अध्याय ४४ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
प्रातर्व्रजाद्व्रजत अविशतश्च सायं गोभिः समं क्कणयतोऽस्य निशम्य वेणुम् ।
निर्गम्य तूर्णमबलाः पथि भूरिपुण्याः पश्यंति सस्मितमुखं सदयावलोकम् ॥१६॥
प्रभाते थापटोनि यशोदा । जागृत करी श्रीमुकुन्दा । सालंकृत सिदोरी खांदा । सुरभिवृंदासमवेत ॥११०॥
ससंकर्षणगोपमेळीं । वेणुक्कणनें प्रयाणकाळीं । मिरवत घनतनु सांवळी । व्रजमंडळी आनंदवी ॥११॥
ऐकोनियां तें वेणुक्कणन । गोपीसमूह सांडूनि सदन । व्रजपुराबाहीर धांवून । नयन भरून विलोकिती ॥१२॥
विशाळ पुण्याचिया कोटी । असती व्रजवनितांचे गांठीं । यास्तव सादर पाहती दृष्टीं । हरि जगजेठी जगदात्मा ॥१३॥
आकर्ण नयन सस्मित मुख । विशाळ भाळ सरळ नासिक । कृपाकटाक्ष सदयावलोक । पाहती सम्यक कृतपुण्यें ॥१४॥
आम्ही अभाग्या अल्पपुण्या । यास्तव कृष्णा संकर्षणा । मल्लनिग्रहणीं आमुच्या नयनां । दावितां करुणा विधि नुधवे ॥११५॥
ऐशा समस्त पुरपुरंध्री । सखेद वदतां परस्परीं । अंतरवेत्ता श्रीमुरारी । कौतुक करी तें ऐका ॥१६॥
एवं प्रभाषमाणासु स्त्रीषु योगेश्वरो हरिः । शत्रुं हंतुं मनश्चक्रे भगवान्भरतर्षभ ॥१७॥
सदयस्त्रियांचें अंतर । द्रवलें जाणोनि योगेश्वर । करावया शत्रुसंहार । मनोव्यापार अवलंबी ॥१७॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । साक्षात् श्रीहरि भगवान । निववावया अभिरत जन । शत्रुनिग्रहण आदरी ॥१८॥
भरतवंशीं श्रेष्ठ पूर्ण । भरतर्षभ त्या संबोधन । देता झाला व्यासनंदन । सादर देखोन श्रवणार्थीं ॥१९॥
ऐशा नागरवधूंच्या वाणी । ऐकोनियां जनकजननी । पुत्रभावना रामकृष्णीं । स्नेहें द्रवोनि झळंबती ॥१२०॥
सभयाः स्त्रीगिरः श्रुत्वां पुत्रस्नेहशुचातुरौ । पितरावन्वतप्येतां पुत्रयोरबुधौ बलम् ॥१८॥
सभयोत्तरीं नागरवामा । स्नेहें झळंबती कृष्णरामा । जननीजनकें हृदयपद्मा । माजी ऐकोनि दचकलीं ॥२१॥
पुत्रप्रताप विदित नाहीं । म्हणोनि शोकसंतप्त हृदयीं । प्रकट रडों न लाहती पाहीं । अंतरीं लाहीसम फुटती ॥२२॥
ऐसी पितरांची अवस्था । आणि कळवळिल्या नागरवनिता । हें जाणोनि मन्मथजनिता । काय करिता झाला पैं ॥२३॥
तैस्तैर्नियुद्धविधिभिर्विविधैरच्युतेतरौ । युयुधाते यथाऽन्योन्यं तथैव बलमुष्टिकौ ॥१९॥
मल्लविद्येच्या कुसरी । जाणे अवघ्या कैटभारि । तिहीं तिहीं युद्धप्रकारीं । समरीं श्रीहरि क्रीडला ॥२४॥
परप्रतापें नोहे च्युत । यालागीं नामें तो अच्युत । याहूनि इतर जो बळवंत । तो मल्ल विख्यात चाणूर ॥१२५॥
जैसे भिडती चाणूरहरि । बळमुष्टिक तयांचि परी । द्वंद्वयुद्धाच्या कुसरी । दावूनि समरीं आक्रमिती ॥२६॥
रामकृष्ण तूं म्हणसी राया । तुल्य मल्लेंसीं केलिया । बाल्यें माल्यें समान काया । केंवि विजया आकळिती ॥२७॥
तरी हें ऐसें सहसा न म्हण । इंधनासमना कें कृशान । अगस्ति म्हणूं नये लहान । उदधिजीवन प्राशितां ॥२८॥
भगवद्गात्रनिष्पातैर्वज्रनिष्पेषनिष्ठुरैः । चाणूरो भज्यमानांगो मुहुर्ग्लानिमवाप ह ॥२०॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । जरी गोपाकृति भगवान । तथापि प्रतापें असाधारण । गोपासमान तो नोहे ॥२९॥
पाषाणघातें ताडितां घटा । तैं घटशकलांचा होय कुटा । घटेंही ताडितां पाषाणगोटा । तरी घटचि स्फोटा पावतसे ॥१३०॥
तैसें भगवद्गात्रावरी । प्रहार करितां चाणूर समरीं । तो श्रीभगवान वज्रशरीरी । गात्रबोहरी मल्लाची ॥३१॥
वज्रनिष्ठुर भगवत्प्रहार । लागतां मल्लाचें शरीर । संधीं संधीं झालें चूर । वाटे घोर तो समर्थ ॥३२॥
स्वप्रहारीं भगवत्प्रहारीं । चाणूर भग्नांग झाला समरीं । क्षणक्षणां मूर्च्छा शरीरीं । नयनीं चंद्री लागतसे ॥३३॥
पुन्हा अवलंबूनियां धीर । म्हणे हा समय महाक्रूर । दांत खावूनि करी निकर । नंदकुमर मारावया ॥३४॥
एकाचि घाये मारीन हरि । म्हणोनि सक्षोभ दीपापरी । प्रज्वळला तेंचि तूं अवधारी । कुरुकेसरी नृपनाथा ॥१३५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP