अध्याय ४४ वा - श्लोक ४१ ते ४५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तथातिरभसांस्तांस्तु संयतान्रोहिणीसुतः । अहन्परिघमुद्यम्य पशूनिव मृगधिपः ॥४१॥
चपेटघातें फोडूनि वदन । परिघ घेतला हिरोन । परिघप्रहारें सशस्त्र चूर्ण । केले संपूर्ण आठही ॥४६॥
जैसा केसरी प्रतापजेठी । मर्दी करटी कोट्यानकोटी । तेथ सामान्य मृगाची गोठी । केंवि वोठीं प्रशंसिजे ॥४७॥
तेंवि मातले अष्टहि शलभ । मर्दूनियां रोहिणीडिंभ । विजयश्रीचा ऊर्जितकोंभ । रंगीं शोभा प्रकाशी ॥४८॥
हें देखोनि निर्जरगणीं । जयजयकारें गर्जोनि गगनीं । उत्साह केला तो सज्जनीं । सावध होवोनि परिसावा ॥४९॥
नेदुर्दुंदुभयो व्योम्नि ब्रह्मेशाद्या विभूतयः । पुष्पैः किरंतस्तं प्रीताः शशंसुर्ननृतुः स्त्रियः ॥४२॥
समल्ल सानुज कंसासुर । मर्दूनि विजयी वसुदेवकुमर । देखोनि आनंदें निर्भर । करिती निर्जर जयघोष ॥२५०॥
भवाब्जभवादि अमरीं सकळीं । पूर्वीं जावोनि क्षीराब्धिपाळीं । प्रसन्न करितां स्वपक्षशाळी । श्रीवनमाळी अवतरला ॥५१॥
आजि तो वधूनि कंसासुर । निर्भय केले सुरभूसुर । म्हणोनि आनंदें निर्भर । जयजयकार सुर करिती ॥५२॥
ब्रह्मेशादि निर्जरपति । श्रीप्रभूच्या गुणविभूति । दुंदुभिघोषें उत्साह करिती । विजयावाप्ति जाणोनि ॥५३॥
करिती अमोघ पुष्पवृष्टि । दिव्यसुमनीं भरली सृष्टि । कृष्णमहिमा लक्षूनि दृष्टीं । स्तोत्रपाठीं प्रशंसिती ॥५४॥
प्रीतिपूर्वक निर्जरगण । करिती भगवद्यशोवर्णन । अप्सरांचें सुनर्तन । सामगायन्गंधर्वीं ॥२५५॥
म्हणती जयजय जगदीश्वर । संकटीं कैपक्षी तूं अमरां । मर्दूनियां महाअसुरां । भूभुसुरां तोषद तूं ॥५६॥
जयजय जगज्जननीजनका । जयजय जगद्भयभंजका । जयजय सज्जनमनोरंजका । अघगंजका अखिलाद्या ॥५७॥
जयजय पुण्यपावनचरिता । जयजय अखिलांडकोटिभरिता । जयजय पादाब्जशौचसरिता । भवनिस्तरिता भ्रमहंत्री ॥५८॥
इत्यादि स्तवनीं स्तवितां अमरीं । येरीकडे मागधकुमरी । कंसकलेवर कवळिती समरीं । जैशा भ्रमरी मधुभंगी ॥५९॥
येथूनि तयांचें शोककथन । राया ऐकें सावधान । श्लोकषट्के निरूपण । व्यासनंदन निरूपी ॥२६०॥
तेषां स्त्रियो महाराज सुहृन्मरणदुःखिताः । तत्राभीयुर्विनिघ्नंत्यः शीर्षाण्यश्रुविलोचनाः ॥४३॥
तेषां म्हणिजे बहुतांचिया । शोक करिती बहुत जाया । दुःखें धांवूनि आलिया । महाराया तें ऐकें ॥६१॥
महामल्लांच्या मल्लवनिता । आणि कंसाच्या राजकान्ता । कंसबन्धूंचिया समस्ता । शोकसंतप्ता धांवती ॥६२॥
आप्त सोयरा जीवप्राण । वल्लभा समान दुसरा कोण । त्या प्राणप्रियाचें देखोनि मरण । दुःखें दारुण झळंबती ॥६३॥
हाहाकारें आक्रंदती । उर मस्तक वदनें पिटिती । लोचनीं अश्रुधारा स्रवती । विलाप करिती परोपरी ॥६४॥
अंगें टाकिती धरणीवरी । हस्तें ताडिती उरीं शिरीं । शोकसंतापमहापूरीं । दुःखलहरीमाजिवड्या ॥२६५॥
शयानान्वीरशय्यायां पतीनालिंग्य शोचतीः । विलेपुः सुस्वरं नार्यो विसृजंत्यो मुहुः शुचः ॥४४॥
वीरश्रीमंडित रंगक्षिति । तेथ अभंग निद्रिस्त पति । त्यांतें आलिंगोनि त्या सती । शोक करिती आक्रोशें ॥६६॥
आपुलाल्या पतींचीं प्रेतें । आलिंगूनियां उभय हस्तें । भूमि भिजविती अश्रुपातें । संतप्तचित्तें त्या रुदती ॥६७॥
मुखामाजी भरली माती । ते काढिती आपुल्या हातीं । रक्तें लेपलीं गात्रांप्रति । तें त्या पुसिती निजवसनीं ॥६८॥
निडळें लाविती कांतनिडळा । अश्रुपात ढळती डोळां । मुखें चुंबिती वेळोवेळां । घालिती गळां निजहस्त ॥६९॥
हस्तें धरूनियां हनुवटी । वदती भोगिल्या विलासगोठी । दीर्घस्वरें रुदतां कंठीं । प्रकटे सृष्टी सुस्वरता ॥२७०॥
स्वभावें मधुर स्त्रियांचे कंठ । करुणास्वरें रुदतां स्पष्ट । विविधा विलपती तो बोभाट । सुस्वर म्हणोनि शुक वदला ॥७१॥
वारंवार अश्रुपात । दुःखशोकें वदनें घेत । बहुधा विलाप करूनि तेथ । करिती आकान्त तो ऐका ॥७२॥
हा नाथ प्रिय धर्मज्ञ करुणानाथ वत्सल । त्वया हतेन निहता वयं ते सगृहप्रजाः ॥४५॥
अहा अहा रे प्राणप्रिया । समर्थ नाथा जिवलग सखया । आमुची अभिरंजनविलासक्रिया । पुरवावया तूं योग्य ॥७३॥
अन्नपानें वस्त्राभरणें । देखों न लाहसी आमुचें उणें । झळंबसी आमुचे करुणे । झालों तुजविणें अनाथा ॥७४॥
दास दासी पोष्यवर्गें । पुत्र कलत्र कुटुंब अवघें । मरण पावलों तव वियोगें । कोण तुजमागें आपंगी ॥२७५॥
आमुचा किमर्थ विषाद आला । कां पां धरिला दीर्घ अबोला । कां पोष्यांचा त्याग केला । धर्मज्ञाला अनुचित हें ॥७६॥
तुझिया उच्छिष्टाची आस । धरूनि पाहूं चिरकाळ वास । अनाथ दिसती दासी दास । कां पोष्यांस उपेक्षिलें ॥७७॥
ऐशा समस्त स्त्रिया रुदती । विशेष कंसाचिया सती । वाग्विलापें शोक करिती । तो भूपति अवधारीं ॥७८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP