अध्याय ४४ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच ॥ एवं चर्चितसंकल्पो भगवान्मधुसूदनः । आससादार्थ चाणूरं मुष्टिकं रोहिणीसुतः ॥१॥
जैसा संकल्प अंतःकरणीं । तैसाचि चाणूरवदनें करूनी । कृतनिश्चयें चक्रपाणि । तन्निग्रहणीं प्रवर्तला ॥३१॥
भुजा ठोकोनि सम्यक । जाला चाणूर सम्मुख । तें देखोनि रोहिणीतोक । रंगीं मुष्टिक पाचारी ॥३२॥
दक्षिणहस्तें घेऊनि माती । मर्दूनियां उभयहस्तीं । बळें अधरोष्ठ चावूनि दांतीं । करीं आंसुडिती परस्परें ॥३३॥
हस्ताभ्यां हस्तयोर्बद्ध्वा पद्भ्यामेव च पादयोः । विचकर्षतुरन्योन्यं प्रसह्य विजिगीषया ॥२॥
हस्तीं पडे न पडे मिठी । तंव ते आंसुडिती जगजेठी । चांचरी जातां धरापृष्ठीं । उठाउठीं सांवरिती ॥३४॥
पडतां मणिबंधासि मिठी । बळें सोडविती चिकाटी । चरणें चरणांसी घालूनि आंटी । दाटोदाटीं रेटिती ॥३५॥
बलात्कारें आंसुडिती । अंगप्रौढी झिंजाडिती । एकमेकांतें ओढिती । तळीं पाडिती परस्परें ॥३६॥
पृष्ठी शिवे न शिवे मही । तंव चमत्कारें उसळती पाहीं । मल्लविद्येची नवाई । दाविती देहीं प्रतापें ॥३७॥
परस्परें जिंकावया । कर्षिती हाका देवूनियां । द्वंद्वयुद्धाचिया क्रिया । दाविती राया उत्साहें ॥३८॥
हा हा म्हणोनि दीर्घस्वरीं । हुंकारिती मेघगजरीं । हिरण्यकशिपूचि समरीं । नरकेशरी जेंवि गर्जे ॥३९॥
अरत्नी द्वे अरत्नीभ्यां जानुभ्यां चैव जानुनी । शिरः शीर्ष्णोरसोरस्तावन्योन्यमभिजघ्नतुः ॥३॥
तर्जनी अंगुष्ठ उभयसंधि । मिठ्या घालूनि वज्रबंदी । आंसुडिताती द्वंद्वयुद्धीं । विजयसिद्धिसाधना ॥४०॥
अरत्नी म्हणिजे समुष्टिहस्त । कूर्परघातें करिती स्वस्त । जानुप्रहार करिती व्यस्त । पदविन्यस्त चापल्यें ॥४१॥
मल्लविद्येच्या कुसरी । थडका हाणिती उरीं शिरीं । दंतपातनें चपेटप्रहारीं । हुमण्या निकरीं मारिती ॥४२॥
लत्ताप्रहार मेढ्रस्थानीं । ऊरु भंगिती हाणुनि पार्ष्णी । गुल्फप्रहाराचिया हननीं । पडती नयनीं झांपडिया ॥४३॥
पर्भ्रामणविक्षेपपरिरंभायपातनैः । उत्सर्पणापसर्पणैश्चान्योन्यं प्रत्यरुंधताम् ॥४॥
करांगुळी बलात्कारीं । परस्परें कवळूनि करीं । सव्यदक्षिणावर्त फेरी । देती भंवरी परस्परीं ॥४४॥
एकमेकां क्षोभविती । सिंहनादें गर्जताती । साटोप धरूनि उफाळती । हिणाविती सरोष ॥४५॥
बळें देती किंकळिया । भंवत्या मल्लांच्या आरोळिया । नागर जनांच्या टाळिया । बाहुस्फालनें उभयत्र ॥४६॥
बाहुपृष्ठीं उरि टिरी । चपेटे ठोकूनि परस्परीं । क्षोभविती हुंकारगजरीं । उरीं शिरीं थडकिती ॥४७॥
कर आंसुडोनि कवळिती कवा । सुहृद स्नेहाळ जैसें खेंवा । मिथा प्रपातनाचिया हांवा । दशनीं अधर रगडिती ॥४८॥
मिथा शरीरें कवळूनि बळें । निकरें चेंपिती जीवनकळे । आंसडूनि पाडितां शरीर आदळे । सवेंचि उफाळें उसळती ॥४९॥
एकमेकां आपटिती भूमीं । मिथा समानपराक्रमी । निघे उमटताती व्योमीं । विजयकामी उभयत्र ॥५०॥
अवचट सुटतां शरीरमिठी । चढोनि जाती एक जगजेठी । अपर मागां सरती हट्टी । नेदूनि पाठी समरंगीं ॥५१॥
पाउलें मात्र टाकिती मागें । सिंतरों पाहती कृतांतवेगें । सक्रोध दृष्टी लक्षूनि आंगें । लागवेगें आंसुडिती ॥५२॥
एकमेकांचे घ्यावया प्राण । ऐसे करिती गात्रें भग्न । विक्रमशक्तीचें धरूनि त्राण । युद्ध दारुण न सांडिती ॥५३॥
उत्थापनैरुन्नयनैश्चालनैः स्थापनैरपि । परस्परं जिगीषंतावुपचक्रतुरात्मनः ॥५॥
भूमीं पाडूनि वीरवाट । मुरडूनि करपद करिती मोट । बळें उचलिती जैसे घट । नेती मुकुटपर्यंत ॥५४॥
अयस्कार निजव्यापारीं । लोह ठोकी घनप्रहारीं । तैसे आदळिती भूमीवरी । गात्रें चकचुरी करावया ॥५५॥
वरुणपाशांसमान कंठीं । निकरें घालिती वज्रमिठी । तीतें उखळिती जगजेठी । दशन ओष्ठीं रगडूनी ॥५६॥
चरणें चरणां घालूनि आढी । हृदय कवळूनि बाहुप्रौढी । भूमीं पाडूनि करपद मोडी । निर्मूनि घडी स्थापिती ॥५७॥
एवं मिथा जिंकावया । शरीरें भंगिती कौरवराया । हें देखोनि नागरीजाया । कृपें द्रवलिया बोलती ॥५८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP