अध्याय ४७ वा - श्लोक ४१ ते ४५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
कच्चिद्गदाग्रजः सौम्य करोति पुरयोषिताम् । प्रीति नः स्निग्धसव्रीडहासोदारेक्षणार्चितः ॥४१॥
सुशांतवृत्ति सत्वसंपन्न । सौम्य हें त्या संबोधन । यास्तव उद्धवा बल्लवीगण । सौम्य म्हणोनि संबोधी ॥८६॥
जो गदाचा बंधु ज्येष्ठ । जैसा आम्हांसि प्रियतम प्रेष्ठ । तैसेच पुरवधूंचे अभीष्ट । काम यथेष्ट पुरवी कीं ॥८७॥
स्निग्ध म्हणिजे सप्रेमभरें । मंदस्मितादि सलज्ज वक्त्रें । ललितापांगें मन्मथशरें । आम्ही हरिगात्रें पूजिलीं जें ॥८८॥
किंवा नागरी मथुरा वामा । त्याही ऐशाचि मेघश्यामा । अर्चिती म्हणोनि त्यांचिया कामा । कांहीं तैसाचि पुरवी कीं ॥८९॥
नागरी वामा कामसक्त । स्मरसंभ्रमें तदनुरक्त । आमुचे ठायीं त्याचें चित्त । कांहीं वृत्तांत स्मरे कीं ॥४९०॥
आम्हांवरी कांहींएक । कृष्णस्नेहाचा कटाक्ष । आतां कैंचा निजमनसाक्ष । हरिलें लक्ष पुरवनितीं ॥९१॥
तंव आणिकी रानटा रमणी । साबड्या गांवढळा गौळणी । उद्धवेंसी वदती वाणी । सादर श्रवणीं ते ऐका ॥९२॥
अपि स्मरति नः साधो गोविंदः प्रस्तुते क्कचित् । गोष्ठीमध्ये पुरस्त्रीणां ग्राम्याः स्वैरकथांतरे ॥४२॥
साधु म्हणोनि उद्धवासी । पुसती उघड वृत्तांतासी । गोविंद जो हृषीकेशी । केव्हां आम्हासि स्मरतसे ॥९३॥
मथुरापुरींच्या नागरा नारी । कृष्णीं क्रीडतां स्वैराचारीं । स्मरसंभ्रमें तत्सभांतरीं । आम्हां मुरारि स्मतसे ॥९४॥
ग्राम्यग्राम्यभोगासक्ता । प्रस्तुत म्हणती कथीं हे वार्ता । काय करावी चातुर्यता । स्मरे स्वसुरता हरि कीं ना ॥४९५॥
तंव आणिकी विलासरसिका । उद्धवेम्सीं व्रजनायिका । पूर्वानुभूतमन्मथसुखा । अभिवर्धका प्रश्नमिषें ॥९६॥
ताः किं निशाः स्मरति यासु तदा प्रियाभिर्वृंदावने कुमुदकुंदशशांकरम्ये ।
रेमे क्कणच्चरणनूपुररासगोष्ठ्यामस्माभिरीडितमनोज्ञकथः कदाचित् ॥४३॥
म्हणती उद्धवा अवधारीं । केव्हां तर्ही त्या शर्वरी । स्मरतो कीं ना श्रीमुरारि । वद निर्द्धारीं शफथेंसीं ॥९७॥
तया शर्वरी कैशा म्हणसी । ज्यांच्या ठायीं पूर्ण शशी । कुमुदां कुंदांतें प्रकाशी । वृंदावनासि ते शोभा ॥९८॥
बहळसुगंध वृंदावनीं । सुधाढ्य धवलिमा शशांककिरणीं । वनश्रींच्या लावण्यगुणीं । व्रजकामिनी हरि रमवी ॥९९॥
सुभगा सुगौरा लावण्यखाणी । मंडित अनर्घ्यवसनाभरणीं । कृष्णें नर्तितां रासरंगणीं । मन्मथकदनीं रसभरिता ॥५००॥
रत्नजडित कार्तस्वर । विलोल श्रवणींचे अलंकार । कंकणें मुद्रिका अनर्घ्य हार । शोभा रुचिर साभरणीं ॥१॥
मौलवेणिका नासामुक्तें । रुक्मविरचितें मनिक्ययुक्तें । कंठाभरणें कंठासक्ते । पदें सालक्तें रंगितें ॥२॥
कटिमेखळे क्षुद्रघंटी । बाहुभूषणें बाह्यवटीं चरणीं क्कणिक नूपुरदाटी । निजबोभाटीं ध्वनि भरिती ॥३॥
ऐसिया वनिता सालंकारा । कृत नर्मोक्ति विविधा मधुरा । रास समाजीं विलासचतुरा । आम्हीं श्रीधरा स्तवितसों ॥४॥
जया उक्ति पडतां कानीं । सहस्रगुनित आनंद मनीं । कोंधाटे त्या कथाकथनीं । चक्रपाणि प्रोत्सार्ह ॥५०५॥
तेणें उत्साहभरितकामें । आमुसीं रमिजे मेघश्यामें । ज्यांमाजि त्या त्रियामा नर्में । आननपद्में कैं स्मरतो ॥६॥
किंवा विसरोनि गेला अवघें । भुलला नवनागराभोगें । असो जें होऊनि गेलें मागें । पुढें सवेगें प्रश्न कथीं ॥७॥
अपेष्यतीह दाशार्हस्त्तप्ताः स्वकृतया शुचा । संजीवयन्नु नो गात्रैर्यथेंद्रो वनमंबुदैः ॥४४॥
ऐशा अपरा पुसती रमणी । म्हणती कृष्ण चातुर्यखाणी । आपणानिमित्त बल्लवतरुणी । मन्मथकिरणीं संतप्ता ॥८॥
कृष्णवियोगशोकदुःखें । गोपीवदनाब्जकानन सुके । हें काय नाहीं त्या ठावुकें । जाणे असिकें सर्वज्ञ ॥९॥
तया संतापनिवारणा । सदयहस्तें संस्पर्शना । तत्पीयूषें गात्रजीवना । करील कीं न आ येऊनि ॥५१०॥
जैशींच मेघवियोगें वनें । ग्रीष्में संतप्त तीव्रकिरणें । हें जाणोनि संक्रंदनें । सजीव करणें नवमेघीं ॥११॥
तैसाचि कृष्ण येईल काय । आम्हां संतप्त्तां जीवनोपाय । करसंस्पर्शें अमृतप्राय । करील निश्चयें वद ऐसें ॥१२॥
हें ऐकोनि गोपी येरी । म्हणती कासया मूर्खापरी । वृथा बोलतां विरहातुरी । गोष्टी अंतरीं विवरा गे ॥१३॥
कस्मात्कृष्ण इहायाति प्राप्तराज्यो हताहितः । नरेंद्रकन्या उद्बाह्य प्रीतः सर्वसुहृद्वृतः ॥४५॥
कोणा कारणास्तव येथें । परतोनि यावें कृष्णनाथें । पावला राज्यैश्वर्यातें । स्वशत्रूतें मर्दुनी ॥१४॥
आतां त्यासि काय उणें । सालंकृत स्वगोत्रस्वजनें । नरेंद्राचीं कन्यारत्नें । पाणिग्रहणें पर्णील ॥५१५॥
भूपोपभोग नृपासनीं । हयगजसिबिका नानायानीं । विलासकुशळ नृपनंदिनी । मन्मथकदनीं साभरणा ॥१६॥
अनुचर किंकर समर्याद । अमात्यसचिवांचे संवाद । भाट बंदी सूत मागध । नाना विनोद रुचविती ॥१७॥
सामंतमांडलिकांचे गण । विनीत करित्ती विज्ञापन । तेथ आमुची आठवण । त्यासि कोठून किमर्थ ॥१८॥
बाळपणीं व्रजीं होता । आम्हां वांचूनि अन्य वार्ता । नेणे म्हणोनी अनन्यता । क्रीडा करितां सस्निग्ध ॥१९॥
आतां महद्भाग्याच्या भरीं । आमुचें स्मरण करील हरि । पुन्हा येऊनियां व्रजपुरीं । आम्हां स्वकरीं स्पर्शेल ॥५२०॥
ऐसी किमर्थ धरणें आशा । आमुचा विचंबु त्या कायसा । आम्ही रानटा वनौकसा । मा येरी राजसा तरी पुसे ॥२१॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP