अध्याय ५८ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तथैव सात्यकिः पार्थैः पूजितश्चाभिवंदितः । निषसादाऽऽसनेऽन्ये च पूजिताः पर्युपासत ॥६॥

जैसा श्रीकृष्ण सम्मानिला । तैसाचि युयुधानही पूजिला । पृथगासनीं बैसविला । संतोषविला उपचारीं ॥५०॥
तयाचिपरी अन्य यादव । कृष्णपार्षद जे कां सर्व । सभास्थानीं कृतगौरव । पूजा तदर्ह त्यां केली ॥५१॥
समस्तांचें औपासन । लक्षूनि तिष्ठती पांचै जण । तंव येरीकडे श्रीभगवान । काय करी तें ऐका ॥५२॥

पृथां समागत्य कृताभिवादनस्तयातिहार्द्रार्द्रशाऽभिरंभितः ।
आपृष्टवांस्तां कुशलं सहस्नुषां पितृष्वसारं परिपृष्टबांधवः ॥७॥

पृथेप्रति जनार्दन । येऊनि करी अभिवादन । तिणें देखतां भ्रातृनंदन । आसनावरून ऊठिली ॥५३॥
हार्द म्हणिजे स्नेहसुभरें । आर्द्र दृष्टी जळ पाझरे । पृथेनें तया सप्रेमभरें । श्रीकृष्ण आदरें आळंगिला ॥५४॥
मग तयेनें क्षेमकुशल । पुशिलें स्वबंधुवर्ग सकळ । तैसाचि भावुजयांचा मेळ । कंकाकंसादि पुशिलिया ॥५५॥
श्रीकृष्णाच्या सापत्नमाता । इरा मदिरा देवरक्षिता । रोहिणीप्रमुखा त्या समस्ता । संतानसहिता पुशिलिया ॥५६॥
स्नुषासहित कुंतीप्रति । क्षेम पुसे स्वयें श्रीपति । हें ऐकोनि अश्रुपातीं । गंहिंवरें कुंती दाटली ॥५७॥

तमाह प्रेमवैक्लव्यरुद्धकंठाश्रुलोचना । स्मरंती तान्वहून्क्लेशान्क्लेशापायात्मदर्शनम् ॥८॥

सप्रेमस्नेहाचिये भरीं । कळवळूनियां अभ्यंतरीं । कंठ दाटोनि स्फुंदन करी । बाष्प नेत्रीं पाझरती ॥५८॥
श्रीकृष्णातें बोले वचनीं । कौरवांची कापट्यकरणी । भस्म केलें लाक्षासदनीं । कीं गरदानीं भीमवध ॥५९॥
गान्धारांचिया दुरुक्ति दुष्टा । कीं सौबळोदिकांचिया कुचेष्टा । नित्य नूतन देती कष्टा । नेणों अभीष्टा तद्योगें ॥६०॥
पदोपदीं दुःखराशि । किती सांगाव्या तुजपाशीं । तूं नांदसी हृदयकोशीं । सर्व जाणसी हृदयस्थ ॥६१॥
बहुतां क्लेशांतें स्मरोन । ग्लानि पावोनि करी कथन । करुणावत्सल श्रीभगवान । तत्कारुण्य वांच्छितसे ॥६२॥
निजभक्तांचे जितुके क्लेश । निरसावया ते अशेष । आपणातें दर्शवी त्यांस । तेणें क्लेशांस भंग करी ॥६३॥
दर्शनें क्लेश निवारी सर्व । ऐसा नैसर्गिक स्वभाव । तो तूं प्रत्यक्ष वासुदेव । आमुची कींव तुजपोटीं ॥६४॥

तदैव कुशलं नो भूत्सनाथास्ते कृता वयम् । ज्ञातीन्नः स्मरता कृष्ण भ्राता मे प्रेषितस्त्वया ॥९॥

तैंचि आमुचें कल्याण जालें । जैं तां कृपेनें सनाथ केलें । आम्हां बंधूतें हृदयीं स्मरिलें । सांभाळिलें कृपेनें ॥६५॥
आमुचा कळवळा अंतरा । म्हणोनि मम भ्राता हस्तिनापुरा । अक्रूरनामा धाडिला खरा । तैं तेणें लेंकुरां आश्वासिलें ॥६६॥
जैं तां पाठविला श्वाफल्कि । तेणें आम्हांसि केलें सुखी । अन्याय धृतराष्ट्रामस्तकीं । बोधिलीं निकीं धर्मवाक्यें ॥६७॥
आपुल्या ज्ञातीसमान आम्हां । तुवां लेखिलें पुरुषोत्तमा । आप्त परकीय मोहभ्रमा । तूं परमात्मा नातळसी ॥६८॥
आपपर हें तुझ्या ठायीं । कोण्हे कालीं स्पर्शलेंचि नाहीं । म्हणसी कंसादि वधिले तेही । ऐकें नवाई तुज कथितें ॥६९॥

न तेऽस्ति स्वपरभ्रांतिर्विश्वस्य सुहृदात्मनः । तथापि स्मरतां शश्वत्क्लेशान्हंसि हृदि स्थितः ॥१०॥

आत्मयाहूनि प्रियतम सुहृद । अपर कोण तो शाश्वत सुखद । विश्वसोयरा तूं आम्हां विशद । सच्चिदानंदा परमात्मा ॥७०॥
स्वप ऐशी अविद्याभ्रांति । अविद्याग्रस्तां जीवांप्रति । तुझ्या ठायीं नसे श्रीपति । तथापि चरितीं भासतसे ॥७१॥
ऐकें तयाचें कारण । तूं हृदयस्थ सर्वग पूर्ण । भजतां छेदिसी अविद्यावरण । विवेकसंपन्न करूनियां ॥७२॥
विवेकसंपन्न कृपेनें करिसी । तैं अविवेकाची निरसे निशी । विस्मरणाचिये सुषुप्तीसी । शांति आपैसी मग होय ॥७३॥
विस्मरणाचिये सुषुप्तीमाजि । भेदभ्रमाची स्वप्नराजि । साच मानूनि क्लेशपुंजीं । बुडूनि सहजीं तळमळिती ॥७४॥
तें सस्मरण दिनोदयीं । विस्मरणाची सुप्ति नाहीं । तैं भेदभ्रमाच्या स्वप्नीं पाहीं । क्लेश कायी उतरतील ॥७५॥
शश्वत्स्मरणाच्या जागरीं । क्लेशहंता तूं हृदयस्थ हरि । भेदभ्रमितां क्लेशकारीं । सुषुप्तीभरीं विसराचे ॥७६॥
यालागीं तूंतें निरंतर स्मरती । तत्क्लेशहंता तूं श्रीपति । भेदभ्रमें तुज द्वेषिती । ते भाविती शत्रुत्वें ॥७७॥
पितृष्वसेनें इत्यादिवचनीं । संसारसुखदुःखांची कहाणी । निवेदिली ते ऐकोनि श्रवणीं । आज्ञा घेऊनि निघाला ॥७८॥
मग येऊनि सभागारा । सात्यकिप्रमुखां यादववीरां । सहित येऊनि युधिष्ठिरा । पाण्डुकुमरांसह बैसे ॥७९॥
तिये काळीं बद्धपाणि । धर्म बोलिला सरळवाणी । ते तूं कौरवचूडामणि । ऐकें श्रवणीं सप्रेमें ॥८०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP