पंडित म्हणाले : -
पुणें शहरीं राहणार्या शिवाजीवर चाल करण्याचें सोडून तो दुष्ट आपल्या सैन्यासह वाईप्रांतींच कां गेला ? ॥१॥
कवींद्र म्हणाले :-
तो गर्विष्ठ व कालयवनाप्रमाणें प्रखर अफजलखान यवन शिवाजीला जिंकण्याकरतां स्वामीच्या आज्ञेवरून सत्वर निघून वाई प्रांतींच कोणत्या हेतूनें शिरला तें मी सांगतों; पंडित हो, ऐका. ॥२॥३॥
बाजराज व उन्मत्त कृष्णराज आणि त्यांचा बाप महा बलवान् चंद्रराज यांना युद्धांत मारून, गुप्त वाटा असलेली, सह्याद्रीच्या लगत्यास वसलेली, दाट झाडी असलेली, किल्ल्याचा आह्स्रय असलेली, जागरूक सैनिकां ( च्या पाहर्यामुळें ) मुळें भयंकर, गिरितटांच्यामध्यें असलेली अशी जावली ( जयवल्ली ) नांवाची दुर्जय पुरी शिवाजीनें घेतली. ॥४॥५॥६॥
जे जे चंद्रराजाचे साह्यकर्ते व नातेवाईक होते त्या सर्वांना बलवानांमध्यें बलिष्ठ असलेल्या वीर शिवाजीनें कापून काढले. ॥७॥
तेव्हां चंद्रराजाचा बंधु जो प्रतापवर्मा तो शिवाजीच्या भीतीनें आदिलशहाकडे पळून गेला. ॥८॥
चंद्रराजाच्या राज्याची इच्छा करणार्या त्या कारस्थानी प्रतापवर्म्यानें मंत्र्यांनीं युक्त अशा आदिलशहाची पुष्कळ काळ सेवा करून त्यास संतुष्ट केलें. ॥९॥
“ अरण्यमय प्रदेशांत असलेलें तें चंद्रराजाचें राज्य त्या शिवाजी राजापासून हिसकावून घेऊन तुला खात्रीनें देईन ” असें आदिलशहानें म्हटल्यावर त्याची काळजी नाहींशी होऊन त्यानें अफजलखानास स्वारी करण्याच्या कामीं साहाय्य केलें. ॥१०॥११॥
मग चंद्रराजाच्या त्या अभिमानी बंधूनें भेद सांगून अफजलखानास वाईस आणलें. ॥१२॥
ज्याच्या ताब्यांत जावली आहे त्याच्या ताब्यांत वाईप्रांत पूर्णपणें आहे. त्याचप्रमाणें सर्व सह्याद्रि आणि समुद्रकिनाराहि आहे, असा विचार करून तो महाबाहु यवन प्रथम तीच घेण्याच्या तयारीनें वाईस शीघ्र आला. ॥१३॥१४॥
मग सैन्यासह वाईप्रांतीं येऊन तो अफजल्खान यवन जावली लवकर घेण्याच्या बेतांत असतां त्यावेळीं प्रतिकार करण्यास तत्पर असलेला चतुर शिवाजी राजा मोठ्या अभिमानानें आपल्याशींच असा विचार करूं लागला :- ॥१५॥१६॥
माझ्यावर क्रुद्ध झालेल्या मानी अदिलशहानें पाठविलेला हा पराक्रमी ( अफजलखान ) आपणास साजेल असा पराक्रम करील. अहो, ज्याच्या अत्यंत दुष्टपणामुळें ह्या कलियुगाचें माहात्म्य वाढत आहे, तोच हा यवन होय. ॥१७॥१८॥
निशुंभाप्रमाणें तेजस्वी अशा ज्या दुष्टानें तुळजापूरच्या भवानीचा मोठ्या अपमान केला; जो सदैव, निर्दय व कोपी असून पापाचा राशी आहे; जणूं काय डोळ्यांत सलूं लागल्याप्रमाणें ब्राम्हणांना पहातांक्षणींच ठार मारूं इच्छितो; जणूं काय पातकाचा पर्वतच, जो मदोमत्त वर्णाश्रमधर्माचा सर्वस्वी नाश करण्यास उद्युक्त झाला आहे; जो सर्व धर्मांचा निषेध करून अधर्माची वाढ करीत आहे, अशा त्या समीप आलेल्या अफजलखानास मला मारलेंच पाहिजे. ॥१९॥२०॥२१॥२२॥
यज्ञासाठीं दूध व तूप हें हविद्रव्य पुरविण्याकरितां गाई ब्रह्मदेवानें पृथ्वीवर निर्माण केल्या आहेत; ॥२३॥
त्यांना हा तामसी अफजलखान अरेरे ! प्रतिदिवशीं ठार मारून सर्वच धर्म उलथून टाकूं इच्छीत आहे. ॥२४॥
ही वसुंधरादेवी खरोखर धर्माच्या योगें धारण केली जाते. तो धर्म निःसंशय देवांकडून रक्षिला जातो आणि ते देव ब्राम्हणांकडून राखले गेले आहेत. ॥२५॥
म्हणून या सर्व लोकांचा आधार अशा ब्राह्मणांचें सर्वदा प्रयत्नानें पालन व पूजन ( सत्कार ) केलें पाहिजे. ॥२६॥
देवांचें, ब्राह्मणांचें आणि गाईचें पालन मीच प्रत्यक्ष प्रतियुगीं अवतार घेऊन करतों. ॥२७॥
ज्यानें समुद्रांत प्रवेश करून माशाचें रूप धारण करून युद्धामध्यें शंखासुराला मारलें व वेद परत आणले; ज्यानें कांसवाचें रूप घेऊन मंदर पर्वत स्वतःच्या पाठीवर धारण केला आणि पृथ्वीला आधारभूत होऊन तिला स्थिर केली; ज्यानें वराहाचें रूप घेऊन आपल्या सुळ्यांच्या योगानें पृथ्वीला समुद्रांतून एकदम वर काढून हिरण्याक्षास ठार मारलें; ज्या इंद्रानुज विष्णूनें वामनाचें रूप घेऊन पूर्ण कपट करून्बळीला रसातळास नेलें; ज्यानें सभामंडपाच्या खांबामधून नरसिंहरूपानें प्ररूट होऊन आपल्या नखांनीं हिरण्यकशिपूचें वक्षःस्थळ विदीर्ण केलें; ज्या भृगुवंशभूषण रेणुकापुत्रानें ( परशुरामानें ) कार्तवीर्याचा नाश केला आणि पृथ्वी निःक्षत्रिय केली; ज्यानें दशरथाचा पुत्र होऊन समुद्रावर सेतु केला आणि पृथ्वी निःक्षत्रिय केली; ज्यानें दशरथाचा पुत्र होऊन समुद्रावर सेतु बांधला व एकाच बाणानें दहाहि मस्तकें उडविलीं; ज्यानें वृष्णिवंशाला भूषण होऊन शूरसेनाच्या कुळांत जन्म घेऊन कंसादि दुष्ट ठार मारलें व धर्मस्थापना केली; तो सर्व देवांचें सर्वस्व असा विष्णुच मी असून पृथ्वीचा भार हरण करण्यासाठीं भूतलावर प्रकट झालों आहें. ॥२८॥२९॥३०॥३१॥३२॥३३॥३४॥३५॥३६॥
यवनांचे हे सर्वच वंश असुरांचे अंश होत. हे आपल्या धर्माच्या योगें पृथ्वीला बुडविण्यास उद्युक्त झाले आहेत. ॥३७॥
म्हणून या यवनरूपी दानवांना मी मारीन आणि धर्माचा निर्भय असा मार्ग प्रचलित करीन. ॥३८॥
जावलीचें घोर वन ही माझी सिंहाची गुहाच होय. तींत शिरणारा हा शत्रु अफजलरूपी हत्ती खात्रीनें नाश पावणार. ॥३९॥
आपला अंतक न पाहातां पंखांच्या बळावर उडणार्या पक्ष्याप्रमाणें तो माझ्या तावडींत सांपडून ( माझ्याशीं गांठ पडून ) खात्रीनें मृत्यु पावेल. ॥४०॥
असा मनामध्यें निश्चय करून त्या ( विष्णुरूपी ) पुरुषश्रेष्ठ शिवाजीनें आपल्या सेनापतीला शत्रूच्या राज्याचा विध्वंस करण्यास सांगून आणि आपल्या राजाच्या व दुर्गांच्या रक्षणासाठीं त्या त्या कामीं दक्ष व हितकर्त्या अधिकारी लोकांना नेमून संधिविग्रह इत्यादि सहा गुणांमध्यें निपुण व शत्रुवीरांचा चुराडा करणारा असा शिवाजी स्वतः पायदळासह जावलीस आला. ॥४१॥४२॥४३॥
मग ज्याचा अभिप्राय गुप्त आहे, ज्याचा बाहुपराक्रम अपार आहे, जो शत्रूंना अजिंक्य आहे, जो प्रभाव, उत्साह व मंत्र या तिन्ही शक्तींनीं युक्त आहे, ज्याचा सेना - समूह सज्ज आहे, असा तो प्रख्यात शिवाजी जावलीस ठाणें देऊन स्वतः युद्धास तयार होऊन बसला आहे, असें ऐकून त्या सर्वार्थकुशल शिवाजीस अफजलखानानें जो निरोप पाठविला तो समग्र जशाचा तसाच अहो पंडितांनों, मी तुम्हांस सांगतों, ऐका. ॥४४॥४५॥४६॥
अफजलखान म्हणाला :-
आपण आजकाल पावलोपावलीं जो उद्धटपणा करीत आहां तो अदिलशहाच्या अंतःकरणांत शल्यासारखा बोंचत आहे. ॥४७॥
निजामशहा विलयाला गेल्यावर स्वतः हस्तगत केलेला त्याचा जो मुलूख आदिलशहानें तह करण्याच्या इच्छेनें मोंगलांना दिला, तो हा त्यांचा डोंगरी किल्ल्यांनीं भरलेला मुलूख शिवाजी राजा, आपल्या ताब्यांत आणला आहेस. ॥४८॥४९॥
तेथें सतत भाग्यशाली अशा तुम्हीं पदोपदीं मुलूख काबीज करून कैदेंत टाकल्यानें दंडाराजपुरीचा राजा जळफळत आहे. ॥५०॥
शत्रूंना अगदीं अजिंक्य अशा चंद्रराजाच्या विस्तीर्ण राज्यावर हल्ला करून व पराक्रम करून तुम्हीं तें बलानें हरण केलें. ॥५१॥
कल्याण आणि भीमपुरी ( भिवंडी ) देखील घेऊन आपण यवनांच्या मशिदी जमीनदोस्त केल्या. ॥५२॥
ज्यांचें सर्वस्वच हरण करून आपण त्यांचीं विडंबना केली ते यवनरूपी सर्प अद्याप तुम्हांवर खवळले आहेत. ॥५३॥
तुम्ही आपल्या बळाबळाचा विचार न करतां काजी मुल्लांना कैद करून निर्भयपणें अविंधाचा मार्ग अडविला आहे. ॥५४॥
ज्याअर्थीं तुम्हीं निर्भयपणें स्वतःच चक्रवर्ती राजाची चिन्हें धारण करीत आहां, आणि अन्यायानें सुवर्णसिंहासनावर बसतां आणि स्वतःच मनुष्यांचा निग्रहानुग्रह करितां, स्वतंत्र होऊन वंदनीयांना वंदन करीत नाहीं; अजिंक्य होऊन लुंग्यामुंग्यांना भीत नाहीं, त्याअर्थीं प्रतापी आदिलशहानें मला तुम्हावर पाठविलें आहे. ॥५५॥५६॥५७॥
आदिलशहाच्या आज्ञेवरून जें हें सहा प्रकारचें सैन्य माझ्याबरोबर आलें आहे, तें मला ताबडतोब युद्धास उद्युक्त करीत आहे. ॥५८॥
हे मुसेखानादि तुम्हाबरोबर युद्ध करूं इच्छिणारे वीर व जावली काबीज करूं इच्छिणारे सरदार मला या कामीं प्रोत्साहन देत आहेत. ॥५९॥
तेव्हां, हे राजा, माझ्या आज्ञेप्रमाणें संधिच कर, आणि सर्व किल्ले व मुलूखहि देऊन टाक. ॥६०॥
सिंहगड आणि लोहगड हे मोठे आणि प्रबळ किल्ले, त्याचप्रमाणें पुरंदरगड आणि चक्रवर्तीपुरी ( चाकण ), नीरा आणि भिमा यांच्यामधला प्रदेश हीं सर्व महाबलाढ्य अशा दिल्लीच्या बादशहास शरण जाऊन लवकर देऊन टाका. ॥६१॥६२॥
जी जावली तुम्ही चंद्रराजापासून जबरदस्तीनें हिसकावून घेतलीत ती ही जावली देखील अल्लीशहा तुझ्यापाशीं मागत आहे. ॥६३॥
असें हें शत्रूचें आलेलें पत्र एकांतांत ऐकून त्या सकलराजशिरोमणी व अद्वितीय वीरानें आपल्या मनामध्यें कांहीं एक उपाय योजला. ॥६४॥
सर्व जगाच्या कल्याणासाठीं सर्वोत्कृष्ट मसलत योजून त्या राजानें त्या पत्राचें काय उत्तर पाठविलें आणि सज्ज असलेल्या त्या शिवाजीच्या अरण्यांमध्यें तो गर्विष्ट अफजलखान कसा केला तें सर्व श्रेयस्कर वृत्त हें पंडितानों, मी तुम्हांस सांगतों, ऐका. ॥६५॥