अध्याय १३ वा - श्लोक ३८ ते ४३
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
इति संचिंत्य दाशार्हो वत्सान् सवयसानपि । सर्वानाचष्ट वैकुंठं चक्षुषा वयुनेन सः ॥३८॥
ऐसा राम विवेकारूढ । होऊनि निश्चय केला दृढ । ज्ञानदृष्टि करूनि उघड । देखे कैवाड कृष्णाचें ॥३४॥
वत्स आणि वत्सपगण । ज्ञानदृष्टी पाहे पूर्ण । श्रीवैकुंठ नारायण । अवघें जाण देखिलें ॥४३५॥
सविचारें साधारण । कृष्णरूपचि सर्व देखोन । विशेष कृष्णोपदेशें करून । करी विवरण तें ऐका ॥३६॥
नैते सुरेशा ऋषयो न चैते त्वमेव भासीश भिदाश्रयेऽपि ।
सर्वं पृथक्त्वं निगमात्कथं वदेत्युक्तेन वृत्तं प्रभुणा बलोऽवैत् ॥३९॥
ईश ऐसें संबोधन । देऊनि म्हणे संकर्षण । मायानियंता तूं श्रीकृष्ण । अगाध विंदाण हें तुझें ॥३७॥
पूर्वील दैवमायाकृत । ऋषिअंश हे वत्स समस्त । देवतांश वत्सप एथ । मज हें विदित आजवरी ॥३८॥
आतां तैसें नव्हेचि जाण । वत्स वत्सप भेदें करून । कैसा झालासी मज हे खुण । विविक्त विवरून वद वेगीं ॥३९॥
ऐसें प्रार्थिलें संकर्षणें । ऐकोनि समर्थें श्रीकृष्णें । निगमरूपें स्वमुखें खुणें । बोधितां खुणें जाणीतलें ॥४४०॥
अग्रजासि बोधी कृष्णा । मन्मय आब्रह्म संपूर्ण । हें विसरोनि सृजनाभिमान । धरी द्रुहिण स्वदेहीं ॥४१॥
तेणें रजाभिमानें करून । केलें वत्सपवत्सहरण । त्याचें करावया स्मयभंजन । हें विंदाण म्यां केलें ॥४२॥
अद्वितीय ब्रह्म एक । हें प्रमाण उपनिषद्वाक्य । तो मी पूर्णब्रह्म विश्वदृक । विधीसीं सम्यक उपजावया ॥४३॥
विधीसहित विश्वसृजन । कर्ता समर्थ मी श्रीकृष्ण । झालों वत्स वत्सपगण । कमलासनछलनार्थ ॥४४॥
ऐकोनि हें परम रहस्य । राम पावला चिन्मयतोष । आश्रऊनि स्वानंदकोश । नावेक दृश्य विसरला ॥४४५॥
धृतावतारसंपादणी । विचित्र करितो चक्रपाणि । तें पहावया अंतःकरणीं । स्मृति परतोनि चेइली ॥४६॥
मग उघडोनि नेत्रकमळा । परिमार्जूनि आनंदजळा । पहाता झाला श्रीकृष्णलीला । तें नृपाळा शुक सांगे ॥४७॥
तावदेत्यात्मभूरात्ममानेन त्रुट्यनेहसा । पुरोवदब्दं क्रीडंतं ददृशे सकलं हरिम् ॥४०॥
कृष्णें रामासि वृत्तांत । कथिल्यानंतर वर्तली मात । वत्सवत्सप वेषवंत । हरि क्रीडत यथापूर्व ॥४८॥
अब्दपर्यंत व्रजीं हरि । क्रीडत असतां पहिलेपरी । ब्रह्मा पाहे अभ्यंतरीं । काळ त्रुटिभरी लोटल्या ॥४९॥
व्रजीं येऊनि पाहे नेत्रीं । तंव वत्सवत्सपेंसी क्रीडतां हरि । देखोनि ब्रह्मा विचार करी । अभ्यंतरीं तें ऐका ॥४५०॥
यावन्तो गोकुले बालाः सवत्साः सर्व एव हि । मायाशये शयाना मे नाद्यापि पुनरुत्थिताः ॥४१॥
वत्सें वत्सप व्रजींचे जितुले । स्वमायामंचकीं म्यां पहुडविले । ते अद्यापि नाहीं उठविले । हे एथ आले कोठूनि ॥५१॥
एत एतेऽत्र कुत्रत्या मन्मायामोहितेतरे । तावन्त एव तत्राब्दं क्रीडन्तो विष्णुना समम् ॥४२॥
स्वमायेनें म्यां मोहिले । त्या वेगळे हे कोठूनि आले । तितुके तैसेच तेथ पाहिले । क्रीडत ठेले पूर्णाब्द ॥५२॥
विष्णुसमागमें क्रीडती । विष्णूसमागमें वेधक शक्ति । विष्णूमयचि सर्व भासती । मज नुमजती ते कीं हे ॥५३॥
मायातल्पीं म्यां निजविले । हे तैसेचि कोठूनि आले । ऐसे वितर्क अनेक केले । परी जाणितले न वचति ॥५४॥
एवमेतेषु भेदेषु चिरं ध्यात्वा स आत्मभूः । सत्याः के कतरे नेति ज्ञातुं नेष्टे कथंचन ॥४३॥
एवं अनेक वितर्कभेदीं । विवंचूनि पाहे विधि । निश्चयाची न लभे शुद्धि । थकली बुद्धि स्वकार्यीं ॥४५५॥
चिरकाळ पाहतां विवरूनि । सत्य कोणतें नुमजे ध्यानीं । अवांतर हे कोणाची करणी । झाला नेणोनि विमूढ ॥५६॥
सत्यज्ञानानंतब्रह्म । तो हा श्रीकृष्ण पुरुषोत्तम । येर केवल मायाभ्रम । जो हा क्रम विधिकृत ॥५७॥
देवमनुष्यतिर्यक । अवघे विधिकृत त्रिगुणात्मक । पूर्वील वत्सप आणि वत्सक । तन्मायिक त्रैगुण्य ॥५८॥
सत्यसन्मात्र कृष्णमय । अयोनिसंभव अविक्रिय । वत्स वत्सपांचा समुदाय । हा केवी होय असत्य ॥५९॥
सत्यासी असत्य म्हणते समयीं । जिव्हा तुटोनि न पडे कायी । पूर्व अपूर्व इयें अन्वयीं । ज्ञप्ति ठायीं हरपली ॥४६०॥
N/A
References : N/A
Last Updated : April 29, 2017
TOP