अध्याय १३ वा - श्लोक २४ ते २६

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


गावस्ततो गोष्ठमुपेत्य सत्वरं हुंकारघोषैः परिहूत संगतान् ।
स्वकान्स्वकान्वत्सतरानपाययन् मुहुर्लिहंत्यः स्रवदौधसं पयः ॥२४॥

गायी येऊनि गोष्ठासमीप । स्नेहें हंबरती होऊनि सकृप । हुंकारघोषें स्ववत्सकळप । ससाक्षेप बहाती ॥४१॥
तया हुंकाराची स्निग्ध ध्वनि । पडतां वांसरूवांचें कानीं । धांवती मुंसांडी देऊनि । ओहा रिघोनि मिसळति ॥४२॥
वत्सें येतां देखोनि दुरी । हरिमायेची नवलपरी । स्तन पाझरती मोकळ्या धारी । मुखाभीतरीं न घालितां ॥४३॥
धेनु पान्हार्ता वोरसून । पुच्छें पृष्ठिभागीं वाहून । स्ववत्सां करिती अवघ्राणें । पृष्ठि लववून गोंवताती ॥४४॥
नवी व्याली जैसी धेनु । वत्सा चाटी कळवळून । अधिक सहस्रधा त्याहीहून । वत्सें जुनी चाटिती ॥३४५॥
नवीं पारठीं लहानें थोरें । कृष्ण नाट्यांचीं वासुरें । गायी चाटिती प्रेमादरें । स्नेहसुभरें वावरल्या ॥४६॥
डिउं धांवती आणिकांकडे । वत्सें चाटिती वाडेंकोडें । स्तनीं दुग्धाचे वहाती लोंढे । मोहें वेडें पशुप्रेम ॥४७॥
एतावता हें वैषम्य । कृष्णासही दिर्निवार परम । परीक्षितीसी मुनिसत्तम । बोधी वर्म येथींचें ॥४८॥

गोगोपीनां मातृताऽस्मिन्सर्वा स्नेहर्धिकां विना । पुरोवदास्वपि हरेस्तोकता मायया विना ॥२५॥

गायीगोपीचें मायपण । कृष्णीं होतेंच पूर्वींहून । स्तनपानादि उपलालन । इहींकरून अभिव्यक्त ॥४९॥
परंतु नव्हती स्नेहवृद्धि । पुत्रता नटतां कृपानिधि । स्नेह वाढला जो त्रिशुद्धि । हा उपाधि विशेष ॥३५०॥
आणि गोगोपींचा पुत्र हरि । यथापूर्व क्रीडा करी । माया लाघवें मोह पसरी । स्वयें अंतरीं निर्मोह ॥५१॥
मायायोगें पुत्र झाला । मायायोगें गोगोपींला । स्नेहाभिवृद्धि करून ठेला । माये वेगळा गोविंद ॥५२॥
सूर्य स्वकिरणीं मृगजळा । भासवूनि दावी मृगातें डोळां । आपण जेंवी राहे वेगळा । तेवी हे लीला कृष्णाची ॥५३॥
माझी माय हे मी इचा पुत्र । हा मोह न स्पर्शे अणुमात्र । केल्या गो गोपी मोहपात्र । स्वयें सन्मात्र अच्युत ॥५४॥
तें स्नेहवृद्धीचें लक्षण । सावध होऊनि किजे श्रवण । जैसें नृपासी केलें कथन । बादरायण औरसें ॥३५५॥

व्रजौकसां स्वतोकेषु स्नेहवल्ल्याब्दमन्वहम् । शनैर्निःसीम ववृधे यथा कृष्णे त्वपूर्ववत् ॥२६॥

दैवयोगें लक्ष्मी वाढे । कीं नित्याभ्यासें प्रज्ञा चढे । कीं शुक्लपक्षीं कळा उघडे । चंद्री चढे प्रतिदिवशीं ॥५६॥
कां इंदु देखोनि सिंधुआप । कीं तारुण्यें संचरे कंदर्प । नातें सुभूमीचें सुबीज रोप । वाढे पादप प्रावृटीं ॥५७॥
व्रजौकसांचा तेवी प्रेमा । पुत्र झालेनि पुरुषोत्तमा । नित्य नूतन पावे गरिमा । यावत्सीमा पूर्णाब्द ॥५८॥
शनैःशनैः वाढे स्नेह । दिवसेंदिवस चढतां मोह । नित्य नूतन प्रेमोत्साह । कमलानाहो सुतबोधें ॥५९॥
पोर्वीं जैसा नंदालयीं । यशोदानंदनाचे ठायीं । प्रेमा होता तैसा पाहीं । सर्वां स्वगेहीं स्वतोकीं ॥३६०॥
पाणवठ्याचें आणितां आप । गृहीं जोडल्या अमृतकूप । ठेले अन्यजळसाक्षेप । तेवी सकृप स्वपुत्रां ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP