अध्याय ८१ वा - श्लोक ३१ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
स्वच्छस्फटिककुड्येषु महामारकतेषु च । रत्नदीपान्भ्राजमानाँल्ललनारत्नसंयुतान् ॥३१॥
स्वच्छ सोज्ज्वळ लखलखीत । स्फटिकभित्ति सदना आंत । रत्नदीप प्रकाशवंत । गमती भास्वततुलनेचे ॥२००॥
महामाकतमणींच्या भिन्ती । कार्तस्वराच्या खेवणी निगुती । करकौशल्यें शोभविती । दीपपंक्ती रत्नांच्या ॥१॥
रत्नदीप भ्राजिष्ठ ऐसे । ललनारत्नें तत्प्रकाशें । प्रकाशतीं लावण्यरसें । तारुण्यदशें शोभविती ॥२॥
नवनागरा सद्गुणराशि । यूनां कर्षिती कटाक्षपाशीं । नवरसरसिका सुरललनाशीं । स्वप्रकाशीं लोपविती ॥३॥
ऐसिया ललना ललामपंक्ती । सदनीं परिचर्या आचरती । अनेक भजनांचिया व्यक्ति । रौक्म्यरौप्या ताम्रमया ॥४॥
गंडूशपात्रें ष्ठीवनपात्रें । रत्नखचितें कार्तस्वरें । कीडास्थानें सुरमंदिरें । सोपस्कारें मखसदनें ॥२०५॥
अनेक धनधान्यसमृद्धि । धनदालयीं जैसे निधि । गगनगामी मनोरथसिद्धि । यानें वहनें बहुपरींचीं ॥६॥
विलोक्य ब्राह्मणस्तत्र समृद्धीः सर्वसम्पदाम् । तर्कयाम स निर्व्यग्रः स्वसमृद्धिमहैतुकीम् ॥३२॥
सर्व संपदांची समृद्धि ऐशी । ब्राह्मणें देखोनि निजमानसीं । तर्किता जाला हें येथें कैसी । प्रकटली आपैसी अकस्मात ॥७॥
अव्यग्रमानसें तर्की द्विज । संपदासमृद्धीचें काय बीज । कोण्या कारणास्तव हे मज । जाली सहज संप्राप्त ॥८॥
नूनं बतैतन्मम दुर्भगस्य शश्वद्दरिद्रस्य समृद्धिहेतुः । महाविभूतेरवलोकतोऽन्यौ नैवोपपद्येत यदूतमस्य ॥३३॥
पूर्वीलची मी करंटपाळ । अखोलदरिद्रियांचा भूपाळ । काण्या सुकृताचें ऐसें फळ । जालों मंगळभाजन पैं ॥९॥
अभागियांचा शिरोमणी । पूर्वीलची हा प्रत्यय मनीं । त्या मज अमरसंपदाश्रेणी । हेतु वांचूनि केविं आल्या ॥२१०॥
बहुतेक मज ऐशा दुर्भगा । योग्यता या ऐश्वर्यभोगा । जे द्वारके जाऊनि कमलारंगा । भेटलों इतुकेंचि कारण पैं ॥११॥
महाविभूति श्रीभगवान । जो यदूत्तम रुक्मिणीरमण । त्याच्या अवलोकना वांचून । अन्य कारण न लक्षे ॥१२॥
अग्नीसी भेटलिया इंधन । निवडे अग्नित्वा घेऊन । तेंवि मज कृष्णाचें दर्शन । कृष्णा समान विभवद हें ॥१३॥
ऐसा निश्चय करूनि मनीं । पुढती वितर्क अंतःकरणीं । ब्राह्मणें केला तो तव श्रवणीं । कुरुकुळतरणी निवेदितों ॥१४॥
अवलोकमात्रें कृपादृष्टी । कृष्ण देता जरी ऐश्वर्यसृष्टी । तरी तुज दिधले ऐशी गोष्टी । निजवाक्पुटीं न कथितां ॥२१५॥
ऐसें विवरूनि ब्राह्मणें । अगाध श्रीकृष्णाचें करणें । असंभाव्यही संभावने । माजि आणूनि प्रतिपादी ॥१६॥
नन्वब्रुवाणो दिसते समक्षं याचिष्णवे भूर्यपि भूरिभोजः ।
पर्जन्यवत्तत्स्वयमीक्शमाणो दाशार्हकाणामृषभः सखा मे ॥३४॥
यादव तितुके दाशार्हक । त्यांचा ऋषभ तो श्रीकृष्ण मुख्य । त्या मम सख्याचें हे सम्यक । जें न वदोनि सम्मुख बहु देणें ॥१७॥
प्रकट न वदोनि याचका पुढें । सव्रीड वदान्य पर्जन्यपाडें । बहुत देऊनि मानी थोडें । निजपडिपाडें भोगाढ्य ॥१८॥
ज्याचे घरीं खायला नाहीं । तो याचकां तृप्त करील कायी । या लागिं भूरिभोगाढ्य शेषशायी । वदान्य पाहीं सर्वस्वें ॥१९॥
भूरिभोज कैसा म्हणाल । तरी लक्ष्मीवायक त्रैलोक्यपाळ । पूर्णकाम भक्तवत्सल । वदान्य अतुल ऐश्वर्यें ॥२२०॥
स्वभक्तांई अल्प सपर्या । देखोनि वोपी पूर्णैश्वर्या । पुढती म्हणे या प्रेमळ धुर्या । अनर्ह श्री या मम दत्त ॥२१॥
याचिये सप्रेम सपर्ये पुढें । अखिल ऐश्वर्य मम दत्त थोडें । म्हणोनि दास्य करणें पडे । वादेंकोडें तत्सदनीं ॥२२॥
प्रत्यक्ष माझे पृथुक मुष्टि । भक्षूनि मानिली जगदात्मतुष्टि । मग मज पाहोनि कृपादृष्टी । ऐश्वर्यपुष्टि हे दिधले ॥२३॥
पर्जन्याचा दृष्टान्त येथ । द्विज वदला तो इत्थंभूत । वाखाणिजेल सावचित्त । श्रोते समस्त परिसोत पैं ॥२४॥
बहुभोज सभाग्य पर्जन्य कैसा । समुद्र संपोर्ण भरी ऐसा । वदान्यतेचा निःसीम ठसा । देतां सहसा न कडसी ॥२२५॥
कदाचित बहुतेकही वर्षोनि जळ । मानी अल्पचि हें केवळ । लज्जित देखोनियां कृषीवळ । म्हणे म्यां प्रेमळ न तर्पिलें ॥२६॥
मग लज्जेकरूनि रात्रभागीं । कर्षकाचीं क्षेत्रें अवघीं । जळें परिपूर्ण करूनि वेगीं । न धरी आंगीं स्फुज्जातें ॥२७॥
प्रकट न वदोनि कर्षका पुढें । समृद्धि ऐश्वर्य प्रवृद्ध गाढें । देऊनि मानी हें थोडें । येणेंचि पाडें श्रीकृष्ण ॥२८॥
प्रेमळाचें अल्प भजन । बहुत मानी बहुताहून । इन्द्रादिसंपदा तुच्छ करून । स्वपद देऊन अल्प म्हणे ॥२९॥
न बोलोनियां ऐशी पदवी । देता समर्थ श्रीगोसांवी । त्या कृष्णाची स्थिति आघवी । सप्रेमभावीं द्विज वर्णी ॥२३०॥
किञ्चित्करोत्युर्वपि यत्स्वदत्तं सुहृत्कृतं फल्ग्वपि भूरिकारि ।
मयोपनीतं पृथुकैकमुष्टि प्रत्यग्रहीत्प्रीतियुतो महात्मा ॥३५॥
मेरूहूनि गौरव गहन । देऊनि किंचित मानी कृष्ण । फल्कट सुहृदाचें अर्पण । बहुताहूनि बहु माने ॥३१॥
म्यां आणिले मुष्टि पृथुक । ते घेऊनिं प्रीतिपूर्वक । स्वयें भक्षी मुष्टि एक । दिधलें अनेक हें विभव ॥३२॥
प्रीति करूनि आदरें हरी । पृथुक होते जे माझे पदरीं । सलज्ज नार्पी मी दरिद्री । झोंबोनि स्वकरीं तो भक्षी ॥३३॥
परचित्तपारखियांचा राव । समष्टिमात्र ज्याचा देह । यालागीं महात्मा हें नांव । व्याससंभव अनुवादे ॥३४॥
ऐसा परम कारुणिक । भक्तवत्सल श्रीनायक । त्याचेंचि दास्य मज सम्यक । जन्म अनेक घडो म्हणे ॥२३५॥
N/A
References : N/A
Last Updated : June 06, 2017
TOP