अध्याय ४४ वा - श्लोक ४६ ते ५१
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
त्वया विरहिता पत्या पुरीयं पुरुषर्षभ । न शोभते निवृत्तोत्सवमंगला ॥४६॥
म्हणती नाथा कंसासुरा । तूं भर्ता या मथुरापुरा । तुझेनि मरणें दीन दारा । पावली धरा वैधव्य ॥७९॥
ऐकें गा ये पुरुषश्रेष्ठा । आम्ही तव जाया वरिष्ठा । पुरीसमान भोगूं कष्टां । सौभाग्यभ्रष्टा न शोभूं ॥२८०॥
मखरें तोरणें पताका । मंगळवाद्यें गजर निका । तुझेनि मरणें नगरी शोका । पात्र झाली आम्हांपरी ॥८१॥
सौभाग्यलक्ष्मीचें कुंकुम । पुसोनि गेलिया दिसों अधम । केवळ वैधव्याचें धाम । झालों परम अमंगळ ॥८२॥
मंगलोत्सवा वोहट पडला । अवदशेचा शृंगार चढला । पूर्वाचरणें दोष घडला । भोगणें पडला तो आजी ॥८३॥
तव प्रतापें मंगळ धरणी । विलसे जैसी सुभगा तरुणी । वैधव्यदुःख तुझिये मरणीं । हे तव करणी भू भोगी ॥८४॥
तेचि कंसासुराची करणी । स्मरोनि विलपती कामिनी । संक्षेपें तें बादरायणि । घाली कर्णीं नृपाचे ॥२८५॥
अनागसां त्वं भूतानां कृतवान्द्रोहमुल्बणम् । तेनेमां भो दशां नीतो भूतध्रुक्को लभेत शम् ॥४७॥
कंसप्रेताच्या वदनापुढें । हस्त नेऊनि वदती तोंडें । म्हणती केलें कर्म कुडें । तें रोकडें फळा आलें ॥८६॥
निरपराध छळितीं भूतें । भूतद्रोह जो घडला तूतें । आजि नृपासन पालथें । पडोनि आम्हांतें दीन केलें ॥८७॥
शरीररक्षणा कारणें । वसुदेवदेवकी निग्रहें छळणें । उग्रसेना निगडबंधनें । कार्याविणें तुवां केलें ॥८८॥
यादव लाविले दिगंतीं । ब्राह्मण मारिले स्मार्तश्रौती । पतिव्रता छळिल्या सती । दुष्टनिघातीं प्रेरूनी ॥८९॥
बाळें मारिलीं जातमात्र । शत्रु केले स्वकुलगौत्र । दैत्यदुरात्मे जोडिले मित्र । अन्यायपात्र झालासी ॥२९०॥
भूतद्रोह निरपराध । आप्तस्वजनासीं विरोध । तेणें दुःखाब्धि अगाध । लंघितां प्रसिद्ध अनुल्लंघ्य ॥९१॥
तुझिया इत्यादि आचरणें । आम्ही विपत्ति हे भोगणें । भूतद्रोह करूनि कोणें । सुख संसारीं अनुभविलें ॥९२॥
प्राणी पीडितां न धरिसी करुणा । शेवटीं पात्र झालासि मरणा । विधवा अनाथा तवांगना । शरण कोणा जातील ॥९३॥
तव संगतीं भोगिलें सुख । तें तंव होवोनि गेलें क्षणिक । आतां अगाध दुःख शोक । भोगितां लोक विलोकिती ॥९४॥
रक्षावया स्वशरीर । शत्रु केला परमेश्वर । ऐसा बुद्धिमंद जो नर । दुःख अघोर मग पावे ॥२९५॥
सर्वेषामिह भूतानामेष हि प्रभवाप्ययः । गोप्ता च तदवध्यायी न क्कचित्सुखमेधते ॥४८॥
कृष्ण हा परमात्मा केवळ । भूतमात्राचा स्थितिलयकाळ । ब्रह्मांडगोळप्रभवनशीळ । स्वपक्षपाळ दैत्यारि ॥९६॥
त्याची अवज्ञा करितां मूर्ख । कोठें अणुमात्र न पवे सुख । तो त्वां वधावया प्रत्यक्ष । वसुदेवतोक आणिला ॥९७॥
धनुर्यागाचें करूनियां मिष । आणिलें कपटें वधावयास । तुझा तव कपटें झाला नाश । केलें दुःखास पात्र आम्हां ॥९८॥
ऐशा विलाप करिती नाना । सानुज कंसाच्या अंगना । आणि तैशाच मल्लललना । करिती रुदना सम दुःखें ॥९९॥
असो हा दुःखाचा सागर । निरूपितां न लगे पार । यावरी नृपातें व्यासकुमर । सांगे प्रकार तो ऐका ॥३००॥
श्रीशुक उवाच - राजयोषित आश्वास्य भगवॉंलभावनः ।
यामाहुर्लौकिकीं संस्थां हतानां समकारयत् ॥४९॥
राया कुरुकंजवनगभस्ति । श्रवणसुभगा परीक्षिति । तुझेनि श्रोतेपणा विश्रांति । माझ्या चित्तीं उचंबळे ॥१॥
लोकभावन जो भगवन्त । धर्मस्थापक कमलाकांत । नृपांगना करूनि शांत । आश्वासित निजवदनें ॥२॥
शास्त्रनिर्णीत जे निष्कृति । जीतें लौकिकी संस्था म्हणती । ते ते मृताच्या स्त्रियांहातीं । करवी श्रीपति विध्युक्त ॥३॥
पुत्रसंतति होती ज्यांसी । त्यांचेनि हातें तत्कर्मासी । करविता झाला हृषीकेशी । धर्मज्ञासी विवरूनी ॥४॥
कंस आणि कंसबंधु । समल्ल सर्वांचिया वधू । उत्तरकर्मीं योजूनि सिद्धु । पुढें गोविंदु काय करी ॥३०५॥
मातरं पितरं चैव मोचयित्वाथ बंधनात् । कृष्णरामौ ववंदाते शिरसा स्पृश्य पादयोः ॥५०॥
उद्धव अक्रूर घेऊनि सवें । सहित संवगडे आघवे । बंदिशाळा वासुदेवें । विजयविभवें ठाकिली ॥६॥
कारागारींचे रक्षक दूत । भेणें पळाले समस्त । मातापितरें केलीं मुक्त । निगड त्वरित छेदूनी ॥७॥
अनुक्रमेंचि उग्रसेना - । सहित समस्त यादवगणा । करूनि बंधविमोचना । समाधाना पावविलें ॥८॥
वसुदेव देवकी उग्रसेन । बंधुवर्ग जो यादवगण । त्यातें स्वमौळें रामकृष्ण । अल्प स्पर्शोनि जल्पति ॥९॥
तेणें आनंदले सर्व । फिटला कंसभयाचा ठाव । निर्भय पावती वासुदेव । तंव देवकी वसुदेव काय करिती ॥३१०॥
देवकी वसुदेवश्च विज्ञाय जगदीश्वरौ । कृतासंवंदनौ पुत्रौ सस्वजाते न शंकितौ ॥५१॥
वसुदेवदेवकी जनकजननी । पुत्रभ्रांति सांडूनि मनीं । प्रत्यक्ष जगदीश्वर जाणोनी । लागलीं चरणीं निःशंक ॥११॥
पुत्रबुद्धि रामकृष्ण । मानूनि न देती आलिंगन । बद्धांजलि पुढें ठाकोन । करिती स्तवन पूर्णत्वें ॥१२॥
म्हणती जयजय जनार्दना । जगदुद्धरणा संकर्षणा । दैत्यदुर्मदनिर्दाळणा । भवतारणा भगवंता ॥१३॥
अनेकजन्मींचा सुकृतसांठा । होता म्हणोनि आलेति पोटा । संहारूनि दैत्यां दुष्टां । आम्हां अभीष्टा भेटविलें ॥१४॥
नम्रमौळें हे करिती स्तुति । नयनीं प्रमोदकें स्रवती । हें जाणोनि मां भूपति । काय करिती तें ऐका ॥३१५॥
पुढिले अध्यायीं ते कथा । शुक सांगे कौरवनाथा । भाषाव्याख्यान तेथींचें श्रोतां । एकाग्र चित्तां परिसावें ॥१६॥
प्रतिष्ठान गोदातटीं । सच्चित्सुखयवैकुंठपीठीं । एकनाथकृपादृष्टी । स्वजनसृष्टी निवविता ॥१७॥
चिदानंदप्रसाद तेथ । भक्त लाहती स्वानंदभरित । गोविंदवरदे पूर्णतृप्त । होती समस्त दयार्णव ॥१८॥
तें हें श्रीमद्भागवत । अठरासहस्र मुनिप्रणीत । परमहंसीं रमिजे तेथ । उपनिषदर्थ सोलींव ॥१९॥
त्यांतील हा दशमस्कंध । पूर्ण झाला कंसवध । चतुर्थ एकादशिनी प्रसिद्ध । श्रोता सावध परीक्षिति ॥३२०॥
चव्वेचाळिसावा अध्याय । संपवूनियां शुकाचार्य । पुढील कथेचा अभिप्राय । निरूपील तो अवधारा ॥२१॥
माथां ठेवूनि श्रोतयां चरणीं । दयार्णवाची हे विनवणी । सर्वभूतीं चक्रपाणि । लक्षूनि बैसावें ॥२२॥
विरोध अथवा अनन्यशरण । झालिया सहजीं भवाब्धितरण । तारूं तेथ श्रीनारायण । होय आपण सर्वस्वें ॥२३॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां समल्लकंसवधो नाम चतुश्चत्वारिम्शत्तमोऽध्यायः ॥४४॥
श्रीकृष्णार्पणमस्त ॥ श्लोक ॥५१॥ टीका ओव्या ॥३२३॥ एवं संख्या ॥३७४॥ ( चव्वेचाळिसावा अध्याय मिळून ओवी संख्या १९९०६ )
चव्वेचाळिसावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP