मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|

शिवभारत - अध्याय तिसावा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


कवींद्र म्हणाला :-
नंतर तोफांच्या गोलंदाजींत ( तोफांचा नेम धरण्यांत ) असामान्य पराक्रमी, प्राकारयुद्धांत ( तटावरून लढण्यांत ) कुशल, संपत्तींत कुबेरावर ताण करणारे, मयासुराप्रमाणें शिल्पकलानिष्णात, समुद्रसंचाराच्यायोगें अजिंक्य, दुर्मार्गगामी, यवनांहून नीच अशा निरनिराळ्या फिरंग्यांस ( पोर्तुगीज, डच, इंग्रज व फ्रेंच इत्यादि ) तसेंच आरमारवाल्या उघड्या बोडक्या मलबार्‍यांस अनद्वीपनिवासी समुद्रावरील अनेक व्यापार्‍यांस, मत्त महागजांसारख्या वैरी मांडलिकांस त्या बलवान् शिवाजीनें सैन्याकरवीं आणवून त्यांच्याकडून निरनिराळी खंडणी द्यावयास लाविली. ॥१॥२॥३॥४॥
त्या त्या लोभी अविधांनीं दीर्घ काळ सांठविलेली राजापुरांतील संपत्ति त्यानें तत्काळ हस्तगत केली. ॥५॥
सोन्याच्या ठेवींनीं भरलेल्या कढया जीमध्यें पुरून ठेवलेल्या होत्या अशी ती भूमि त्या दुष्टांच्या कर्दनकाळानें अनेक खनकांकडून ( भूमिगत धन ओळखणार्‍यांकडुन ) खणविली. ॥६॥
तेथें त्या राजाच्या नेत्रांत जरी सिद्धांजन घातलेलें नव्हतें, तरी त्यास ते पुरलेले सांठे प्रत्यक्ष दिसले ! ॥७॥
त्या राजानें जेथें जेथें आपली दृष्टि फेकली, तेथें तेथें मेरूपर्वताप्रमाणें सोन्याच्या राशि उत्पन्न झाल्या ( दिसल्या ) ! ॥८॥
तेथें थोर लोकांनीं अर्पिलेल्या अनेक रत्नराशींच्यायोगें त्यास विदूराद्रि ( वैदूर्य रत्नांचा डोंगर ) हा जणूं काय अविदूर ( अगदीं जवळ ) झाला. ॥९॥
दीर्घ काळ राहिलेल्या यवनांच्या संपर्कानें अशुद्ध झालेली व पुरलेले सांठे असलेली भूमि त्यानें तेथें शुद्ध केली कीं काय ! ॥१०॥
सोनें, रुपें, पितळ, शिसें, तांबें, लोखंड, कथील, काच, सुवर्णमाक्षिक, मोतीं, पाच, माणिक, हिरा, पोवळें, गेंड्याचें शिंग, चामर, हस्तिदंत, कस्तुरी, केशर, चंदन, कापूर, कृष्णागरु, कापूरकाचरी, कंकोळ रक्तचंदन, वेलदोडा, लवंग, दालचिनी, चीनदारु, निवळी, नक्रनख, वाळा, नागकेशर, जायफळ, भांग, अफू, तमालपत्र, चारोळी, अक्रोड, मनुका खजूर, खर्बूर, मिरीं, सुपारी, देवदार, सुंठ, गांठी पिंपळमूळ, जटामांसी, चवक, हळद, सैंधव, पादेलोण, जवखार, सज्जीखार, हिरडा, दशांगधूप, राळ, शिलाजित, मेण रसांजन, मोरचूद, निळा सुरमा, काळा सुरमा, ओंवा, हिंग, जिरें, लोध्र, गुग्गुळ, पावकशिख, मंजिष्ठ, शेंदूर, पारा, हरताळ, गंधक, मनहीळ, लाख, रक्त्याबोळ, गोरोचन, अभ्रक, निरनिराळ्या प्रकारचीं विषें व तीं विषें उतरण्याचीं द्रव्यें, रेशमी, गवती, तागी, फळांचीं, ‘ रंकु ’ हरणार्‍या लोकरीचीं, लोकरी अशीं नवीं वस्त्रें हे आणि दुसरे पुष्कळ पदार्थ त्या राजानें त्या वेळीं मोठीं ओझीं वाहणारे घोडे, घोड्या, बैल, कावडे, वेठ्ये यांच्याकडून वाहून नेववून आपल्या निरनिराळ्या गडांवर ठेवविले. ॥११॥१२॥१३॥१४॥१५॥१६॥१७॥१८॥१९॥२०॥२१॥२२॥२३॥
शेठवली, सौंदळ, हरचेरी, नेवरें, नाधवडें, कोतवडें, केळवली, कशेळी, पांवस, धामणसें, बेलवडें, खारेपाटण ह्या आणि दुसर्‍याहि गांवांनीं त्यास खंडणी आणून दिली. ॥२४॥२५॥
ह्याप्रमाणें निरनिराळे प्रांत ताब्यांत आणून विविध खंडणी घेऊन तो प्रतापी राजा आपल्या देशाकडे वळला. ॥२६॥
पंडित म्हणाले :-
मुसलमानांचें सैन्य पळवून लावून ( शिवाजीनें ) दाभोळ शीघ्र घेतलें ( जिंकलें ); तसेंच चिपळूण आपल्या हस्तगत केलें आणि संगमेश्वरहि अनायासेंच घेतलें. आणि अहो ! सर्व राजापूरहि पातळापर्यंत खणून काढलें; सर्व सांठे घेतले आणि नागरिक कैस केले; तसेंच स्वसामर्थ्यानें समुद्रास आपला मांडलिक केलें ( त्याजवर आपली सत्ता स्थापिली. ) अशा प्रकारें शिवाजीनें वैरानें देश व्यापला हें जाणून त्यावेळीं आदिलशहानें कोणता उपाय योजला ? ॥२७॥२८॥२९॥३०॥
कवींद्र म्हणाला :-
“ तो आमचा उघड शत्रु राजापुरावर चालून जात असतां त्यास त्या अत्यंत दुर्गम अरण्यमार्गांत तूं ( सूर्यराजा ) अडविलें नाहींस ! ॥३१॥
बरें तें राहों. आतां तो आमचा उन्मत्त शत्रु परतून जवळ आला आहे; तेव्हां त्यास तूं कोंड. ” ॥३२॥
याप्रमाणें दुःखित आदिलशहानें शृंगापूरचा राजा सूर्याजीराव यास हुकूम पाठविला. ॥३३॥
पंडित म्हणाले :-
त्यावेळीं त्या आदिलशहानें सर्व सेनापति सोडून त्याच राजाची योजना त्या कामावर कां केली ? ॥३४॥
कवींद्र म्हणाला :-
शिवाजीनेंच पूर्वीं पराभूत केलेले रुस्तुमादि सरदार ( त्याच्याशीं ) लढण्यास समर्थ होणार नाहींत असा मनांत विचार करून, अरण्याच्या मध्यभागीं राहणार्‍या व पायदळ बाळगणार्‍या त्याच राजाची योजना असें म्हणतात तें काम कठीण असतांहि त्यावर केली. ॥३५॥३६॥
तेव्हां त्या अत्यंत अभिमानी व पराक्रमी राजानें आदिलशहाच्या आज्ञेवरून - हत्ती मदानें सिंहाशीं जसें वैर करतो तसें - मदानें शिवाजीशीं वैर धारण केलें. ॥३७॥
शिवाजीनें दुर्गम मार्ग साफसूफ करण्याच्या इच्छेनें संगमेश्वरीं ठेवलेलें तें सैन्य त्यानें आपलें सैन्य घेऊन सत्वर वेढलें. ॥३८॥
पुष्कळ पायदळाच्या साह्यानें शिवाजीचें मोठें सैन्य मध्यरात्रीं वेढून दुर्दैवानें लढूं इच्छिणारा तो सूर्याजीराव पुष्कळ वेळ मेघाप्रमाणें गर्जना करूं लागला. ॥३९॥
गरुड जसा नागांचा फूत्कार सहन करीत नाहीं, तशी प्रचंडपणें कानीं पडलेली ती त्याची गर्जना त्या समयीं तानाजीप्रभृति योध्द्यांनीं सहन केली नाहीं. ॥४०॥
तेव्हां अतिशय भ्यालेला नीळकंठ राजाचा पुत्र जो हतभागी पिलाजी त्यानें प्रभावलीच्या राजास जणूं काय यश देण्यासाठींच लढण्यापेक्षा पळणेंच अधिक पसंत केलें ! ॥४१॥
कांपरें भरलेल्या, अतिशय धापा टाकणार्‍या, हातांतील तरवार खालीं टाकून पळत सुटलेल्या अशा त्या पिलाजीस ताबडतोब कित्येक पावलें जाऊन मालुसर्‍यानें स्वतः हातांत धरलें व त्याचा उघड धिक्कार केला. ॥४२॥
मालुसरे म्हणाला :-
ह्या युद्धांत मी तुझा साह्यकर्ता आहें. तूं आपल्या लोकांस टाकून पळत सुटला आहेस ही खेदाची गोष्ट होय ! पूर्वी तूं ज्या बढाया मारीत होतास, त्या तुझ्या बढाया, हे सेनापते ! कोठें गेल्या ? ॥४३॥
अभीष्टदात्या शिवाजीनें ज्या तुला मोठेपणा देऊन पाळिलें तो तूं सेनापति आज सैन्य टाकून पळून जात आहेस आणि अरे ! त्याची तुला खंतहि वाटत नाहीं ! ॥४४॥
असें बोलून त्या घाबरलेल्या पिलाजीस आपल्या संनिध दोरखंडानीं दगडास पक्का बांधून ठेवून तेथें लगेच आपलें शौर्य शूरांस पदोपदीं दाखवीत नाचूं लागला. ॥४५॥
ठार केलेल्या शत्रूकडील वीरांच्या रक्ताचें पूर वाहावयास लावणारा व प्रचुरयुद्धशोभारूपी सुंदरीच्या कानांतील अलंकार असा तो तानाजी मालुसरे युद्धामध्यें चमकूं लागला व त्याच्या तेजानें त्या रात्रीं सूर्य उत्पन्न झाला. ॥४६॥
तेव्हां आपण केलेल्या जयघोषानें ज्यांनीं मेघांचा ध्वनि लोपवून टाकला आहे, ज्यांच्या हातांत तरवारी चमकत आहेत व जे पदोपदीं मारण्यास उद्युक्त झाले आहेत अशा शत्रूंच्या प्रचंड गर्दीमध्यें न गोंधळणार्‍या व उत्तम तिरंदाज सैनिकांनीं त्याचें रक्षण केले. ॥४७॥
सज्ज हो, हाण, दे, थांब, फेक, पोंचव, वांचव, टाक, सोड, पळ, ने, परतव, पहा, फोड, तोड, घे, पाड, मार असें तेथें मोठ्यानें ओरडणार्‍या व एकमेकांवर धावून जाणार्‍या दोहींकडील योध्द्यांचा अवर्णनीय ओरडा झाला. ॥४८॥
चकाकणार्‍या रत्नजडित आंगठ्यांच्या चकाकीनें ज्यांच्या नखांची कांति चित्रविचित्र झाली आहे असे हात, पगड्या पडलेली मुंडकीं, दाट पडलेले हात पाय आणि विजेप्रमाणें चमकणार्‍या तरवारींनीं तुटलेले व ज्यांच्यावर पुष्कळ रक्तप्रवाहाचे संचय झालेले आहेत असे दुसरेहि अवयव यांच्यायोगें ती भूमि दुर्गम झाली ! ॥४९॥
मग रात्र संपू लागली असतां, सूर्याचे किरण जसे अंधकार नाहींसा करतात तसें, शिवराजाच्या योध्द्यांनीं पूर्ण पराभूत केलेलें शत्रुसैन्य तत्काळ नाहींसें झालें ( पळालें ). ॥५०॥
मग ते शत्रुराजाकडील श्रेष्ठ सैनिक लगेच पळून गेले असतां नवीन मेघाप्रमाणें गर्जणार्‍या दुंदुभीबरोबर मालुसरे गर्जना करूं लागला. ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 13, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP