अध्याय ८१ वा - श्लोक ३६ ते ४१
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तस्यैव मे सौहृदसख्यमैत्री दास्यं पुनर्जन्मनि जन्मनि स्यात् ।
महानुभावेन गुणालयेन । विषज्जतस्तत्पुरुषप्रसङ्गः ॥३६॥
त्याच्याच ठायीं सौहार्द माझें । सदैव असो सप्रेम ओजें । अवंचकभावें सख्य जें म्हणिजे । असो मज सहजें तन्निष्ठ ॥३६॥
मैत्री म्हणिजे उपकारत्व । अवंचकप्रेमाचें अधिकत्व । दास्य म्हणिजे सेवकत्व । असो एकत्वें तन्निष्ठ ॥३७॥
सौहार्द सख्य मैत्री दास्य । कृष्णींच माझें असो निःशेष । हेंवि मानसींचें रहस्य । वाञ्छा विशेष हे इतुकी ॥३८॥
येव्थ सहाध्यायित्वें हरि । जोडला ऐसीच जन्मान्तरीं । सौहार्द सख्य दास्य मैत्री । घडो निर्द्धारीं पुन्हा पुन्हां ॥३९॥
आणिक तत्संबंधी तन्निष्ठ जन । निष्काम निर्मम निरभिमान । त्यांच्या ठायीं इत्यादि गुण । सन्निधान द्विज वांछी ॥२४०॥
या वेगळी तत्संपत्ती । सहसा द्विज न वांछी चित्तीं । काय म्हणोनि हें पुसिजेल श्रोतीं । हे शंकानिवृत्ति पुढें करू ॥४१॥
प्रस्तुत महानुभाव जो हरि । तेणेंसीं ज्या निरंतरीं । असंगसंग अहोरात्रीं । जिहीं निर्धारीं साधियला ॥४२॥
तया भक्तांच्या ठायीं माझा । संग असो भो गरुडध्वजा । या वीण आणिक संपदा वोजा । अधोक्षजा मी न मागें ॥४३॥
भक्तीवांचूनि वैभव अपर । तेथें न रमे ममान्तर । म्हणसी भक्तीचें फळ संपदा प्रचुर । तेथें तूं सादर कां नव्हसी ॥४४॥
पूर्वीं विशुद्ध भक्ति केली । संपदारूपें तेचि फळली । पुढती भक्तीच कां याचिले । तरी ते बोली अवधारा ॥२४५॥
भक्ताय चित्रा भगवाह्नि संपदो राज्यं विभूतिर्न समर्थयत्यजः ।
अदीर्घबोधाय विचक्षणः स्वयं पश्यन्निपातं धनिनां मदोद्भवम् ॥३७॥
अज अव्यय जो श्रीहरि । भगवान षड्गुणैश्वर्यधारी । तो विचित्र संपदा भक्तां घरीं । सहसा संसारीं न वाढवी ॥४६॥
विचित्र संपदा म्हणाल कैसी । तरी जी माजि अनेक पदार्थराशी । गणितां एकैक पदार्थासी । संख्या कोणासी करवेना ॥४७॥
अनेक कुञ्जर अनेक रथ । अनेक अश्व उष्ट्र बहुत । अनेक पदाति प्रान्तरहित । देश दुर्गें भूवलयें ॥४८॥
अजा अविकें गाई म्हैशी । नियोगीं यूथप दास दासी । वसनाभरणें धनधान्यासी । मर्यादेसी न करवे ॥४९॥
ऐशा विचित्र संपदा अपार । राज्य म्हणिजे सत्ता सधर । विभूति म्हणिजे कलत्रपुत्र । सुहृदमित्रगोत्रादि ॥२५०॥
अविवेकिया भक्ता घरीं । ऐशा समृद्धिं नेदी हरि । वोपी जिज्ञासा अंतरीं । भक्ति निर्धारीं प्रवर्तवी ॥५१॥
म्हणाल कां या संपदा नेदी । तरी ते अदीर्घबोध मंदबुद्धी । वरपडोनियां अष्टमदीं । विषयविषास्वादीं झळंबती ॥५२॥
तेणें अंतरती श्रीचरण । मग ते भ्रंशतीच कीं मच्छरण । या लागीं स्वयें विचक्षण । भक्तकल्याण स्वयें लक्षी ॥५३॥
धनाढ्यासि मदोद्भव । होतो म्हणॊनि वासुदेव । आधींच निर्धन करूनि सर्व । हरूनि सद्भाव दृढ वोपी ॥५४॥
मग ते भगवच्चरणीं निरत । भवैश्वर्या होती विरत । सुदीर्घबोधें सदोदित । हरिगुणचरित प्रशंसिती ॥२५५॥
अविवेकी जे अदीर्घबोध । त्यांसी ऐशिया संपदा विविध । सहसा नेदी श्रीपाण्डुरंग । मा दीर्घबोधप्रद होय ॥५६॥
तरी दीर्घबोध जे भक्तराज । भक्तिपरिणामसुखाचा ध्वज । लावूनि सेवितां गरुडध्वज । ते न मानिती चोज भवविभवीं ॥५७॥
नृपसंतान जातमात्र । नृपाभावीं त्या धरिलें छत्र । असतां अनेक संपदा विचित्र । परि तें भजे गात्र मातेचें तव चरणीं ॥५८॥
तैसे दीर्घबोध जे सद्भक्त । संपदा लाधलेही समस्त । तथापि न होती तदासक्त । सर्वदा अनुरक्त तव चरणीं ॥५९॥
सप्रेम जे दीर्घबोध । त्यांसी संपदा न करी बाध । संपन्न असतां ध्रुव प्रह्लाद । भजनानंद अनुभविती ॥२६०॥
स्वयें भगवान विचक्षण । संपादाजनित दोषगुण । लक्षूनियां वक्ष्यमाण । भक्तांलागून कदा नेदी ॥६१॥
असो अन्य भक्तांची कथा । हृदयीं विवरीं द्विजनिजवार्ता । सप्रेम सावध होऊनि श्रोता । श्रवणें स्वहिता अनुभविजे ॥६२॥
येथें नाहीं शुकवैखरी । परंतु अन्यग्रंथान्तरीं । ब्राह्मण असतां गुरूचे घरीं । श्रीमुरारी समवेत ॥६३॥
वना धाडिलें इन्धना साठीं । तैं गुरुमातेनें मुष्टि मुष्टि । चणक एकत्र द्विजाचे वोटीं । घालूनि गोठी हे कथिली ॥६४॥
समस्तांसि मुष्टिप्रमाण । चणक दिधले ते अवघे जण । यथाभागें करा भक्षण । ऐसें वदोन पाठविले ॥२६५॥
वनीं वर्जन्यसंकटकाळीं । बैसल्या सर्वांच्या दांतखिळी । द्विजें चणक ते तिये वेळीं । भक्षिले सकळी न वांटितां ॥६६॥
तया दोषास्तव दुस्तरी । पडिला दरिद्रदुःखसागरीं । साचचि सहाध्यायी श्रीहरि । तेणें अंतरीं दृढ नियमी ॥६७॥
बाह्य दरिद्र भोगिलें घोर । परंतु अभंग सदाचार । भगवन्निष्ठ निजान्तर । अढळ अंकुर प्रेमाचा ॥६८॥
तेणें अत्यंत करुणावंत । हृदयीं द्रवूनियां भगवंत । उद्बोधिलें सतीचें चित्त । ते मग धाडी त्वरित हरीपासीं ॥६९॥
पृथुकमुष्टि उपायनव्याजें । आणीले जाणूनि गरुडध्वजें । पूर्व चणकांच्या परिहारकाजें । अधोक्षजें ते भक्षिले ॥२७०॥
कृष्णें सेवितांचि ते पृथुक । हरला समग्र दोषकलंक । ब्राह्मण जाला निष्कलंक । जाणोनि सम्यक विभवा दे ॥७१॥
गुरुपत्नीचा आज्ञाभंग । मित्रस्वहरणाचा प्रसंग । मित्रवंचनेचाही डाग । नैष्ठुर्य निलाग आहत्काळीं ॥७२॥
कृष्ण करितां पृथुकाशन । जालें इत्यादिदोषदहन । केला ब्राह्मण श्रीसंपन्न । शक्राहून सौभाग्यें ॥७३॥
धनिकां अवश्य मदोद्भव । जाणोनि भक्तां नेदी विभव । हतभाग्य मी भजनानर्ह । म्हणोनि केशव मज वोपी ॥७४॥
ऐशी कथा ग्रंथान्तरीं । ते सूचिली अल्पोद्गरीं । यावरी ब्राह्मण निजान्तरीं । करी अवसरी श्रीलाभें ॥२७५॥
यास्तव विभवीं मम मन न रमे । हरिपदसेवन भक्तिप्रेमें । इतुकेंचि द्यावें पुरुषोत्तमें । ऐसें नियमें द्विज वाञ्छी ॥७६॥
मजला न लगे सुरसंपत्ति । अढळ असो पैं श्रीपदभक्ति । ऐसा निश्चय करूनि सुमति । केली प्रवृत्ति ते ऐका ॥७७॥
एत्थं व्यवसितो बुद्ध्या भक्तोऽतीव जनार्दने । विषयाञ्जायया त्यक्षन्बुभुजे नातिलम्पटः ॥३८॥
इत्थं म्हणिजे ऐशिया परी । व्यवसायवंत निजनिर्धारीं । बुद्धि करूनि अभ्यंतरीं । वरिला श्रीहरिपदप्रेमा ॥७८॥
अतीव म्हणिजे भत्यंतभक्त । जाला जनार्दनीं अनुरक्त । हळु हळु विषयांतें त्यागीत । परम विरक्त भवविभवीं ॥७९॥
दरिद्राचा मानूनि त्रास । न करवे स्वयतीचा संतोष । म्हणोनि जायेतें द्विजास । द्वारकेस पाठविलें ॥२८०॥
अंतरवेत्ता श्रीभगवा । आपणा तुल्य ऐश्वर्यदान । देऊनि सतीचें समाधान । केलें पूर्ण जगज्जनकें ॥८१॥
कल्पिली न वचे मनोरथीं । अगाध अपार सुरसंपत्ती । लाहोनि स्वेच्छा सेवी पती । परि तो चित्तीं सविराग ॥८२॥
जाये सहित सकळ विषया । भोगीत असतां लंपट न होय । जळीं कमलिनीपत्रन्यायें । अलिप्त राहे हरिप्रेमें ॥८३॥
विषयीं अत्यंत लंपट नाहीं । परंतु आयेच्या भजनस्नेहीं । अंगीकारी सर्व कांहीं । विरक्त देहीं अहर्निशीं ॥८४॥
तस्य वै देवदेवस्य हरेर्यज्ञपतेः प्रभोः । ब्राह्मणाः प्रभवो दैवं न तेभ्यो बिभ्रते परम् ॥३९॥
ब्राह्मणाचें जाणोनि मज । दिधलें सप्रेम निजाङ्घ्रिभजन । सतीनें वांछिलें पतीचें भजन । श्रीसंपन्न ते केली ॥२८५॥
ऐसा प्रभु जो यज्ञपति । देवदेवोत्तम चिन्मयमूर्ती । त्या हरीची ब्रह्मण्यस्थिति । पाहोनि चित्तीं द्विज कल्पी ॥८६॥
श्रीकृष्णाची ब्रह्मण्यता । देखोनि ब्राह्मण म्हणे तत्वता । विचित्र नोहे सर्वथा । श्रीभगवंता पाहोनि ॥८७॥
प्रभुत्वें ब्राह्मणाहूनी थोर । कृष्णासि नाहीं दैवत अपर । ब्रह्मण्यतेचा हा निर्धार । कृष्ण साचार निगमात्मा ॥८८॥
एवं स विप्रो भगवत्सुहृत्तदा दृष्ट्वा स्वभृत्यैरजितं पराजितम् ।
तद्ध्यानवेगोद्ग्रथितात्मबंधनस्तद्धाम लेभेऽचिरतः सतां गतिम् ॥४०॥
ऐशियापरी तो ब्राह्मण । भगवंताचा जो जिवलग प्राण । सुहृदाहूनि सुहृदपूर्ण । महिमा देखोन त्या समयीं ॥८९॥
लोकत्रयीं अपराजित । स्वभृत्यांहीं तो अनंत । जिंकिला ऐशांतें देखूनि त्वरित । तन्निष्ठ होत सप्रेमें ॥२९०॥
त्या कृष्णाचें सदैव ध्यान । करितां मन झालें उन्मन । ध्यानातिशयें आत्मबंधन । गेलें सुटोन क्षणमात्रें ॥९१॥
आत्मबंधन म्हणाल काय । तरी जो अहंकार जाळी देह । त्याचा निःशेष मोडला ठाय । चित्सुखमय द्विज जाला ॥९२॥
निरभिमान मोकळी वृत्ति । सप्रेम बाणली ध्यानस्थिती । याहूनि कोणती सायुज्यमुक्ति । कैवल्यप्राप्ति ते काय ॥९३॥
जे गति पावती ब्रह्मनिष्ठ । अल्पकाळेंच तो द्विजवरिष्ठ । जाला तत्तेजीं प्रविष्ट । दुर्घट कष्ट न करूनि ॥९४॥
तद्धाम पावला ब्राह्मण । प्राप्तीहूनि तो म्हणाल भिन्न । ऐसें नव्हे तो समरसोन । जाला अभिन्न धामाची ॥२९५॥
पृथुकाख्यान हें साद्यंत । शौनका सांगे नैमिषीं सूत । याच्या श्रवणें फळ प्राप्त । श्रीशुक कथित तें ऐका ॥९६॥
एतद्ब्रह्मण्यदेवस्य श्रुत्वा ब्रह्मण्यतां नरः । लब्धभावो भगवति कर्मबंधाद्विमुच्यते ॥४१॥
ब्रह्मण्यदेव कमलावर । त्याची ब्रह्मण्यता हे जो नर । ऐकोनि होय आनंदप्रचुर । भगवत्पर तो होय ॥९७॥
पृथुकाख्यानश्रवणें करून । भगवच्चरणीं सद्भाव पूर्ण । लाहतां कर्मबंधापासून । विमोक्षण तो पावे ॥९८॥
कर्मबंधापासून मुक्त । अनन्यप्रेमें श्रीकृष्णभक्त । होऊनि मिरवे वैषणवा आत । जेंवि हनुमंत कां गरुड ॥९९॥
ऐसें श्रीमद्भागवतीं । पृथुकाख्यान भारता प्रति । कथिलें तो हा एकाशीति । अध्याय निगुती निरूपिला ॥३००॥
पृथुकाख्यानाचें महिमान । दरिद्रदोषें दुःखी जन । तिहीं करितां श्रवण पठण । श्रीसंपन्न ते होती ॥१॥
ऋणग्रस्तांचीं फिटती ऋणें । पात्र होती भगवत्करुणे । परम आरोग्य होती रुग्णें । होती भग्नें भवदुरितें ॥२॥
अध्याय द्व्यशीतितम यावरी । तेथ भूपांहीं कुरुक्षेत्रीं । वृष्णि देखोनि परस्परीं । गाती वैखरी हरिगरिमा ॥३॥
श्रोतीं परिसावया ते कथा । प्रसन्न कीजे मनोरथा । पाय ठेवूनि विघ्नां माथां । निजपरमार्था साधावें ॥४॥
प्रतिष्ठानपुरनिवासी । श्रीएकनाथ चित्सुखराशि । दयार्णवें तच्चरणांपासीं । पिपीलिकेसी वसोनियां ॥३०५॥
पृथुकाख्यान समर्पिलें । महाराष्ट्रभाषा तें उपलविलें । श्रीहरिवरें ग्रथन केलें । वोवीप्रबंधें अतिसुगम ॥६॥
याचें भावें श्रवण करी । त्याचें संकट हरी श्रीहरि । ऐसी हरिवरदाची थोरी । जाणोनि चतुरीं अनुष्ठिजे ॥७॥
श्रीमद्भाग्वत दशम स्कंध । टीका हरिवरद अगाध । दशार्णवकृत परम विशुद्ध । अध्याय प्रसिद्ध एकाशीतितम ॥३०८॥
इति श्रीमद्भागवतेमहापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां पृथुकाख्याने भगवन्मित्रब्राह्मणसंवादे संपदुपलब्धिस्तत्पदप्राप्तिकथनंनामैकाशीतितमोऽध्यायः ॥८१॥
अधिकाश्वयुजि कृष्णे कालयुक्ताक्षिवत्सरे । अष्टम्या चन्द्रवारे तु पृथुकाख्यानमर्थितम् ॥१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४२॥ ओवी टीका ॥३०८॥ एवं संख्या ॥३५०॥ ( एक्क्याऐंशीवा अध्याय मिळून ओवी संख्या ३६५२१ )
एक्क्याऐंशीवा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : June 06, 2017
TOP