अध्याय ८४ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


मुनय ऊचुः - यन्मायया तत्त्वविदुत्तमा वयं विमोहिता विश्वसृजामधीश्वराः ।
यदीशितव्यायति गूढ ईहया अहो विचित्रं भगवद्विचेष्टितम् ॥१६॥

भगवंताचें दुरन्वय वचन । ऐकूनि तूष्णींभूत मुनिजन । जाले तयाचेंचि विवरण । करिती येथून दों श्लोकीं ॥८४॥
तत्त्ववेत्तयांमाजि परम । श्रेष्ठही आम्ही उत्तमोत्तम । जयाचे मायेचा संभ्रम । योगें भवभ्रम अवलोकूं ॥८५॥
विश्वस्रष्टे जे अधीश्वर । जिनें मोहिले थोर थोर । ऐसी जयाची माया दुस्तर । तो परमेश्वर श्रीकृष्ण ॥८६॥
ज्या कारणास्तव तो श्रीहरि । स्वयें होऊनि नरशरीरी । जनीश्वरांचिये परी । चेष्टे संसारीं नररूपें ॥८७॥
लेऊनि मानुषी अवगणी । जरी वर्ते मनुष्यपणीं । तर्‍ही ऐश्वर्यउभारणी । न झांके गुणीं लोपवितां ॥८८॥
जरी तूं म्हणसी श्रीभगवंता । स्वयें ईश्वर मी जरी असतां । तरी कां घेतों अनीश्वरता । ऐक तत्वतां यदर्थीं ॥८९॥
अहो या आश्चर्येकरून । म्हणती तुझें विचित्राचरण । यालागीं आम्हां अतर्क्य पूर्ण । तें अतर्क्यपण अवधारीं ॥९०॥

अनीह एतद्वहुधैक आत्मना सृजत्यवत्यत्ति न बध्यते यथा ।
भौमैर्हि भूमिर्बहुनामरूपिणी अहो विभूम्नश्चरितं विडम्बनम् ॥१७॥

तुझी षड्गुणैश्वर्यता । तें तूं अवधारीं भगवंता । ईहारहित अनीह असतां । ईहा समस्ता प्रकाशिसी ॥९१॥
केवळ अक्रिय रूपेंकरून । करिसी सृजनावनाशन । बहुधा नसोनि होसी पूर्ण । नपवसी बंधन तद्योगें ॥९२॥
एक भूमि अनेक भौतिकें । विस्तारूनि घटमठादिकें । बद्ध नोहे तदात्मकें । मृद्विवेकें अविकारी ॥९३॥
घटमठादि वाचारंभण । तेथ मृत्तिकाचि सत्य जाण । ऐसें जें कां श्रुतीचें वचन । सन्मात्रपूर्ण तेंवि तूं ॥९३॥
जरी म्हणसी मी वसुदेवपुत्र । केंवि मी स्थितिलयसृजना पात्र । यांचे कर्ते गुण स्वतंत्र । मी परतंत्र तनुधारी ॥९५॥
ऐसें न म्हणें भो जगदीशा । धर्मसंस्थापक हा मानवी ठसा । घेऊनि वर्तसी मनुजांसरिसा । हेंचि परेशा आश्चर्य ॥९६॥
विभूम्न म्हणिजे तूं परिपूर्ण । तुज जन्मादि मनुजाचरण । अवगणीचें विडंबन । केवळ अनुकरणमात्रची ॥९७॥
तेंही अनुकरण किमर्थ म्हणसी । लक्षून लोकसंग्रहासी । धर्मसेतु प्रतिपादिसी । ऐक तेविषीं निवेदितों ॥९८॥

अथापि काले स्वजनाभिगुप्तये बिभर्षि सत्त्वं खलनिग्रहाय च ।
स्वलीलया वेदपथं सनातनं वर्णाश्रमात्मा पुरुषः परोभवान् ॥१८॥

लोकसंग्रहाचिकारणें । अनेक अवतार तुवां धरणें । तयाचीं साकल्यें निरूपणें । कोण्हा वदनें निरूपवती ॥९९॥
यावरीही प्रस्तुतकाळीं । स्वजनगोपनार्थ भो वनमाळी । शुद्धसत्वात्मक सांवळी । मानुषी मूर्ति हे धरिसी ॥१००॥
स्वलीला म्हणिजे क्रीडाचरणें । वेदमार्गातें प्रतिपादणें । स्वयें वर्तोनि प्रवृत्ति करणें । जनसंग्रहार्थ धर्मपथीं ॥१॥
धर्मपथाचे उच्छेदक । उत्पथपाखण्डप्रतिपादक । ते खळनिग्रहार्थ सम्यक । शुद्धसत्वात्मक तनु धरिसी ॥२॥
येर्‍हवीं प्रकृतीहूनि तूं पर । उत्तम पुरुष जो अक्षर । वर्णाश्रमात्मक शरीर । धरिसी साचार स्वलीला ॥३॥
वर्णश्रमप्रतिपादना । अनाद्धर्मसेतुसंस्थापना । करावयालागीं ब्राह्मणां । बहुसम्मानें वाढविसी ॥४॥
यालागीं तूं ब्रह्मण्यदेव । वेदवैदिकऋतुसमुदाव । याचें वाढविसी महत्त्व । सहेतु वास्तव तें ऐक ॥१०५॥

ब्रह्म ते हृदयं शुक्लं तपः स्वाध्याय संयमै । यत्रोपलब्धं सद्व्यक्तमव्यक्तं च ततः परम् ॥१९॥

आदिब्रह्म तें तूं मुख्य । जें सन्मात्र शुद्ध सम्यक । निर्गुण निराकार निष्टंक । अखंडैक अद्वितीय ॥६॥
स्वगतप्रधानावलंबें तेंची । शुद्धसत्वात्मक पूर्णत्वाची । प्रणवरूप आदिबीजाची । आस्तिक्यता प्रकाशी ॥७॥
प्रणवरूप तें व्यक्ताव्यक्त । कार्यकारणरूपें स्थित । कार्य म्हणिजे क्रियायुक्त । बीज अव्यक्त कारण तें ॥८॥
त्यामाजि अव्यक्त बीजकारण । जें वेदाख्य अमल शुक्लवर्ण । तेंचि तुझें हृदय पूर्ण । अंतरंग निजरूप ॥९॥
तयापासूनि मग जें व्यक्त । कर्मकलाप वेदोदित । तें तत्कार्य क्रियासहित । वर्त्ते संतत तव रूप ॥११०॥
क्रियाकलाप म्हणसी कोण । तरी तो त्रिविध कायवाङ्मन । तपःस्वाध्याय संयम पूर्ण । प्राप्तिसाधन उत्तरोत्तर ॥११॥
कायिक कर्म त्या नाम तप । वाङ्मय वेदपठनादि जल्प । ईश्वरप्रीत्यर्थ निष्कामकल्प । विगतसंकल्प संयम तो ॥१२॥
पूर्वमीमांसापरिशीलन । निष्काम तदुदित कर्माचरण । नित्यनैमित्तिक अनुष्ठान । काम्यनिषिद्धपरित्यागें ॥१३॥
येणें होय चित्तशुद्धी । ब्रह्माजिज्ञासा आकळे बुद्धी । उत्तरमीमांसा सद्गुरु बोधी । तैं उपलब्धी अव्यक्ता ॥१४॥
तदुत्तर संयम क्रमें । मनोजय साधितां नियमें । शुद्धसन्मात्र वृत्तिविरामें । हेमीं हेमें जेंवि मिळिजे ॥११५॥
तस्मात् वेद हृदय तुझें अमळ । यास्तव पूजिसी ब्राह्मणकुळ । हें आश्चर्य नव्हे केवळ । ऐक विवळ तें आतां ॥१६॥

तस्माद्ब्रह्मकुलं ब्रह्मन् शास्त्रयोनेस्त्वमात्मनः । सभाजयसि सद्धाम तद्ब्रह्मण्याग्रणी भवान् ॥२०॥

ब्रह्मन् ऐसें संबोधन । सन्मात्रब्रह्म तूं जनार्दन । वेद ब्रह्महृदयवान् । क्रियासंपन्न व्यक्तत्वें ॥१७॥
वेद ब्रह्महृदय अमळ । तत्प्रवर्तक ब्राह्मणकुळ । शास्त्रयोनी जो तूं केवळ । निगमपाळ निगमात्मा ॥१८॥
ऐसिया तुझें प्राप्तिस्थान । वेद मूर्तिमंत ब्राह्मण । त्यांचा वाढविसी सम्मान । तस्मात् ब्रह्मण्यवर्य तूं ॥१९॥
वेदांचें जें वसतिस्थान । यालागीं सद्धाम त्या अभिधान । ब्रह्मनिष्ठाग्रणी तूं पूर्ण । ब्रह्मण्य म्हणोनि द्विज यजिसी ॥१२०॥
अनन्यरूपा आपुलिया । भजतां भेद गेला विलया । ब्रह्मण्यबोधें तुज सन्मया । माजि मिळणें उपलब्धि ते ॥२१॥
तस्मात् ईश्वर तूं केवळ । जनसंग्रहार्थ स्वधर्मशीळ । आम्ही तुजसीं पावलों मेळ । कृतार्थ केवळ तद्योगें ॥२२॥
आज तुझेनि सन्निधिमात्रें । पावन झालों वाङ्मनोगात्रें । तें संक्षेपें कथितों वक्त्रें । विश्वश्रोत्रें परिसावें ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP