श्रीशुक उवाच - जरासंधं घातयित्वा भीमसेनेन केशवः । पार्थाभ्यां संयुतः प्रायात्सहदेवेन पूजितः ॥३१॥

भीमहस्तें जरासंध । वधूनि प्रतापी गोविन्द । भीमार्जुनांसहित सिद्ध । इंद्रप्रस्थासी चालिला ॥१२०॥
तंव मागधें तये काळीं । श्रीकृष्णाच्या चरणकमळीं । हस्तमस्तक पुष्पाञ्जळि - । प्राय अर्पूनिहरि विनवी ॥२१॥
स्वामी आपुल्या दासगणा । माजी कनीय मातें जाणा । अंगीकारूनि मम पूजना । मग प्रयाणा आदरिजे ॥२२॥
जनकें तुमचिये कृपादृष्टी । देह ठेवूनि चरणांनिकटीं । समरीं सत्यप्रतिज्ञेसाठीं । सायुज्यपेठीं विराजला ॥२३॥
स्वपादुका जाणूनि मज । केलें स्वामीनें मगधराज । आतां माझी सर्व लाज । गरुडध्वजें रक्षावी ॥२४॥
ऐकूनि सहदेवाचें वचन । कृपें कळवळिला भगवान । अंगीकारूनि तत्पूजन । केलें प्रयाण तेथूनी ॥३२५॥
निघते समयीं रुक्मिणीकान्तें । आज्ञापिलें सहदेवातें । युधिष्ठिराच्या दर्शनातें । राजसूयार्थ येइजे ॥२६॥
बार्हद्रथाच्या विजयरथीं । तिघें बैसले महारथी । पुरंदरप्रस्थाचिये पंथीं । स्वस्थ चालती स्वानंदें ॥२७॥
जेथ आपुल्या निजायुधांतें । स्थापूनियां कमळाकान्तें । विप्रवेश धरिले होते । मागधातें छळावया ॥२८॥
पुधती येवोनि तये ठाईं । आयुधें घेऊनियां लवलाहीं । रथीं बैसोनि विश्वविजयी । खाण्डवप्रस्थाप्रति गेले ॥२९॥

गत्वा ते खाण्डवप्रस्थं शंखान्दध्मुर्जितारयः । हर्षयंतः स्वसुहृदो दुर्हृदा चासुखावहाः ॥३२॥

मग ते खाण्डवप्रस्थानिकटीं । तिघे पातले प्रतापजेठी । विषयशब्दाच्या बोभाटीं । शंख स्फुरिते त्रिवर्गीं ॥३३०॥
शत्रुजयाचा उत्साह भारी । तया आवेशें महावीरीं । शंखस्फुरणाचिये गजरीं । केली नगरीं जयसूचना ॥३१॥
सुहृद जिवलग आप्त स्वजन । शंखस्वरें ते हर्षायमान । केले तैसेच दुष्ट दुर्जन । कंपायमान तद्घोषें ॥३२॥
ऐसा विजयशंखोत्साह । सुहृदां आप्तां सुखावह । दुष्टदुर्जना दुःखावह । जाला पहा हो ते काळीं ॥३३॥

तच्छ्रुत्वा प्रीतमनस इंद्रप्रस्थनिवासिनः । मेनिरे मागधं शांतं राजा चाप्तमनोरथः ॥३३॥

श्रीकृष्णाचा पाञ्चजन्य । वृकोदराचें पौण्ड्रस्फुर्ण । देवदत्त स्फुरी अर्जुन । नागरीं ते स्वर ओळखिले ॥३४॥
इंद्रप्रस्थनिवासिजन । तिहीं ऐकूनियां ते स्वन । हृदयीं पावले समाधान । म्हणती दुर्जन निर्दळिला ॥३३५॥
मागधासारिखा भूकंटक । शान्त झाला हें मानिती सुख । धन्य युधिष्ठिर कुरुनायक । पावला सम्यक मनोरथ ॥३६॥
येथोनि महाभाग्याचा उदय । सिद्धी जाईल राजसूय । मागधवधें त्रैलोक्यविजय । नृपसमुदाव वशवर्ती ॥३७॥
यावरी धर्माचें दर्शन । जालें त्रिवर्गालागून । तये कथेचें व्याख्यान । सावधान अवधारा ॥३८॥

अभिवंद्याथ राजानं भीमार्जुनजनार्दनाः । सर्वमाश्रावयांचक्रुरात्मना यदनुष्ठितम् ॥३४॥

धर्मराजा सभास्थानीं । नमिला जाऊनि तिघीं जणीं । परस्परें आळंगूनी । स्वागतप्रश्नीं नृप अर्ची ॥३९॥
भीमार्जुनजनार्दन । गेले धर्माज्ञा घेऊन । तैं पासूनि वर्तमान । करिती कथन सविस्तर ॥३४०॥
जैसा रचिला होता मंत्र । कृत्य साधिलें तदनुसार । मागध करूनि प्रतिज्ञातंत्र । द्वंद्वसमरीं संहारिला ॥४१॥
आपण जैसें अनुष्ठिलें । तें तें धर्मा ऐकविलें । धर्में ऐकूनि काय केलें । तें परिसिलें पाहिजे ॥४२॥

निशम्य धर्मराजस्तत्केशवेनानुकंपितम् । आनंदाश्रुकलां मुंचन्प्रेम्णा नोवाच किंचन ॥३५॥

जरासंधवध चरित्र । ऐकोनि धर्मराजाचे श्रोत्र । निवाले आणि अभ्यंतर । सात्त्विकाष्टकें कवळिलें ॥४३॥
भीम जरासंधसमरीं । जर्जर जाला गदाप्रहारीं । आंगीं मूर्छना दाटतां भारी । कैटभारी अनुकंपी ॥४४॥
केशवकृपावलोकमात्रें । आप्यायितां भीमगात्रें । दृढतर जाहलीं वज्रप्रहारें । न डंडळिती समरंगीं ॥३४५॥
जरासंधाचें निधनमर्म । सांगतां भीमें भीमविक्रम । करूनि चिरिलें मागधवर्ष्म । जे दुर्घट कर्म सुरासुरां ॥४६॥
येरवीं भीम मागधपाळा । समरीं न्यून तुकितां तुळा । केशवकृपामृतजिव्हाळां । वधिलें खळा तद्योगें ॥४७॥
श्रीकृष्णाचा येथवरी । कृपाविशेष आम्हांवरी । आम्ही उत्तीर्ण या संसारीं । केंवि पामरें हों शकिजे ॥४८॥
हृदयामाज युधिष्ठिर । कृष्णकृपेचा कृतोपकार । स्मरतां सजळ जाले नेत्र । आनंदाश्रु स्रवताती ॥४९॥
थरथर कांपे अंगयष्टी । सद्गद श्वास रोधला कंठीं । रोमाञ्च उठिले जेंवि प्रावृटीं । होतीं वृष्टी तृणाङ्कुर ॥३५०॥
पुलक दाटले रोममूळीं । सजळ सार्द्रता स्वेदजळीं । भासे कंचुक मुक्ताफळीं । खचित लेइला ज्यापरी ॥५१॥
कृष्णकृपेचें अपारपण । उमजों न शकवे म्हणोन । वाचे पडिलें सुदृढ मौन । सहज विस्मरण तनुभावा ॥५२॥
ऐसी युधिष्ठिराची दशा । अष्टभावांचा पडिला ठसा । तेचि अवस्था जगदधीशा । जाहली सहसा सप्रेमें ॥५३॥
ये यथा मां प्रपद्यंते । मीही तसाचि भजें त्यांतें । या वाक्याचें सत्यत्व निरुतें । परीक्षितीतें शुक बोधी ॥५४॥
अष्टभाव हे परस्परीं । जेंवि दर्पण दर्पणान्तरीं । बिम्बती तेथ नसे दुसरी । शोभा प्रतिभा एकत्वीं ॥३५५॥
सुखसंपन्न झाली वृत्ति । स्वमानें चेइली तेथ स्मृति । करणवर्गाची प्रवृत्ति । पूर्वस्थिति प्रवर्तली ॥५६॥
नयन असतांचि पैं उघडे । देखणे परतले मागिलेकडे । ते फिरूनि परतले पुढें । दृश्य निवाडें पहावया ॥५७॥
मनें आळंगिला संकल्प । परिमार्जिलें नयनींचें बाष्प । स्वेदपुलका झाला लोप । गात्रींचा कंप स्थिरावला ॥५८॥
पुढें देखूनि कृष्णमूर्ति । जाली वक्तृत्वा प्रवृत्ति । तें व्याख्यान चतुःसप्ततीं । सांगेल सुमती शुकराया ॥५९॥
राजसूयमखेंद्रयजन । अग्रपूजाप्रसंगेंकरून । चैद्य निन्दितां श्रीभगवान । करील हनन चैद्याचें ॥३६०॥
इये कथेचिये श्रवणीं । सप्रेमभरित अंतःकरणीं । बैसती त्यांतें चक्रपाणि । पाण्डवांहूनि प्रिय होय ॥६१॥
प्रतिष्ठानीं एकनाथ । जनार्दनकृपाधनें समर्थ । चिदानंदाख्यशेवधिभरित । स्वानंदकोशीं परिपूर्ण ॥६२॥
तया कोशाचा आवव्यय । अन्वयाङ्कुर गोविंदराव । पाहोनि अधिकाराची सोय । ओपिता होय सद्विभव ॥६३॥
दयार्णव जन्मला तयाचे उदरीं । झाला भाण्डाराधिकारी । न जोडितां घरचेघरीं । सर्व सामग्री स्वतःसिद्ध ॥६४॥
श्रोतीं होऊनि सावधान । श्रवणपात्रीं भरिजे धन । जेणें तुटे भवबंधन । संसृतिदैन्य मग कैचें ॥३६५॥
तो अठरा सहस्र ग्रंथ । नामें श्रीमद्भागवत । दशमस्कंध जो हा विख्यात । वक्ता समर्थ शुकराया ॥६६॥
अध्याय हा त्रिसप्तति । मागधाची करूनि शान्ति । सोडूनियां निरुद्ध नृपति । शक्रप्रस्था हरि आला ॥६७॥
दयार्णवाची इतुकी विनति । सदैव कृष्णीं रंगल्या मति । संकटीं नुपेक्षी निश्चिती । शकुनग्रंथी हे बांधा ॥३६८॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेंऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां जरासंधवधनृपविमोचनंनाम त्रिसप्तप्रतितमोऽध्यायः ॥७३॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥३५॥ ओवी टीका ॥३६८॥ एवं संख्या ॥४०३॥ ( त्र्याहत्तरावा अध्याय मिळून ओवीसंख्या ३३६८७ )

त्र्याहत्तरावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP