । तर्हेतर्हेचे करुनि तर्क । शंकराद दाविणे काशी मार्ग । विलंब नको आता फार ॥३६॥
बोलाविती शंकरास जवळ । जाणिले रे तुझे तपोबळ । व्यर्थ जाता नये काळ । प्रस्थान ठेविणे काशीचे ॥३७॥
काशीत राहती श्रेष्ठ पंडीत । विद्वत् सभा चालती नित्य । आपले मत मांडणे यथातथ्य । तेथेच पूर्ण उमगेल ॥३८॥
मजजवळी होते ते दिले । तूहि ते सर्वस्वी संपादिले । परंतु यश लौकिकातले । आवश्यक जीवन ध्येयास्तव ॥३९॥
संपता हा वर्षाकाळ । नर्मदाकाठीचा संपवी खेळ । पाहुनि सुयोग्य वेळ । जावे बाळा काशीस ॥४०॥
दूर राहिली पूर्णा मातेसह । सोडणे नर्मदाहि गुरुसह । गंगाकाळ गाठणे शिष्यांसह । शंकर कांहीसा खिन्न ॥४१॥
मनी योजिले जे कार्य । त्यास्तव कष्ट अनिवार्य । आदेश देती जो यतिवर्य । सिद्धीस नेईल माझे ध्येय ॥४२॥
समजावी मनास विवेके । भावभावनांचा कल्लोळ आवरे । गोविंदयतींना अत्यादरे । विनवी द्यावा उपदेश ॥४३॥
नर्मदाकाठी गुरुगृही । गोविंदयति शंकराचार्यांस । देती कोणता उपदेश । जाणावा पुढील अध्यायी ॥४४॥
इति श्री आदि शंकर लीलामृत । दहावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । करण्या ग्रंथ पूर्ण सार्थ ॥४५॥
शुभं भवतुं । शुभं भवतुं । शुभं भवतुं ।
N/A
References : N/A
Last Updated : March 19, 2017
TOP