मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|

शिवभारत - अध्याय पाचवा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '

धृतराष्ट्राचे मुलगे शांतवृत्ति धर्मराजाचा ज्याप्रमाणें मत्सर करीत असत त्याप्रमाणें विठोजी राजाचे खेळकर्णप्रभृति पुत्र हे भाऊबंदकीमुळें शहाजी राजाचा पदोपदीं शत्रूंप्रमाणें अतिशय द्वेष करूं लागले. ॥१॥२॥
ज्यानें आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेनें पृथ्वी वश केली आणि आश्रय करण्यास योग्य अशा निजामशहाच्या मलिकंबर प्रधानाचा, आपणास वैभव प्राप्त व्हावें अशी सदोदित इच्छा करणार्‍या, विठोजीच्या पुत्रांनीं आश्रय केला. सूर्याप्रमाणें तेजस्वी शहाजी त्यांच्या डोळ्यांत सलूं लागला. ॥३॥४॥
आपल्या कुलामध्यें फूट उत्पन्न झाली आहे हें त्या मनकवड्या आणि बुद्धिमान शहाजीनें ओळखलें आणि मलिकंबर, निजामशहा व आपल्या विरुद्ध कपट कारस्थान करणारे आपले दुष्ट चुलतभाऊ, यांचा तिरस्कार करून अत्यंत उत्साही, मानी, गरुडाप्रमाणें पराक्रमी, विजयश्रीचें माहेरघर व खांद्यावर भाला टाकलेल्या शहाजीनें, आपलें सैन्य आणि विपुल युद्धसामग्री यांसह जलदीनें आपल्या जहागिरीस प्रयाण केलें. ॥५॥६॥७॥८॥
तेथून निघून जाऊन आपल्या जहागिरींत मोठ्या ऐश्वर्यानें राहिलेल्या त्या शहाजीस निजामशहाचा प्रधान मुळींच वश करूं शकला नाहीं. ॥९॥
सूर्यावांचून आकाश जसें शोभत नाहीं, त्याप्रमाणें शहाजी निघून गेल्यामुळें निजामाचें राज्य समृद्ध असतांही त्याची कळा गेली. ॥१०॥
भेद पाडण्याला ही संधि योग्य आहे असें त्या महामति व निजामशहाची स्पर्धा करणार्‍या अदिलशहानें आपल्या सरदारांकरवीं त्या महाबाहु, अतिशय उत्साही आणि थोर मनाच्या शहाजीस साहाय्यार्थ आणवून तो आपणास अजिंक्य मानूं लागला. ॥११॥१२॥
ज्याप्रमाणें वार्‍याच्या मदतीनें वणवा वनेंचीं वनें जाळून वृद्धिंगत होतो, त्याप्रमाणें त्या शहाजीचें साहाय्य मिळाल्यानें आदिलशहा शत्रुसैन्याचा विध्वंस करून उत्कर्ष पावला. ॥१३॥
आपल्या तेजानें सर्वत्र तळपणारा सूर्य ज्याप्रमाणें सुंदर ग्रहांनीं युक्त असलेलें आकाश आक्रमितो, त्याप्रमाणें त्या महाबाहु शहाजीनें आपल्या प्रतापानें त्या थोर मनाच्या मलिकंबरास जिंकलें. ॥१४॥
जोरानें वाहणारा तुफानी वारा ज्याप्रमाणें बद्धमूल वृक्षास मोडून पाडतो, त्याप्रमाणें त्या उत्कर्ष पावणार्‍या शहाजीनें निजामशहाचा स्वबाहुबलाबद्दलचा गर्व जिरवला. ॥१५॥
नंतर त्या इब्राहिम आदिलशहानें संतुष्ट होऊन आपल्या शत्रूंचा विध्वंस करणार्‍या शहाजी राजाला आपलें अर्धपद दिलें असें मला वाटतें. ॥१६॥
मातबर लोकांनीं सेविलेला, पर्वताप्रमाणें उंच, महापराक्रमी आणि गर्विष्ठ असा मुधोजी फलटणकर इब्राहिमशहाच्या विरुद्ध असल्यानें, त्याच्यावर शहाजी राजानें युद्धसरंजामासह स्वारी करून त्याचा पूर्ण पराभव केला. ॥१७॥१८॥
कर्नाटक व केरळप्रांत जिंकून त्या प्रतापी शहाजीनें इब्राहिमशहाच्या खजिन्यांत भर घालून त्याला फार संतुष्ट केलें. ॥१९॥
त्यानें दुसर्‍याही बलाढ्य राजांना आपल्या कारस्थानांच्या जोरावर आपल्या कह्यांत आणून तें इब्राहिमशहाचें राज्य रामराज्याप्रमाणें केलें. ॥२०॥
ज्याप्रमाणें पार्वतीनें शंकराची सेवा केली, त्याप्रमाणें जाधव कुलांत उत्पन्न झालेली, चंद्राप्रमाणें सुंदर मुख असलेली व सुंदर दांत असलेली जिजाई शहाजी महाराजाची सेवा करी. ॥२१॥
ती अत्यंत विलासवती व प्रसदोन्मुख साध्वी राणी आपल्या पतीची प्रत्येक इच्छा परिपूर्ण करीत असे. ॥२२॥
त्याला तिच्यापासून सहा शुभलक्षणी पुत्र झाले. त्यांपैकीं शंभू व शिवाजी हे दोघेच काय ते वंशवर्धक झाले. ॥२३॥
परंतु शिवाजी हा विष्णूचा अंश पृथ्वीवर अवतरून तो सर्व राजांचा नेता आणि शत्रुपक्षीय राजांचा विनेता कसा झाला हें मी सांगणार आहें; तें, हे द्विजश्रेष्ठांनो, आपण ऐका. ॥२४॥२५॥
पूर्वी दररोज उग्र तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेऊन वेदशास्त्रांचा प्रतिबंध केल्यानें कळिकाळ बळावला. ॥२६॥
नंतर दुष्ट लोकांना अनुकूल व सज्जनांस प्रतिकूल असा तो पापमय काल गांठून कपटी, देवब्राह्मणद्वेष्टे व महाविध्वंसक दैत्य म्लेच्छरूपानें पृथ्वीवर अवतरले. ॥२७॥२८॥
प्रथम त्यांनीं पश्चिमदिशा, त्यानंतर उत्तर, पूर्व व अजिंक्य दक्षिणही बळानें पादाक्रांत केली. ॥२९॥
आपला धर्म जाणणांर्‍यांच्या त्यांच्यामध्यें जरी यज्ञांची प्रवृत्ति नव्हती; तथापि कलियुगाच्या प्रभावामुळें त्यांचें ऐश्वर्य जोरानें वाढलें. ॥३०॥
त्या बलाढ्य म्लेच्छांनीं कित्येकांस उचलून राज्यावर बसवलें व कित्येकांचा युद्धांत निःपात केला. तेव्हांपासून बहुधा सर्व क्षत्रिय नष्ट झाले. ॥३१॥
तेव्हां म्लेच्छांच्या पीडेनें गांजून जाऊन धरित्री देवी आपल्या रक्षणार्थ रक्षणकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेली. ॥३२॥
भयंकर पीडेमुळे निस्तेज - दीनवदन झालेल्या त्या पृथ्वीनें, तेहतीस कोटि देवांकडून वंदिला जाणार्‍या त्या ब्रह्मदेवास वंदन केलें. ॥३३॥
विषण्ण झालेली ती पृथ्वी हात जोडून आपलें अनेक प्रकारचें दुःख निवेदन करण्याच्या हेतूनें ब्रह्मदेवास म्हणाली,
विश्वंभरोवाच । ॥३४॥
देवी विश्वंभरा म्हणाली : - “ हे ब्रह्मदेवा तूं तीन्ही लोकांचा पिता आहेस व वैदिक धर्माचें रक्षण करणें तुला प्रिय आहे असें असून मी या दुःख सागरांत बुडत असतां तूं माझी उपेक्षा कां करतोस ? ॥३५॥
हे ब्रह्मदेवा, त्वां उत्पन्न केलें जें हें चराचार विश्व तें म्लेच्छरूपी दैत्यांमुळें, हाय हाय ! आज बुडत आहे. ॥३६॥
ज्या दुष्ट दैत्यांचा देवांनीं पूर्वीं संहार केला, तेच ह्या कलियुगामध्यें म्लेच्छरूप धारण करून मला पीडा देत आहेत. ॥३७॥
दुष्ट दैत्यांचा नाश करणारा भगवान श्रीकृष्ण निजधामास गेला आहे व भगवान बुद्धानें मौन स्वीकारिलें आहे. अशा वेळेस हे दुष्ट यवन पापें करूं लागले आहेत व मला कोणीही त्राता मिळत नाहीं. मी या दुःखाचें निवारण कसें करूं ? ॥३८॥३९॥
देवांचें कोणीं आवाहन करीत नाहीं; अग्नींत कोणीं हवन करीत नाहीं; वेदांचेंहि अध्ययन सुटलें आहे; ब्राह्मणांचा सत्कार बंद झाला आहे. सत्रें आणि यज्ञाक्रिया यांना फांटा मिळाला आहे; दानें आणि व्रतें संपुष्टांत आलीं आहेत; सज्जनांस दुःख होत आहे; धर्मनिर्बंध मोडले जात आहेत; म्लेच्छधर्म वृद्धि पावत आहे; गाईंचीहि हत्या घडत आहे; साधूंचा नाश होत आहे. क्षत्रिय लयास चालले आहेत. अशा प्रकारें हल्लीं यवनांपासून मला मोठें भय उत्पन्न झालें आहे. ॥४०॥४१॥४२॥४३॥
ज्याप्रमाणें वेदपारंगत लोक मूर्खाच्या तोंडीं असलेल्या वेदाची थट्टा करतात, त्याप्रमाणें मला म्लेच्छांच्या ताब्यांत गेलेली पाहून सर्व लोक माझा उपहास करीत आहेत. ॥४४॥
जेव्हां जेव्हां मला दैत्यांपासून भय उत्पन्न झालें, तेव्हां तेव्हां त्वां शक्तिमानानें माझें रक्षण केलें आहे. ” ॥४५॥
असें ब्रह्मदेवास बोलून, पृथ्वी डोळ्यांत अश्रू आणून, उष्ण निश्वास टाकीत स्तब्ध राहिली. ॥४६॥
विश्वाच्या विश्वासाचें निवासस्थान अशा ब्रह्मदेवानें त्या पृथ्वीला व्याकुळ व अस्थिर झालेली पाहून तिचें याप्रमाणें सांत्वन केलें :-
पितामह उवाच ॥४७॥
ब्रह्मदेव म्हणाला - हे मित्रे वसुंधरे, तूं घाबरूं नकोस; तुझें लवकरच कल्याण होईल ( म्हणजे या दुःस्थितींतून तुझी मुक्तता होईल ); स्वस्थानीं राहून, हें पृथ्वी, तूं स्वस्थ व स्थिर ऐस. ॥४८॥
दयासागर विष्णूची तुझ्यासाठीं मी पूर्वीं परमभक्तीनें प्रार्थना केली. तेव्हां तो स्वतः मला म्हणाला -
विष्णुरुवाच ॥ ॥४९॥
हे ब्रह्मदेवा, तूं चिंता करूं नकोस, माझें बोलणें ऐक; तुला इष्ट असलेली गोष्ट लवकरच घडून येईल. ॥५०॥
मालोजीचा पुत्र जो भाग्यशाली, सुलक्षणी, वार्‍याप्रमाणें वेगवान, सूर्याप्रमाणें तेजस्वी, विश्वजेता, पुण्यवान, महापराक्रमी असा शहाजी महाराज दक्षिणेंतील फार प्रख्यात नृपश्रेष्ठ आहे, त्याची भार्या महासाध्वी, यशस्विनी, जाधवरावाची मुलगी जिजाबाई ही पृथ्वीवर जागत ( जागरूक ) आहे. ॥५१॥५२॥५३॥
ती राणी तेजोमय अशा मला आपल्या उदरांत धारण करील आणि तिचा पुत्र होऊन मी तुझें प्रिय करीन. ॥५४॥
मी पृथ्वीवर धर्माची शाश्वत मर्यादा स्थापीन, यवनांचा उच्छेद करीन, देवांचें रक्षण करीन, यज्ञादि क्रिया पुन्हा सुरू करीन, गाई व ब्राह्मण यांचे पालन करीन असें मला वचन देऊन, हे कल्याणि, भूतभविष्यजाणणार्‍या भगवानानें मला सत्यलोकांस जाण्य़ास अनुज्ञा दिली. ॥५५॥५६॥५७॥
असें बोलून ब्रह्मदेवानें पृथ्वीचें समाधान केलें आणि तिला जाण्यास सांगितलें व तीसुद्धां आपल्या लोकीं आली. ॥५८॥
त्रिभुवनास अत्यंत कल्याणकारक व हृदयास आनंद देणारी अशी ती ब्रह्मदेवाची वाणी ऐकून म्लेच्छरूपी दैत्यापासून उत्पन्न झालेली भीति टाकून देऊन, ती अनुकूल कालाची वाट पहाणारी पृथ्वी, बह्मर्षि, देव व ब्राह्मण यांच्या कुलांसह अत्यंत आनंद पावली. ॥५९॥
अत्यंत पीडादायक झालेल्या अशा सहस्रावधि दैत्यांनीं व्यापून टाकलेल्या अखिल पृथ्वीला लवकर मुक्त करण्याचीं इच्छा करणार्‍या कृपाळू आणि निरुपम विष्णूनें सुंदर मनुष्यरूपहि धारण करण्याची इच्छा केली. ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP