हतं कुवलयापीडं दृष्ट्वा तावतिदुर्जयौ । कंसो मनस्व्यपि तदा भृशमुद्विजते नृपम् ॥१८॥

रामकृष्ण रंगस्थानीं । कंस केवळ मृत्युच मानी । पूर्वपराक्रम अनुमानी । वाढवी ग्लानि हृत्कमळीं ॥४४॥
कुवलयापीडनामा गज । सहस्रगजबळांचा पुंज । लीला मर्दूनियां तो सहज । रंगीं भोज नाचती ॥१४५॥
धनुर्मख भंगिला पूर्वदिनीं । संरक्षक मर्दिल्या सेनाश्रेणी । हें देखोनि कंसा मनीं । बैसली कणकणी भयाची ॥४६॥
निकट गोप्ते परम शूर । दुर्घट दुर्गम मल्ल दुर्धर । अस्त्रविद्येचा अंगीं भर । परि पडला विसर सर्वांचा ॥४७॥
सन्नद्ध बद्ध सर्वसंपत्ति । एवं मनस्वी कंसभूपति । तथापि देखोनि रामश्रीपति । कैसे शोभती तें ऐका ॥४८॥
राया ऐसी कंसस्थिति । ग्लानि म्लानता भय विभ्रांति । कथिलियावरि ते यदुपति । पडली भ्रांति ते काळीं ॥४९॥

तौ रेजतू रंगगतौ महाभुजौ विचित्रवेषाभरणस्रगंबरौ ।
यथानटावुत्तमवेशधारिणौ मनः क्षिपंतौ प्रभया निरीक्षताम् ॥१९॥

मल्लरंगीं दोघे बन्धु । शोभती जैसे भास्कर इंदु । दिव्यांबराभरणें विविधु । जैसे विशुद्ध नटवेश ॥१५०॥
मंचस्थानीं जनपदसभा । पाहतां त्यांचिया नयनीं जिभा । निघोनि प्राशिती लावण्यप्रभा । मानसें लोभा झळंबती ॥५१॥
नाट्यें नटोनि नटनाटकी । निर्भय ऊर्जित लक्ष्मी नटकी । धरिली गोपाकृति लटकी । तथापि धडकी न धरिती ॥५२॥
असो निर्भय निराट ऐसे । आजानुबाहु रौद्ररसें । रंगीं मृत्युसमान कंसें । भावुनी मानसें भय धरिलें ॥५३॥
सानुज कंस मल्लांसहित । धाकें कांपती हृदया आंत । येर मंचस्थजनाची मात । राया समस्त अवधारीं ॥५४॥

निरीक्ष्य तावुत्तमपूरुषौ जना मंचस्थिता नागरराष्ट्रिका नृप ।
प्रहर्षवेगोत्कलितेक्षणाननाः पपुर्न तृप्ता नयनैस्तदाननम् ॥२०॥

मथुरानगरीमाजील लोक । आणि राष्ट्रींचेही अनेक । देखोनि रंगीं उत्तम पुरुष । पावले हर्ष हृत्कमळीं ॥१५५॥
तया हर्षोत्कर्षवेगें । रामकृष्णांचीं उत्तम आंगें । प्राशिते झाले नयनमार्गें । परि तृप्ति न भंगे प्रेमळाची ॥५६॥
आवडीचेनि आर्तिभरें । नयनीं प्राशितां मुखकह्लारें । अधिक प्रेमोत्कर्ष अवतरे । करणद्वारें कवळावया ॥५७॥

पिबंत इव चक्षुर्भ्यां लिहंत इव जिह्वया । जिघ्रंत इव नासाभ्यां श्लिष्यंत इव बाहुभिः ॥२१॥

चक्षूकरूनि प्राशिती रूप । ऐसे प्रेमभरें सकृप । घ्राणें हुंगिजे जेंवि कां पुष्प । मानसें द्विरेफ करूनियां ॥५८॥
वत्सें चाटिती जैशा धेनु । तैशा रसज्ञा उद्विग्न । आलिंगितीज बाहूकरून । ऐसे निमग्न दयारसीं ॥५९॥
राया कौरववनउडुपति । ते जन परस्परें बोलती । ऐकें तयांची भारती । शुक संकेतीं वाखाणी ॥१६०॥

ऊचुः परस्परं ते वै यथा श्रुतम् । तद्रूपगुणमाधुर्यप्रागल्भ्यस्मारितां इव ॥२२॥

गोकुळवृंदावननिवासी । अनेक जनपद हरिसहवासी । तिहीं प्रतापशक्ति जैसी । देखिली तैसी ते वदती ॥६१॥
मथुराराष्ट्रिक सह नागर । भगवन्महिमागरिमा प्रचुर । ऐकिला तैसा सविस्तर । येरां येर प्रतिवदती ॥६२॥
मल्लरंगींच्या दर्शनमात्रें । रामकृष्णांचीं देखोनि गात्रें । गुणमाधुर्य पूर्वचरित्रें । कथिती विचित्रें स्मरविलीं ॥६३॥
जैसी दिधली आठवण । तैसें भवतत्प्रागल्भ्य नयन । देखोनि अंतःकरणा स्मरण । देती संपूर्ण चरितांचें ॥६४॥

एतौ भगवतः साक्षाद्धरेर्नारायणस्य हि । अवतीर्णाविहांशेन वसुदेवस्य वेश्मनि ॥२३॥

जनपद परस्परें बोलती । दोघे नारायणांशमूर्ति । तेथ अवतरले गूढस्थिती । वसुदेवसंतति तत्सदनीं ॥१६५॥
अनंत ऐश्वर्यपरिपूर्ण । जो तो श्रीहरि नारायण । त्याचे अंशावतार पूर्ण । म्हणतां गौण न मनावें ॥६६॥
पावकांश स्फुलिंग एक । ऐश्वर्य नोहे न्यूनाधिक । पाचक दाहक प्रकाशक । वाढे सम्यक प्रसंगीं ॥६७॥
तैसे वसुदेवाचे घरीं । जरी अवतरले मनुजाकारीं । तरी ऐश्वर्याची थोरी । प्रत्यक्ष चतुरीं देखिजे ॥६८॥

एष वै किल देवक्यां जातो नीतश्च गोकुलम् । कालमेतं वसन्गूढो ववृधे नंदवेश्मनि ॥२४॥

अहो हा कृष्ण पुरुषोत्तम । राजीवाक्ष मेघश्याम । देवकीजठरीं पावला जन्म । महानिशीथीं नभोऽष्टमीं ॥६९॥
दुर्भटगुप्तकारागारीं । कोणां नकळत करूनि चोरी । नेऊनि गोकुळामाझारी । अद्यापवरी लपविला ॥१७०॥
परंतु नंदाचिये सदनीं । याची ऐश्वर्यप्रतापकरणी । परस्परें अद्भुत जनीं । बोलती वदनीं ते ऐका ॥७१॥

पूतनानेन नीतांतं चक्रवातश्च दानवः । अर्जुनौ धेनुकः केशी गुह्यकोऽन्ये च तद्विधाः ॥२५॥

कपटवेशें सविष स्तन । पूतना पाजितां ते शोषून । येणें मारिली न लगतां क्षण । महादारुण निशाचरी ॥७२॥
परमकोमल सुमुकार चरण । झाडूनि शकट केला चूर्ण । तृणावर्ताचे घेतले प्राण । चढतां गगन गळग्रहणें ॥७३॥
मृद्भक्षणीं ब्रह्मांडकोटि । वदनीं यशोदे दाविल्या दिठीं । स्मरोनि नारदशापगोठी । गुह्यकराहटी आठविली ॥७४॥
नलकूबर मणिग्रीव । जे धनदाचे वीर्यसंभव । नारदशापें अर्जुनत्व । पावले दुर्भव स्थावरता ॥१७५॥
चरणस्पर्शें उन्मळोनी । उद्धरिले ते गुह्यक दोन्ही । घोडे गाढव राक्षसयोनि । केशिधेनुक संहरिले ॥७६॥
तयाचि ऐसे विविधरूपी । राक्षस वधिले महाप्रतापी । अघासुराच्या प्रळयकल्पीं । मूढत्व ओपी विधातिया ॥७७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP