अध्याय ८१ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
क्वाहं दरिद्रः पापीयान्क्व कृष्णः श्रीनिकेतनः । ब्रह्मबंधुरिति स्माहं बाहुभ्यां परिरंभितः ॥१६॥
कोण्हीकडे मी दरिद्री रंक । पापी दीन नीच याचक । तुच्छाहूनि तुच्छ अल्पक । कळिमळपंकनिमग्न ॥९॥
कोण्हीकडे हा पुण्यकीर्ति । श्रीनिकेतन जगत्पति । लोकत्रयाची विश्रान्ति । मंगळमूर्ति निगमात्मा ॥११०॥
ऐसा श्रीकृष्ण थोरां थोर । मी पामराहूनि पामर । लक्षूनि ब्राह्मणजातिमात्र । सप्रेम आदर वाढविला ॥११॥
बहुतां दिवसांची वोळखी । दुरी देखोनि एकाएकीं । सांडूनि वैदर्भी मंचकीं । स्नेहें उत्सुकीं धाविन्नला ॥१२॥
विश्वमंगळकमळान्लयीं । आलिङ्गिलें मज दोन्हीं बाहीं । न पाहोनी समता कांहीं । नेलें स्वगेहीं सदुमानें ॥१३॥
निवासितः प्रियाजुष्टे पर्यके भ्रातरो यथा । महिष्याविजित श्रांतो वालव्यजनहस्तया ॥१७॥
बराडियासारिखी कान्ति । कुचैल वस्त्राची अनुपपत्ति । ऐसिया मातें धरूनि हस्तीं । सदनीं श्रीपति प्रवेशे ॥१४॥
कमळा विलसे जिये मंचकीं । तेथ मज नेवूनि एकाएकीं । अग्रज बंधूचिये सम तुकीं । बैसवूनी अभ्यर्ची ॥११५॥
पट्टमहिषी वैदर्भीं मुख्य । धरूनि वाळव्यजन सम्यक । श्रमपरिहरणा स - कौतुक । प्रीतिपूर्वक वीजितसे ॥१६॥
शुश्रूषया परमया पादसंवाहनादिभिः । पूजितः परया भक्त्या देवदेवेन देववत् ॥१८॥
सकळ देवांचा वरिष्ठ देव । तो हा श्रीकृष्ण वासुदेव । मातें जाणोनि भूदेव । परम भक्तीनें पूजियलें ॥१७॥
कनकपात्र मांडूनि तळीं । चरण क्षाळी श्रीवनमाळी । कनककलशें भीमकबाळी । वोती करतळीं जळधारा ॥१८॥
दुहिण संक्रंदन ईशान । तें जेंवि पूजिती जनार्दन । तैसिया परी मजलागून । पूजी भगवान भक्तपति ॥१९॥
अत्र गंध पुष्प धूप । नव्हे सामान्य सपर्यारूप । अनर्ध्य उपचार दिव्य अमूप । कंदर्पबाष्पें समर्पिले ॥१२०॥
ब्रह्मणदेव साचार हरी । म्हणोनि प्रेमा ब्राह्मणावरी । ऐसा ब्राह्मण अभ्यंतरीं । मार्गीं विवरी प्रभुमहिमा ॥२१॥
पुढती वितर्क करी मानसीं । म्हणे सपर्या केली ऐसी । अल्पही धन न द्यावयासी । कारण काय हें मज न कळे ॥२२॥
सदय सर्वज्ञ श्रीमंत हरी । स्नेहाळ होऊनियां मजवरी । गुरुगृहींच्या वार्ता करी । परि अल्पही करीं धन नेदी ॥२३॥
मी तो न मागें अयाचितवृत्ति । वदान्य सर्वज्ञ लक्ष्मीपति । माझी देखूनि सर्वानुपत्ति । नार्पिलें रतिभरी हेम ॥२४॥
स्वर्गापवर्गयोः पुंसां रसायां भुवि संपदाम् । सर्वासामपि सिद्धीनां मूलं तच्चरणार्चनय् ॥१९॥
कांहीं न द्यावयाचें कारण । पाहतां इतुकेंचि कल्पतें जाण । पूर्वी भगवत्पादार्चन । मजलागून न घडलें ॥१२५॥
म्हणूनि कृपाळु होऊनि हरी । भगवत्पादार्चनाधिकारी । अकिंचनता देऊनि करी । हें निर्द्धारीं गमतसे ॥२६॥
पाताळभुवनींच्या समृद्धि । मृत्युलोकेंच्या वैभवऋद्धि । दिविभोगादि ऐश्वर्यसिद्धि । स्वर्गमोक्षादि संपदा ॥२७॥
या सर्वांचें मूळ जाण । श्रीभगवत्पादार्चन । तें घडावें मजलागून । म्हणूनि भगवान कृपाळु ॥२८॥
पूर्वीं पादार्चन न घडलें । म्हणूनि दरिद्र आंगीं जडलें । ऐशियातें धन आंतुडलें । तरी मग पडलें मदभुरळें ॥२९॥
अधनोऽयं धनं प्राप्य माद्यन्नुच्चैर्न मां स्मरेत् । इति कारुणिको नूनं धनं मेऽभूरि नाददात् ॥२०॥
हा तंव निर्धन दरिद्री रंक । यातें धन प्राप्त जालिया सम्यक । उन्मत्त होईल मग निष्टंक । भजे नावेक मजलागीं ॥१३०॥
धनमद सर्वांमाजि उच्च । येणें अष्टही होती साच । माझ्या स्मरणाचा नडनाच । मग विसंच पावेल ॥३१॥
म्हणूनि कारुणिक श्रीहरी । कृपाळु होऊनियां मजवरी । अल्पही धन माझे करीं । नेदी निर्धारीं सर्वज्ञ ॥३२॥
धनें मातेल हा ब्राह्मण । तेणें न करील भगवत्स्मरण । अभूरि म्हणिजे अल्पही धन । मजलागून नेदूनी ॥३३॥
बोळवीत बाहीर आला । सप्रेमभाएं स्नेह केला । दीर्घदृष्टी हा कळवळा । यास्तव धनाला नार्पिलें ॥३४॥
ऐसा उपकार श्रीकृष्णाचा । हृदयीं चिन्तूनि स्मरें वाचा । परंतु अणुमात्र वैषम्याचा । शब्द न ठेवी भगवंतीं ॥१३५॥
पूजा आदर स्नेह बहुत । स्मरूनि हृदयीं आनंदभरित । मार्ग क्रमूनि नगरप्रान्त । पावता जाला तें ऐका ॥३६॥
N/A
References : N/A
Last Updated : June 06, 2017
TOP