एतावताऽलं विश्वात्मन्सर्वसंपत्समृद्धये । अस्मिंल्लोकेऽथवामुष्मिन्पुंसस्त्वत्तोषकारणम् ॥११॥

इतुकेंचि पुरुषाचें करणें । सर्वसंपत्तीकारणें । अलं म्हणिजे पूर्णपणें । श्रीभगवानें जाणावें ॥५७॥
एकमुष्टिपृथुकाशनें । जितुकी माजी माया अवलोकनें । ब्रह्मांडगर्भींचीं कारणें । विभवें संपूर्णें आतुडलीं ॥५८॥
इहलोकींच्या ज्या संपत्ति । कीं चतुर्दशभुवनात्मक ज्या होती । मत्कटाक्षें अमरां प्राप्ति । त्या या प्रति वोपिलिया ॥५९॥
याहीवरी द्वितीयमुष्टी । भक्षणेच्छा धरिली पोटीं । तरी या अधीन मज शेवटीं । करूं पाहतां कीं काय ॥६०॥
स्वचरणांचा वियोग मातें । करूनि अर्पण कराल यातें । ऐसेंचि चित्तीं असेल निरुतें । तरी द्वितीयमुष्टीतें भक्षिजे ॥६१॥
तुझिया तोषाचें कारण । सर्वसंपत्तीचें मूळ जाण । प्रेमें अर्पी अणुप्रमाण । संपदा गहन तो लाहे ॥६२॥
विश्वात्मन् या संबोधनें । विश्वात्मकातें वैदर्भी म्हणे । संपदासमृद्धीकारणें । इतुकेंचि पुरे पुरुषासी ॥६३॥
तुझिया तोषाचें कारण । इहामुष्मिकसंपदा पूर्ण । दिधल्या हों न शके उत्तीर्ण । करीं शुश्रूषण यास्तव तूं ॥६४॥
इत्यादि अभिप्रायें श्रीकमळा । रहस्यसंकेतें कर धरिला । तें गुह्य जाणोनि मेघसांवळा । हस्त आवरिला पृथुकेंसीं ॥६५॥
भगवंताचीं ललनारत्नें । ब्राह्मणा पाहों येती यत्नें । नमस्कारिती नम्रपणें । आशीवचनें द्विज वोपी ॥६६॥
म्हणती भावोजी आजिवरी । निष्ठुर झालेती कां अंतरीं । सहोदराहूनि वहुतांपरी । दुर्लभ संसारीं मित्रत्व ॥६७॥
बाई भेटविली नाहीं आम्हां । किती अपत्यें झालीं तुम्हां । आमुचे ठायीं तुमचा प्रेमा । उदास कां मा आजिवरी ॥६८॥
ऐसिया सोळा सहस्र युवति । सशत अष्टनायिकाप्रभृति । स्नेहवादे द्विजाप्रति । गौरविती सम्मानें ॥६९॥
ब्राह्मण म्हणे कुटुम्बामाजी । कृष्णें सम्मानिलें मज आजी । सर्व संभावना करिती माजी । होइन सहजीं सभाग्य तैं ॥७०॥
इतुकें कृष्णाचें कुटुम्ब । या वेगळा यदुकदंब । संभावनेचा होईल लाब । यथावालभ मज भजती ॥७१॥
ऐसा संतुष्ट अभ्यंतरीं । तिये दिवसीं हरिमंदिरीं । सुखाडला सर्वोपचारीं । सावदह श्रोत्रीं तें ऐका ॥७२॥

ब्राह्मणस्तां तु रजनीमुषित्वाच्युतमंदिरे । भुक्त्वा पीत्वा सुखं मेने आत्मानं स्वर्गतं यथा ॥१२॥

दिव्यभोजनाचिया परवडी । अमृतापरिस मधुरता गाढी । अपूर्वफळांचिया कोडी । द्विजा आवडी समर्पिती ॥७३॥
स्रक्चंदनविलेपनें । सुगंधशलाका धूपदानें । कर्पूरादिनीराजनें । ललनारत्नें समर्पिती ॥७४॥
सौरभ्य धूसर उधळिती अबळा । मंदारपुष्पें खोंविती मौळा । एकी समर्पिती ताम्बूला । चरणकमळा एकी चुरिती ॥७५॥
पानार्थ अर्पिती विविध रस । निवविती मधुरोत्तरीं मानस । रत्नदंडी चामरांस । धरूनि वीजिती पैं एकी ॥७६॥
मृदुळमंचकीं पहुडवून । करिती सर्वाङ्गशुश्रूषण । एक पदतलसंमर्दन । करिती कोमळ करकमळीं ॥७७॥
ब्राह्मणाचा धरूनि कर । परमानंदें जगदीश्वर । आत्मभुवन सविस्तर । दावी सादर होत्साता ॥७८॥
माड्या गोपुरें विचित्र शाळा । एकान्तसदनें सभास्थळा । कोशभाण्डारसमृद्दि सकळा । सादर डोळां द्विज पाहे ॥७९॥
वनें वाटिका रहाट पाट । जळप्रवाह धडधडाट । फळें पुष्पें पल्लव दाट । गमे वैकुण्ठ यवन्यून ॥८०॥
ऐसिये भुवनीं तो द्विजवर । सुखाडला अहोरात्र । अमरां दुर्लभ दिव्योपचार । ते तेथ समग्र अनुभविले ॥८१॥
ब्राह्मण मानी आपणातें । शतक्रतूच्या ऐश्वर्यातें । भोगार्हता जाली मातें । स्नेहें भगवंतें स्वीकारितां ॥८२॥
ऐसिया सुखें श्रीकृष्णसदनीं । ब्राह्मणें क्रमिली दिवसरजने । प्रभात होतां चक्रपाणी । विप्रालागूनी बोळवी ॥८३॥

श्वोभूते विश्वभावेब्न स्वसुखेनाभिवंदितः । जगाम स्वालयं तात पथ्यनुव्रज्य नंदितः ॥१३॥

उदया आलिया गभस्ती । स्वयें येऊनि ब्राह्मणा प्रति । स्वधामा जावया आज्ञापिती । सादर वृत्ति करूनियां ॥८४॥
ब्राह्मण व्रतस्थ अयाचित । स्वमुखें न याची कांहीं अर्थ । म्हणे सर्वज्ञ श्रीभगवंत । जाणे हृद्गत सर्वांचें ॥८५॥
तंव त्या स्वमुखें म्हणे श्रीपति । स्वामी उठावें शीघ्रगति । चालतां उष्ण होईल पंथीं । म्हणूनि निगुती वेग करा ॥८६॥
हर्यंगना नमिती चरणां । म्हणती बाईंसी सांगा नमना । आमुचा विसर न पडो मना । ऐसी प्रार्थना बहु करिती ॥८७॥
कन्या कुमर आलिंगिती । भो पितृव्या आम्हांप्रति । पूर्णस्नेहें आपुल्या चित्तीं । स्मरिजे म्हणती निरंतर ॥८८॥
दासदासी लोटाङ्गणा । घालूनि बोळविती ब्राह्मणा । लंघूनि अंगणा प्राङ्गणा । पण्यस्थाना पैं आला ॥८९॥
विश्वभावन जो श्रीहरि । तेणें बाह्मणा धरूनि करीं । आला बोळवीत बाहेरी । पादचारी अनुगामी ॥९०॥
वंदिला असतां परिवारगणीं । विश्वभावनें सुखें करूनी । बोळवीत सवें जावोनी । आनंदातें पावविला ॥९१॥
ऐकें बापा कौरवनाथा । म्हणसी धनधान्यादि न देतां । आनंद केला द्विजाच्या चित्ता । कैसा तत्वता मज न कळे ॥९२॥
तरी विश्वभावन या अभिधानें । अमरां दुर्लभ लक्ष्मी देणें । भावी ब्राह्मणा कारणें । बादरायणें हें सूचिलें ॥९३॥
सुखेन ऐसिया पदें करूनी । पूर्णानंद जो चक्रपाणी । स्वतुल्य संपत्ति देतां ग्लानी । न धरी मनीं हें सूचिलें ॥९४॥
नम्र समर्याद विनयोक्ति । अमृततुल्य मधुरा प्रीति । वदोनि विप्रा आनंद चित्तीं । केला निश्चिती हें कथिलें ॥९५॥
तया आनंदाचें लक्षण । सिंहावलोकनें वक्ष्यमाण । मार्गीं विप्राचें चिन्तन । कथितां जाणोन घे राया ॥९६॥

स चालब्ध्वा धनं कृष्णान्न तु याचितवान्स्वयम् । स्वगृहान्व्रीडितोऽगच्छन्महद्दर्शननिर्वृत्तः ॥१४॥

मग तो ब्राह्मण श्रीकृष्णातें । राहवूनियां आदरें बहुतें । जाता जाला निज नगरातें सलज्ज चित्तें प्रमुदित पैं ॥९७॥
चित्त लज्जेनें व्यापिलें असतां । कैंची आनंदाची वार्ता । तरी हे दोहींची व्यवस्था । सावध श्रोतां परिसावी ॥९८॥
कृष्णापासून कांहींच धन । प्राप्त जालें नाहीं म्हणोन । चित्त अत्यंत लज्जायमान । वनितादर्शनसंकोचें ॥९९॥
बहुतेक वनिता पतिव्रता । सहसा विक्षेप न करी चित्ता । परंतु माझी मज कृपणता । सलज्जता जाकळिते ॥१००॥
एवं लज्जेचें कारण । त्याचें विवरिलें निरूपण । या वरी आनंदाचा पूर्ण । हेतु कोण तो ऐका ॥१॥
महान् म्हणिजे श्रेष्ठश्रेष्ठ । तो कृष्ण विश्ववरिष्ठ । त्याचें देखिलें पादपीठ । तेणें भूयिष्ठ आनंद ॥२॥
तया श्रेष्ठत्वाचीं लक्षणें । पथीं चौं श्लोकीं ब्राह्मणें । विवरिलीं तीं अंतःकरणें । श्रोतीं श्रवणें परिसावीं ॥३॥

अहो ब्रह्मण्यदेवस्य दृष्टा ब्रह्मण्यता मया । यद्दरिद्रतमो लक्ष्मीमाश्लिष्टो बिभ्रतोरसि ॥१५॥

अहो या अव्ययें परमाश्चर्य । मानूनि म्हणे ब्राह्मणधुर्य । ब्रह्मण्यदेव वृष्णिवर्य । आर्या आर्य पूज्यतम ॥४॥
ब्रह्मण्यदेवाची ब्रह्मण्यता । ते म्या प्रत्यक्ष देखिली तत्वता । तेणें परमानंद चित्ता । तो सर्वथा न बोलवे ॥१०५॥
मी दरिद्री अनाथ रंक । लुप्ताचार हीनविवेक । मळिन म्लान गर्हितवेष । मज तो परेश आळंगी ॥६॥
ज्याचें हृदय वसवी लक्ष्मी । मंडित सकळसद्गुणलक्ष्मी । तये हृदयीं त्रैलोक्यस्वामी । प्रेमसंभ्रमीं मज कवळी ॥७॥
जें वक्षस्थळ लक्ष्मीनिलय । तये हृदयीं परम सदय । मजला कवळी आनंदमय । ब्रह्मण्यवर्य यास्तव तो ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP