अध्याय ४७ वा - श्लोक ५६ ते ६०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
सरिद्वनगिरिद्रोणीर्वीक्षन्कुसुमितान्द्रुमान् । कृष्णं संस्मारयन्रेमे हरिदासो व्रजौकसाम् ॥५६॥
यमुनाप्रमुख नानासरिता । कुंजकाननें पिहितलता । गोवर्धनादि अधोर्ध्व भंवता । पाहे पुरता हरिचर्या ॥६२०॥
गुहागह्वरें वप्रें शिखरें । प्रफुल्ल वल्ली द्रुम कांतारें । कृष्णक्रीडितें पाहोनि नेत्रें । सप्रेमभरें हरि हृदयीं ॥२१॥
हरिक्रीडेचीं पाहतां भुवनें । उद्धव निवे स्वांतःकरणें । गोपी गोपाळ व्रजस्थें जनें । तत्तत्स्मरणें निववितसे ॥२२॥
हरिदासां जो अग्रगणी । तो उद्धव निवोनि स्वांतःकरणीं । हरिक्रीडेच्या अनुस्मरणीं । व्रजा लागूनि अभिरमवी ॥२३॥
ऐसा उद्धव कित्येक मास । करितां व्रजजनीं सहवास । गोपिकांचा प्रेमोत्कर्ष । देखोनि संतोष पावला ॥२४॥
नंद यशोदा सुहृदां स्वजनां । अजा अविका पशु गोधना । कृष्नें वेधलें व्रजस्थां जनां । परी न पवती तुळणा गोपींची ॥६२५॥
जीवन जिवलग सर्वां जीवां । तेंवि व्रजजन प्रिय केशवा । मत्स्या वियोग न साहवे केव्हां । गोपीभावा ते तुळणा ॥२६॥
कुलटा स्वैरिणी जारनिपुणा । कुंकुमकज्जलवसनाभरणा । सालंकृता लावण्यगुणा । कामुकां तरुणां भुलविती ॥२७॥
मधुरनर्मोक्तिभाषणें । ठाणठकारें कटाक्षबाणें । चाटुचटुलकुलटाचिह्नें । विंधिती मनें भुजगांचीं ॥२८॥
तैशा स्वैरिणी नव्हती गोपी । निष्काम साधक जपी तपी । योगी विरक्त निर्विकल्पी । तेंवि हरिरूपीं रंगल्या ॥२९॥
ज्ञानी विवेकविरांगवंत । व्यतिरेकबोधें निजत्मरत । साधनसंपन्न्न उपरमयुक्त । कृष्णीं निरत या तैशा ॥६३०॥
नाहं देहो नेंद्रियगण । नाहंकार नाहं प्राण । इत्यादि व्यतिरेकें निरसन । करिती सज्ञान गुरुवचनें ॥३१॥
गोपीलागिं ते स्वयंभ दशा । बाणली न करितां शास्त्राभ्यासा । होऊनि भवभानीं उदासा । कृष्णपरेशा अनुसरल्या ॥३२॥
तनुलावण्या वस्त्राभरणा । गात्रा नेणती नग्नानग्ना । पतिपुत्रादि स्वजना सदना । सर्व ईषणा न स्मरती ॥३३॥
दृश्याभासा घालूनि पाणी । विमुख जालिया तन्मात्रज्ञानीं । केवळ निद्रिता भवभानीं । रतल्या कृष्णीं आत्मत्वें ॥३४॥
सांख्यवेदांतपरिशीलनें । नित्यानित्यविवेकज्ञानें । साधनसंपतिव्याख्यानें । तें स्वयंभ लक्षणें गोपींचीं ॥६३५॥
शास्त्राधारें शब्द वदती । आंग्मीं दुर्लभ अपरोक्षस्थिति । दशासिद्धि त्यां केउती । मा कृष्णप्राप्ति केंवि घडे ॥३६॥
गोपिकांचा अगाध महिमा । वेधें विसरल्या भवसंभ्रमा । प्रेमें रतल्या आत्मयारामा । पूर्णकामा श्रीकृष्णा ॥३७॥
ऐसा विवेक बहुधापरी । उद्धव आपुले हृदयीं विवरी । तो तूं कुरुवर्या अवधारीं । शुकवैखरी वदतसे ॥३८॥
दृष्ट्वैवमादि गोपीनां कृष्णावेशात्मविक्लवम् । उद्धवः पप्रमप्रीतस्ता नमस्यन्निदं जगौ ॥५७॥
ऐसी पूर्वोक्त बहुतां परी । ऐकोनि गोपींची वैखरी । व्रजीं राहोनि चिरकाळवरी । अवस्था नेत्रीं पाहोनी ॥३९॥
कृष्णाकार जालीं मनें । कृष्णीं उपरम पावलीं करणें । कृष्णावेशें आविष्करणें । जिणें मरणें तन्निष्ठा ॥६४०॥
शरीरभावीं परम ग्लानि । क्षुधे तृषेची नेणती हानि । कृष्णविरहाचा दावाग्नि । तावी म्हणोनि बरळती ॥४१॥
क्षुधा तृषा नेणती कांहीं । तेणें प्राणांसि विकळता देहीं । परी ते मनासि ठाउकी नाहीं । ध्यानप्रवाहीं उन्मन तें ॥४२॥
सर्वदा कृष्णक्रीडाध्यान । तेणें सदैव मन उन्मन । प्रवृत्तीसी पडिलें शून्य । प्रपंचभान मावळलें ॥४३॥
ऐसी गोपींची देखोनि स्थिति । उद्धवें चमत्कारूनि चित्तीं । धन्य मानूनि परम प्रीति । करी प्रनति गोपींतें ॥४४॥
पुरस्कारोनि वारंवार । सप्रेम घाली नमस्कार । म्हणे धन्य हा व्यभिचार । कैवल्यपर अवघाचि ॥६४५॥
नमीत होत्साता गोपींतें । उद्धव विवरी आपुल्या चित्तें । शास्त्रज्ञ दोष देखती येथें । धर्मशास्त्रातें लक्षूनी ॥४६॥
प्रत्यक्ष जो कां आपुलीं जननी । अथवा सर्वत्र गुरूची पत्नी । सामान्य सर्वत्र वर्णा ब्राह्मणी । नमितां श्रेणी पुण्याच्या ॥४७॥
वैश्यवर्णीं गोपवनिता । म्यां क्षत्रियें यालागिं नमितां । वर्णविभागें अयोग्यता । धर्मशास्त्रता प्रतिभासे ॥४८॥
शास्त्रदृष्टीच्या परिहारा । वर्णी गोपींच्या अधिकारा । म्हणे प्रेमळा कैवल्यपरा । महत्त्वें थोरा व्रजललना ॥४९॥
श्लोकपंचकें उद्धवगीत । क्षणैक परिसा सावधचित्त । ज्याच्या श्रवणें सभाग्य भक्त । अधिकारवंत जाणवती ॥६५०॥
एताः परं तनुभृतो भुवि गोपवध्वो गोविंद एव निखिलात्मनि रूढभावाः ।
वांछंति यद्भवभियो मुनयो वयं च । किं ब्रह्मजन्मभिरनंतकथारसस्य ॥५८॥
उद्धव म्हणे इये धरणीं । देहधारी जितुके प्राणी । त्यांमाजि या व्रजमानिनी । धन्य जन्मोनि भूलोकीं ॥५१॥
धन्य सफळ जन्म यांचें । ऐका रहस्य या वाक्याचें । नैसर्गिक प्रेम साचें । परमेश्वरीं यां घडलें ॥५२॥
गोप्ता गोमय गोगोविंद । अखिलात्मा जो परमानंद । त्याच्या ठायीं कृतसौहार्द । प्रेमा विशद पैं यांचा ॥५३॥
सदनीं धनीं तनुसंतानीं । पृथक्प्रेमा वाढे मनीं । प्रवृत्तिविसरें एकवटुनी । अवघा कृष्णीं तो यांचा ॥५४॥
नितरां म्हणिजे अतिशयेंसीं । रूढभाव म्हणिजे ज्यासी । नैसर्गिक तो प्रेमा यांसीं । पूर्वपुण्येंसीं जोडला ॥६५५॥
जन्ममरणांचा ज्यासि धाक । तापत्रयाची धुकधुक । कर्मबंधें त्रासले लोक । मोक्ष निष्टंक इच्छिती ॥५६॥
ऐसिया मुमुक्षुवर्गाप्रति । नैसर्गिक भगवद्गति । श्रमतां न जोडे कल्पांतीं । जे व्रजयुवती लाधलिया ॥५७॥
अथवा मनातें धरूनि मुठी । मननशीळही मुनिजन हठी । येहीं कष्टतां बहुसंकटीं । प्रेमा पोटीं हा नुपजे ॥५८॥
संकल्पाचा करूनि न्यास । कर्मत्यागें कृतसंन्यास । गोपींऐसा प्रेमा विशेष । तेहीं निःशेष न लाहती ॥५९॥
योगाभ्यासी जितप्राण । त्यांसही हा प्रेमा गहन । न लभे करितां अनेक शीण । बल्लवीगणसमसाम्य ॥६६०॥
अथवा आम्ही सात्वत भक्त । भगवत्प्रेमें भवविरक्त । ऐसिया आम्हांही अप्राप्त । प्रेमा निश्चिंत गोपींचा ॥६१॥
तीर्थवासी मरती शिणें । याज्ञिकें श्रमती मखसाधनें । तापसें करिती व्रताचरणें । तनुशोषणें कृच्छ्रादि ॥६२॥
वेदशास्त्रादि स्तोत्रपाठ । नानादेवताराधननिष्ठ । पुरश्चरणाचे साहती कष्ट । परि हा उद्भट भावन त्यां ॥६३॥
निसर्गप्रेमा दुर्लभ दानीं । न लभे आपूर्तादिसाधनीं । न जोदे जपजाप्यविधानीं । गोपींलागूनि फळला जो ॥६४॥
यालागीं पावन भगवत्प्रेमा । किमर्थ योनि उत्तम अधमा । वृथाचि अभिजात्यादिगरिमा । पुरुषोत्तमा भाव प्रिय ॥६६५॥
जनकशुक्लें जननीजठरीं । गात्र परिणमे नवमासवरी । जन्म पावे योनिद्वारीं । तें निर्धारीं शौक्ल जन्म ॥६६॥
शौक्ल जन्म सर्वां जाती । विशेष वर्णाग्र्यमहंती । तेथिंची ऐकावी व्युत्त्पत्ति । सावध श्रोतीं होऊनी ॥६७॥
करावया वेदपठन । अधिकारसिद्ध व्रतबंधन । सावित्र जन्म त्या अभिधान । वैश्यान्तत्रिवर्णंपर्यंत ॥६८॥
यज्ञाधिकारसिद्धीसाथीं । ब्राह्मण सर्वां वर्णां मुकुटीं । श्रौतदीक्षा मखपरिपाटीं । तृतीय जन्म्न दैक्षाख्य ॥६९॥
वृथाचि ऐसीं त्रिविध जन्में । वृथाचि श्रौतस्मार्तादि कर्में । वृथा वाहिजे वर्णाग्र्यगरिमे । हरिपदप्रेमें न रंगतां ॥६७०॥
अग्रवर्णाच्या या गोठी । तेथ कायशा सामान्यकोटी । असो जो सर्वलोकांही मुकुटीं । तो ब्रह्मा शेवटीं न तुळेचि ॥७१॥
येथ ब्रह्माचि न सरता । कायसी ब्रह्मलोकाची कथा । ब्रह्मलोकावाप्ति वृथा । कर्मठें इच्छितां न लजती ॥७२॥
विद्या वयसा रूप बळ । सत्ता संपदा कुळ शीळ । भगवत्प्रेमेंवीण वोफळ । जैसें मृगजळ श्रम न हरी ॥७३॥
श्रेष्ठजन्माचा अतिशय वृथा । सत्यलोकादि कायसी कथा । भगवत्प्रेमा प्राप्त नसतां । शीणचि नुसता सर्वत्र ॥७४॥
हो का कोण्ही जातिविशेष । कोण्हे योनिमाजि वास । परि गोपींऐसा प्रेमोत्कर्ष । लाहतां सारांश हरिप्राप्ति ॥६७५॥
तेंचि जन्म उत्तमोत्तम । कुळ शीळ रूप नाम । धन्य तेंचि धर्म कर्म । भगवत्प्रेम जे ठायीं ॥७६॥
शुक म्हणे गा कुरुकुळनरपा । हरिरति दुर्लभ कंजजगरपां । ते हे सुलभ अबळां गोपां । प्रौढां स्तनपां गोवत्सां ॥७७॥
ऐसीच आणखी एक परी । भगवत्प्राप्ति निजनिर्धारीं । तेही राया तूं अवधारीं । उद्धव वैखरी जें वदला ॥७८॥
अनंताचिया अनंत काथा । त्रिजगीं विस्तृता गुणगणभरिता । तद्रसपानीं सादर श्रोता । गोपीसमता तो पावे ॥७९॥
जातिवर्ण त्या न लगे श्रेष्ठ । सप्रेमभावें श्रवणनिष्ठ । विधिहरशक्रांहूनि वरिष्ठ । मानी वैकुंठ प्रियतम त्या ॥६८०॥
तस्मात् महत्त्वा कारण । तो हा भगवत्प्रसाद पूर्ण । भगवत्प्रेमोपलब्धीविण । जन्म वर्ण सर्व वृथा ॥८१॥
भगवत्प्रेमाचिये प्राप्ति । कुळ शीळ वर्ण जाति । अथवा ज्ञानाची संपत्ति । न लगे व्युत्पत्ति बहुशास्त्रीं ॥८२॥
तरी ते केंवि चढे हाता । ऐसा संदेह बाधी चित्ता । केवळ भजनें हरिएकांता । प्रेमोत्कटता वश होय ॥८३॥
तें या श्लोकीं निरूपण । उद्धव विवरी अनुतापोन । श्रोतीं करूनि मनाचे कान । हें व्याख्यान परिसावें ॥८४॥
क्केमाः स्त्रियो वनचरीर्व्यभिचारदृष्टाः कृष्णे क्क चैष परमात्मनि रूढभावः ।
नन्वीश्वरोऽनुभजतोऽविदुषोऽपि साक्षाच्छ्रेयस्तनोत्यगदराज इवोपयुक्तः ॥५९॥
उद्धव म्हणे कोण या स्त्रिया । वनौकसा वनचरप्रिया । नेणती विधानविधिचातुर्या । श्रुतिपथचर्या अश्रुत यां ॥६८५॥
केवळ मूढा श्वापदवत । परम तुच्छ यांचें जीवित । अधिकार पाहतां अपाड बहुत । कीं हरिएकांत यां योग्य ॥८६॥
तथापि व्यभिचारप्रेमेंकरून । ज्यांचें वर्तन सदूषण । व्यभिचारदुष्टा हें अभिधान । श्रुतिधर्मज्ञ ठेविती ॥८७॥
ऐसियां आणि हरिएकांत । उन्मत्तपुष्पीं उमाकांत । तेंवि व्यभिचारें त्रैलोक्यनाथ । रानटां प्राप्त अघटित हें ॥८८॥
अहो श्रुतिपथधर्माभिमानी । युगीं युगीं चक्रपाणि । नानारूपें अवतरोनी । धर्मस्थापनीं प्रवर्त्ते ॥८९॥
तो हा अधर्मव्यभिचारपथें । इहीं स्ववश केला येथें । अधर्ममार्गें स्वधर्मकृत्यें । इहीं समस्तें लाजविली ॥६९०॥
श्रुताध्यय्यनीं विमुखा नारी । तथापि केवळ या वनचरी । अधर्मस्वधर्ममार्गकुसरी । कोणे संसारीं नेणती ॥९१॥
तिहीं व्यभिचारप्रेमभावें । भगवन्निष्ठा वरिली जीवें । विधिविधान नाहींच ठावें । मा जेणें घडावें दूषण ॥९२॥
तस्मात् वेदशास्त्रपुराणयोग्यता । तुळिता न तुळे सप्रेमपथा । प्रेमें पाविजे हरिएकांता । विधान वृथा तद्रहिता ॥९३॥
बाळक शब्दचातुर्य नेणे । कोडोळ्यासि कोमडें म्हणे । परि तें माता अंतर जाणे । तेंवि सर्वज्ञें जगदीशें ॥९४॥
गोवाची पुदी बोबडावाणीं । बाळक मागे अज्ञानपणीं । त्या गुळाची पुरी वोपी जननी । अनर्थचि आणी सरळार्था ॥६९५॥
कीं तें अनन्यभावें जननी । वांचूनि त्रिजगीं श्रेष्ठ न मनी । तेंवि निरूढ प्रेमा कृष्णीं । व्रजकामिनीबहुपुण्यें ॥९६॥
भजनोपलब्धप्रेमभरें । कृष्णीं रंगल्लिया व्यभिचारें । अंतर जाणोनि कमलावरें । आत्माकारें रमविलिया ॥९७॥
बहुतेक ईश्वर जो सर्वज्ञ । त्यासि अविदुष ज्ञानहीन । भजतां त्याचें न्यून पूर्ण । करी कल्याण प्रसादें ॥९८॥
परिस जैसें कां लोहाचें । दैत्य फेडूनि कांचन साचें । करी तैसेंचि व्यभिचाराचें । दूषण पालटि हरितुष्टि ॥९९॥
कीं तमाढ्य कुहुचे रातीं । दैवें उगवलिया गभस्ति । तैं तो तामत्त्वा करी निवृत्ति । धवळी जागती निज तेजें ॥७००॥
कीं उपयुक्त सुधारस । सर्व रोगांचा करी नाश । न पाहे आयुर्विधानास । चिकित्सा त्रिदोष न विचारी ॥१॥
तेंवि भजनोपलब्धप्रेमें । अविदुष भजतां अविधिक्रमें । परि अनन्य जाणोनि पुरुषोत्तमें । कैवल्यधामें गौरविजे ॥२॥
साक्षाच्छ्रेय तो अपवर्ग । वोपी न मगतां अव्यंग । बळिष्ठ सप्रेमभजनमार्ग । त्याविण व्यंग विधिपदवी ॥३॥
जाति चंपक शेवंती बकुळा । पासूनि कनकौळें जासनीळा । प्रियतम न गणोनि परिमळा । तेंवि गोपाळा व्रजललना ॥४॥
तें या श्लोकीं निरूपण । उद्धव बोले चमत्कारून । शुकें नृपासि केलें कथन । तें व्याख्यान अवधारा ॥७०५॥
नायं श्रियोंऽगज नितांतरतेः प्रसादः स्वर्योषितां नलिनगंधरुचां कुतोऽन्याः ।
रासोत्सवेऽस्थ भुजदंडगृहीतकंठलब्धाशिषां य उदगाद्वजबल्लवीनाम् ॥६०॥
अपूर्व गोपींवरी प्रसाद । करिता झाला जो मुकुंद । पोर्वीं श्रियादि प्रेमळ वृंद । कोणी विशद न लाहती ॥६॥
ललनारत्न लक्ष्मी श्रेष्ठ । सागरसंभवा वरिष्ठ । ऐश्वर्यसौभाग्यें एकनिष्ठ । तेही फलकट गोपींसीं ॥७॥
लक्ष्मी निजांगीं वक्षस्थळीं । पादसेवनीं चरणकमळीं । तीसि हे प्रसादनव्हाळी । कोण्हे काळीं अप्राप्त ॥८॥
जयेसि सर्वदा एकांतरति । अनन्यनिरता सुभगा सती । गोपीप्रसादाची प्राप्ति । तेही कल्पांतीं न लाहे ॥९॥
उकरार्थें आश्चर्य मोठें । हेंचि राया आम्हांसि वाटे । जें न लाहती नितांत निकटें । तें लाहती रानटें गोवळियें ॥७१०॥
आणि लक्ष्मीच्या सहोदरी । ज्या जन्मल्या क्षीराब्धिजठरीं । पद्मगंध ज्यांच्या शरीरीं । पद्मकांति पद्माक्षी ॥११॥
पद्माकृति करपदतळें । पद्मवदना लावण्यमेळें । मनसिज ज्यांच्या प्रतापबळें । जिंके सगळें ब्रह्मांड ॥१२॥
ज्यांचा तापसांसि दरारा । ऐसिया स्वर्गांगना अप्सरा । गोपींसमान त्याही चतुरा । प्रसादपरा न होती ॥१३॥
तेथ इतरा प्राकृतनारी । केंवि या प्रसादा अधिकारी । म्हणसी कोणते प्रसादथोरी । ते अवधारीं कुरुनरपा ॥१४॥
लक्ष्मी चिरकाळ इच्छी रति । तीसि दुर्लभ श्रीपदप्राप्ति । तो बलात्कारें कमलापति । गोपींप्रति आळंगी ॥७१५॥
रासक्रीडेच्या आनंदें । भुजदंड पसरूनि श्रीमुकुंदें । आलिंगूनि आनंदकंदें । बल्लवीवृंदें तोषविलीं ॥१६॥
कंठीं संलग्न होतां हरि । लाधल्या प्रासदसिंधुलहरी । तेचि दुर्लभ सर्वांपरी । समता न करी कमलाही ॥१७॥
तया आनंदाचा लेश । दुर्लभ सहसा विधिहरांस । कदा न लाहती खगेंद्रशेष । सनकादिकांस अप्राप्य ॥१८॥
ऐसा गोपींचा भाग्यमहिमा । वर्णूं न शके फणींद्र ब्रह्मा । तो तुज कथिला श्रवणकामा । नृपसत्तमा संक्षेपें ॥१९॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP