अध्याय १३ वा - श्लोक ६ ते ८

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अत्र भोक्तव्यमस्माभिर्दिवा रूढं क्षुधाऽर्दिताः । वत्साः समीपेऽपः पीत्वा चरंतु शनकैस्तृणम् ॥६॥

ऐशिये पुलिनीं मनोरमीं । क्षुधार्दित परम आम्ही । या रे जेवूं समागमीं । आला व्योमीं दिन बहु ॥९॥
नित्याच्या भोजनाची वेळ । क्रमोनी झाली वाढ वेळ । एथ जेवूं या रे सकळ । क्षुधा परम लागल्या ॥११०॥
पाणी पाऊनि वत्समेळ । एथ थांबवा रे सकळ । जळासमीप तृण कोमळ । तें ही हळूहळू चरतील ॥११॥

श्रीशुक उवाच :- तथेति पाययित्वाऽर्भा वत्सानारुध्य शाद्वले ।
मुक्त्वा शिक्यानि बुभुजुः समं भगवता मुदा ॥७॥

शुक म्हणे परिसें सावधान । ऐसें ऐकोनि कृष्णवचन । आज्ञां सप्रेमें वंदून । वत्सें पाजून थांबविलीं ॥१२॥
कोमळ हिरवीं लसलसित । रसाळ तृणें महिमंडित । तेथ हो करून वत्सें समस्त । भोजनार्थ मिळाले ॥१३॥
तळीं आंथरूनि कांबळिया । त्यावरि सोडूनि जाळिया । गडी जेविती सांवळिया । सवें गोवळीयां हरि जेवी ॥१४॥
तया भोजनाची पंक्तिरचना । ऐकोनि राया धरीं सूचना । जें गुह्य दुर्लभ श्रुतिपुराणा । अमरगणा अगोचर ॥११५॥

कृष्णस्य विष्वक्पुरुराजिमंडलैरभ्याननाः फुल्लदृशो व्रजार्भकाः ।
सहोपविष्टा विपिने विरेजुश्र्छदा यथांऽभोरुहकर्णिकायाः ॥८॥

तये क्रीडेमाजीं सकळ । शोभते झाले वत्सपाळ । कृष्णासभोंवतें मंडळ । मध्यें गोपाळ शोभला ॥१६॥
पुरुराजि म्हणिजे बहुत पंक्ति । कृष्णाभोंवत्या चक्राकृति । जेवीं षोढा श्रीभगवंतीं । आवरण दैवती विराजे ॥१७॥
विष्वक् म्हणजे सर्वांकडूनि । कृष्णा सन्मुख अवघीं जणीं । अनेक पंक्तींची मांडणी । सुखभोजनीं बैसले ॥१८॥
सह म्हणजे अंतररहित । ऐक्य समरसें भेदातीत । कृष्णवदनातें लक्षीत । कृष्णीं निरत तादात्म्यें ॥१९॥
श्रीकृष्णवदनचंद्रवेधें । वत्सपांचीं नेत्रकुमुदें । विकासलीं परमानंदें । प्रफुल्लितें शोभती ॥१२०॥
कीं कृष्णतरणीच्या कृपाकिरणीं । फावल्या वत्सपदृक्पद्मिनी । कीं कमलकणिकेभोंवत्या श्रेणि । सहस्रपत्रीं जलजांच्या ॥२१॥
नयन वेधिले श्रीकृष्णवदनें । कृष्णाकार झालीं मनें । पुढें जे जे क्रीडा करणें । ते ते होणें हरितंत्र ॥२२॥
जेवीं बाळ पाहोनि छाये । छंदें हालवी हातपाय । छाया तैशीच चंचल होय । तेणें न्याय वत्सप ॥२३॥
ऐसे बैसले घनदाट । इंद्रिय प्राणें मनें सकट । होऊनि श्रीकृष्णीं प्रविष्ट । क्रीडा अचेष्ट चेष्टती ॥२४॥
अनेक काष्ठीं एक शकट । कीं अनेक तंतु एक पट । कीं शरीर अनेक तत्त्वांसकट । वर्ते प्रकट एकाज्ञा ॥१२५॥
हस्तापादादि हालवणें । चळणें वळणें संभाषणें । अवघ्यांमाजीं एक कृष्णें । अभिन्नपणें ते क्रीडा ॥२६॥
आगमी म्हणती कुलाचार । मीमांसक म्हणती दिव्यसत्र । वेदांती म्हणती आत्माकार । हे अगोचर हरिक्रीडा ॥२७॥
ऐसे एकात्मभावोपविष्ट । गडी कृष्णेंसीं एकवाट । अन्नें वाढिलीं चोखट । पात्रें स्पष्ट तें ऐका ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP