अध्याय ५८ वा - श्लोक ३६ ते ४०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
वरं विलोक्याभिमतं समागतं नरेंद्रकन्या चकमे रमापतिम् ।
भूयादयं मे पतिराशिषोऽमलाः करोतु सत्या यदि मे धृतो व्रतैः ॥३६॥
जैसा इच्छित होती मनीं । त्याहूनि वरिष्ठ कोटिगुणीं । भर्ता देखूनि नृपनंदिनी । मन्मथबाणीं भेदियली ॥१॥
आवडिऐसा प्रिय संमत । आपण होऊनि जाला प्राप्त । त्यातें नृपदुहितेचें चित्त । जालें आसक्त सर्वस्वें ॥२॥
जो कां रमेचा रमणीय भर्ता । तो वर विलोकूनि नरेंद्रदुहिता । मानसें वश जाली तत्सुरता । चिंती चित्तामाजिवडी ॥३॥
दैवें मज हा हो कां पति । माझ्या अनेक व्रतसंपत्ति । अमळआशीर्वादांची प्राप्ति । तेणें श्रीपति वर लाभो ॥४॥
दृढव्रतें म्यां वरिला मनीं । तो परमात्मा मज ये क्षणीं । फलद हो हा वर योजुनी । नृपनंदिनी हें वांच्छी ॥३०५॥
नाग्नजितीचे मनोरथ । सबाह्य जाले कृष्णासक्त । ऐसी निरोपूनियां मात । नृप प्रार्थित तें ऐका ॥६॥
अर्चितं पुनरित्याह नारायण जगत्पते । आत्मानंदेन पूर्णस्य करवाणि किमल्पकः ॥३७॥
सभास्थानीं कोशलपति । स्वर्चित सुप्रसन्न श्रीपति । देखोनि त्यातें पुढतोपुढती । करी विनंति सप्रेमें ॥७॥
भो भो निर्गुणा नीरायतना । जगत्पते श्रीनारायणा । किंकराची विज्ञापना । ऐकोनि आज्ञा मज दीजे ॥८॥
देहधारियां जीवांप्रति । विषयसंयोगें आनंदप्राप्ति । आत्मानंदें ज्यासि तृप्ति । तया पूर्णासि विनंति काय करूं ॥९॥
मी तो अल्प हीन दीन । तूं परमात्मा आनंदघन । काय करूं मी दास्याचरण । हें आज्ञापन मज कीजे ॥३१०॥
त्रिजगीं विस्तृत तुझा महिमा । विदित विदुषा आगमनिगमां । भाग्यें तो तूं आजि आम्हां । सुलभ परमात्मा झालासी ॥११॥
यत्पादपंकजरजः शिरसा बिभर्ति श्रीरब्जजः सगिरिशः सहलोकपालैः ।
लीलातनुः स्वगतसेतुपरीप्सयेशः काले दधत्स भगवान्मम केन तुष्येत् ॥३८॥
ज्याचे पादपंकजरज । शिरीं धरिती शिवअब्जज । लोकपाळांहीं सहित सहज । सुकृतपूज्य नरसुरही ॥१२॥
कमला पदकमळाची धुळी । दुर्लभ लाभें धरूनि मौळीं । कमलवासिनी निजकरकमळीं । चरणकमला संवाहनीं ॥१३॥
स्वकृतस्वधर्मसेतुपालना । इच्छूनि स्वजनाचिया कल्याणा । अवतार धरूनि लीला नाना । जगदुद्धरणा करी ईश ॥१४॥
जिये काळीं स्वधर्मभंग । होतां देखोनि इंदिरारंग । पुढती स्वधर्म स्थापी साङ्ग । षड्गुण अभंग प्रकटूनी ॥३१५॥
ऐसा मजवरी परमेश्वर । तोषोनि होय कृपाकर । कोण्ह्या उपचारें हें सधर । मम अंतर तर्कीना ॥१६॥
अनेक जन्मांचें सुकृत । कीं पूर्वजांचें पूर्वार्जित । तेणें कृपेनें द्रवोनि येथ । मज सनाथ केलें पैं ॥१७॥
आतां कृपेनें आज्ञा कीजे । जेणें जन्मसार्थक माझें । हें ऐकोनि गरुडध्वजें । तोषोनि सहजें वदिजेल ॥१८॥
श्रीशुक उवाच - तमाह भगवान्कृष्णः कृतासनपरिग्रहः । मेघगंभीरया वाचा सस्मितं कुरुनंदन ॥३९॥
शुक म्हणे गा परीक्षिति । नृपाची देखोनि अमळभक्ति । कृपेनें तोषोनि कमलापति । बोले त्याप्रति सप्रेमें ॥१९॥
आसनीं बैसोनि सुपूजित । मेघगंभीरवाचा वदत । परमानंदें हास्ययुक्त । षड्गुणवंत हरि बोले ॥३२०॥
श्रीभगवानुवाच - नरेंद्र याञ्चा कविभिर्विगर्हिता राजन्यबंधोर्निजधर्मवर्तिनः ।
तथापि याचे तव सौहृदेच्छया कन्यां त्वदीयां न हि शुक्लदा वयम् ॥४०॥
कृष्ण म्हणे गा राजेश्वरा । आम्हां क्षत्रियांचिया आचारा । याञ्चा परम निंद्यतरा । महर्षिंप्रवरीं निषेधिली ॥२१॥
जन्मोनियां क्षत्रियकुळीं । जे सर्वदा स्वधर्मशाळी । तयां याञ्चा नाहीं बोलिली । शास्त्रकुशलीं सर्वज्ञीं ॥२२॥
तथापि याचितों मी आपण । तुझिये सुहृदइच्छेकरून । तुझे जठरींचें कन्यारत्न । मजलागून समर्पी ॥२३॥
शुक्ल म्हणिजे द्रव्यमात्र । तदर्थ आम्ही न हों पात्र । तुवां प्रार्थिलें त्याचें उत्तर । इतुकेंचि सार जाणावें ॥२४॥
द्रव्यदानाचें पात्र नाहों । कन्यायाचक आलों आहों । तुवां पुशिलें काय देवों । तरी हा निर्वाह जाणावा ॥३२५॥
ऐसी ऐकोनि भगवद्वाणी । राजा तोषोनि अंतःकरणीं । बोलता जाला तें तूं श्रवणीं । ऐकें करणी तत्कृत जे ॥२६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP