अध्याय ७४ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एक एवाद्वितीयोऽसावैतदात्म्यमिदं जगत् । आत्मनाऽऽत्माश्रयाः सभ्याः सृजत्यवति हंत्यजः ॥२१॥

सकळ सभ्यां सहदेव म्हणे । मद्वाक्य विवरिजे सदस्यगणें । एवं या अव्ययें निश्चय करणें । एक अद्वितीय हा कृष्ण ॥९२॥
एतदात्मक जग हें सत्य । ऐसा सिद्धांत श्रुतिप्रणीत । यदर्थीं शंका ते किमर्थ । इत्थंभूत उमजलिया ॥९३॥
आत्मानात्माश्रयभगवान । चिद्विलासमय भगवान । याचें सृजनावनसंहरण । हरिहरदुहिणगुणात्मक ॥९४॥
ऐसी शंका धरिली चित्तीं । तरी या मायिका गुणमूर्ती । माझा नियंता श्रीपति । अज अव्यय अविनाश ॥१९५॥
स्वप्न देखोनि जागृतीं आला । स्वप्न प्रपंच विस्तारिला । जागृत होतां उपसंहारला । स्वयें उरला एकात्मा ॥९६॥
स्वप्नें देखिलीं उच्चावचें । त्याचे पदरीं शुभाशुभ कैचें । अवघे वयुन प्रसुप्ताचें । तदाकारें प्रस्फुरित ॥९७॥
तैसा अज अव्यय श्रीहरी । अलिप्त कर्मादिसंस्कारीं । जीवमृगांतें मृगाम्बापरी । वेधी संसारीं तें ऐका ॥९८॥

विविधानीह कर्माणि जनयन्यदवेक्षया । ईहते यदयं सर्वः श्रेयो धर्मादिलक्षणम् ॥२२॥

अन्यनिरपेक्ष स्वतंत्र । केवळ आत्मा श्रीधर । यालागीं अजन्म अक्षर । परात्परतर परमात्मा ॥९९॥
स्वप्नप्रपंचाचें जनन । पाळन आणि उपसंहरण । सुषुप्तिगर्भीं त्रिव्ध जाण । अलिप्त आपण तद्रष्टा ॥२००॥
ज्याचें अनुग्रहकृपादृष्टी । तपोयोगादिकर्मराहाटी । करूनि अवघी जनपदसृष्टी । कल्याणपुष्टी साधितसे ॥१॥
वेदप्रणीत ज्याची आज्ञा । विश्वासोनि वैध्यवचना । जन आचरती कर्माचरणा । तत्फलदाना दायक जो ॥२॥
धर्मलक्षण जें कल्याण । सर्वप्रकारें आचर जन । ज्याच्या अनुग्रहें तत्फळदान । तो हा श्रीकृष्ण प्रत्यक्ष ॥३॥

तस्मात्कृष्णाय महते दीयतां परमार्हणम् । ऐवं चेत्सर्वभूतानामात्मनश्चार्हणं भवेत् ॥२३॥

तत्मात् कृष्ण सचराचर । पूर्णचैतन्य परमेश्वर । प्रकट असतां कां विचार । अग्रपूजनीं करावा ॥४॥
महच्छब्दें परब्रह्म । अणुही अंतर्गत जो सूक्ष्म । अग्रपूजा परमोत्तम । या कारण समर्पिजे ॥२०५॥
जाणूनि ऐसिया श्रीकृष्णातें । समर्पील अग्र्‍यार्हयणातें । तरी आपणासहित सर्वभूतांतें । साङ्ग समर्हण तें होय ॥६॥
पुढती माद्रेय बोले वचन । झणें शंका मानील मन । जें आपण करितां कृष्णपूजन । ते आपणालागून केंवि होय ॥७॥
कृष्ण पूज्य आपण पूजक । प्रकट असतां हा विवेक । आपणा आपण पूजिलें देख । केंवि हें सम्यक घडेल ॥८॥
तरी हा ऐका अभिप्राय । सर्व भूतात्मा वासुदेव । वर्तमान भूतभाव्य । श्रुतिनिर्धार हा वदती ॥९॥

सर्वभूतात्मभूताय कृष्णायानन्यदर्शिने । देयं शांताय पूर्णाय दत्तस्यानंत्यमिच्छता ॥२४॥

सर्वभूतांचा आत्मभूत । तया कृष्णाकारणें येथ । अग्रपूजा इत्थंभूत । देईजे निश्चित यजमानें ॥२१०॥
अन्यदर्शीं तो भेदज्ञ । कृष्ण केवळ भेदशून्य । या कारणें अग्र्‍यार्हण । दीजे संपूर्ण फळार्थ ॥११॥
अणूचाही हृदयंगम । महत्त्वें केवळ परब्रह्म । तयामाजी भेदागम । कोण पां अधम प्रतिपादी ॥१२॥
अणूपासूनि ब्रह्मवरी । ज्याचें पूर्णत्व चराचरीं । तेथ आत्मपूजेची कुसरी । मानोनि बाहेरी कें उरिजे ॥१३॥
म्हणाल श्रीकृष्ण या ठायीं । भेद संभव देखिजे कांहीं । अभेद एवात्मा तो कहीं । पूतनादि वधूं शकता ॥१४॥
तरी पूर्णचैतन्य भेद न सरे । भेदसंकल्पें पूतना मरे । अभेदबोधें आत्माकारें । समरसी नुरे शत्रुत्वें ॥२१५॥
म्हणाल कृष्ण असहिष्णुता । क्रोधें अधादिदैत्यघाता । केलें ऐसें दूषण शांता । विषश्चितीं न मानावें ॥१६॥
भेदसंकल्पें दैत्य मेले । कृष्णें आत्मत्वें ते स्वीकेले । भेदबोधें त्यांतें त्यजिलें । हें नाहें कथिलें आम्हांसी ॥१७॥
राज्याभिलाषें कंसवध । हा पूर्णासि नलगे बाध । कृष्ण पूर्णत्वें अगाध । सहसा नृपपद इच्छीना ॥१८॥
सर्वात्मकत्वें जो सहिष्णु । अभेदबोधें अनिच्छ पूर्णु । त्या कृष्णाकारणें अग्र्‍यार्हणु । सदस्यगणीं समर्पिजे ॥१९॥
ऋतुसुकृतें पावती अंत । कृष्णार्पणें ते अनंत । जाणोनि यजमानें इत्यंभूत । रुक्मिणीकान्त अर्चावा ॥२२०॥
श्रीकृष्णाचा वास्तवमहिमा । उपासकत्वें भक्तोत्तमा । विदित म्हणोनि सहदेवनामा । वदला धर्मा ते काळीं ॥२१॥

इत्युक्त्वा सहदेवोऽभूत्तूष्णीं कृष्णानुभाववित् । तच्छ्रुत्वा तुष्टुवुः सर्वे साधु साध्विति सत्तमाः ॥२५॥

श्रीकृष्णाचा अनुभाव विदित । म्हणोन सहदेव सुनिश्चित । इतुकें बोलोनियां मौनस्थ । होऊनि निवान्त राहिला ॥२२॥
हें ऐकूनि भला भला । साधुवादें गौरविला । सदस्यसत्तमें पूजिला । सर्वीं स्तविला सुशब्दें ॥२३॥
अग्रपूजेचा निर्धार । केला सहदेवें साचार । पूजनार्ह रुक्मिणीवर । जयजयकार प्रवर्तला ॥२४॥
सदस्य म्हणती हा माद्रेय । पाहतां याचें धाकुटें वय । अगाध याचा कृतनिश्चय । धन्य माय प्रसवली या ॥२२५॥
धन्य धन्य भला भला । सदस्यीं जयजयकार केला । ऋत्विजीं मुनिवर्गीं पूजिला । साधुवादें शुभवचनें ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP