अध्याय ८४ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तान्दृष्ट्वा सहस्रोत्थाय प्रागासीन नृपाडशः ।पाण्डवाः कृष्णरामौ च प्रणेम्र्विश्चवन्दितान् ॥६॥

येता देखोनि त्या मुनीतें । नृपति बैसले तेथ जे होते । पाण्डवरामकृष्णादि अवघे ते । उभे ठाकले झडझडां ॥२०॥
त्रिजगद्वंघ्र जे कां मुनि । त्यांतें देखूनि नमिती मूध्नि । पूजिते जाले सत्कारूनी । चक्रपाणि जेंवि अर्ची ॥२१॥
रामकृष्ण अर्चिती जैसे । समास्त नृपही तयांचि सरिसे । पूजिते जाले सप्रेमरसे । शुद्धमानसें मुनिवर्यां ॥२२॥

तानावर्च्युर्यवा सर्वे सहरामोऽच्युतोऽर्चयत् । स्वागतासनपाद्यार्घ्यमाल्यभूषानुलेपनैः ॥७॥

श्रेष्ठासनीं बैसवोनि सर्वां । स्वागतप्रश्न करिती बरवा । पादार्घ्याचमनादिगौरवा । पूजिते जाले यथाविधि ॥२३॥
मलजगंधें अनुलेपनें । कर्स्तूती केशर सुगंध सुमनें । दियाभरणें अमूल्यवसनें । तपोधनांतें समर्पिली ॥२४॥
धूपदीपदिव्योपहार । फलताम्बूल चामीकर । विविध रत्नें सर्वोपचार । पुष्पाञ्जळि निराजलें ॥२५॥
ऐसे मुनिवर पूजिल्यावरी । विश्रान्ति पावले अभ्यंतरीं । सुखे बैसले त्यांप्रति हरी । वदे वैखरी तें ऐका ॥२६॥

उवाच सुखमासीनान्भगवान्धर्मगुप्तनुः । सदसस्तस्य महतो यतवाचो‍ऽनुशृण्वतः ॥८॥

धर्मरक्षक ज्याची तनु । त्यालागीं म्हणिजे धर्मगुप्तनु । तो भगवान स्वमुखेंकरून । समाहित वचन बोलतसे ॥२७॥
महतांचिये सभास्थानीं । श्रवण करीत असतां मुने । बोलता जाला चक्रपाणी । नियतवचनीं तें ऐका ॥२८॥

श्रीभगवानुवाच - अहो वयं जन्मभृतो लब्धं कार्त्स्न्येन तत्फलम् । देवानामपि दुष्प्रापं यद्योगेश्वरदर्शनम् ॥९॥

अहो म्हणिजे हर्षोत्कर्षें । भगवान बोले परमोल्लासें । आम्ही जन्मसाफल्य तैसें । लाधलों जैसें लाहों ये ॥२९॥
जन्मवंतांचें सफळ जिणें । होय साकल्यें ज्या साधनें । देवांसही दुर्लभपणें । आम्हांकारणें तें सुलभ ॥३०॥
जन्मसफल्याचें बीज । तें साकल्यें आम्हां सहज । देवां दुर्लभ जें निजगुज । तें पदकंज स्वामींचें ॥३१॥
योगीश्वरांचें दर्शन । तें आम्हां सुलभ पूर्णत्वेंकरून । देखतां स्वामीचे श्रीचरण । त्रिजगीं मान्य धन्यतम ॥३२॥
देवां दुर्लभ दर्शन तुमचें । आम्हां सुलभ तें आजि साचें । जालों अधिकारी स्पर्शाचे । चरणसेवनाचेनि मिसें ॥३३॥
देवां दर्शनमात्रही न घडे । आम्हां स्पर्शन सेवन घडे । अघटित घटनेचेनि पाडें । आश्चर्य केवढें वाटतसे ॥३४॥

किं स्वल्पतपसां नृणामर्चायां देवचक्षुषाम् । दर्शनस्पर्शनप्रशन्प्रह्वपादार्चनादिकम् ॥१०॥

अपक्कज्ञानी अल्पबुद्धि । त्यांची विपरीत साधनसिद्धि । भजती देखोनियां उपाधि । फळनिरुपाधि अनोळख ॥३५॥
मिष्ट उत्कृष्ट नेणती खंड । भजती तदर्थ इक्षुदंड । अल्पफळार्थ कर्मकाबाड । केवळ जडमूढ आचरती ॥३६॥
तीर्थादिस्नानमात्रीं ज्यांची । तपोबुद्धि वर्ते साची । ऐसिया अल्पता पशूंची । निष्ठा कैंची सत्पुरुषीं ॥३७॥
पाषाणादिप्रतिमामात्रीं । देवताबुद्धि ज्यांचे नेत्रीं । तयांची निष्ठा योगीश्वरीं । सुकृतकारी न संभवे ॥३८॥
योगीश्वराचें दर्शन । अंगसंवाहनस्पर्शन । नम्रता प्रश्न पादार्चन । सुकृतसधनसें न वटे ॥३९॥
कीं तें स्थूळदृष्टि मूढ । देहात्मवादी जे कां दृढ । तीर्थप्रतिमातपादि उघड । कर्मकाबाड श्रेष्ठ गमे ॥४०॥
योगीश्वरांच्या ठायीं त्यांची । मानुषीप्रतीति वर्ते साची । यास्तव दर्शनस्पर्शनाची । पादार्चनाची असंभावना ॥४१॥
जैसे आपण मनुष्यदेही । योगीश्वरही तैसेचि पाहीं । भासती आणि त्यांच्या ठायीं । निष्ठा न बणे पूज्यत्वीं ॥४२॥
त्यांच्या दर्शनें कल्याणप्राप्ति । स्पर्शनें समस्ताघनिवृत्ति । नम्रप्रश्ने आत्मसंवित्ति । अमृतावाप्ति पादार्चनें ॥४३॥
ऐसी भावना नुपजे तयां । स्थूळबुद्धि ज्या प्राणियां । असंभावना करूनियां । दृढनिश्चया अनुसरती ॥४४॥
परि ते तारतम्य नेणती । स्थूळबुद्धि मंदमति । तेचि तारतम्याचे रीती । स्वमुखें श्रीपति वाखाणी ॥४५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP