अध्याय ४७ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीकृष्णपरब्रह्मणे नमः ॥
षड्गुणांचें अधिष्ठान । गोविंदसद्गुरु श्रीभगवान । भवीं बुडतां मादृशदीन । तदुद्धरणा अवतरसी ॥१॥
तव यश गाती निगमागम । शेषविरंचिमुनिसत्तम । हरिहरसुरवर पादपद्म । नमिती सप्रेम स्वसुखार्थ ॥२॥
पायाभ्रमभर भवाची वाडी । वेली वाढतां चढोवढी । सृष्टिस्थितिलय स्वकार्य ओढी । भरली भवंडी अभिमानें ॥३॥
विसरोनि आंगींची एकात्मता । प्रकृतिगुणीं निबद्ध होतां । भेदें पसरे अनेकता । हे क्षोभकता गुणांची ॥४॥
तया गुणक्षोभापासून । मुक्त करिसी प्रबोधून । यालागीं हरिहरकमलासन । सुरमुनिगण यश गाती ॥५॥
मोक्षश्रीचा कल्पद्रुम । ईश्वरा करिसी पूर्णकाम । यालागीं शक्तीसि श्रीपदप्रेम । बोधी निःसीम परिचर्या ॥६॥
तुझें उदारत्व कोणा । न तुळे कैवल्यकृपाघना । न कडसितां थोरां लहाना । साम वदान्या वर्षसी ॥७॥
जीवत्वावदशा दवडूनी । संपन्न करिसी ईश्वरपणीं । कीं जीवेश्वराची आटणी । ब्रह्मनिर्वाणीं समरसतां ॥८॥
इंद्रियद्वारा विश्व अशेष । उमाणी धरूनि विषयसोस । तों विपरीत ज्ञानें चिदाभास । मानी विशेष चिद्भासा ॥९॥
तुझें ज्ञान नोहे तैसें । येणें त्रिपुटी निःशेष पुसे । ज्ञेय ज्ञान ज्ञाता ऐसें । कोण उमसे ते ठायीं ॥१०॥
वास्तवबोधें ब्रह्मानंद । त्रिपुटीवर्जित जो अभेद । अमृतत्वीं अमृतस्वाद । हें ज्ञान विशद तव कृउपा ॥११॥
जया ज्ञानाचिया उजिवडें । ईश्वरही स्वकार्य मानी उबडें । मुरडोनि स्वानंदडोहीं बुडे । मग अनिवडे साक्षित्वें ॥१२॥
जें या ज्ञानाचें भाजन । तें वैराग्य तुझें गहन । मिथ्या कळल्या विवर्तभान । रंगे कोण ते ठायीं ॥१३॥
स्वप्नप्रियेचा सुरतानंद । सुशुप्तिभ्रमामाजि विशद । जागृति येतां चिळसीप्रद । विषयस्वाद तेंवि भवीं ॥१४॥
मिथ्याविवर्तप्रतीति । ज्ञानी निश्चय करी वसती । तैं ब्रह्मांडगर्भितविषयविरक्ति । भेदोपहतीमाजि मिरवे ॥१५॥
एवं यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य मिरवी धैर्य । तें तव सत्तेचें ऐश्वर्य । त्रैलोक्यधुर्य धुरंधरा ॥१६॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । गोमयवेत्ता आब्रह्मभुवन । असद्बोधातें निरसून । सद्बोधपूर्ण सद्गुरु तूं ॥१७॥
अचिंत्यैश्वर्य अपार । तें वर्णिलें षड्गुणाकार । षण्णाम जो भग उच्चार । तो भगवान्साचार गुरुवर तूं ॥१८॥
मादृशदीनाचिये करुणे । जाकळोनियां अवतार धरणें । तें षड्गुणांचीं अळंकरणें । विश्वीं प्रकटणें तनुविभवीं ॥१९॥
अनेक जन्म निष्कामभजनीं । जिहीं केलासि सेवाऋणी । तयां सभाग्यांच्या ऋणोत्तीर्णीं । सद्गुण लेवूनि अवतरसी ॥२०॥
तेव्हां जगदघभ्रमांधकार । निरसूनि चिद्बोधदिवाकर । प्रकट होतां जगदुद्धार । हा बडिवार बिरुदाचा ॥२१॥
माझा कारुण्यकलवळा पोटीं । म्हणोनि अद्वैतबोधहातवटी । सप्रेमभजन अभेदगोठी । टीका मर्‍हाठी हरिवरदा ॥२२॥
वाखाणवितां सधमस्कंधा । त्यामाजि उद्धवें नंदयशोदा । प्रबोधिलीं तो अध्याय समुदा । शेचाळिसावा संपला ॥२३॥
यावरी सत्तेचाळिसावा । अध्याय आरंभिला बरवा । प्रज्ञाप्रकाशें सिद्धी न्यावा । हें गुरुदेवा प्रार्थितसें ॥२४॥
अतिदुर्बोध भ्रमरगीत । परमरहस्यचातुर्यभरित । परमहंसीं रमिजे जेथ । श्रुतिसिद्धांत सद्भक्ति ॥२५॥
नंदद्वारीं देखोनि रथ । गोपी वितर्किती समस्त । तंव पातला उद्धव तेथ । प्रातःस्नानकृताह्निक ॥२६॥
श्रीकृष्णाच्या गुह्यगोठी । विशेष अध्यात्मपरिपाठीं । सम्यक बोधूनि व्रजगोरटी । येईल भेटी कृष्णाचे ॥२७॥
तेथ उद्धवातें देखून । निवाले व्रजवधूंचे नयन । तयाचें रूपलावण्य पूर्ण । नृपा कथन करी शुक ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP