मृगतृष्णां यथा बाला मन्यंत उदकाशयम् । एवं वैकारिकी मायामयुक्ता वस्तु चक्षते ॥११॥

राजे म्हणती भो श्रीपति । बाळक जैं प्राकृतमति । अध्यारोपविनिमयगति । अवस्तु भाविती वस्तुत्वें ॥७७॥
भास्करकिरणांची झळझळ । देखूनि जलाशय मानिती बाल । नेणती मृगतृष्णा केवळ । स्थळीं चंचळ दृग्भ्रम हा ॥७८॥
तैसे अयुक्त जे अविवेकी । न म्हणती माया वैकारिकी । बुजाली वस्तूची ओळखी । अवस्तु लेखी वस्तुत्वें ॥७९॥
वस्तु सच्चित्सुखमय घन । अवस्तु विषयभवभ्रम पूर्ण । अवस्तु वस्तुत्वें भावून । अयुक्त अतज्ज्ञ पाहताती ॥८०॥
अवस्तूसी मानूनि वस्तु । बालिश झाले विषयासक्त । बोलूनि दृष्टान्त प्रशस्त । प्रत्यय स्वगत नृप वदती ॥८१॥
दृष्टान्तमात्र अयुक्त बाळ । प्रत्यक्ष आम्हीच ते केवळ । राज्ययोगवियोगहळहळ । भोगूं तत्फळ सुखदुःख ॥८२॥
राज्ययोग मानितां अर्थ । वियोगें तोचि होय अनर्थ । त्याग अर्थ स्वार्थ । दुःखावर्त भव भोगूं ॥८३॥
अयुक्त अविवेकी अज्ञानी । मृगतृष्णेतें जलाशय मानी । आमुच्या ठायीं तेचि करणी । देखिली म्हणोनि जृप वदती ॥८४॥
कोणें देखिली म्हणसी जरी । तंव तुझी कृपा नव्हती हरी । तंववरी भ्रमलों भवभ्रमलहरीं । आतां अंतरीं देखतसों ॥८५॥
प्रथमश्लोकें तो भवभ्रम । द्वितीयें तवानुग्रह परम । दों श्लोकीं तें नृपोत्तम । पुरुषोत्तमाप्रति वदती ॥८६॥

वयं पुरा श्रीमदनष्टदृष्टयो जिगीषयास्या इतरेतरस्पृधः ।
घ्नंतः प्रजाः स्वा अतिनिर्घृणाः प्रभो मृत्युं पुरस्त्वाविगणय्य दुर्मदाः ॥१२॥

प्रभो समर्था ऐकें हरि । पूर्वीं आम्ही श्रीमदभारीं । अंध होत्साते विवेकनेत्रीं । भवभ्रमलहरी वर पडलों ॥८७॥
मदिरादिकांचा मादक मद । त्रिपंचरात्रें उतरे विशद । तारुण्याचा होतां वृद्ध । नोहे प्रमादकर माद ॥८८॥
कुळ शीळ रूप विद्या । इत्यादि मादकें नव्हतीं सद्या । एका श्रीमदें अविद्या । सर्व विरुद्धा आचरवी ॥८९॥
क्ठोर अयस्मय कुठार । तथापि छेदूं न शके तरुवर । दंड योजूनि करितां प्रहार । सर्व कान्तार विखंडी ॥९०॥
तेंवि मादक श्रीमद प्रबळ । राजसत्तेचें होतां बळ । मदोन्मत अंध केवळ । प्रलयकालपर्यंत ॥९१॥
आम्हां आंगीं नृपश्रीमद । तेणें अविवेकें झालों अंध । विषयस्वार्थें झालों बद्ध । तें तूं प्रसिद्ध जाणसी ॥९२॥
इये पृथ्वीच्या ऐश्वर्यस्वार्थें । परराष्ट्रपभंजनीं जिगीषा वर्ते । तये करूनि सरतें पुरतें । चतुरंगयूथप सज्जनी ॥९३॥
परराष्ट्रभंजना प्रवर्ततां । तंव तद्राष्ट्रप प्रतीकारार्था । आवेशोनियां युद्ध करितां । प्रजा समस्ता आक्रंदती ॥९४॥
चतुरंगसेनेचिया भरणा । स्वप्रजा पीडूनि घेतां धना । अन्याय ऐसें नवटे मना । परमनिर्घृणा मदान्धा ॥९५॥
परपजांचें लुण्ठन करितां । अणुमात्र घृणा नुपजे चित्ता । ऐशिया राज्यें श्रीमदमत्तां । राष्ट्रें भंगितां शीण न वाटे ॥९६॥
सर्वात्मा तूं सर्वगट । त्या तुज विसरूनि श्रीमददृप्त । परस्परें प्रजांचा घात । करितां आकान्त भूचक्रीं ॥९७॥
एकापरीस बळिष्ठ एक । समरीं संघटतां निःशंक । पीडा पावती प्रजालोक । हा विवेक मावळला ॥९८॥
अत्यन्त निर्दय कृतान्तापरी । विजयस्वार्थाचिया भरीं । प्रवर्तोनि प्रजासंहारीं । मानूनि शरीरीं प्रभुत्व ॥९९॥
आम्ही समर्थ पृथ्वीपति । आम्ही भंगूं शत्रूप्रति । आम्ही प्रतापें जिंकूं क्षिती । दिगंतीं कीर्ति विस्तारूं ॥१००॥
ऐसे श्रीमदनष्टदृष्टि । पाञ्चभौतिक कलेवरयष्टि । आश्रयूनि ऐश्वर्यपुष्टि । म्हणवूं सृष्टी नरेश्वर ॥१॥
तूं सर्वगत सर्वां ठायीं । असतां आम्हां झालासि नाहीं । निमेष लव पळ भरतां पाहीं । युगप्रवाहीं घडमोडी ॥२॥
एवं अखंडदंडायमान । तूं कालात्मा करिशी कलन । कळत कळतां मदान्ध पूर्ण । तुजलागून न गणूं पैं ॥३॥
वाढे तितुकें काळें मोडे । सांचे त्याचा वेंच घडे । जन्मलें मरणातें वरपडे । घडलें विघडे यथाकाळें ॥४॥
ऐसा पुढें तूं प्रत्यक्ष काळ । असतां दुर्मद आम्ही खळ । तुज न गणूं अहंताबळ । राहूं केवळ नृपगर्वें ॥१०५॥
ऐसे आम्ही मोहग्रस्त । होतों दुर्मद विवेकरहित । तें तव कृपेनें यथार्थ । उमजलें स्वहित जगदीशा ॥६॥
कैसें उमजलां ऐसें म्हणसी । तें तूं अवधारीं हृषीकेशी । तुझिया कृपाकटाक्षलेशीं । उमज मानसीं जो घडला ॥७॥

त एव कृष्णाद्य गभीररंहसा दुरन्तवीर्येण विचालिताः श्रियः ।
कालेन तन्वा भवतोऽनुकम्पया विनष्टदपश्चिरणौ स्मराम ते ॥१३॥

अगा ये कृष्णा करुणासिन्धु । राज्यमदें होतों अन्धू । ते आजि जाहलों विगतमदु । स्मरों तव पद स्वलाभें ॥८॥
देहादि राज्यैश्वर्यमाज । जयाचे भुली न गणूं तुज । तो त्वां आज भंगिला सहज । लाधलों सुतेज निजचक्षु ॥९॥
जो तूं काळात्मा गभीर गहन । तुजशीं न तुळे सौक्ष्म्यें गगन । महाकल्पान्तीं स्थूळमान । विशाळ विस्तीर्ण प्रवाह ॥११०॥
सूक्ष्म वेगाची परवडी । माजि परमाणुघडमोडी । स्थूलमानें ब्रह्माण्डकोडी । जे घडी विघडी काळतनू ॥११॥
ते तुझिये काळतनू करून । झालें नृपश्रीमदभंजन । राज्यभ्रंशाचा न मनूनि शीण । अनुग्रह पूर्ण हा तुझा ॥१२॥
तुझिया कृपेच्या अमृतलेशें । विदर्प झालों निजमानसें । आतां तुझें चरण कैसे । विषयविनाशें स्मरतसों ॥१३॥
कृपालेशें विवेकदृष्टि । निवळली ते ऐकें गोष्टी । भ्रामक नोहे भवभ्रमसृष्टि । ते परिपाटी अवधारीं ॥१४॥

अथो न राज्यं मृगतृष्णिरूपितं देहेन शश्वत्पतता रुजां भुवा ।
उपासितव्यं स्पृहयामहे विभो क्रियाफलं प्रेत्य च कर्णरोचनम् ॥१४॥

ऐश्वर्यमदभंगें राज्यच्युति । हे तव कृपानुग्रहप्राप्ति । यानंतरें भो श्रीपति । आम्हांप्रति तें न रुचे ॥११५॥
मृगतृष्णिकामय संसार । दृग्गोचर क्षणभंगुर । भवभ्रमग्रस्त जे पामर । ते या साचार मानिती ॥१६॥
तव कृपानुग्रहें स्वामी । तैसें आतां न मनूं आम्ही । सज्ज न होतांचि तत्कामकर्मीं । भवभ्रमऊर्मिमाजिवडे ॥१७॥
नवमृद्भाण्डीं पाझरे नीर । तेंवि शश्वत् शीर्यमाण शरीर । सकळ रोगांचें पिकतें क्षेत्र । आत्माकार तें न मनूं ॥१८॥
मातृरुधिर पितृशुक्र । उभयमलात्मक जें शरीर । आतां तेथें अहंकार । नुठे साचार आत्मत्वें ॥१९॥
आत्मा भावूनि स्थूळतनु । धरूनि तेथिचा दृढाभिमान । भेदबुद्धि भिन्नभिन्न । विषयसेवन सत्य गमे ॥१२०॥
भूतभौतिकीं एक माती । पृथक् योनि पृथक् जाती । अविद्याभ्रमाचिया भ्रान्ती । माजी भासती सत्यत्वें ॥२१॥
एक लोपोनि अनेकाकार । दृश्याभास गमे साचार । त्रिताप षड्रिपु षड्विकार । दुःख दुस्तर भोगविती ॥२२॥
असो सामान्याची कथा । विशेष नृपासनाची अहंता । राज्यलोभाचिया स्वार्था । माजि परमार्था कोण पुसे ॥२३॥
रंक इच्छी अन्नवसन । तत्संपन्न इच्छी धन । धनाढ्य वांछी वृत्तिभुवन । राज्यासन तद्भोक्ता ॥२४॥
सामान्य राजे सार्वभौम । व्हावयाचा इच्छिती काम । एवं मृगतृष्णा भवभ्रम । यावरी दुर्गम हें न मनूं ॥१२५॥
एवं मृगतृष्णमय राज्य । देह केवळ आमयपुंज । जेथ आत्मत्वें होऊनि सज्ज । सहसा भोज्य हें न मनूं ॥२६॥
आपण मानूनि देहमात्र । नृपैश्वर्यभोग विचित्र । तत्सेवनीं स्पृहातंत्र । न हों स्वतंत्र सुखलाभें ॥२७॥
एवं इहलोकींचें सुख । राज्यभोगादि देह क्षणिक । जाणोनि येथें स्पृहोत्सुक । न हों निष्टंक सेवावया ॥२८॥
यावरी आमुष्मिक जो स्वर्ग । सुकृतकर्माचा फळभोग । मेलिया नंतर भोगिजे साङ्ग । करिती याग ज्या लाभा ॥२९॥
याज्ञिक पुष्पिता वेदवाणी । तद्विश्वासें भजती यज्ञीं । पूर्वमीमांसा पडतां श्रवणीं । स्पहा सेवनीं बहु धरिती ॥१३०॥
परि ते कर्णरोचनमात्र । मीमांसकांचें फळभोगसूत्र । तेथही सुखदुःख सर्वत्र । इहामुत्र समसाम्य ॥३१॥
अल्पसुकृती जे जे होती । श्रेष्ठपुण्यभाग त्यां न गणिती । तुल्यसुकृती द्वेष करिती । भोगमहती परस्परें ॥३२॥
कनिष्ठ श्रेष्ठांची करिती स्पृहा । सुकृताभावें पावती मोहा । परंतु कनकत्व दुर्लभ लोहा । विवेकस्पर्शावांचूनी ॥३३॥
दुर्धरतपें बळिष्ठ दैत्य । ते आदरिती संग्रामकृत्य । तैं सुरवरां भय आकान्त । पळती भ्रान्त दिग्विजयीं ॥३४॥
ऐसिया स्वर्गा दुःखपूर्णा । स्पृहा न धरूं तत्सेवना । लक्षूनि अक्षयसुखकल्याणा । तुझिया चरणाम चिन्तितसों ॥१३५॥
जरी तूं ऐसें म्हणसी हरी । ऐसा निश्चय तुम्हां अंतरीं । तरी मम चरणांच्या स्मरणादरीं । मुक्ति निर्धारीं पावाल ॥३६॥
मच्चरणांचिया अनुस्मृति । आयास न करितां पावाल मुक्ति । माझी अपेक्षा याहीपरती । किमर्थ म्हणसी तरी ऐक ॥३७॥

तं नः समादिशोपायं येन ते चरणाब्जयोः । स्मृतिर्यथा न विरमेदपि संसरतामिह ॥१५॥

प्राणिमात्रीं विषयात्मक । निसर्गप्रेमा वर्ते एक । त्याहीमाजि न्यूनाधिक । संसार विशेष कर्माचा ॥३८॥
कर्में तितुकीं त्रिगुणात्मकें । त्यांमाजि सुखदें शुत्त्भें सात्विकें । राजसें मिश्रें उभयात्मकें । तामसें सुखें भोगविती ॥३९॥
त्यांमाजिही उच्चावच । गुणकर्मात्मक प्रेमा साच । प्राक्तननिष्ठेचा नटनाच । करी आहाच न मनूनी ॥१४०॥
प्राक्तनयोगें निसर्ग प्रेमा । सुचे अमेध्यीं प्रीति अधमा । रति सन्मार्गीं उत्तमोत्तमा । उभयीं समा समकर्में ॥४१॥
कर्मसंस्कारें निसर्गप्रीति । पालट न करवे कल्पान्तीं । तुझिया अनुग्रहें सत्संगती । जंववरी श्रीपति न जोडे ॥४२॥
एवं कर्मतंत्र सकळ प्राणी । उत्तम सांडूनि अधमाचरणीं । जाणतां ही प्रवर्तोनी । कर्मी प्राक्तनीं दुःख दीजे ॥४३॥
दोघां एक जननीजनक । एका सत्कर्मीं प्रेमा देख । दुजा आवडे आभिचारिक । नरकदायक दुष्कर्म ॥४४॥
कर्मसंस्कारीं निसर्गप्रेमा । तस्मात् तव पदस्मृति आम्हां । आकळावयाची अशक्य गरिमा । पुरुषोत्तमा तुज विदित ॥१४५॥
यालागीं तो उपाय आतां । आम्हां उपदेशीं भगवंता । जेणें तव पंदपंकज स्मरतां । विराम चित्ता न उपजे ॥४६॥
जरी आम्ही कर्मसंस्कारें । पावतां अनेक जन्मान्तरें । तेथही तव पदाप्रेमादरें । प्रियकर दुसरें न रुचों दे ॥४७॥
तुझिया कृपानुग्रहावीण । सहसा न रुचे तव पदस्मरण । यालागिं कृपा करूनि पूर्ण । चरणस्मरण अविरत दे ॥४८॥
सप्रेम चरणस्मरणोपाय । म्हणसी बोधिजे कैसा काय । तरी सत्संगाचा लाभ होय । इतुकीच सोय दावावी ॥४९॥
सत्संगाचा होतां लाभ । ते चिन्तिती पंकजनाभ । श्रवणमात्रें भंगें अशुभ । मग होय सुलभ हरिप्रेम ॥१५०॥
संत स्मरती तुझिया नामा । ज्या नामाचा अगाध महिमा । आकल्प वर्णूं न शके ब्रह्मा । कैवल्यधामा तें ऐक ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP