अध्याय ८४ वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
न ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः ते पुनन्त्युरुकालेन दर्शनादेव साधवः ॥११॥
अम्मयें म्हणिजे जलमयें तीर्थें । पापक्षालनीं नव्हती समर्थें । मृत्तिकापाषाणमयदैवतें । जी असमर्थें फलदानीं ॥४६॥
योगीश्वरांच्या कृतसंकल्पें । उदकें होती तीर्थरूपें । मृत्तिका पाषाण सुरप्रतापें । स्फुरती जल्पें ज्यांचेनी ॥४७॥
तया तीर्थप्रतिमांप्रति । भजतां चिरकाळें फळें देती । साधुदर्शनें सफळ होती । मनोरथमात्र भजकांचे ॥४८॥
प्रतिमातीर्थादिकांएं परम । साधुसेवनीं तारतम्य । क्लेशसाध्य आणि सुगम । पुन्हा पुरुषोत्तम प्रतिपादी ॥४९॥
नाग्निर्न सूर्यो न च चन्द्रतारका न भूर्जलं खं श्वसनोऽथ वाड्मनः ।
उपासिता भेदकुतो हरन्त्यघं विपश्चितो घ्नन्ति मुहूर्तसेवया ॥१२॥
पंचमहाभूतें भिन्न । इयें उपास्यें सहवाङ्मन । यांतें उपासितां भेदज्ञ । अघनाशन न करिती पैं ॥५०॥
उपास्य भिन्न उपासक भिन्न । उपासनामार्ग भिन्न । तदाचरणीं फळही भिन्न । भजे भेदज्ञ या बोधें ॥५१॥
भूमि म्हणिजे प्रतिमा पार्थिव । जळविशेषें तीर्था नांव । अग्न्यर्केन्दुतारका सर्व । तेजस्तत्व जाणावें ॥५२॥
श्वसनशब्दें बोलिजे पवन । देहचाळक जो मुख्य प्राण । खं म्हणिजे केवळ शून्य । आकाश म्हणोनि जाणावें ॥५३॥
वाग्देवता ते गायत्री । मनोदेवता ज्योत्स्ना चान्द्री । इत्यादिदैवतें भेदज्ञनरीं । पृथगाकारीं भजिजेत ॥५४॥
भेदबुद्धी भेदज्ञ भजती । तैं तीं दैवतें प्रसन्न होती । कल्पित दोषांची निवृत्ती । करूं न शकती चिरकाळें ॥५५॥
तीर्थाटनें दोष गेला । तंव कर्मलोपात्मक आंगीं जडला । एंव भज्यभेद झाला । दोषां वेगळा करवेला ॥५६॥
चिरकाळ भजनाच्या प्रसंगें । एक आंगींचा दोष भंगे । तंव अनेकदोषसमुच्चय लागे । तो न भंगे तद्योगें ॥५७॥
तैसे नव्हेती साधुजन । मुहूर्तमात्र ज्यांचें सेवन । केलिया दोषांचें जन्मस्थान । ते भंगिती अज्ञान अभेदें ॥५८॥
मुहूर्तमात्र ज्यां सहवासीं । वसतां निरसिती ते द्वैतासी । अविद्यानाशें अज्ञानासी । भेदेंसहित क्षालन पैं ॥५९॥
भेद हरतां अभेदवोधें । चिन्मात्रैक निवळे नुसधें । निवर्त निरासे अखिलानंदें । स्वसंवेद्य चिन्मात्र ॥६०॥
तस्माद्भूताद्युपासना । करूं न शकती दोषनिरसना । मुहूर्तमात्र साधुसेवना । करितां सन्मात्र करिती ते ॥६१॥
यास्तव साधूवांचोनि कोण्ही । समर्थ नव्हती दोषनिरसनीं । साधु उपेक्षूनि तीर्थादिभजनीं । निष्ठा धरिती ते ऐका ॥६२॥
यस्याऽऽत्मबुद्धिः कुणपे त्रिधातुके स्वधीः कलत्रादिषु भौम इज्यधीः ।
यत्तीर्थबुद्धिः सलिले न कर्हिचिज्जनेष्वभिज्ञेषु स एव गोखरः ॥१३॥
कुणप म्हणिजे जितचि प्रेत । त्रिधातु म्हणिजे कफ वात पित्त । ऐसें शरीर नाशवंत । अहंबुद्धि तेथ जयांसी ॥६३॥
आत्मबुद्धि त्रिधातुकीं । आत्मीयबुद्धि कलत्रादिकीं । स्वधीशब्दाच्या अर्थविवेकीं । कवळी निष्टंकीं भ्रमग्रस्त ॥६४॥
माझा देश माझा ग्राम । माझी वृत्ति माझें सद्म । पुत्र कलत्र मित्र आश्रम । कर्म धर्म मामक हें ॥६५॥
स्वधीशब्दें इत्यादि सकळ । आपुलें मानोनि ममताजाळ । आणि भूविकार जे जे समळ । देवता केवळ त्यां मानी ॥६६॥
तीर्थबुद्धि जळाच्या ठायीं । ऐसा जयासी निश्चय पाहीं । योगीश्वरांतें या प्रवाहीं । जाणोनि कांहीं त्यां न भजे ॥६७॥
त्रिधातुक कुणपदेह । मम सम योगीश्वरही होय । तेथ अधिक कोणतें काय । पूज्यत्व लाहे केंवि हा ॥६८॥
ऐशिये असंभावनेकरून । योगीश्वरांतें पाहती गौण । नेणती तत्कृट साध्य साधन । मग त्यां महिमान केंवि कळे ॥६९॥
देहचतुष्ठयातीत । प्रत्यगात्मा निर्गळित । स्वरूपसमरसें जे संतत । योगी वर्तत आत्मत्वें ॥७०॥
विश्वात्मकत्वें योगिजन । तेथ कुणपबुद्धि ज्यालागून । तोचि केवळ गो खर श्वान । किंवा हीन त्याहूनिही ॥७१॥
अभेदबोधें निर्मम योगी । ममता लावी जो त्यां आंगीं । आत्मीयभाव जो नापंगी । तो अभागी गोरखवत् ॥७२॥
मृत्पाषाणधातुप्रतिमा । देवताबुद्धि तेथ ज्या अधमा । योगीश्वरीं पूज्यत्वगरिमा । न धरी दुरात्मा गोखर तो ॥७३॥
जळाच्या ठायीं तीर्थभावना । भावी तद्योगें अघनिरसना । योगिदर्शनें निष्पापपणा । न मानी जाणा गोखर तो ॥७४॥
तृणकाष्ठादिभारवाह । वृषभा खरा सम त्याचा देह । अभिज्ञजनाच्या ठायीं रोह । जो करी पहा हो प्राकृतवत ॥७५॥
ऐसें भगवंतें मुनिजना । बोलिलें असतां अनुरूप वचना । आनंद जाला त्यांचिया मना । तो कुरुरत्ना शुक सांगे ॥७६॥
श्रीशुक उवाच - निशम्येत्थं भगवतः कृष्णस्याकुण्ठमेधसः ।
वचो दुरन्वयं विप्रास्तूष्णीमासन्भ्रमद्धियः ॥१४॥
ज्याची मेधा कुण्ठित नोहे । अकुण्ठमेधस त्या म्हणावें । षड्गुणैश्वर्यें जो मिरवे । तो पूर्ण वैभवें भगवंत ॥७७॥
तया कृष्णाचें ऐसें वचन । ऐकोनि समस्तही मुनिजन । संमत अनुरूप जाणोन । मौन धरून राहिले ॥७८॥
अन्वय तर्किला न वचे कांहीं । बुद्धि निश्चळ न थरे ठायीं । विचारविवरणप्रवाहीं । प्रत्युत्तरार्थ धी भ्रमती ॥७९॥
विचारविवरणीं भ्रमित बुद्धि । मौनस्थ बैसले तपोनिधि । विलंबें विवरूनि यथाविधि । वदती त्रिशुद्धि तें ऐका ॥८०॥
चिरं विमृश्य मुनय ईश्वरस्येशितव्यताम् । जनसङ्ग्रह इत्यूचुः स्मयन्तस्तं जगद्गुरुम् ॥१५॥
चिरकाळ विचार करूनी मुनीं । निर्धार केला आपुले मनीं । जें ईश्वरें अनीश्वरपणीं । कर्माधिकारी कां होणें ॥८१॥
ईश्वर असतां अनीश्वरपण । धरूनि होइजे कर्माधीन । जें जनसंग्रहमात्र कारण । हें विवरून दृढ केलें ॥८२॥
हास्यवदनें कृष्णाप्रती । प्रत्युत्तरा मुनि बोलती । जगद्बोधात्मक ज्या शक्ती । यास्तव म्हणती जगद्गुरु ॥८३॥
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP