अध्याय ५८ वा - श्लोक २६ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
सोऽग्निस्तुष्टो धनुरदाद्धयाञ्श्वेतान्रथं नृप । अर्जुनायाक्षयी तूणौ चर्म चाभेद्यमस्त्रिभिः ॥२६॥
अरोग केला जो कृशान । तो होऊनि संतुष्टमान । पार्थालागीं गाण्डीवसंज्ञ । देता जाला कोदंड ॥८६॥
क्षीरोदसंभव अश्व रत्ना । समान जवीन क्रमिती गगना । दिव्य तुरंग ते स्यंदना । सहित अर्जुना समर्पी ॥८७॥
अक्षयसायकमंडित तूण । अभेद्यचर्म म्हणिजे वोडण । परशरघातें नोहे भिन्न । इत्यादि अर्पण करूनियां ॥८८॥
म्हणे मज तुमचा उपकार फार । उत्तीर्ण नोहें मी अणुमात्र । येथूनि तुमचा आज्ञाधर । स्मरतां तत्पर सेवेसी ॥८९॥
ऐसी ऐकोनि पावकवाणी । पाण्डव आणि चक्रपाणि । पावकालागीं मधुरवचनीं । गौरवूनियां बोळविला ॥१९०॥
असो अग्नीची हे गोष्टी । यावरी ऐकें मयराहटी । तेणें प्रार्थूनियां जगजेठी । नमिला किरीटी नतमौळें ॥९१॥
मयश्च मोचितो वह्नेः सभां सख्य उपाहरत् । यस्मिन्दुर्योधनस्याऽऽसीज्जलस्थलदृशिभ्रमः ॥२७॥
अग्नीपासूनि वांचविला । म्हणोनि उपकारें दाटला । प्रत्युपकरणा अर्पिता जाला । सभा निर्मूनि निजसखया ॥९२॥
मय असुराचा विश्वकर्मा । तेणें सभा परमोत्तमा । गौण जियेपुढें सुधर्मा । हेमललामात्मक अवघी ॥९३॥
दुर्योधनासि जिये ठायीं । स्थलजलभ्रांति झाली पाहीं । पतन होतां नृप सर्वही । ललनादिकांहीं स्मय केला ॥९४॥
हास्य करितां लहान थोर । तेणें सलज्ज धार्तराष्ट्र । कांति उतरोनि काळें वस्त्र । कांपे थरथर सक्रोधें ॥१९५॥
पाण्डवीं बहुधा सम्मानिला । परि तो हृदयीं सशल्य जाला । जेंवि कां सर्पें डाव धरिला । तेंवि दुःखाला विसरेना ॥९६॥
असो पाण्डवाकडील कथा । अपार भारत न सरे कथितां । वैशंपायन तुझिया सुता । होईल कथिता व्यासाज्ञा ॥९७॥
यानंतरें श्रीभगवान । मय पावक दोघे जण । विसर्जूनियां सभासदन । पाहोनि संपूर्ण संतोषे ॥९८॥
एवं आनंदें इंद्रप्रस्थीं । धर्मा निकटीं करितां वसती । देवकी वसुदेव हलधर चित्तीं । आठवी श्रीपति औत्सुक्यें ॥९९॥
मग पुसोनि कुरुनरेशा । नमस्कारूनि पितृष्वसा । हस्तें स्पर्शोनि द्रौपदी शिरसा । आज्ञा घेता हरि जाला ॥२००॥
संकेतमात्रें प्रस्थानभेरी । सवेग वाहूनियां कुंजरीं । मुहूर्तें ठोकितां तयांच्या गजरीं । जाली परिवारीं लगबग ॥१॥
सारथि जुंपिती रहंवर । मंदुरशाळेतें मादुर । सज्जिले अंबष्ठीं कुंजर । पदाति वीर सिद्ध जाले ॥२॥
सेना निघाली बाहेर । पश्चिम मार्गें चालिले भार । धर्मराजें श्रीयदुवीर । बोळविला तो अवधारा ॥३॥
स तेन समनुज्ञातः सुहृद्भिश्चानुमोदितः । आययौ द्वारकां भूयः सात्यकिप्रमुखैर्वृतः ॥२८॥
रत्नजडितें कनकाभरणें । अर्पिलीं कालिंदीकारणें । माळा गळीं विचित्र वसनें । सात्यकिप्रमुखां समर्पिलीं ॥४॥
भगवंतासि सर्वोपचार । अनर्घ्य रत्नें अलंकार । विद्युत्प्राय पीतांबर । प्रेमें परिधान करविला ॥२०५॥
मुकुट कुंडलें मेखळा । कटकांगदें मुद्रिका माळा । वांकी तोडर चरणयुगळा । रत्नपादुका समर्पिल्या ॥६॥
गंधाक्षता कुसुमहार । वरी उधळिला दिव्य धूसर । नीराजनीं जयजयकार । करितां स्वार हरि जाला ॥७॥
तो श्रीकृष्ण या प्रकारें । आज्ञा देऊनि युधिष्ठिरें । बोळविलिया सुहृदीं गजरें । अत्यादरें अनुमोदिला ॥८॥
पाण्डववेष्टित वासुदेव । सात्यकिप्रमुख सहयादव । नागरजनीं कृतगौरव । अर्पिलीं अपूर्व उपायनें ॥९॥
पांचै जणीं पाण्डववीरीं । आरूढोनियां निज रहंवरीं । युयुधानेंसीं कैटभारि । वेष्टित गजरीं निघाला ॥२१०॥
त्रिगव्यूतीपर्यंत ऐसे । अनुगमनार्थ कृष्णा सरिसे । तेथूनि आहविले यादवेशें । प्रेमसौरसें गौरवुनी ॥११॥
नृपासनाचिया बंधनीं । वत्स गोवूनि धेनु तान्ही । वना जातां वोरसें दोन्ही । दाटती तैसे परस्परें ॥१२॥
पाण्डव पाहती कृष्णवदन । पाण्डववदना पाहे कृष्ण । स्नेहसुभरें द्रवती नयन । पुसूनि प्रयाण आदरिलें ॥१३॥
श्रीकृष्ण म्हणे माझिया स्मरणें । तुम्हां न बधिजे कोणा विघ्नें । पाण्डव म्हणती कृपेच्या घनें । स्नेहकारुण्यें तर्पावें ॥१४॥
ऐसें बोलूनि परस्परीं । पुन्हां बैसोनि रहंवरीं । द्वारके उजू कैटभारि । सहपरिवारीं चालिला ॥२१५॥
कालिंदीतें शिबिकायानीं । सहचरी सखिया वीजिती व्यजनीं । सवें घेऊनि चक्रपाणि । द्वारकाभुवनीं प्रवेशला ॥१६॥
युयुधानेंसीं कमलानाथ । घेऊनि कालिंदी समवेत । द्वारकेप्रति येतां दूत । पुढें नगरांत पाठविले ॥१७॥
उद्धव अक्रूर संकर्षण । देवकप्रमुख यादवगण । स्नेहें सामोरे येऊन । कृष्ण पाहोन निवाले ॥१८॥
पाहोनि कालिंदीचें मुख । सर्वां जाला सुखसंतोष । गीत नृत्य मंगलघोष । भद्रासनास पातले ॥१९॥
नमूनि राजा उग्रसेन । वसुदेवप्रमुखां केलें नमन । येर समस्त यादवगण । अवलोकून वंदिले ॥२२०॥
मग करूनि जयजयकार । प्रवेशले निजमंदिर । कालिंदीचें पाहूनि वक्त्र । निवती समस्त पुरवासी ॥२१॥
ऐसा द्वारकाप्रवेश कथिला । यावरी जो कां वृत्तान्त वितला । तो तूं कुरुनृपाळा । सदस्यमेळासमवेत ॥२२॥
अथोपयेमे कालिंदीं सुपुण्यर्त्वृक्ष ऊर्जिते । वितन्वन्परमानंदं स्वानां परममंगलम् ॥२९॥
यानन्तरें उत्तम दिवसीं । भद्रासनीं नृपापासीं । वसुदेवादि हृषीकेशी । संकर्षणेंशीं उपविष्ट ॥२३॥
प्रसंगें नृपाचिये कर्णीं । वृत्तांत जाणवी सुनंदपाणि । कालिंदीचिये पाणिग्रहणीं । यथाविधानीं हा काळ ॥२४॥
रायें पाचारिलें ब्राह्मण । पुरोहित ज्योतिषी विधानज्ञ । तिहीं केलें कालज्ञान । पंचांगपठन करूनियां ॥२२५॥
ऋतु वरिष्ठ कुसुमाकर । वैशाख माधव श्रेयस्कर । उच्चासनारूढ भास्कर । ऊर्जितविभवें विराजित ॥२६॥
अखिल मंगळां मंगलायतन । तो श्रीकृष्ण कल्याणभुवन । त्याचें साधावया सुलग्न । मंगळ दिन द्विज पाहती ॥२७॥
ताराबळ चंद्रबळ । वाक्पति विद्यादैवबळ । गोचरप्रकरणीं पाहोनि अमळ । दैवज्ञ कुशळ विचारिती ॥२८॥
द्रेष्काण होरा नवांश ग्रह । द्वादशांश त्र्यंशांश षड्वर्गसमूह । ज्याचे अधिपति शुभग्रह । करिती निर्वाह विवरूनी ॥२९॥
गोत्रनिर्णय वर्णात्मकां । राशिचिंतन अनुलोमप्रमुखां । पंचकोत्तीर्ण लग्नघटिका । इष्ट बलिष्ठ विलोकिलें ॥२३०॥
लाभीं सर्व शुभावह । केन्द्रीं त्रिकोणीं सौम्य ग्रह । सहज शत्रुभुवनीं निचय । पापग्रहांचा शुभफलद ॥३१॥
ऐसी करूनियां विचारण । लग्नपत्रिका वर्तिली जाणा । हळदी लावूनि दोघां जणां । देवकप्रतिष्ठा पैं केली ॥३२॥
ऊर्जित दैवें ओंपुण्यकाळ । लग्नविधान शुभमंगल । ब्राह्मण तपोधन निर्मळ । भूभुजमेळ सुहृदांचा ॥३३॥
वाजंत्रांची एक घायी । सुरवर सुमनें वर्षती पाहीं । परमानंद सर्वां देहीं । कृष्णविवाहीं वोसंडे ॥३४॥
धनें गोधनें वांटिलीं द्विजां । भद्रासनीं आहुकराजा । सुहृदीं अहेरीं पूजिला वोजा । गरुडध्वजा लक्षूनी ॥२३५॥
देवकी रोहिणी सापत्न जननी । वरमाता या वरिष्ठ मानीं । बैसोनि मिरवती सुखासनीं । वाद्यगायनीं पुरगर्भीं ॥३६॥
समस्तां सदनीं महोत्सव । वर्हाडी भोजान्धक यादव । रामप्रमुख वासुदेव । अहेरगौरव यां करिती ॥३७॥
मंगलमंडित षोडश दिवस । लक्ष्मीपूजन गृहप्रवेश । निरवूनियां भाणवसास । गृहस्थ जगदीश चौघींसीं ॥३८॥
कालिंदीचें पाणिग्रहण । द्वारकेमाजि जालें पूर्ण । प्रसंगें विवाहप्रकरण । पंचम लग्न शुक सांगे ॥३९॥
विंदानुविंदावावंत्यो दुर्योधनवशानुगौ । स्वयंवरे स्वभगिनीं कृष्णे सक्तां न्यषेधताम् ॥३०॥
त्यानंतरें अल्पा दिवसीं । द्वारके वसतां श्रीहृषीकेशी । अवंतीहूनि सर्वां देशीं । मूळें रायांसि पैं आलीं ॥२४०॥
विंदानुविंद बंधु दोघ । दुर्योधनासिं स्नेहयोग । तद्वशवर्ती होऊनि अनुग । राज्यभूभाग भोगिती ॥४१॥
दुर्योधनाच्या स्नेहादरें । कृष्णीं वर्तती द्वेषाचारें । तिहीं भूपति निज सोयरे । पत्रद्वारें पाचारिले ॥४२॥
क्षिप्रापगेच्या उभय तटीं । शिबिरें उभिलीं लक्ष कोटी । भूमंडळींच्या भूभुजथाटी । अवंती निकटीं उतरलिया ॥४३॥
मित्रविंदेचें स्वयंवर । ऐकोनि मिळाले नृपवर । एक वर्जूनि द्वारकापुर । सोयरे अपार पातले ॥४४॥
गुण लावण्य ऐश्वर्यथोरी । श्रीकृष्णाची परस्परीं । ऐकोनि मित्रविंदा सुंदरी । मनें निर्धारी हरि भर्ता ॥२४५॥
मातेपासीं कथिलें गुज । जें मम भर्ता गरुडध्वज । हें ऐकोनि अवंतिराज । म्हणती लाज हे आम्हां ॥४६॥
कृष्णासि नाहीं नृपासन । केवळ गोरक्ष हीन दीन । चैद्य मागध दुर्योधन । भूभुज मान्य हे आम्हां ॥४७॥
मित्रविंदेतें निषेधिती । कृष्ण अयोग्य नृपसंपत्ति । यालागिं सांडूणि तदासक्ति । वरीं भूपति माने तो ॥४८॥
भूमंडळींचे भूप । अमोघ ऐश्वर्य शौर्य प्रताप । त्यांमाजि पाहूनि ऐश्वर्यकल्प । लावण्यदीप नृप वरिजे ॥४९॥
सहज येतील स्वयंवरीं । श्रवणें नयनें पाहोनि विवरीं । प्रियतम वाटेल तो तूं वरीं । भगिनी यापरी प्रबोधिती ॥२५०॥
ऐकोनि बंधूंचें उत्तर । जेविं मृद्घटीं दृढ पाथर । पडतां भंगी तेंवि अंतर । भंगोनि विचार हारपला ॥५१॥
थरथरा कांपे अंगयष्टि । झरझर नीर पाझरे दृष्टी । मर मर दैवा म्हणोनि कष्टी । होय गोरटी अनुतापें ॥५२॥
कृष्णावेगळा स्वयंवरीं । अन्य भूपाळ सहसा न वरीं । ऐसा निश्चय दृढ अंतरीं । करूनि श्रीहरी चिंतितसे ॥५३॥
मित्रविंदेचें अंतर । सर्वज्ञ सर्वग कमलाकर । जाणोनि पातला पैं सत्वर । तोही प्रकार अवधारा ॥५४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP