शिवभारत - अध्याय सातवा
श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '
बालरूपानें खेळणारा तो सुंदर आणि गोजिरवाणा ( मुलगा ) हा अमानुष ( मनुष्य नव्हे ) विष्णु आहे हें त्या मातापितरांस समजलें नाहीं. ॥१॥
पृथ्वीचा भार नाहींसा करण्यासाठीं भूतलावर अवतार घेऊन शहाजी राजाच्या वाड्यांत बालरूपानें विहार करणारा आणि आपल्या सौंदर्यानें जन्म देणारी आई व दुसरे लोक यांचे रंजन करणारा तो सर्वांतरात्मा विष्णु तेथें नानाप्रकारच्या लीला करूं लागला. ॥२॥३॥
इंद्राचे इष्ट कार्य करण्यासाठीं प्रत्येक युद्धांत दैत्यांस अनेक वेळां मारून जो शस्त्र उपसलेला विष्णु जणूं काय थकून जाऊन क्षीरसागरामध्यें निद्रा घेतो तो आईचें दूध पिण्यासाठीं रडत असे ! ॥४॥५॥
बाललीला करणारा तो ( बालक ) पाचेच्या भूमीवर रांगत असतां तींत आपलें प्रतिबिंब पडलेलें पाहून तें जोरानें पकडूं पाहात असे. ॥६॥
तो गुडघ्यांवर रांगत असतां त्याच्या पायांच्या तळव्याच्या लालीच्या योगानें अंगणांतील स्फटिक माणकांसारखे दिसत. ॥७॥
धुळीनें आंग भरून घेऊन तो वाड्याच्या अंगणांत रांगत असतां पायांतील रत्नांच्या चाळांचा छुमछुम आवाज मातेला रमवीत असे. ॥८॥
रत्नमय अंगणामध्यें खेळतांना तुरतुर रांगणारा तो ( बालक ) आपल्या प्रतिबिंबाशीं स्पर्धा करीत असे. ॥९॥
अहो ! ज्याच्या कृपेनें सर्व देवांना अमृतप्राशन करण्यास मिळालें त्याला स्वतःला मऊ माती खाऊन आनंद होत असे, हे आश्चर्य नव्हे काय ? ॥१०॥
ज्यानें बलीस फसवून तीनहि लोकांचें तीन पावलांनीं आक्रमण केलें त्या देवाला घरचा उंबरठा ओलांडण्यास प्रयास पडत ! ॥११॥
जो प्रभु स्वतः सातहि लोकांचा ( भुवनांचा ) आधार आहे तो सुद्ध दाईचें बोट धरून उठत असे ! ॥१२॥
स्फटिकाच्या भिंतींत पडलेलें सूर्याचें प्रतिबिंब पाहून ते बोटानें दाखवून ‘ तूं आपल्या हातानें घेउन मला दे ’ असें म्हणून तो रडूं लागे आणि वेडेपणामुळें आईकडून वेड्यासारखें हसें करून घेई. ॥१३॥१४॥
ज्याला नुकतेच सुळे फुटले आहेत, असा हत्तीचा छावा आपल्या शुंडाग्रानें मस्तकावर धूळ उडवून घेतो, त्याप्रमाणें कुंदकळ्यासारखें शुभ्र दांत ज्याला नुकतेच येऊं लागले आहेत अशा आणि आपल्या हस्तकमलांनीं डोक्यावर धूळ उडवून घेऊन वाड्याच्या दरवाज्यापुढें खेळणार्या त्या बालकास शिक्षा करण्यास ( शिस्त लावण्यास ) आलेली दाई त्याला पाहून स्तब्ध होई. ॥१५॥१६॥
दाई टाळ्या वाजवूं लागली कीं, त्याची गंमत वाटून तो हास्यवदन करून अनेक प्रकारे नाचूं बागडूं लागे. ॥१७॥
ज्यानें ब्रह्मदेवाला लक्षणांसह वेद पढविले तो स्वतः दाईच्या तोंडून निरनिराळे शब्द शिकत असे. ॥१८॥
इच्छिलेलें पुरविणारा तो ( विष्णु ) खुषीत आला असतां आपल्या अंगावरील दागिने भराभर उतरून दायांना देत असे. ॥१९॥
बापाचे मत्त हत्ती आणि घोडे यांपैकीं वाटतील ते पसंत वा नापसंत करण्यास तो पूर्ण मालक असतां तो टाकून, तो मातीचे हत्ती घोडे च अधिक पसंत करी. ॥२०॥
झुलपांच्या योगें शोभणारा तो बालक मोरांचीं पिसें घेण्याच्या इच्छेनें मोरांच्या कळपामागें धावत असे ! ॥२१॥
मोर, पोपट आणि कोकिळ यांच्या आवाजांची तो इतकी हुबेहूब नक्कल करीत असें कीं, प्रत्यक्ष तेच पक्षी ओरडत आहेत असे भासवी. ॥२२॥
तो जवळ उभा राहून एकदम वाघासारखी गर्जाना करून आपल्या प्रेमळ दाईस सुद्धा भेवडावीत असे. ॥२३॥
तो भ्रमरहित असूनहि कधीं भ्रमराप्रमाणें गरगर फिरत असे; हर्षभरित होत्साता कधीं घोड्याप्रमाणें खिंकाळत असे. ॥२४॥
कधीं हत्तीप्रमाणें मोठ्यानें चीत्कार करी; ॥२५॥
आपल्या गंभीर आणि मधुर स्वरानें आकाश आणि पृथ्वी दुमदुमवून सोडीत तो कधीं ऐटीनें दुंदुभीसारखा आवाज करी. ॥२६॥
कधीं मुलांकडून मातीचीं उंच शिखरें च करवून ‘ हे माझे गड ’ असें म्हणे ॥२७॥
कधीं ( लंपडाव ) ‘ आंधळी कोंशिंबीर ’ खेळतांना वाड्याच्या कोपर्यांत लपून बसला असतां सोबती त्यास हुडकून काढून शिवलें कीं तो हसत असे. ॥२८॥
कधीं हातांतून पडलेल्या चेंडू पुनः पुनः उड्या घेत असतां त्यास खालीं पाडण्यासाठीं हातानें मारीत असे. ॥२९॥
कधीं आपण उंच उडविलेला चेंडू आकाशांतून खालीं पडतांना वर तोंड करून त्याकडे लक्षपूर्वक पाहात हात उंच करून भूमीवर जणूं काय नाचत नाचत तो झेलीत असे. ॥३०॥३१॥
ज्याचें दर्शन झालें कीं, प्राणी जन्ममरणाच्या भोवर्यांतून त्वरित मुक्त होतात तो सुद्धा कधीं स्वतः लाकडांचा भोंवरा फिरवी. ॥३२॥
बोटानें दटावणें इत्यादि उपायांनीं दायांनीं त्यास मनाई केली तरी तो शहाजीचा पुत्र त्या त्याबाललीलेंत गर्क होई. ॥३३॥
‘ खा ’ म्हटलें तरी खात नसे, ‘ पी ’ म्हटलें तरी पीत नसे, आणि दायांनीं त्यास आळवून ‘ नीज ’ म्हटलें तरी निजत नसे. ॥३४॥
त्या त्या खेळांत गर्क असलेला तो श्रेष्ठ जगदात्मा प्रत्यक्ष आईनें बोलाविलें तरी दूर पळून जाई. ॥३५॥
बालपणच्यां खेळांच्या नादानें शिवाजी जेथें जेथें जाई तेथें तेथें इंद्रादि सर्व देव त्याचें रक्षण करीत. ॥३६॥
करुणेचा सागर, देवांचा आधार, वेदांनीं वर्णिलेला, पुराणांमध्यें प्रसिद्ध असलेला, अशा ज्या भगवान विष्णूनें शहाजी राजाच्या घरीं स्वतः अवतार घेतला त्याला बालपण प्राप्त होऊन तें अतिशय शोभूं लागलें. ॥३७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 12, 2017
TOP