अध्याय ५८ वा - श्लोक ४६ ते ५०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


बध्वा तान्दामभिः शौरिर्भग्नदर्पान्हतौजसः । व्यकर्षल्लीलया बद्धान्वालो दारुमयान्यथा ॥४६॥

शूरसेनाचा नातु हरि । यालागीं नामें बोलिजे शौरि । तेणें सातही वृषभ एके हारी । बांधोनि दोरीं आकर्षिले ॥८४॥
दर्प भंगला त्या वृषभाचा । तेजोलोप जाला साचा । धर्म निथळे सर्वांगाचा । लोप शक्तीचा जाला पैं ॥३८५॥
ऐसियांतें चक्रपाणि । वोढिता जाला धरूनि कानीं । सभानायकां दाविलें नयनीं । प्रतिज्ञा जाणोनि आश्चर्य ॥८६॥
जेंवि काष्ठाचीं वृषभ घोडीं । दोर बांधूनि बाळक वोढी । सप्त वृषभां ते परवडी । केली रोकडी श्रीकृष्णें ॥८७॥
हें देखोनि कोशलपति । आणि पुरजनींहि समस्तीं । जयजयकार केला प्रीति । नाग्रजिती हरिखेली ॥८८॥
यादववीर थरारिले । तिहीं जयजयकार केले । कृष्णें नोवरीतें जिंकिलें । आतां वहिलें चला म्हणती ॥८९॥
श्रृंगारूनियां नाग्नजिती । नेते जाले शिबिराप्रति । कोशलराजा करी विनति । सप्रेमभक्ति यदुवर्या ॥३९०॥
म्हणे माझें पूर्वसंचित । होतें अनंतजन्मार्जित । तया पुण्यें आजि येथ । कृष्ण जामात जोडला ॥९१॥
प्रतापें नोवरी जिंकिली पणी । त्यावरी माझी एक विनवणी । यथासूत्रें विधिविधानीं । पाणिग्रहणीं वरावी ॥९२॥
दासांमाजि गणूनि मातें । सनाथ कीजे श्रीभगवतें । चार्‍ही दिवस राहोनि येथें । मत्पूजेतें स्वीकरिजे ॥९३॥
ऐसें विनवितां कोसलपति । ऐकोनि तोषला कमलापति । शिबिरा नेऊनि नाग्नजिती । दिधली पुढती रायातें ॥९४॥

ततः प्रीतः सुतां राजा ददौ कृष्णाय विस्मितः । तां प्रत्यगृण्हाद्भगवान्विधिवत्सदृशीं प्रभुः ॥४७॥

त्यानंतरें प्रीतीकरून । कोसलपति कन्यादान । करिता जाला विस्मयें करून । कृष्णाकारणें सद्भावें ॥३९५॥
दोहींकडील मूळपत्रिका । सुहृदां आप्तां धाडिल्या देखा । वसनीं गौरवूनियां वार्तिकां । म्हणती ठाका समयातें ॥९६॥
अक्रूर गेला हस्तिनापुरा । पत्रिका अर्पिली युधिष्ठिरा । तेणें प्रेरिलें प्रार्थवीरा । माद्रीकुमरांसमवेत ॥९७॥
उभयपक्षींचे सोयिरे आप्त । ऐकोनि पातले जी समस्त । वैदिक दैवज्ञ विपश्चित । आणिले त्वरित लग्नासी ॥९८॥
देवकप्रतिष्ठा दोहींकडे । करिते जाले द्विज निवाडे । ब्राह्मण पूजिले वाडेंकोडें । अहेर ज्येष्ठा अर्पिती ॥९९॥
सेवती रुखवत अर्पिलें हरि । कोशलें आदर केला भारी । अनेक वाद्यांचिया गजरीं । कोसलपुरी गर्जतसे ॥४००॥
साळंकृत नारी नर । मिरवती जैसे स्वर्गीं अमर । गुढिया मखरीं साळंकार । लाजवी नगर अमरपुरा ॥१॥
मार्तंडमंडलोदय लक्षूनी । घटिका प्रतिष्ठिली जीवनीं । वधूमंडपा फळ घेऊनी । गजरें यादव पातले ॥२॥
मंडपा आणूनि नग्नजिती । अक्रूरें पूजिली यथानिगुती । वस्त्राभरणें अर्पूनि भक्ति । गेले पुढती स्वशिबिरा ॥३॥
सवेंचि वरासि निघालें मूळ । नग्नजितराजा कोशलपाळ । सवें घेऊनि सोयरे सकळ । आला तत्काळ हरिशिबिरा ॥४॥
वाजंत्रांची लागली घायी । नर्तकी नाचती ठायीं ठायीं । बिरुदावळी पढती पाहीं । भाट बंदिजन बहुसाल ॥४०५॥
रायें करूनि श्रीकृष्णपूजा । वस्त्राभरणें अर्पिलीं वोजा । वोहमायेनें सहजीं सहजा । तेलवणासी समर्पिलें ॥६॥
अमूल्य तुरंग श्यामकर्ण । त्यावरी आरूढ जाला कृष्ण । भंवता सुवासिनींचा गण । अक्षता मौळीं समर्पिती ॥७॥
सात्वत दाशार्ह यादव । वृष्णि अंधक भोज माधव । अर्जुनप्रमुख वर्‍हाडी सर्व । निघाले स्वमेव उत्साहें ॥८॥
दणाणिलिया कुंजरभेरी । पताका डोलती दिव्यांबरीं । गगन झांकलें तुंगातपत्रीं । श्वेतचामरीं हरि वीजिती ॥९॥
शशांकवलयासमान छत्रें । विकसित गमती सहस्रपत्रें । आश्चर्य मानिजे दशशतनेत्रें । ऐकोनि श्रोत्रें हरिगरिमा ॥४१०॥
विवाहमंडपा आला वर । दासी पिहित करिती द्वार । त्यांसि देऊनि तदुपचार । वसनाभरणीं गौरविल्या ॥११॥
वोंवाळूणि सांडिती मुद । नेत्रां स्पर्शिती तोय विशुद्ध । तळी उतरूनियां मुकुंद । मंडपीं प्रसिद्ध मग नेती ॥१२॥
रत्नखचित चौकीवरी । मृद्वासन सह झल्लरी । त्यावरी बैसवूनियां श्रीहरि । राजा करी मधुपर्क ॥१३॥
अर्घ्य पाद्य सर्वोपचार । अर्पूनि पूजिला जगदीश्वर । रत्नखचित अलंकार । पीताम्बर नेसविला ॥१४॥
वैरणा घालूनि क्षीरोदक । उभा केला त्रैलोक्यजनक । मध्यें धरूनियां जवनिक । नोवरी सम्यक आणियली ॥४१५॥
द्विजवर पढती मंगलपद्यें । हरियशमिश्रें कविकृत सद्यें । म्हणती सावधान उपाध्ये । दैवतें आद्यें चिंता हो ॥१६॥
लक्ष्मीनारायणचिंतन । किजे म्हणती सावधान । नाहीं लग्नासी व्यवधान । घटिका पूर्ण जानोनी ॥१७॥
ग्रहहोरा द्रेष्काण शुद्ध । नवांश द्वादशांश अमळ विशुद्ध । त्र्यंशांशांचा स्वामी बुध । अमोघफलद जाणा हो ॥१८॥
ॐपुण्यकाळीं अंतःपट । सुटतां वधूवरें एकवट । द्विजवर करिती निगमपाठ । जाला बोभाट वाद्यांचा ॥१९॥
मृक्ताफळीं लग्नाक्षता । कृष्णें घातल्या नोवरीमाथा । तेव्हां लाहूनि पूर्णता । जाली तत्त्वता हरियोग्य ॥४२०॥
कृष्णकृपेची योग्यता जाली । मग नोवरी हरिवरी अक्षता घाली । वियोगाची काळिमा गेली । सबाह्य भरली हरिलाभें ॥२१॥
ऐसें पाणिग्रहण जालें । कंकण उभयांसि बांधलें । बोहर बोहला बैसविलें । मग आदरिलें हवनातें ॥२२॥
अग्निप्रतिष्ठा आसादनीं । विवाहहोमीं शांतिपठनीं । अक्षता वधूवरांच्या मूर्ध्नि । टाकिल्या ब्राह्मणीं ते काळीं ॥२३॥
सप्तपदी करपीडनीं । वरदक्षिणा चक्रपाणि । देता जाला आनंदोनी । कल्याणखाणी वधूजनक ॥२४॥
भूरि दक्षिणा वांटिलें कनक । मंडपीं गौरविले याचक । श्रवण पिळावया श्यालक । जाले सम्मुख ते काळीं ॥४२५॥
त्यांसी तदुचित वसनाभरणें । देऊनि गौरविले मेहुणे । यावरी राजा सप्रेम वचनें । करी प्रार्थने यदुवर्या ॥२६॥
वृद्धाचारें चक्रपाणि । चतुर्थ होम आमुचे सदनीं । सहपरिवारें साङ करूनी । मजलागूनि तोषविजे ॥२७॥
प्रार्थनेसरिसा श्रीमुरारि । मंडपीं राहोनि दिवस चारी । विवाहोत्सव साङ्ग करी । नवनोवरीसमवेत ॥२८॥
नवर्‍हाडियांसि तिलक माळा । परिमळद्रव्यें धूसर उधळा । विडे देऊनियां सकळां । नृपें केला जयगजर ॥२९॥
नोवरी देऊनि कडियेवरी । गौरीहरांतें नेती हरि । तेथें पूजुनि शंकरगौरी । आम्र वधूवरीं शिंपियला ॥४३०॥
चार्‍ही दिवस अन्नशान्ति । रायें करूनि यथानिगुती । मांडिली साडियांची आइती । शुभ मुहूर्तीं द्विजवचनें ॥३१॥
वाणपालटण जालियावरी । साडे आरंभिले दिवसीं येरीं । मुहूर्त पाहोनियां द्विजवरीं । केली सामग्रीं साडियांची ॥३२॥
प्राड्मुख बैसवूनियां वधूवरें । प्रत्यड्मुखें कोशलेश्वरें । उभयपक्षी निजसोयरे । बैसते जाले स्वपक्षीं ॥३३॥
ऐरणीपूजन करिती द्विज । नाग्नजितीसह गरुडध्वज । पूजिता जाला कोशलराज । सहितभाज वधूजननी ॥३४॥
वायनें अर्पूनियां द्विजवरां । अहेरीं गौरवी यादववीरां । नोवरी निरवी शार्ङ्गधरा । आनि अक्रूरादिकां सकळां ॥४३५॥
वंशपात्र विस्तारून । शिरीं ठेवूनि देती मान । कृष्णप्रमुख यादवगण । करिती निरवण त्यांप्रति ॥३६॥
कोशलपतीच्या समस्त वनिता । देखोनियां जामात दुहिता । हर्षनिर्भर जाल्या चित्ता । तेंचि श्रोतां परिसावें ॥३७॥

राजपत्न्यश्च दुहितुः कृष्णं लब्ध्वा प्रियं पतिम् । लेभिरे परमानंदं जातश्च परमोत्सवः ॥४८॥

राजपत्न्या प्रहृष्टचित्तीं । कृष्ण लाधली नाग्नजिती । परस्परें प्रियदंपती । भाग्य म्हणती कुमरीचें ॥३८॥
नेत्रीं आणोनियां अश्रुपात । कन्या निरविती त्या समस्त । परमानंदें वोसंडत । म्हणती सुकृत हें फळलें ॥३९॥
जन्मोनियां आमुचे जठरीं । दैवें वरिला त्वां श्रीहरि । कुळतारिणी नौका खरी । भवसागरीं तूं आम्हां ॥४४०॥
आमुचे कुळीं हे जन्मली । आम्हीं पुत्रवत् प्रतिपाळिली । आतां यदुनंदना अर्पिली । तुम्हीं पाळिली पाहिजे ॥४१॥
जन्मोनियां आमुचे कुळीं । इणें वरिला श्रीवनमाळी । कृष्णअर्धांगीं शोभली । यास्तव जाली जगज्जननी ॥४२॥
उचलूनियां दोहीं करीं । यादवांचें मांडियेवरी । बैसवूनियां विनति करी । जे स्नेहें नोवरी पाळावी ॥४३॥
दिव्य वसनें रत्नाभरनें । अर्पिलीं यादवांकारणें । सुगंधद्रव्यें माळा सुमनें । ताम्बूल देती चहूंकडे ॥४४॥
लागली वाजंरांची घाई । भाट बिरुदें पढती पाहीं । गृहप्रवेशाचिये समयीं । उत्साह करिती तो ऐका ॥४४५॥

शंखभेर्यानका नेदुर्गीतवाद्यद्विजाशिषः । नरा नार्यश्च मुदिताः सुवासःस्रगलंकृताः ॥४९॥

ढोल दमामे शंख भेरी । आनक गोमुख काहळा गजरीं । दुंदुभिघोषें कोशलनगरी । गर्जे अंबरीं मेघरवें ॥४६॥
नाचणीचे नाचती थाट । ठायीं ठायीं लखलखाट । नागरनरनारी संतुष्ट । वसनीं समृष्ट उज्वलित ॥४७॥
अमरपुरंध्री अमरावती । माजि उत्साहें मिरवती । तैसिया साळंकृता युवती । नरसुरपति सम तोषें ॥४८॥
सुमनावतंस सुमनहार । वस्त्राभरणीं शोभती नर । यावरी आंदण राजेश्वर । देता जाला तें ऐका ॥४९॥

दशधेनुसहस्राणि पारिबर्हमदाद्विभुः । युवतीनां त्रिसाहस्रं निष्कग्रीवं सुवाससाम् ॥५०॥

कामधेनूच्या काल्हवडी । दुभती सुरसुरभीसुरवाडी । तनुजाजामात आवडी । पंक्तिसहस्र आंदणा दे ॥४५०॥
कार्तस्वराचीं भूषणें । वरी जडियलीं अमूल्य रत्नें । पदकेंसहित कंथाभरणें । ग्रीवामंडित विराजती ॥५१॥
अग्निधौतें कनवसनें । बहुधा रंगीं विराजमानें । वुंथी कंचुकिया परिधानें । माळा सुमनी सुशोभिता ॥५२॥
चारु चपळा चातुर्यखाणी । अवयपूर्ण सुभगा तरणी । ऐसिया तीन सहस्र आंदणीं । दासी दिधल्या दुहितेतें ॥५३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP