अध्याय ४७ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


मय्यावेश्य मनः कृत्स्नं विमुक्ताशेषवृत्ति यत् । अनुस्मरंत्यो मां नित्यमचिरान्मामुपैष्यथ ॥३६॥

पूर्वीं मत्संगसेवनें । मनिष्थ जालीं तुमचीं मनें । आइतीं स्तिमित विरहध्यानें । अन्यसाधनें न लगती ॥५९॥
कृत्स्न म्हणिजे समग्र मन । माझ्या ठायीं प्रवेशून । अनुवेदनें माझें स्मरण । करितां संपूर्ण महत्प्राप्ति ॥४६०॥
समग्र मन तें म्हणाल कैसें । अषेष करणवृत्तिसरिसें । एकवटोनि अवस्थानाशें । विषयाध्यासें सुटलें जें ॥६१॥
जैसा सूर्य किरणगौळा । करूनि टाकी अस्ताचळा । तेंवि करणवृत्तिमेळा । मानसें सकळा आवरूनि ॥६२॥
करणवृत्तिसहित मन । मनमाजि प्रवेशतां पूर्ण । तुटले विषयासक्तिगुण । निर्मुक्तपण सहजेंचि ॥६३॥
जेव्हां विमुक्त अशेष वृत्ति । तेव्हांचि जाली भवनिवृत्ति । तस्मात् बाणल्या ऐसी स्थिति । तैं मत्प्रपति अतिशीघ्र ॥६४॥
अवज्ञा हेलन सन्निधानें । मानस वेधे विरहध्यानें । ज्या कारणास्तव तीं लक्षणें । तुम्हीं संपूर्ण अनुभविलीं ॥४६५॥
आतां माझें अनुस्मरण । मन्निष्ठता अनुवेदन । तेणें मदैक्य पावलां पूर्ण । चिरकाळ साधन न करितां ॥६६॥
म्हणाल समाधानास्तव । ऐसिया उक्तीचें गौरव । दावूनि माधुर्यरसाची ठेव । स्नेहलाघव पोखणें ॥६७॥
यदर्थीं ऐका वो कल्याणी । प्रतीति बाणे तुमच्या मनीं । ऐसें बोलिला चक्रपाणि । ते हे हरिवाणी अवधारा ॥६८॥

या मया क्रीडता रात्र्यां वनेऽस्मिन्व्रज आस्थिताः ।
अलब्धरासाः कल्याणो मा‍ऽपुर्मुद्वीर्यचिंतया ॥३७॥

मजसीं वनितां क्रीडता रातीं । जाणूनि प्रेमनिर्भरा चित्तीं । धांवोनि येतां मजप्रति । गृहीं स्वकांतीं रोधिल्या ॥६९॥   
अप्रपत माझी रासक्रीडा । भर्तृनिरोधें पावल्या पीडा । क्रीडाध्यानीं त्यांस चाडा । देहसांकडाहूनि सुटल्या ॥४७०॥
त्या माझेनि वीर्यचिंतनें । मजसीं मिनल्या माझेनि ध्यानें । हें जाणिजे तुमचेनि मनें । तरी संशय करणें कां येथ ॥७१॥
ऐसीं कृष्णाचीं शब्दरत्नें । उद्धव पारखूनि देतां यत्नें । व्रजवनिताही घेऊनि श्रवणें । अंतःकरणें निवालिया ॥७२॥
कुरुकुलमलयाचलचंदन । श्रोता परीक्षिति विचक्षण । सादर देखोनि पुढां कथन । करी संपूर्ण शुकयोनी ॥७३॥

श्रीशुक उवाच - एवं प्रियतमादिष्टमाकर्ण्य व्रजयोषितः ।
ता ऊचुरुउद्धवं प्रीतास्तत्संदेशागतस्मृतीः ॥३८॥

गोपीमानसप्रियतम कृष्ण । तदुक्त संदेश करूनि श्रवण । पूर्वस्मृतीचें लाहूनि स्मरण । करिती भाषण उद्धवेंसीं ॥७४॥

गोप्य ऊचु :- दिष्ट्याहितो हतः कंसो यदूनां सानुगोऽधकृत् ।
दिष्ट्याप्तैर्लब्धसर्वार्थैः कुशल्यास्तेऽच्युतोऽधुना ॥३९॥

उद्धवातें म्हणती गोपी । यादवांचा वैरी पापी । दुःखदायक खटाटोपी । वधिला प्रतापी रामकृष्णीं ॥४७५॥
ऊर्जितदैवें परमानंदें । सानुगशत्रूचे खाणोनि कांदे । स्वजनसुहृदेंसीं मुकुंदें । ऐश्वर्य समुदें सेविजतें ॥७६॥
यादव लागले देशोदेशीं । कृष्णें संपदा वोपूनि त्यांसीं । सर्वही करूनि मथुरावासी । आतां तिहींसीं कुशळ असे ॥७७॥
कुशळ रामकृष्ण बंधु । कुशल स्वपक्ष सात्वतसिंधु । आतां किमर्थ स्नेहसंबंधु । कीं तो व्रजवधू स्मरेल ॥७८॥
ऐशा बल्लवी वदल्या एकी । तंव विरहोत्सुका ज्या आणिकी । अभीष्ट गोष्टी पुसती मुखीं । तें श्रोतीं कौतुकीं परिसावें ॥७९॥

कथं रतिविशेषज्ञः प्रियः स पुरयोषिताम् । नानुबध्येत तद्वाक्यैर्विभ्रमैश्चानुभाजितः ॥४०॥

देव मानव आब्रह्मभुवन । रमवूं जाणे रति अभिज्ञ । परम प्रियतम तो जोडला कृष्ण । भाग्यसंपन्न पुरवनिता ॥४८०॥
रतिविशेष जेथ जे जैसे । कृष्ण तेथ ते जाणे तैसे । पुरवनितां तो जोडला असे । त्या स्वविलासें भजविती ॥८१॥
चाटुचटुला मधुरा वचनीं । सलज्ज मंद स्मित ईक्षणीं । वक्र व्यंकट कटाक्षबाणीं । नागरा स्वगुणीं अर्चिती ॥८२॥
इत्यादि ललनालालसललितीं । लाघवललाम लावण्यदीप्ति । स्ववश करितां हरिहक्पातीं । स्नेहावर्ती कां न पडे ॥८३॥
पुरस्त्रीस्नेहें बांधला हरि । कोठूनि आमुचें स्मरण करी । आम्ही वृथा वराका नारी । झुरों अंतरीं तद्विरहें ॥८४॥
ऐशा एकी बोलों सरल्या । तंव आणिकी उदिता जाल्या । कृष्णप्रेमें विरहाथिल्या । काय बोलिल्या तें ऐका ॥४८५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP