अध्याय ७४ वा - श्लोक ४६ ते ५०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


जन्मत्रयानुगुणितवैरसंरब्धया धिया । ध्यायंस्तन्मयतां यातो भावो हि भयकारणम् ॥४६॥

म्हणाल निन्दकाची चैतन्यज्योति । कैसी प्रवेशली भगवंतीं । तरी जन्मत्रयाची विरोधभक्ती । कारण तद्गतीतें जाणा ॥४३॥
जन्मत्रयीं वैरानुबंध । तेणें ध्याननिष्ठा साधली शुद्ध । चरमदेहीं गमला चैद्य । ध्यानें स्वरूप लाधला ॥४४॥
वैरें ध्याननिष्ठा चित्ता । अवस्थात्रयीं विसर न पडतां । दृढ बाणली तन्मयता । तेणें स्वरूपता पावला ॥४४५॥
स्वरूपता मुक्ति पावला विशद । यथापूर्व जाला पार्षद । तस्मात भावना जन्मप्रद । निगमानुवाद हा सत्य ॥४६॥
करणद्वारा विषयाध्यास । संस्कारजनितकर्महव्यास । सत्य मानूनि विश्वाभास । कलेवरास जैं टाकी ॥४७॥
तैं संकल्पान्तःपाती । कर्मसंस्कारबीजें होती । तदनुसार परिणमे वृत्ती । जन्म पावती तद्रूपें ॥४८॥
वैरानुबंधें तदाकार । अवस्थात्रयीं निरंतर । ध्यानें वृत्ति झाली स्थिर । पडतां शरीर तद्योगें ॥४९॥
वैरें भगवन्मूर्तिध्यान । वस्तुसामर्थ्यें अघभंजन । नितान्त निर्मळ शुद्ध चैतन्य । गेलें मिळोन भगवंतीं ॥४५०॥
करणद्वारा विषयाभिलाषें । ध्यानसंकल्प दृश्याभासें । देह पडतां भवभ्रमपिसें । जन्मे आपैसें न फिटतां ॥५१॥
तैसें नोहे भगवद्ध्यान । ध्यानें नितान्त निर्मळ मन । विशुद्ध होय संकल्पशून्य । समरसोन हरि होय ॥५२॥
यया नाम वैधदीक्षा । वेधें साधिती लयलक्षा । आत्माकार होतां दक्षा । पावणें मोक्षा या योगें ॥५३॥
कीटकी केवळ अज्ञान जड । भयें भृंगीचें ध्यान दृढ । लागतां तद्रूप होय उघड । वेधें अवघड घडे ऐसें ॥५४॥
तस्मात भावच कारण भवा । हा गुह्यार्थ साहकां सर्वां । दृढनिश्चयें असो ठावा । दयार्णवा कळवळा हा ॥४५५॥
विषयीं मानसा न कीजे वेध । गुरुमुखें आपुला करूनि शोध । पूर्णत्वाचा अपरोक्षबोध । प्रत्यगात्मत्वा वेधावें ॥५६॥
असो साधका शिकवण । करावया माझा अधिकार कोण । जरी मी पायींची वहाण । म्हणा लोचना सुखदायी ॥५७॥
असो शिशुपाळाची कथा । त्यावरी युधिष्ठिरें तत्त्वता । पूजिलें ऋत्विजां समस्तां । तें कुरुनाथा अवधारीं ॥५८॥

ऋत्विग्भ्यः ससदस्येभ्यो दक्षिणां विपुलामदात् । सर्वान्संपूज्य विधिवच्चक्रेऽवभृथमेकराट् ॥४७॥

विपुळ दक्षिणा ऋत्विजांप्रती । धर्में पूजूनि अर्पिली निगुती । सदस्य पूजिले येथोचितीं । कुळशीळादि लक्षूनी ॥५९॥
याचक इच्छारहित केले । ज्येष्ठ श्रेष्ठ सम्मानिले । सम्रट्पदीं अभिषेकिले । तिहीं समस्तीं धर्मातें ॥४६०॥
धर्मराजाचे आज्ञेवरून । चैद्या उत्तरक्रियाचरण । तत्पुत्रातें भद्रासन । सर्वभूभुजीं दीधलें ॥६१॥
राजसूय साङ्ग जाहला । अवभृथस्नानोत्सव संपला । सिंहावलोकनें पुन्हा कथिला । जाईल पुढिले अध्यायीं ॥६२॥
यज्ञ संपूर्ण झालियावरी । इंद्रप्रस्थीं राहिला हरी । कित्येक मास सप्रेमभरीं । सुहृदादरीं तें ऐका ॥६३॥

साधयित्वा ऋतुं राज्ञः कृष्णो योगेश्वरेश्वरः । उवास कतिचिन्मासान्सुहृद्भिरभियाचितः ॥४८॥

योगेश्वरांचा ईश्वर । कृष्ण केवळ परमेश्वर । तेणें रायाचा ऋतुवर । संपादूनियां निर्विघ्न ॥६४॥
परिवासेंसीं द्वारके जाया । उदित आज्ञा मागावया । सुहृद्वर्गीं प्रार्थूनियां । कित्येक मास राहविला ॥४६५॥
समस्त पाण्डवांचिये भक्ती । सुभद्राद्रौपदीपृथेचे प्रीती । सभार्य ससैन्य श्रीपती । इंद्रप्रस्थीं स्थिरावला ॥६६॥
तेथ क्रिमिले कित्येक मास । पुढती जावया द्वारकेस । धर्मा प्रार्थी हृषीकेश । तें नृपास शुक सांगे ॥६७॥

ततोऽनुज्ञाप्य राजानमनिच्छंतमपीश्वरः । ययौ सभार्यः सामात्यः स्वपुरं देवकीसुतः ॥४९॥

कित्तेक मास क्रमिल्यावरी । धर्मरायातें प्रार्थी हरी । आज्ञा द्यावया निजान्तरीं । धर्म नादरी प्रार्थना ॥६८॥
श्रीकृष्णासी आज्ञा देणें । सर्वदा धर्म हें नेच्छी मनें । तथापि बहुधा प्रार्थूनि कृष्णें । आज्ञा घेऊनिं निघाला ॥६९॥
सवें सर्वही अंतःपुर । मंत्री सचिव सेनाधर । तिहीं सहित देवकीकुमर । पावला स्वपुर स्वानंदें ॥४७०॥

वर्णितं तदुपाख्यानं मया ते बहुविस्तरम् । वैकुंठवासिनोर्जन्म विप्रशापात्पुनःपुनः ॥५०॥

वैकुंठवासी हरिपार्षद । विप्रशापास्तव ते विशद । दैत्य जाले महादुर्मद । प्रथमजन्मीं हरिद्वेष्टे ॥७१॥
नामें हरिण्याक्ष हरिण्यकशिपु । ज्यांचा लोकत्रयीं प्रतापदर्पु । भगवद्द्वेष्टे क्रूर अमूप । अहंताजल्पें प्रजल्पती ॥७२॥  
न घेती महाविष्णूचें नाम । इतरां मुखें ऐकतां अधम । स्मरतियां दाविती कृतान्तधाम । हा दृढ नेम जयांचा ॥७३॥
वराहनृसिंहवेषें हरी । तया दैत्यांतें संहारी । द्वेषें दृढतर त्यां अंतरीं । ध्यान निर्धारीं ठ्सावलें ॥७४॥
ध्यानयोगें तमोपशमन । पुढें तमाक्त रजोगुण । उरला यास्तव पावले जनन । राक्षसयोनी माझारी ॥४७५॥
रावण कुंभकर्ण ते दोघे । शरीरें केवळ प्रळयमेघ । प्रतापें जिंकोनियां त्रिजग । लंकादुर्ग आश्रयिलें ॥७६॥
रमाभिलाप रमारमण । शत्रु मानूनि करितां ध्यान । जालें रजतमा क्षालन । विरोधभजनसंस्कारें ॥७७॥
पुढें रजतमाक्त सत्त्व मात्र । उरला यास्तव मनुष्यगात्र । जाले प्रतापी भूवर । पूर्वसंस्कारें हरिद्वेष्टे ॥७८॥
ते हे शिशुपाळ वक्रदंत । हनना अवतरला कृष्णनाथ । पूर्वसंस्कारें विरोधयुक्त । सुहृद प्राप्त असतांही ॥७९॥
विरोधभजनीं तृतीयभवीं । शिशुपाळ समरसला केशवीं । ध्यानयोगाची हे पदवी । तुज म्यां आघवी निरोपिले ॥४८०॥
ध्यानें जळाले त्रिगुणमळ । जाहला नितान्त निर्मळ । निंदामिसे स्तवनरोळ । करितां केवळ हरि झाला ॥८१॥
विप्रशापीं पुनःपुनः । वैकुण्ठवासीं पावले जनना । सविस्तर म्यां तदाख्याना । केलें कथना कुरुवर्या ॥८२॥
प्रसंगें वक्रदंताचीही कथा । कथिजेल तें असो आतां । प्रस्तुत ऐकें कौरवनाथा । यज्ञसाङ्गता धर्माची ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP