अध्याय ४३ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
गोविंदसद्गुरवे नमः ॥
गगनसुमनग्रथनतंतु । त्यासी आधार गोविंद जो तूं । जेथ चराचर आधेयभूतु । त्या तुज मीतूंरहित नमो ॥१॥
शब्दसुमनें गगनोद्भूत । स्वयंभ स्मृति तद्ग्रथनतंतु । नम्यनमननमकातीतु । आधार तो तूं सन्मात्र ॥२॥
नमूं जातां तुज ऐसिया । भेदें न सरे नमनक्रिया । यालागीं मी तूं गाळूनियां । ऐसें अद्वया प्रणाम ॥३॥
ऐशी अन्वयव्यतिरेकरीति । अपरोक्षचिन्मात्रैकप्रतीति । सांख्ययोगादिवेदांतीं । सर्वसिद्धांतीं ठी केली ॥४॥
परंतु माझिया मनोधर्मा । सगुनसद्गुरुभजनप्रेमा । तुळितां फळकट मोक्षगरिमा । येरा अधमा दुर्लभ जें ॥५॥
सद्गुरुभजनाविण मोक्ष । इच्छिती ते अधम मुमुक्ष । सांख्य योग कां वेदांतपक्ष । अवघा कक्ष समगमतो ॥६॥
शास्त्राभ्यासें ब्रह्मज्ञान । योगविद्येचें साधन । अवघें सद्गुरुभजनाविण । निष्फळ जाण निर्वीर्य ॥७॥
न कर्शितां कोदंडकांड । प्राणें विण जैसा पिंड । गुरुभजनें विण वक्ता चंड । तें पाखंड पांडित्य ॥८॥
निर्बळाचा तिरस्कार । निर्धनाचा अहंकार । निर्दयाचा सदाचार । कीं शृंगार अनिनेचा ॥९॥
तस्मात् सद्गुरुभजनापोटीं । ऐश्वर्यसिद्धि कोट्यानकोटि । कैवल्यपदाचिये मुकुटीं । वंदी धूर्जटि गुरुभक्तां ॥१०॥
ऐसे वरिष्ठ सर्वांहून । सोपें सद्गुरुपदसेवन । परंतु तेथे इतुकें कठिन । जें प्रेम अनन्य निष्काम ॥११॥
असो ऐसिया मनोरथा । वाहें परंतु मी न सरतां । सर्व विदित श्रीगुरुनाथा । चरणीं माथा न्यसिलासे ॥१२॥
हें ऐकोनि सज्जनवृंद । ज्यांसी गुरुभजनाचा छंद । पूर्ण पावोनि परमानंद । म्हणती सावध प्रेमळा ॥१३॥
नंदादि आलिया सभेसी । पुढें कथा वर्तली कैसी । सादर होऊनि व्याख्यानासी । ते आम्हांसी परिसवीं ॥१४॥
सज्जन श्रोते सादर पूर्ण । सांभाळूनि अनुसंधान । पुढें कथेचा करितां प्रश्न । तेणें प्रसन्न वक्तृत्व ॥१५॥
सज्जनप्रश्नाचेनि सुवातें । दयार्णवीं प्रज्ञाभरतें । भरलें तेणें परमामृतें । भवसंतप्तें निववीतसे ॥१६॥
म्हणे ऐका जी विद्वज्जन । करून धनुर्यागभंजन । स्वेच्छा पुरीमाजी क्रीडन । करूनि स्वस्थान पातले ॥१७॥
हें ऐकोनि कंसमनीं । दाटली भयाची कणकणी । दचके दुश्चिह्नांच्या श्रेणी । देखिल्या शयनीं निशिगर्भीं ॥१८॥
होतां प्रभाते चेइरा । रचिलें जैशा मंत्रविचारा । द्वारीं स्थापूनि कुंजरा । मल्लसमरा विवंचिलें ॥१९॥
इत्यादि कंसचिकीर्षित । रामकृष्ण जाणोनि त्वरित । हर्षें उठिले तंद्रारहित । पुढें वृत्तांत अवधारा ॥२०॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP