जनेष्वेवं ब्रुवाणेषु तूर्येषु निनदत्सु च । कृष्णरामौ समाभाष्य चाणूरो वाक्यमब्रवीत् ॥३१॥

पटह ढक्का दुंदुभि तुरें । वाजती मल्लतालांच्या गजरें । त्यांमाजी जनपद परस्परें । ऐसीं उत्तरें बोलती ॥९८॥
ऐकूनि चाणूर क्षोभला पोटीं । म्हणे दुष्टांच्या दुष्ट गोठी । वीररसाची करिती तुटी । श्रवणपुटीं न पडाव्या ॥९९॥
तप्ततैलीं शीतळ जळ । पडतां भडके प्रळयज्वाळ । तैसा चाणूर मल्लपाळ । क्षोभला केवळ जन वदतां ॥२००॥
रामकृष्णांतें पाचारून । कपटगर्भित मृदुल वचन । यथार्थ वदला तें संपूर्ण । श्रोता सर्वज्ञ परिस तूं ॥१॥

हे नंदसूनो हे राम भवंतौ वीर्यसमंतौ । नियुद्धकुशलौ श्रुत्वा राज्ञाऽहूतौ दिदृक्षुणा ॥३२॥

अगा ये बलरामा बळिष्ठा । नंदतनया कृष्णा धीटा । तुमच्या वीर्यशौर्याच्या चेष्टा । जाल्या प्रकटा नृपसभे ॥२॥
मल्लविद्याप्रवीण तुम्ही । राजा कौतुकेक्षणकामी । तेणें तुम्हां रंगभूमीं । पाचारूनि आणविलें ॥३॥
निरतिशयें युद्धकुशल । रायें ऐकोनि तुमचें बळ । येथ आणविलें त्याचें फळ । दाविजे केवळ नृपनयनां ॥४॥

प्रियं राज्ञः प्रकुर्वंत्यः श्रेयो विंदंति वै प्रजाः । मनसा कर्मणा वाचा विपरीतमतोऽन्यथा ॥३३॥

जननी जनक जगदीश्वर । नृपति तयांचा अवतार । त्याच्या प्रजा मनुजमात्र । यावद्राष्ट्रपर्यंत ॥२०५॥
करितां नृपाज्ञालंघन । इहलोक परलोक होय शून्य । यालागीं सर्वदा नृपाधीन । प्रजा संपूर्ण वर्तती ॥६॥
इत्यादिदोष दर्शनशास्त्रीं । यावरी नृपति दंडधारी । वागवी अष्टांग सामग्रीं । शासन करी प्रजांतें ॥७॥
देश दुर्ग कोश बळ । मंत्री प्रधान अमात्य कुशळ । नृपशरीर प्रजा सुशीळ । न्याय निर्मळ शास्त्रोक्त ॥८॥
देखतां प्रजांचा अन्याय । कृतांततुल्य दंडिता होय । न्यायें वर्ततां परमसदय । अपत्यप्राय प्रतिपाळी ॥९॥
यालागीं नृपासी जें जें प्रिय । अवश्य प्रजांसि तें करणीय । तें आचरितां पावती श्रेय । ऊर्जितविजय सर्वत्र ॥२१०॥
म्हणाल अवंचक अर्पणें कर । इतुकेनि प्रजा स्वधर्मपर । ऐसें नव्हे हा विचार । ऐका साचार वदतसे ॥११॥
मनें नृपाचें प्रिय इच्छिणें । नृपासी प्रिय तें कर्म करणें । नृपा रुचे तें बोलणें । कायवाङ्मनें नृपसेवा ॥१२॥
श्रेय प्रजांसि या आचरणें । विपरीत होता तीव्रशासनें । प्रजा पीडती अकल्याणें । दुःखें दारुणें भोगिती ॥१३॥
तरी ये प्रसंगीं पातलां तुम्ही । नृपाति कौतुकेक्षणकामी । निःशंक क्रीडतां आपुले ग्रामीं । तैसें संभ्रमीं क्रीडा हो ॥१४॥

नित्यं प्रमुदितां गोपा वत्सपाला यथा स्फुटम् । वनेषु मल्लयुद्धेन क्रीडंतश्चारयंति गाः ॥३४॥

गोपवत्सप यथासुखें । वनीं पुलिनीं स्वसंतोषें । मल्लयुद्धाच्या उत्कर्षें । परमवेशें क्रीडती ॥२१५॥
नित्य नूतनानंदभरित । क्रीडतां धेनूंतें चारित । मल्लविद्यापारंगत । झालां समस्त तद्योगें ॥१६॥
तरी अंतरींची सांडूनि शंका । नृपासि दाविजे प्रियकौतुका । तेंचि प्रियतम सर्व लोकां । वदतों ऐका बल्लव हो ॥१७॥

तस्माद्राज्ञः प्रियं यूयं वयं च करवामहे । भूतानि नः प्रसीदंति सर्वभूतमयो नृपः ॥३५॥

सर्वभूतमयचि राजा । तो तोषतां अवघ्या प्रजा । तोष पावती सहजींसहजा । या निजगुजा जाणा हो ॥१८॥
तस्माद्रायाचें कौतुक । तुम्ही आम्ही आवश्यक । आजि पुरविणें निष्टंक । येणें सर्वही लोक तुष्टती ॥१९॥
सर्वभूतात्मक भूपति । भूतें त्याच्या अंगप्रकृति । नृपसंतोषें त्या तोषती । प्रसन्न होती अनायासें ॥२२०॥
ऐसें चाणूर मल्लपवचन । जैसे विषाक्त मिष्ट पक्कान्न । सगर्भरहस्य करूनि श्रवण । बोले श्रीकृष्ण तें ऐका ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP