पण्डित म्हणाले :-
आपला शहाणा मुलगा शिवाजी ह्यास पुणें प्रांतीं पाठवून शहाजी राजानें कर्नाटकांत राहून काय केलें ? ॥१॥
आणि ज्यानें शत्रू जिंकले आहेत व ज्याचा युद्धोत्साह प्रसिद्ध आहे अशा शहाजीशीं महमुदशहा स्वतः कसा वागला ? ॥२॥
कवीन्द्र म्हणाला :-
संधि, विग्रह, यान, आसन, संश्रय आणि द्वैध या सहा गुणांचा प्रयोग करून, त्याचप्रमाणें नानाप्रकारच्या मसलती लढवून, शहाजीनें सर्व कर्नाटक प्रांत आपल्या ताब्यांत आणला. ॥३॥
( कावेरी पत्तनाच्या ) जगद्देवानें शरण येऊन, प्रणाम करून ह्याची सत्ता पुष्पाप्रमाणें मस्तकावर धारण केली. ॥४॥
मदुरेचा अजिंक्य राजा सुद्धां ह्याच्या आज्ञेंत वागूं लागला. ह्मैसूरच्या राजानेंहि ह्याचा ताबा मान्य केला. ॥५॥
दुष्ट रणदूल्लाखानाने बलात्कारानें घेतलेल्या आपल्या सिंहासनावर वीरभद्र हा शहाजीच्या आश्रयानें पुनः बसला. ॥६॥
निरनिराळ्या प्रसंगीं निरनिराळ्या मसलती योजणार्या चतुर शहाजीच्या प्रभावानें पुष्कळांनीं यवनांची भीति टाकली. ॥७॥
दुसर्यांस अतिशय दुःसह असणारा रणदुल्लाखान सर्व स्वामिकार्यें शहाजी राजाच्या सल्लामसलतीनें करूं लागला. ॥८॥
पुढें सेनापति रणदुल्लाखान कालवश झाल्यावर कर्नाटकांतील राजांनी ताबडतोब आपल्या ताब्यांत आणण्यासाठीं ज्या ज्या सेनापतींस आदिलशहानें तिकडे पाठविलें तो तो सेनापति त्याचें इष्ट कार्य सिद्धीस नेण्यासाठीं शहाजीच्याच तंत्रानें वागूं लागला. ॥९॥१०॥
तेव्हां अनीतीचा आश्रय करणार्या त्या इब्राहिम आदिलशहाच्या पुत्रानें ( महमूदशहानें ) घमेंडीनें भोसले राजास कैद करण्याची मुस्तुफाखानास आज्ञा केली. ॥११॥
मग दुंदुभिध्वनीनें समुद्र दुमदुमवीत, योध्द्यांच्या जय शब्दानें दिशा भरून टाकीत, तरल पताकांनीं विजांना धमकावीत, हत्तींच्या उंच शुंडाग्रांनीं मेघांना बाजूस सारीत, घोड्यांनीं उडविलेल्या धुळीनें सूर्यास लोपवून टाकीत, सेनासमूहांनीं मार्गांतील नद्या आटवीत, उंच सखल भूमि अगदीं सपाट करीत तो मुस्तफाखान शत्रू योद्धयांनीं व्याप्त अशा कर्नाटक प्रांतास जाऊन पोंचला. ॥१२॥१३॥१४॥१५॥
सेनापतिपद प्राप्त झालेला, आदिलशहाच्या विश्वासांतला कपटरूपी वृक्षांचें आगर असलेल्या खुरासान प्रांताचा अर्क, महामानी, थोर कुलांतला, प्रख्यात मुस्तुफाखान हा अनेक सरदारांसह येत आहे असें ऐकून आपला त्याच्यावर विश्वास नसतांहि तो आहे असें दाखवून शहाजी राजा आपल्या सैन्यासह लगबगीनें त्यास सामोरा गेला. ॥१६॥१७॥१८॥
एकमेकांविषयीं अधिकाधिक प्रेम दाखविणार्या त्यांच्या भेटीचा समारंभ मार्गांत दोघां मित्रांच्या भेटीप्रमाणें मोठा थाटाचा झाला. ॥१९॥
त्या समयीं दोघांनीहि तेथें वस्त्रें, अलंकार, हत्ती, घोडे ही एकमेकास विपुल अर्पण केली. ॥२०॥
त्या वेळेस मुस्तुफाखानाच्या सैन्याच्या तळाजवळच बलाढ्य शहाजी राजे भोसले यांनींहि आपल्या सेनेचा तळ दिला. ॥२१॥
छिन्द्रान्वेषी मुस्तुफाखान जेव्हां जेव्हां पाही तेव्हां तेव्हां त्यास शहाजी राजा अगदीं सज्ज आढळे. ॥२२॥
आपल्याविषयीं खात्री पटविण्यासाठीं स्नेह दाखवून मुस्तुफाखान शहाजी राजास सर्व कार्यांत पुढें करीत असे. ॥२३॥
लगबगीनें उत्थापन देऊन, दुरून सामोरें जाऊन, हात घट्ट धरून आनंद दाखवून, हातांत हात घालून, अर्धासन देऊन, त्याच्याकडे तोंड करून, स्मितपूर्वक बोलून, प्रीतिपूर्वक पाहून, नानाप्रकारच्या मसलतीच्या योजना त्यास प्रकट करून, सर्व कार्यांत त्याचा पुष्कळ पुरस्कार करून मूल्यवान् नजराणे देऊन सलगी दाखवून, स्तुति करून, खूप थट्टा मस्करी करून, आध्यात्माच्या गोष्टी सांगून हिताविषयीं अभिमान जागृत करून, किंवा आपला वृत्तांत सांगून तो यवन दररोज त्यास त्याच्यावर आपला विश्वास दाखवीत असे. ॥२४॥२५॥२६॥२७॥२८॥
पुढें त्या राजनीतिनिपुण सेनापतीनें समस्त सेनानायकांस आणवून एकांतांत भाषण केलें. ॥२९॥
मुस्तुफाखान म्हणाला :-
जो सेवक ज्याचें ( धन्याचें ) अन खातो त्या सेवकाचा जो पाण तो त्या धन्याचा होय, त्याचा ( सेवकाचा ) केव्हांहि नव्हे. ॥३०॥
विद्येशिवाय महत्त्व ( प्राप्त होत ) नाहीं; प्रतिभेशिवाय काव्य ( निर्माण होत ) नाहीं; त्याचप्रमाणें स्वामिकृपेशिवाय अभीष्ट झालेलें पाहण्यांत नाहीं. ॥३१॥
म्हणुन जो ( सेवक ) स्वामिकार्यार्थ आपला प्राण वेंचतो तोच धन्य पुरुष होय असें नीतिशास्त्रवेत्ते म्हणतात. ॥३२॥
स्वामिसेवापरायण लोकांनीं संबंधी, मित्र, सोयरेधायरे, सख्ख्याभाऊ यांची, इतकेंच नव्हे तर, बापाची सुद्धां पर्वा करूं नये. ॥३३॥
जो संतुष्ट झाला असतां आपण तुष्ट होतों, आणि जो रुष्ट झाला असतां आपण नष्ट होतों त्याची ( स्वामिची ) सेवा कोणता पुरुष एकनिष्टपणें करणार नाहीं ? ॥३४॥
आपण सर्वच जण सध्यां त्याच्या पूर्ण ताब्यांत आहोंत तेव्हां सर्व मिळून महमूदाच्या हितासाठीं झटूं या. ॥३५॥
आपला मानी धनी महमूदशहा ह्यानें ‘ शहाजीस कैद करा ’ असा आज निरोप पाठवून मला कळविलें आहे; तें आम्ही स्वहित साधकांनीं बलाढ्य शहाजीराजा भोसला जों जागा झाला नाहीं तोंच केलें पाहिजे. ॥३६॥३७॥
ही आजची रात्र उलटल्यावर मोठ्या पहाटेस आपआपल्या सैनिकांसह एकत्र होऊन त्या राजास पकडा. ॥३८॥
याप्रमाणें त्या मुस्तुफाखानानें सेनानायकांस कार्य सिद्धीस नेण्यास सांगितल्यावर ते आपआपल्या शिबिरात गेले. ॥३९॥
ही मसलत त्या अविंधांनीं ज्या रात्रीं केली त्याच रात्रीं शहाजीच्या शिबिरांत मोठे उत्पात झाले. ॥४०॥
घोडे अश्रु ढाळुं लागले, हत्ती करुण स्वर काढूं लागले, एकाएकी वावटळ धुळीसह गरगर फिरूं लागली; ॥४१॥
न वाजवतांच नगारे भयंकर आवाज करूं लागले, एकाएकी वावटळ धुळीसह गरगर फिरूं लागली; ॥४२॥
मेघांशिवाय च आकाशांतून गारा चोहोंकडे पडूं लागल्या; मेघांशिवाय च आकाशांतोन वीज चमकूं लागली; ॥४३॥
दिवे लागण्याचे वेळीं दिवे लागेनात; मनुष्यांचीं सुखें व मनें म्लान झालीं. ॥४४॥
सेनेसमीप भालू अशूभ ओरडूं लागल्या. कुत्रीं वर तोंड करून अत्यंत घाणेरडें रडूं लागलीं; ॥४५॥
वारंवार अत्यंत जवळ येऊन घुबड घूत्कार करूं लागलें; त्याचप्रमाणें लांडगेहि एकाएकीं भयंकर आवाज करूं लागले; ॥४६॥
प्रत्येक देवळांत देवांच्या मूर्ति कापूं लागल्या; मध्यरात्रीं अकस्मात् गायी हंबरडें फोडूं लागल्या. ॥४७॥
अशीं भयसूचक दुश्चिन्हें पुष्कळ झालीं, तथापि तो शहाजी राजा दुर्दैवामुळें सावध झाला नाहीं. ॥४८॥
ज्यांच्याशीं मध्यरात्रींच्या वेळीं मुस्तुफाखानानें फार वेळ मसलत केली ते सेनानायक आपआपल्या शिबिरांत सज्ज होऊन राहिले आहेत असें हेरांनीं येऊन सांगितलें तरि तें ऐकूनहि अतिशय बलाढ्य शहाजी राजानें दुर्दैवामुळें तत्कालोचित गोष्ट केली नाहीं ! ॥४९॥