अध्याय ७४ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ईशो दुरत्ययः काल इति सत्यवती श्रुतिः । वृद्धानामपि यद्बुद्धिर्बालवाक्यैर्विभिद्यते ॥३१॥

रसरसूनि आपुले ठायीं । विस्मय करूनि बोले कांहीं । समर्थ काळशक्ति कवणांही । उल्लंघिली नवजाय ॥९३॥
दुःखें नातिक्रमवे काळ । समर्थ ईश्वर हा केवळ । ऐसा श्रुतीचा चावळ । असत्य विफळ न म्हणावा ॥९४॥
काल दुरत्यय ऐसी श्रुती । कालसामर्थ्यें सत्यवती । प्रत्यक्ष प्रत्यय हा बाणला चित्तीं । जे भ्रंशली मती वृद्धांची ॥२९५॥
बाळवाक्यांतें ऐकून । वृद्धही झाले बुद्धिहीन । बाळवचना अनुसरून । बुद्धिभेद त्यां जाला ॥९६॥
ऐकूनि बाळांचा अनुवाद । वृद्धां झाला बुद्धिभेद । ऐसी काळशक्ति अगाध । कोण कोविद लंघील ॥९७॥
ऐसा श्रीकृष्णपूजनें । शिशुपाळ रसरसित दुखवलेपणें । यावरी सदस्यांकारणें । बोले वचनें तें ऐका ॥९८॥

यूयं पात्रविदां श्रेष्ठां मा मन्ध्वं बालभाषितम् । सदसस्पतयः सर्वे कृष्णो यत्संमतोऽ‍र्हणे ॥३२॥

सदसस्पति हो तुम्ही सुज्ञ । पात्र जाणत्यांमाजि मान्य । मान्य करणें बाळवचन । तुम्हांलागून अयुक्त तें ॥९९॥
धर्माहूनि सहदेव बाळ । अज्ञान अल्पमति केवळ । तद्वाक्य मानितां सदस्य सकळ । अन्यायशीळ होत्साते ॥३००॥
तरी मान्य न कीजे बाळभाषण । कीं तें केवळ अप्रमाण । बाळवाक्या वरूनि कृष्ण । अग्र्‍यार्हणीं योग्य म्हणां ॥१॥
बाळभाषणा मानूनि तुम्हीं । अग्र्‍यार्हण अर्पिलें अधर्मीं । कृष्ण केवळ गोरक्षनामी । केंवि सत्तमीं संमत हा ॥२॥
सदस्यीं पहावें न्यूनपूर्ण । अध्वर सदस्य प्रेक्षकगण । तेथ न वदतां भीड धरून । लागे दूषण सदस्यां ॥३॥
पूज्य मानूनि अपूज्य पंक्ती । अपूज्य तेथें पूजिजती । मरण दुर्भिक्ष महाभीती । प्राप्त होती ते ठायीं ॥४॥
कृष्णाहूनि पूज्य कोण । ऐसा प्रजल्पे यजमान । तरी यदर्थीं ऐका वचन । सभ्यां दूषण तें कथितों ॥२०५॥

तपोविद्याव्रतधरान्विज्ञानध्वस्तकल्मषान् । परमर्षीन्ब्रह्मनिष्ठांल्लोकपालैश्च पूजितान् ॥३३॥
सदसस्पतीनतिक्रम्य गोपालः कुलपांसनः । यथा काकः पुरोडाशं सपर्यां कथमर्हति ॥३४॥

तपस्वियांमाजी जे श्रेष्ठ । अथवा उपासक वरिष्ठ । महाव्रतधारी जे ज्येष्ठ । सभ्य यथेष्ट तुम्ही असतां ॥६॥
विद्याविनयसंपन्न थोर । कायवाड्मानसजित व्रतधर । कीं ज्ञानविज्ञानभास्कर । सारासारप्रकाशक ॥७॥
अविद्यात्मकभ्रममलध्वस्त । विगतकल्मष जे भास्वत । व्रतस्थ निर्जितजिह्वोपस्थ । जे कां प्रशस्त सद्बोधें ॥८॥
साङ्गोपाङ्गव्रताचरणीं । मानसमळाची केली धुणी । जे कां नितान्तनिर्मळपणीं । अपरतरणिसम तपती ॥९॥
ज्याचे वाचेसी अनृतदोष । काळत्रयीं न करी स्पर्श । महासतीतें जारपुरुष । जेंवि अभिलाष करूं न शके ॥३१०॥
ऐसे परमर्षिवरिष्ठ । आत्मवेत्ते ब्रह्मनिष्ठ । त्यांतें लंघूनि वृथापुष्ट । केंवि हा श्रेष्ट पूज्यत्वीं ॥११॥
ब्रह्मनिष्ठ तपोधन । विद्याविनयतासंपूर्ण । ध्वस्तकल्मषविवस्वान । ज्ञानविज्ञानपारग जे ॥१२॥
पुरंदरप्रमुखलोकपाळीं । जे पूजिले सुरमंडळीं । ऐसियांतें त्यागूनि सकळीं । केंवि हा गौळी योग्य केला ॥१३॥
ऐसियां श्रेष्ठां सदस्यातें । अतिक्रमूनियां हा गोरक्ष येथें । योग्य होय अग्रपूजेतें । कोण्या मतें मज सांगा ॥१४॥
अंत्येष्टीच्या दशाहदिवशीं । प्रेतपिण्डार्हता वायसासी । त्यासी योग्यता पुरोडाशीं । घडे कैसी विचारा ॥३१५॥
जो कां केवळ कुळदूषण । त्या बोलिजे कुलपांसन । प्रत्यक्ष केलें मातुलहनन । कें हें श्रवण तुम्हां नसे ॥१६॥
गोपाल कुलपांसन यथा काक । पुरोडाशासि अनर्ह देख । अग्रपूजेसी यदुनायक । अयोग्य सम्यक जाणा हो ॥१७॥
ऐसि शिशुपाळाची वाणी । निन्दा करितां सभास्थानीं । वाग्देवता सत्य म्हणोनी । वास्तवबोधें प्रतिपादी ॥१८॥
स्वर्ग श्रुति आणि भूमी । वाखाणिती गो या नामीं । पाळक म्हणिजे यांचा स्वामी । हॄषीकेश हा गोपाळ ॥१९॥
कुत्सितार्थाचें लापन । करिती तयां कुलपाभिधान । ऐसे कुलप म्हणाल कोण । वेदबाह्यजन पाखंडी ॥३२०॥
तया वेदबाह्यांचें हनन । करित्यां बोलिजे कुलपांसन । तो हा यथार्थ श्रीभगवान । मुख्य व्याख्यान वास्तव हें ॥२१॥
यथापदीं दीर्घता वसे । अकारलोप झाला असे । व्याकरणसूत्रें पदनिर्देशें । अकाक ऐसा प्रतिपाद्य ॥२२॥
अकाक ऐसीं अक्षरें तीन । यांचा समास कीजे श्रवण । क म्हणिजे सुख संपूर्ण । असुखाभिधान अक ऐसें ॥२३॥
उभय मिळोनि म्हणिजे काक । नशिबे काक ज्यातें तो अकाक । एवं सुखदुःखातीत सम्यक । सर्वात्मक श्रीकृष्ण ॥२४॥
अकाक पुरोडाशा योग्य नव्हे । कीं तो आप्तकाम स्वभावें । पुरोडाश हविती देवतानामें । कृष्ण ते अवघे एकात्मा ॥३२५॥
अग्नि देवता मंत्र हवी । इत्यादि यज्ञक्रिया आघवी । कृष्ण साकल्यें आहेच पूर्वीं । पुरोडाश केंवि तदर्ह ॥२६॥
देवतापरिच्छिन्न स्वर्गस्थ । पुरोडाश विध्युक्त द्रव्य शस्त । देवतार्ह तो विधिप्रणीत । केंवि अनंत त्या योग्य ॥२७॥
अखिलात्मकत्वें संचला । पुरोडाश मात्र कें योग्य त्याला । अकाका योग्य नव्हे हें वदला । अर्थ सरळ वास्तव हा ॥२८॥
अकाका योग्य पुरोडाश । तद्वत अग्रपूजा कृष्णास । सर्वस्व अर्पणें योग्य ज्यास । सपर्यामात्र अनर्ह त्या ॥२९॥
मुख्य ब्रह्मर्षि सदस्यगणीं । त्यांसि योग्यता अग्र्‍यार्हणीं । अखिलात्मकत्व वर्ते कृष्णीं । आत्मार्पण त्या अर्ह ॥३३०॥
आणिक निंदेचीं उत्तरें । चैद्य बोले तें ऐका श्रोत्रें । परीक्षितीतें व्यासकुमरें । कथिलीं तैशीं निरोपितों ॥३१॥

वर्णाश्रमकुलापेतः सर्वधर्मबहिष्कृतः । स्वैरवर्ती गुणैर्हीनः सपर्यां कथमर्हति ॥३५॥

चैद्य सदस्यां विपश्चितां । म्हणे या वर्णाश्रमकुळादिरहिता । सर्वधर्मबहिष्कृता । पूजार्हता केंवि घडे ॥३२॥
स्वैरवृत्ति गुणविहीन । यासि अनर्ह अग्र्‍यार्हण । तथापि पूजिलें हें दूषण । सभ्यां आंगीं संक्रमलें ॥३३॥
इत्यादि निन्देचीं जीं वचनें । वाग्देवता वास्तववयुनें । वाखाणी तें ऐका श्रवणें । सावधमनें क्षण एक ॥३४॥
वर्ण म्हणिजे ब्राह्मणादिक । आश्रम ब्रह्मचर्यादि चौक । कुळ म्हणिजे मूळपुरुष । गोत्रप्रवर्तक जो ज्यातें ॥३३५॥
यांपासूनि वेगळा कृष्ण । बृहत्त्वें ब्रह्म जो परिपूर्ण । अरूप अगोत्र अनभिधान । करिती व्याख्यान श्रुति ऐसे ॥३६॥
वर्णाश्रमकुळादि सकळ । हें देहासि लागलें केवळ । देहातीत आत्मा अमळ । न शिवती मळ त्याप्रति हे ॥३७॥
कृष्ण अयोनिसंभव मुळीं । तो लावावा कवणे कुळीं । वर्णाश्रमातीत वनमाळी । हे वाचाळी उपनिषदीं ॥३८॥
ज्यासि नाहीं वर्ण गोत्र । सर्व धर्मीं त्या अनधिकार । सर्वधर्माचें अभ्यंतरे । वसवूनि श्रीशर बहिष्कृत ॥३९॥
नेत्रा आड आलिया अभ्र । म्हणती आच्छादिला भास्कर । तेंवि सर्व धर्म ज्या बाहीर । करिती बहिष्कार कर्मठ त्या ॥३४०॥
सर्व धर्मांचा अनधिकारी । तो परमेश्वर स्वैराचारी । अतएव निर्गुण निर्विकारी । नोहे विकारी त्रिगुणात्मा ॥४१॥
एवं परमेश्वर श्रीहरी । नोहे जीववत् कर्माधिकारी । जीवायोग्य सपर्या खरी । नोहे निर्धारीं हरियोग्य ॥४२॥
पुढती निन्दोक्ति वदे चैद्य । त्या वाखाणी भारती विशद । क्षण एक बैसोनियां सावध । विद्वद्वृंद तें ऐका ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP