अध्याय ७३ वा - श्लोक २६ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
भोजयित्वा वरान्नेन सुस्नातान्समलंकृतान्न । भोगैश्च विविधैर्युक्तांस्तांबूलाद्यैर्नृपोचितैः ॥२६॥
त्रिपादिकांचिया हारी । तळीं मांडूनि वृद्धाचारीं । कनकताटें तयांवरी । वाढिती परी अन्नांच्या ॥७१॥
कुशिंबिरी लवणशाका । फळमूळदळादि अनेका । शुण्ठीरामठलवणात्मका । मरीचिचूर्ण वाढिती ॥७२॥
भर्जित पर्पट कुष्माण्डवटक । लेह्य पेय रस अनेक । द्वादश शिप्रा क्षीरात्मक । पायसान्नें परिवेषिलीं ॥७३॥
सूक्ष्मसाळीचा ओदन । वितुषमुद्गांचें वरान्न । घृतपाचित भक्ष्य़ें आन । खंडशर्कराविकृत जीं ॥७४॥
कनकचषकांचिया हारी । मध्वाज्य पय साय पंचधारी । श्वेतशर्करा पायसावरी । क्कथिका रुचिकर तक्राची ॥२७५॥
प्रार्थनापूर्वक वाढिती अन्नें । स्वेच्छा यथारुचि भोजनें । करावीं म्हणोनि मृदुवचनें । नृपां सम्मानें प्रमोदिती ॥७६॥
जे जे पदार्थ जयाप्रति । रुचती तैसे त्या अर्पिती । रंभारसाळफळनिष्पत्ती । नाना शिखरणी नृपभोग्या ॥७७॥
अमृतापरिस स्वादिष्ठें । अन्नें नृपभोग्यें वरिष्ठें । मगधेश्वरें परमनिष्ठें । नृपां यथेष्टें जेवविलीं ॥७८॥
सुस्नात सुभुक्त सालंकृत । सभास्थानीं नृप समस्त । ताम्बूळादि उपचार युक्त । यथोचित समर्पिले ॥७९॥
नृपार्ह विविध भोग्य विषयां । यथारुचि समर्पूनियां । राजोपचिह्नें अर्पिलीं तयां । तें कुरुवर्या अवधारीं ॥२८०॥
छत्रें चामरें आतपत्राणें । ढक्के दुन्दुभि गज निशाणें । नाना आयुधें अंगत्राणें । दिव्य दर्पणें समर्पिलीं ॥८१॥
राया ऐकें कौरवपति । ऐसे सुपूजित भूपति । शोभते झाले कवणे रीति । तें तूं निगुती परियेसीं ॥८२॥
ते पूजिता मुकुंदेन राजानो मृष्टकुंडलाः । विरेजुर्मोचिताः क्लेशात्प्रावृडंते यथा ग्रहाः ॥२७॥
भगवंताचिये आज्ञाबोलें । सहदेवें ते नृप पूजिले । क्लेशापासोनि मुक्त केले । भक्तवत्सलें मुकुंन्दें ॥८३॥
राहुवरदानापासूनि मुक्त । मृगाङ्ग कौमुदी आलिंगित । तैसे भूपति कान्तियुक्त । उज्ज्वळ कुंडलीं मिरवती ॥८४॥
नाते वर्षाकाळीं ग्रह । निबिडघनपटळाचा समूह । लोपतां अणुमात्रही रोह । स्वप्रभेचा न दाविती ॥२८५॥
वर्षान्तीं ते निर्मळ गगनीं । प्रभाभासुर तारागणीं । तेंवि नृपति मागधहननीं । हरिशारदीं राजती ॥८६॥
वदनीं नृपश्रियेची कळा । मुकुटकुंडला दिव्यदुकूळा । धरितां दिसती शशिमंडळा । समसोज्ज्वळ भूभुजते ॥८७॥
यावरी तयांची बोळवण । करविता जाला श्रीभगवान । कुरुवर्या तें करीं श्रवण । म्हणे सर्वज्ञ शुकवक्ता ॥८८॥
रथान्सदश्वानारोप्य मणिकांचनभूषितान् । प्रीणय्य सूनृतैर्वाक्यैः स्वदेशान्प्रत्यापयत् ॥२८॥
नृपयानार्ह अमूल्य रथीं । तुरंगरत्नें योजूनि निगुती । धुरे बैसोनियां सारथी । मागधनृपति त्यां अर्पी ॥८९॥
रत्नखचित सुवर्णशिबिरें । सुवर्णघटितें रहंवरचक्रें । अश्वाभरणेंही समग्रें । कार्तस्वरें लखलखिती ॥२९०॥
शिबिकाप्रमुख विचित्र यानें । शिबिरें वितानें यात्रोपकरणें । अल्पस्वल्पें चतुरंग सैन्यें । दासदासींसमवेत ॥९१॥
इत्यादि सम्मान संपत्ती । सूनृतवाक्यें परमप्रीती । गजरें बैसवूनियां रथीं । स्वदेशाप्रती त्यां धाडी ॥९२॥
श्रीकृष्णाचे आज्ञेवरून । बार्हद्रथाचा नंदन । तया नृपांची बोळवण । करिता झाला ते कथिली ॥९३॥
द्वारकेमाजी नृपांचा दूत । येऊनि कथिला जो वृत्तान्त । तदनुसार शरणागत । केले विमुक्त श्रीकृष्णें ॥९४॥
त एवं मोचिताः कृच्छ्रात्कृष्णेन सुमहात्मना । ययुस्तमेव ध्यायंतः कृतानि च जगत्पतेः ॥२९॥
जेणें निरसे जन्ममरण । परमामृत त्या न म्हणे कोण । तैसे अमोघ श्रीकृष्णगुण । प्रत्यय बाणून नृप गाती ॥२९५॥
एवं क्लेशापासूनि सकळ । कृष्णें सोडविले भूपाळ । मग ते म्हणती हरि केवळ । भक्तवत्सल परमात्मा ॥९६॥
प्रत्यय बाणला निजान्तरीं । त्यातें ध्याती निरंतरीं । जगत्पति जो चक्रधारी । गाती वैखरी तत्कर्में ॥९७॥
जगदुः प्रकृतिभ्यस्ते महापुरुषचेष्टितम् । यथाऽन्वशासद्भगवांस्तथा चक्रुरतंद्रिताः ॥३०॥
आपुलिया अष्टधा प्रकृति । मंत्री अमात्य सेनापति । राजे जाऊनि स्वदेशाप्रति । त्यापें वानिती हरिचरित्रें ॥९८॥
अविद्यावेष्टित जीवपुरुष । त्यांतें सोडविता जो परेश । मायानियंता जगदधीश । महापुरुष तो श्रीकृष्ण ॥९९॥
तयाचें अलौकिक चेष्टित । नृपति स्वमुखें स्वराष्ट्रांत । वाखाणिती सप्रेमभरित । सुहृदां आप्तां स्त्रीपुत्रां ॥३००॥
ज्यातें विधि हर नमिती नियमें । ज्याचें महत्त्व वर्णिजे निगमें । सुरवर पढती ज्याचीं नामें । मुनिवर प्रेमें स्तव करिती ॥१॥
तो हा प्रत्यक्ष चक्रपाणि । नटोनि मानुषी अवगणी । प्रतापें मर्दूनि दानवश्रेणि । द्वारकाभुवनीं नांदतसे ॥२॥
आम्ही मागधाचिये बंदीं । दैवोपहत भुभूजमांदी । महासंकटें पदलों सांदी । अजिंक दंदी भूचक्रीं ॥३॥
दूतमुखें ते आमुची ग्लानि । ऐकूनि निर्जरचूडामणि । करुणावत्सल कळवळूनी । आला धांवोनि जगदात्मा ॥४॥
वदान्य त्रिजगत्पालनपटु । तेणें घेतला ब्राह्मणनटु । भीमार्जुन हे महासुभटु । शिष्य निकट द्विजरूपी ॥३०५॥
आमुच्या कैपक्षें श्रीरंगें । अतिथिवेळेच्या पसंगें । मागध छळिला याञ्चामार्गें । प्रतिज्ञा न भंगे तें केलें ॥६॥
मग याचितां द्वंद्वसमरा । तेणें वरिलें वृकोदरा । क्षण देवोनि चढला निकरा । सैन्यपरिवारा सांडूनी ॥७॥
दोघे नागायुतबळिष्ठ । एकाहूनि एक वरिष्ठ । गदाप्रहरणविद्यानिष्ठ । महोद्भट समरंगीं ॥८॥
सप्तविंशति अहोरात्रें । गदाप्रहारें चूर्ण गात्रें । तथापि विजयवेशमात्रें । अमर्षसूत्रें संघटती ॥९॥
भीम प्रतापी महाबळी । विशेष कैपक्षी वनमाळी । यास्तव मागध समरशाळी । उधडूनी धुळी मिळविला ॥३१०॥
भीमें वधितां जरासंध । शरण पातला प्रजावृंद । जारासंधि जो मागध । त्यासि नृपपद अर्पिलें ॥११॥
केलें आमुचें बंधमोचन । देऊनि पूजा नपसम्मान । केली आमुची बोळवण । ऐसे हरिगुण नृप कथिती ॥१२॥
आम्हां शरणागतांकारणें । मागध मारिला नारायणें । राज्याभिलाष अंतःकरणें । न धरूनि हृदयीं कवळिला ॥१३॥
सहदेव करूनि मागधपति । आमुची निरसूनियां विपत्ति । राजसूयार्थ इंद्रप्रस्थीं । यावें म्हणॊनि निमंत्रिलें ॥१४॥
अनुग्रहरूप परमार्थबोध । आम्हां दासांसि केला शुद्ध । ऐसा कृपाळु श्रीगोविन्द । स्वमुखें गुणवाद नृप कथिती ॥३१५॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । तेणें परमार्थ अनुशासन । जैसें केलें तैसे नृपगण । करिती वंदूनि हर्याज्ञा ॥१६॥
आलस्य अनवधान विस्मृती । निद्रा तंद्रा सारूनि परती । अलोट हर्याज्ञा आचरती । स्मरूनि युक्ती कृष्णाच्या ॥१७॥
असो नपांकडील कथा । शुक म्हणे गा कौरवनाथा । भीमहस्तें बार्हद्रथा । झाला वधिता श्रीकृष्ण ॥१८॥
केलें नृपांचें मोचन । सहदेवातें भद्रासन । अर्पूनि कृष्णभीमार्जुन । जाते झाले तें ऐका ॥१९॥
N/A
References : N/A
Last Updated : June 01, 2017
TOP