अध्याय ४४ वा - श्लोक २६ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
ततः कूटमनुप्राप्तं रामः प्रहरतां वरः । अवधील्लीलया राजन्सावज्ञं वाममुष्टिना ॥२६॥
रामें मुष्टिक मारिल्यावरी । कूटनामा मल्ल समरीं । लोटला संकर्षणावरी । आंगी वीरश्री बाणोनि ॥१५०॥
बाहू ठोकूनि ठकारें ठाके । तंव वाममुष्टिप्रहारें एकें । लीलेंकरून रोहिणीतोकें । रंगभूमिके निजविला ॥५१॥
तर्ह्येव हि शलः कृष्णपदापहतशीर्षकः । द्विधा विदीर्णस्तोशलक उभावपि निपेततुः ॥२७॥
तैसिचि दोघे महामल्ल । कृष्णावरी शलतोशल । उठावले शलभतुल्य । वीरश्री बहळ साटोपें ॥५२॥
कृष्णें वज्रलत्ताप्रहारीं । मस्तक चूर्ण केलें समरीं । अशुद्ध वाहे धरणीवरी । राममुरारी जयवंत ॥५३॥
चाणूरे मुष्टिके कूटे शले तोशलके हते । शेषोः प्रदुद्रुवुर्मलाः सर्वे प्राणपरीप्सवः ॥२८॥
चाणूर मुष्टिक महामल्ल । कूट आणि शल तोशल । मारिले असतां मल्लदळ । भयें तत्काळ पळालें ॥५४॥
प्राण वांचवावयाचे चाडें । मरणभयें झाले वेडे । पळतां मार्ग न सांपडे । धाकें चहूंकडे विखुरले ॥१५५॥
कोणी लपती वनितांमागें । कोणी म्हणती आम्ही भणगें । एक पळाले लागवेगें । राजमार्गें अधोमुख ॥५६॥
पळतां वळलिया वेंगडी । जीतचि होऊनि पडलीं मडीं । एक तृणें धरिती तोंडीं । आली हुडहुडी एकांतें ॥५७॥
ऐसे प्राणपरीप्सव । वांचवावया आपुले जीव । समरंगाचा घेऊनि भेव । भाकूनि कींव पळाले ॥५८॥
तंव रामकृष्ण प्रतापमेरु । तयांसि देऊनि नाभीकारू । म्हणती भयत्रस्तांतें न मारूं । धरूनि धीरु बैसा रे ॥५९॥
ऐसें सभयां देऊनि अभय । उभय बंधु परम निर्भय । कृष्ण आणि रोहिणीतनय । करिती काय तें ऐका ॥१६०॥
गोपान्वयस्यानाकृष्य तैः संसृज्य विजह्रतुः । वाद्यमानेषु तूर्येषु वल्गंतौ रुतनूपुरौ ॥२९॥
गोप वयस्य संवगडे । आकर्षूनि आपणाकडे । मंडळ रचूनि वाडेंकोडें । विविधा क्रीडे दाविती ॥६१॥
मल्लरंगीं महागजरें । वाजत असतां विचित्र तुरें । चरणीं रुणझुणती नूपुरें । रामें श्रीधरें नाचतां ॥६२॥
ऐसें देखोनि सर्वांमनीं । परमानंद सभास्थानीं । जयजयकाराचिया ध्वनी । टाळी सज्जनीं पीटिली ॥६३॥
जनाः प्रजहृषुः सर्वे कर्मणा रामकृष्णयोः । ऋते कंसं विप्रमुख्याः साधवः साधुसाध्विति ॥३०॥
कंसावांचूनि सर्व सभा । पात्र झाली आनंदलाभा । रंगीं क्रीडतां पद्मनाभा । अपार शोभा मिरविली ॥६४॥
रामकृष्णांच्या देखोनि कर्मा । आह्लाद सर्वांच्या हृदयपद्मा । स्तविती रामा पुरुषोत्तमा । नागरी वामा जयघोषें ॥१६५॥
संत सज्जन महानुभाव । ब्राह्मणप्रमुख ज्ञाति सर्व । वोपिती आशीर्वाद सर्व । साधु साधु इहीं शब्दीं ॥६६॥
धन्य धन्य म्हणती कृष्णा । भला गा भला संकर्षणा । कठ्होर मल्लांचिये तुळणा । समरंगणा आंगविलें ॥६७॥
समस्त समूह आह्लादभरित । जनमानसें उत्फुल्लित । कंस क्षोभे परभतप्त । तत्संकेत अवधारा ॥६८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP