अध्याय १३ वा - श्लोक ३ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
शृणुष्वावहितो राजन्नपि गुह्यं वदामि ते । ब्रूयुः स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत ॥३॥
राष्ट्रभंगार्थ परचक्र । क्षोभलें असतां महाघोर । त्याचें ऐकती अभयपत्र । तेंवी सादर हें ऐकें ॥८४॥
किं कुटुंबेंसीं कारागार । प्राप्त झालिया अति दुष्कर । ते ऐकती निर्गममंत्र । तेंवी सादर हें परिसें ॥८५॥
कीं एकुलता गुणाढ्य बाळ । ग्रासावया प्रवर्ते काळ । तेथ उपाय कथितां पुण्यशीळ । ऐके अविकळ माउली ॥८६॥
त्याहीहूनि कोटिगुणें । सादर होऊनि अंतःकरणें । परम गुह्य हें श्रवण करणें । तोषोनि प्रश्नें कथितों मी ॥८७॥
हें तों अकथ्य परम रहस्य । परी मिनल्या सत्पात्र स्निग्ध शिष्य । गुह्यही बोधिती सद्गुरु त्यास । सविश्वास जाणोनि ॥८८॥
तरी तुज देखोनि सद्गुणालय । स्थितप्रज‘ज अमलाशय । अनसूय आणि हरिगुणप्रिय । कथनीं हृदय प्रशस्त ॥८९॥
म्हणसी तुम्हांसै रहस्य कोण । तरी जे ब्रह्मविद्या परम गहन । इयेसि अपात्र सामान्यजणें । जेवीं अयोग्य श्वान रडे तें ॥९०॥
पूर्ण वैराग्यें आथिले । अंतर्निष्ठ मुमुक्षु भले । सनकादिकांचे पंक्ति आले । ते भुकेले या रसा ॥९१॥
प्राकृत प्रपंचा बा दवडी । देखोनि पडिले विषयगोडी । त्यांसि एथींची अनावडी । कीं ते बराडी भवभणग ॥९२॥
त्यांसि प्रवृत्ति जे प्रयोजिली । श्रेष्ठीं पाहिजे ती रुचविली । ब्रह्मविद्या गुप्त केली । भली पाहिली यालागीं ॥९३॥
ज्याचे पदरीं नाहीं कवडी । त्यासि राज्यभोगाच्या परवडी । भोगूं सांगतां न टके जोडी । मानी वांकुडी शिकवण ॥९४॥
अनेक सुकृताच्या बळें । विषयविरागें प्रज्ञा उजळे । त्यांसि हे ब्रह्मविद्या आकळे । येर आंधळे या ठायीं ॥९५॥
असुकृती जे अविरक्त । त्यांसि कथितां हा परमार्थ । उभयाधिकारीं होती च्युत । विषयासक्त म्हणोनि ॥९६॥
विरक्तीवीण ब्रह्मविद्या । न फळे न वचेचि अविद्या । कर्मफळाच्या अर्थवादा । जाणोनि श्रद्धा मग नुपजे ॥९७॥
कर्मब्रह्म उभय भ्रष्ट । अध्यात्मवक्ते विषयनिष्ठ । होती श्वपचाहून कनिष्टः । ते पापिष्ठ या बोधें ॥९८॥
रांधणें न तपतां भाकरी । कीं आंधण न येतां वैरिली खिरी । तैसा अयोग्य अनधिकारी । हें वर्म चतुरीं जाणावें ॥९९॥
इत्यादि वचनीं रहस्यखुण । शुकें नृपासि कथोन पूर्ण । पुढें चालविलें व्याख्यान । तें सर्वज्ञ परिसोत ॥१००॥
तथाऽघवदनान्मृत्यो रक्षित्वा वत्सपालकान् । सरित्पुलिनमानीय भगवानिदमब्रवीत् ॥४॥
कालरूप व्याळवदना - । पासूनि वत्सवत्सपगणां । रक्षोनि आणिले सरोवरपुलिना । मग या वचनां त्यां बोले ॥१॥
श्रीभगवानुवाच - अहोऽतिरम्यं पुलिनं वयस्याः स्वकेलिसंपन्मृदुलाच्छवालुकम् ।
स्फुटत्सरोगंधहृतालिपत्रिकध्वनिप्रतिध्वानलसद्द्रुमाकुलम् ॥५॥
भोजनविधानाकारणें । पुलिनस्तवनें मधुसूदनें । किजे वयस्य संबोधनें । तेंचि श्रवणें अवधारा ॥२॥
वत्सपां म्हणे कंबुकंठ । रम्य पहा हो वाळुवंट । जेथें क्रीडतां यथोक्त । तोष उत्कट दुणवटे ॥३॥
आपुले क्रीडेची संपत्ति । ते एथ असे सर्व आयती । जेथ क्रीडतां निजविश्रांति । नाठवे चित्तीं कल्पना ॥४॥
विनयतेचें मवाळपण । विशुद्ध जैसें अंतःकरण । स्वच्छ सुंदर मृदुत्तर पूर्ण । गुणसंपन्न पुलिन हें ॥१०५॥
विकसित पद्मीं सरोवर भरलें । दिव्यसौरभ्यें आथिलें गंधपाशीं आकर्षिले । भ्रमरवर्गा पंकजीं ॥६॥
पक्षी जलाशयाश्रयीं । आपुलिया स्व स्व विषयीं । रमोनि रुंजतां जलाच्या ठायीं । ते उमटे नवाई ध्वनीची ॥७॥
तये ध्वनीचा प्रतिनाद । द्रुमीं काननीं उमटे विशद । तेणें मुखरित पादपवृंद । विलसे तोषद पुलिन हें ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : April 29, 2017
TOP