श्रीशुक उवाच - अयुते द्वे शतान्यष्टो लीलया युधि निर्जिताः । ते निर्गता गिरिद्रोण्यां मलिना मलवाससः ॥१॥

कुरुकैपक्षा विपक्षदमना । शुक म्हणे गा नृपमंडना । एकार परिसें भगवद्गुणां । पूर्वजाचरिता समवेत ॥१०॥
वीस सहस्र अष्ट शतें । शौर्य प्रतापें मगधनाथें । राजे जिङ्कोनि कोंडिले होते । चिरकाळवरी निजदुर्गीं ॥११॥
लीले करूनि क्रीडे बाळ । तैसा समरीं मगधपाळ । संग्राम म्हणिजे ज्याचा खेळ । हेळा भूपाळ निग्रहिले ॥१२॥
मागधमरणानंतर हरि । तया नृपांतें विमुक्त करी । मग ते गिरिद्रोणीबाहेरी । मलिनाम्बरीं निघाले ॥१३॥
निगूढ गिरिदुर्गमदरकुटीं । त्यामाजि कोंडिल्या नृपांच्या थाटी । कृष्णें पाहूनि कृपादृष्टी । पुनः सृष्टि दाविली त्यां ॥१४॥
मागधकाळदाढेमधून । बळें काढूं शके कोण । कृष्ण साक्षात श्रीभगवान । म्हणोन आंगवण हे घडली ॥१५॥
जननीजनक वनमाळी । भाग्यें लाधलीं इये काळीं । ऐसें भावूनि हृदयकमळीं । पातले सकळी हरिजवळी ॥१६॥
भूमि आकाश दाही दिशा । चंडकिरणाचिया प्रकाशा । लाहती दोर्णि गर्भवासा । पासूनि प्रसवा पावलिया ॥१७॥
उल्बवेष्टित गर्भस्थ समळ । तैशीं शरीरें अमंगळ । चैलखंदें समळ बहळ । परम कुश्चळ वनरवत ॥१८॥
मूर्धजांचीं वाढलीं भिसें । शरीरें भासती, पिशाच्या ऐसें । कक्षोपस्थींचिया केशें । अत्यंत क्लेशें जाकळती ॥१९॥
घ्राणाबाहीर रोमावळी । कूर्चश्मश्रूमाजि धुळी । लिक्षा जंतु सर्व वाळीं । झदती भूतळीं व्यवहारें ॥२०॥
जलस्पर्शरहित तनु । ऐशा नृपांच्या अत्यंत मलिन । अशनवसनावांचूनि दीन । त्वचा संलग्न अस्थींसीं ॥२१॥

क्षुत्क्षामाः शुष्कवदनाः संरोधपरिकर्शिताः । ददृशुस्ते घनश्यामं । पीतकौशेयवाससम् ॥२॥

क्षुधाव्याधीचा भडका पोटीं । जठराग्नीची जळे अगिठी । मेदोमांसादि तेणें आठी । शुष्क अंगयष्टी काष्ठसम ॥२२॥
तोंडें वाळलीं काचर्‍यापरी । सखोल निस्तेज नेत्रगारी । त्राण अणुमात्र न थरे गात्रीं । भ्रमें अंधारीं मूर्छना ये ॥२३॥
इक्षुकाण्डें पिळिती घाणां । निरोधें कर्शिती तैसे जाणा । निःसार निःसत्त्व क्षणक्षणा । क्ल्र्शें मूर्छना पावती ॥२४॥
ऐशियां विमुक्त करितां हरि । निघाले गिरिद्रोणीबाहेरी । लंघिली क्लेशांची शर्वरी । देखती नेत्रीं हरिसूर्य ॥२५॥
कृष्णकृपेचें अमृतपान । तिन्हीं देखिलें श्रीकृष्णध्यान । तीं श्लोकीं तें शुकभगवान । करी वर्नन मूर्तीचें ॥२६॥
एके श्लोकें प्रेमोत्सुकता । अपर श्लोकें नतिनम्रता । क्लेशमार्जन झाला वक्ता । तें येथ श्रोतां परिसिजे ॥२७॥
राजे देखते झाले ध्यान । तें ऐकावें सावधान । जैसा प्रावृटीं सजळ घन । तैसें लावण्य कान्तीचें ॥२८॥
इन्द्रनीळाची भासुरप्रभा । नातरी निरभ्र गगनगाभा । कीं अनिमेष पाहतां भास्करबिम्बा । माजील गर्भासम कान्ति ॥२९॥
सान्द्रपयोदीं सौदामनी । तेंवि पीताम्बर परिधानीं । किंवा जाम्बूनदसुवर्णीं । इन्द्रनीलमणि खेवणिला ॥३०॥

श्रीवत्सांकं चतुर्बाहुं पद्मगर्भारुणेक्षणम् । चारुप्रसन्नवदनं स्फुरन्मकरकुण्डलम् ॥३॥

श्रीवत्साङ्क हृदयकमळीं । अरुणप्रभा नेत्रकमळीं । चतुर्बाहु श्रीवनमाळी । पद्मगर्भास भासे ॥३१॥
लावण्याचें अधिष्ठान । सुप्रसन्न सुंदर वदन । मकरकुण्डलें भ्राजमान । उभयकर्णीं तळपती ॥३२॥
चंचत्कुन्तळ चंचरिकाभ । हास्यवदन पंकजनाभ । आयुधचतुष्टयाची शोभ । चहूं हस्तकीं देदीप्य ॥३३॥

पद्महस्तं गदाशंखरथांगैरुपलक्षितम् । किरीटहारकटककटिसूत्रांगदाचितम् ॥४॥
भ्राजद्वरमणिग्रीवं निवीतं वनमालया ।

दरारिपंकजकौमोदकी । तीक्ष्ण तेजस्वी लखलखी । देखतां अरिवर्गातें धडकी । धाकें सम्मुखीं न थरती ते ॥३४॥
भासुरभास्करकोटिकोटीर । शशाङ्कभासम मौक्तिकहार । अमूल्यमणिमय शोभती अपर । कौस्तुभ मणिवर भ्राजिष्ठ ॥३५॥
जडित अंगदें बाहुवटीं । कंबुकटकद्वय मनगटीं । सुरत्नमेखळा कटितटीं । क्षीरोददुटी प्रावरणा ॥३६॥
मुकुटीं तुरंबिलीं प्रसूनें । सज्जनांचीं विशुद्ध मनें । त्यावरी जैशीं पाळिगणें । सात्वतनयनभृंगांचीं ॥३७॥
मागधबंदींचे विमुक्त भूप । ऐसें देखती कृष्णरूप । तयांचा प्रेमोत्कर्ष अमूप । वर्णी संक्षेपे योगिराट् ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP