अध्याय ७४ वा - श्लोक ३६ ते ४०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
ययातिनैषां हि कुलं शप्तं सद्भिर्बहिष्कृतम् । वृथापानरतं शश्वत्सपर्यां कथमर्हति ॥३६॥
ययातीनें जयांचें कुळ । निश्चयें शापूनि केलें समळ । सज्जनें बहिष्कारिलें केवळ । आचारबरळ म्हणोनियां ॥४४॥
सर्वदा करिती वृथापान । ऐसे केवळ आचारहीन । ऐसिया योग्य अग्रपूजन । बोला वचन सदस्य हो ॥३४५॥
ऐसा निद्नी चैद्यराव । गिरा प्रतिपादी वास्तव । तोही अर्थ कोविद सर्व । ऐका अपूर्व लापनिका ॥४६॥
ययातीनें यांचें कुळ । जह्री शापूनि केलें समळ । तरी सज्जनीं अत्यंत अमळ । जाणोनि मौळीं वंदिलें ॥४७॥
अमळ कैसें म्हणाल जरी । तरी आम्हां भूपाळांचिये परी । नोहे सर्वथा दुराचारी । सर्वदा न करी वृथापान ॥४८॥
नियताचारें विधिपालन । करूनि स्वधर्मसंस्थापन । इतरां सन्मार्गप्रदर्शन । अनुशासन हें ज्याचें ॥४९॥
यदुकुळाचा महिमा ऐसा । न भंगे ययातिशापासरिसा । तेथें हा श्रीकृष्ण परेश कैसा । तुळिजे सहसा नृपतुलने ॥३५०॥
तस्मात् सपर्यामात्र यातें । योग्य नव्हे हें जाणा निरुतें । याचें स्वरूप त्रिपुटीपरतें । पूज्य पूजकपूजनादि ॥५१॥
यावीण भिन्न नसेचि कांहीं । तरी पूजक पूजन करील कायी । चैद्य वदला यथार्थ पाहीं । मूर्खप्रवाहीं निंदोक्ति ॥५२॥
पुढती वदे दामघोषी । कुटिलोक्ति ज्या निन्दा दोषी । त्या वाग्देवी यथार्थभाषी । अतिनिर्दोषी वाखाणी ॥५३॥
ब्रह्मर्षिसेवितान्देशान्हित्वैतेऽब्रह्मवर्चसम् । समुद्रं दुर्गमाश्रित्य बाधते दस्यवः प्रजाः ॥३७॥
पूर्वश्लोकीं आचारबरळ । ऐसें बोलिला जें शिशुपाळ । तेंचि ये श्लोकीं प्राञ्जळ । पुन्हां कुटिळ प्रतिपादी ॥५४॥
यादव आचारबरळ कैसे । प्रजापीडक दस्यु जैसे । दुर्गमस्थळाच्या आश्रयवशें । प्रजा पीडिती सर्वत्र ॥३५५॥
वेदोदित जो आचारमार्ग । जिये देशीं चाले साङ्ग । तो देश सेविती अभंग । साङ्गोपाङ्ग ब्रह्मर्षि ॥५६॥
वेदोदित क्रियाचरणें । ब्रह्मवर्चस त्यातें म्हणणें । इहीं तें टाकूनि प्राणरक्षणें । समुद्रदुर्ग आश्रयिलें ॥५७॥
ब्रह्मर्षि सेविती जो देश । यादवीं टाकूनि तो निःशेष । समुद्रदुर्गीं करूनि वास । दस्यु प्रजांस पीडिती हे ॥५८॥
ऐसिया अग्रपूजा यजमानें । दिधली कोण्या योग्यतागुणें । योग्ययोग्य सदस्यीं पाहणें । कीं प्रशंसा करणें हें उचित ॥५९॥
इत्यादिनिन्देचिया वचनीं । यदुकुळ निन्दी चैद्याग्रणी । वास्तवबोधें गीर्वाणवाणी । पदसंदर्भें प्रतिपादी ॥३६०॥
तीच श्लोकान्वययोजना । वास्तवबोधें प्रतिपादना । निंदेमाजी प्रकटी स्तवना । पदलापना ते ऐका ॥६१॥
वेदोक्तविहिताचरणनिष्ठ । ब्रह्मवर्चस्वी राजे श्रेष्ठ । प्रजापीडक दस्यु दुष्ट । त्या दुष्टां कष्ट ते देती ॥६२॥
तया राजयांचिया भेणें । दुष्टीं करूनि पलायनें । कीकटादि अब्रह्मण्यें । निन्द्य भुवनें वसविती ते ॥६३॥
जो देश न सेविती ब्रह्मर्षी । अनर्ह वेदोदितकर्मासी । दुष्टीं राहूनि ऐसिये देशीं । पीडिजे प्रजांसी दुष्टत्वें ॥६४॥
तरी हा यादवां नाहीं दोष । सेविती ब्रह्मर्षि जे देश । तेथें राहूनि सावकाश । अब्रह्मवर्चस सांडविती ॥३६५॥
पूर्वीं विष्णूनें दैत्यहनन । करूनि केलें धर्मस्थापन । तैं जे थ क्षाळिलें सुदर्शन । तें अतिपावन चक्रतीर्थ ॥६६॥
गोमतीरत्नाकरसंगम । जेथ प्रकटूनि त्रिविक्रम । कुश मर्दूनि केलें धाम । मोक्षद परम त्रिजगातें ॥६७॥
परम पावन ते कुशस्थळी । महर्षी देवर्षी ब्रह्मर्षी सकळीं । जेथ वसिजेत सर्वकाळीं । ते यदुकुळीं आश्रयिली ॥६८॥
ब्रह्मज्ञानें मोक्ष घडे । अथवा काशींत देह पडे । गोमतीस्नानमात्रें निवाडें । प्राणी रोकडे जेथ वरिती ॥६९॥
तस्मात ब्रह्मर्षिसेवित देश । आश्रयूनियां यादवेश । ब्रह्मवर्चस सावकाश । प्रतिपादिती आचरणें ॥३७०॥
आणि दस्यु जे प्रजावेषी । चोर उत्पथ महादोषी । त्यांतें दंडिती प्रतापेंसी । हे यदुवंशीं वर्तणुक ॥७१॥
अब्रह्मवर्चस सांडविती । तेही ऐका कोणे रीती । समुद्रदुर्ग दुष्प्रवृत्ती । साधूंप्रति भ्रामक जे ॥७२॥
अबह्मवर्चस जे पाखंड । वेदविरुद्धाचरणबंड । मुद्रालिंगधारणें दृढ । अवघें थोताण्ड वेदबाह्य ॥७३॥
मुद्रासहित लिंगधारणें । समुद्र ऐसें त्यातें म्हणणें । दुर्ग म्हणिजे कवण्या गुणें । तेंही श्रवणें अवधारा ॥७४॥
पाखंड आणी झळफळित । अधर्म परंतु धर्मवत । भाविकां गमे भक्तिपंथ । भांबावत जन तेणें ॥३७५॥
पाखंडमार्ग न गमें कोणा । धर्मपथाचि भासे जनां । निगूधत्वें दुर्गाभिधाना । यया वचना पात्रता ॥७६॥
मुद्रासहित लिङ्गधारणें । अतर्क्य अधर्म दुर्गमपणें । ऐसीं समुद्रदुर्गाचरणें । यादवशासनें सांडविती ॥७७॥
अब्रह्मवर्चस जें पाखण्ड । अतर्क्य अधर्मकारक बंड । तें मत खंडूनि करिती दंड । ऐसे प्रचंड यदुवीर हे ॥७८॥
घेऊनि प्रजांची अवगणी । देशोदेशीं दस्युxxणी । त्यांतें बाधती हे हुडकुनी । स्वधर्माचरणीं ते प्रवर्तविती ॥७९॥
लावितां न लागती धर्मपथा । तया दंडूनि देती व्यथा । ऐसी यदुवर्यांची कथा । कोण दुर्वक्ता निन्द्य म्हणे ॥२८०॥
यास्तव दुजा यादवांहून । कोण धार्मिक ब्रह्मिष्ठ मान्य । ऐसें निन्देमाजी स्तवन । वदली संपूर्ण वाग्देवी ॥८१॥
एवमादीन्यभद्राणि बभाषे नष्टमंगलः । नोवाच किंचिद्भगवान्यथा सिंहः शिवारुतम् ॥३८॥
इत्यादिकां अभद्रा वचनीं । बोलता झाला चैद्य ते क्षणीं । कीं तो अनष्तमंगळ म्हणोनी । सायुज्यवरणीं केळवला ॥८२॥
सदेह चैद्यासनाचा भंग । पावावयासि झाला योग्य । यास्तव नष्टमंगळप्रसंग । कोविद चांग वाखाणिती ॥८३॥
ऐशीं शतशःनिन्द्यवचनें । ऐकूनियां जनार्दनें । किंचितही न बोलतां मौनें । परावरज्ञें उपेक्षिलीं ॥८४॥
शिवाशब्दें बोलिजे भालु । तिणें केला बहु कोल्हाळु । तो ऐकतां राहे निश्चळु । न वदे अळुमाळु सिंह जैसा ॥३८५॥
शब्द निघाले अपानद्वारें । पंडित न म्हणती त्यां अक्षरें । दुर्गंधि मात्र क्षण एक पसरे । वायुप्रसारें विध्वंसे ॥८६॥
तैसें चैद्याचें भाषण । कृष्णें साहिलें धरूनि मौन । परंतु भगवन्निन्दाश्रवण । होतां सज्जन दुखवले ॥८७॥
भगवन्निदनं श्रुत्वा दुःसहं तत्सभासदः । कर्णौ पिधाय निर्जग्मुः शपंतश्चेदिपं रुषा ॥३९॥
ऐसी भगवंताची निन्दा । ऐकूनि समस्तां सभासदां । दुःकें साहूं न शकवे कदा । परम विषादा वरपडले ॥८८॥
श्रवणीं घालूनियां बोटें । तेथोनि निघाले झडझडाटें । सक्रोध चैद्या शापिती वोठें । ओखटें दुष्टें अनुष्ठिलें ॥८९॥
मृत्यु समीप आला यासी । म्हणोनि प्रवर्तला निन्देशी । दूषण ठेवूनि सदस्यांसी । वृथा प्राणांसी मुकेल ॥३९०॥
जैसा दीप निवान्तमंदिरीं । सरतां आयुष्य स्नेहसामग्री । सूत्र जाळूनि उभारे भारी । क्षणामाझारी विझावय ॥९१॥
तेंवि चैद्याची भरली घडी । मुमूर्षु सन्निपातें बडबडी । अमर्यादेची अरुचि तोंडीं । विषादें खोडी कर पद पैं ॥९२॥
ऐसें बोलूनियां सज्जन । हस्तें झांकूनियां कर्ण । तेथूनि निघाले झडझडून । काय म्हणोन तें ऐका ॥९३॥
हरीची अथवा हरिभक्तांची । श्रवणीं निन्दा ऐकतां साची । तेथूनि न निघे जो तयांची । बुद्धि तत्पापीं संक्रमली ॥९४॥
निंदां भगवतः शृण्वंस्तत्परस्य जनस्य वा । ततो नापैति यः सोऽपि यात्यधः सुकृताच्च्युतः ॥४०॥
निन्दकातुल्य तोही झाला । सद्य सुकृतापासूनि च्यवला । अंधतमातें पावला । यालागीं भला तेथ न वसे ॥३९५॥
ऐसा निश्चय श्रुतिपुराणीं । तो प्रकट वदोनि तेथ सज्जनीं । बोटें घालूनि उभयश्रवणीं । गेले उठोनि तत्काळ ॥९६॥
तया समयीं पृथाकुमर । भीमार्जुन युधिष्ठिर । नकुळ सहदेव राजे अपर । क्षोभले समग्र तें ऐका ॥९७॥
N/A
References : N/A
Last Updated : June 01, 2017
TOP