अध्याय ४३ वा - श्लोक २६ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
गावः सपाला एतेन दावाग्नेः परिमोचिताः । कालियो दमितः सर्प इंद्रश्च विमदः कृतः ॥२६॥
महिमा देखिला ते ते जन । येरां परस्परें करिती श्रवण । म्हणती अवतार रामकृष्ण । ऐश्वर्य गहन पैं यांचें ॥७८॥
गाई गोपाळ दावानळीं । जळतां देखोनि करुणाशाली । रक्षिता झाला तिये काळीं । स्वये वनमाळी ऐश्वर्यें ॥७९॥
झांकवोनियां नेत्रकमळें । नेलें भांडीरवटाजवळें । ऐसिये याचे ऐश्वर्यलीले । साक्षी डोळे पैं आमुचे ॥१८०॥
एक म्हणती यमुनाहृदीं । कालिय विषधर सुपर्णदंदी । येणें दमिला नर्तनविधीं । वरदसिद्धि बोळविला ॥८१॥
एक म्हणती परस्परें । पुरंदरयज्ञाचें मातेरें । करूनि विदर्प केला येरें । मग तो मत्सरें क्षोभला ॥८२॥
सप्ताहमेकहस्तेन धृतोऽद्रिप्रवरोऽमुना । वर्षवाताशनिभ्यश्च परित्रातं च गोकुलम् ॥२७॥
सांवर्तक मेघ विद्युत्पात । सवें देऊनी प्रळयवात । गोपगोधनांचा निःपात । करवी त्वरित क्षोभवूनी ॥८३॥
जलपाषाण विद्युत्पतनें । गृहें मंदिरें पडती तेणें । आक्रंदती गोपगोधनें । झंझापवनें त्रासितां ॥८४॥
तेव्हां कृष्णें गोवर्धन । करीं धरूनि सप्तदिन । इंद्र केला लज्जायमान । दुर्मेघविघ्न भंगोनी ॥१८५॥
वर्षावात विद्युत्पात । जलगारादि महासीत । भंगोनि गोकुळ दिवस सात । रक्षी समस्त गिरिधर हा ॥८६॥
गोप्योऽस्य नित्यमुदितहसितप्रेक्षणं मुखम् । पश्यंतो विविधांस्तापांस्तरंति स्वाश्रमं मुदा ॥२८॥
आणि गोपिकांचें वदन । नित्यानंदें निर्भर पूर्ण । हास्ययुक्त सविलास नयन । पाहोनि विघ्न निस्तरती ॥८७॥
विविध म्हणिजे अनेक ताप । हरिमुख पाहतां अनिमेष अल्प । गोपी निस्तरती सुखरूप । ऐसा प्रताप पैं याचा ॥८८॥
तंव बोलती कोणी एक । नागर मथुराप्रांतीचे लोक । ते तूं कुरुउडुगणपा ऐक । म्हणे श्रीशुक स्वानंदें ॥८९॥
वदंत्यनेन वंशोऽयं यदोः सुबहुविश्रुतः । श्रियं यशो महत्त्वं च लप्स्यते परिरक्षितः ॥२९॥
ते जन वदती परस्परें । यदुकुळगोपन करितां येरें । त्रिजगीं यदुवंश विस्तारे । कीर्ति पसरे नभोगर्भीं ॥१९०॥
यदुवंशींची कीर्ति बहळ । त्रिजग धवळी परम अमळ । यश लक्ष्मी महत्त्वशीळ । याचेनि यदुकुळ वरील ॥९१॥
ऐसा देवकीतनयमहिमा । वर्णिला धरूनि कृष्णीं प्रेमा । एक वर्णिते झाले रामा । नृपललामा तें ऐक ॥९२॥
अयं चास्याग्रजः श्रीमान्नामः कमललोचनः । प्रलंबो निहतो येन वत्सको ये बकादयः ॥३०॥
अहो हा याचा अग्रजबंधु । राम तेजस्वी प्रतापसिंधु । कमललोचन महाप्रसिद्धु । जैसा इंदु उडुगणीं ॥९३॥
निर्भय मल्लरंगीं उभा । वदनीं फांके वीरश्रीप्रभा । बळप्रतापशक्तिशोभा । देखती सभासद सारे ॥९४॥
प्रलंबास्र महाकपटी । गोपवेशें या वाहोनि पाठी । नेतां येणें मारूनि मुष्टि । केला सृष्टी शतचूर्ण ॥१९५॥
वत्सासुर बकासुर । व्योमादि कपटी महादुष्कर । रामें केला यां संसार । नेणोनि निर्धार जन वदती ॥९६॥
कृष्णें धेनुक वधिला म्हणती । रामें बकवत्सादिकां शांति । ऐसें विपरीत जन बोलती । हें लोकोक्ति अनिश्चयें ॥९७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP