अध्याय ८४ वा - श्लोक ६६ ते ७१
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
ऐसा वसुदेवें प्रार्थिला । समस्त यादवीं सम्मानिला । सख्याचें प्रिय करावयाला । राहता जाला दिन कांहीं ॥३८॥
मित्र प्रार्थिती परमप्रीती । भोजनानंतरे जावें म्हणती । अपराह्णपर्यंत करा वसती । ऐसे वोगिती स्नेहपाशें ॥३९॥
रामकृष्णांच्या मुखीवीक्षणें । नंद वेधला अंतःकरणें । मान देऊनि तत्प्रार्थने । अपराह्णपर्यंत राहिला ॥४४०॥
भोजनानंतर अपराह्णकाळीं । व्रजपतीतें प्रार्थिती सकळी । रात्री क्रमोनि सुहृदमेळीं । प्रयाण कीजे प्रभातीं ॥४१॥
अपरदिवशीं तयाचि परी । म्हणती मध्याह्ना उपरी । प्रयाण कीजे सहपरिवारीं । इतुकीं वैखरी मानावी ॥४२॥
रामकृष्णांच्या प्रेमरसा । भुलोनि नंद गुंतला कैसा । आजि उद्यां परवां ऐसा । तेथ त्रिमासां अतिक्रमिलें ॥४३॥
त्या नंतरें बहु प्रार्थना । करूनि नंदें घेतां आज्ञा । प्रयाणकाळीं वस्त्राभरणा । देते जाले ते ऐका ॥४४॥
ततः कामेः पूर्यमाणः सव्रजः सहबान्धवः । परार्ध्याभरणक्षौमनानानर्ध्यपरिछदैः ॥६७॥
वसुदेवोग्रसेनाभ्योआं कृष्णोद्धवबलादिभिः । दत्तमादाय पारिबर्ह यापितो यदुभिर्ययौ ॥६८॥
तदुपरि राजा उग्रसेन । वसुदेव उद्धव रामकृष्ण । इत्यादिकीं भिन्नभिन्न । वस्त्राभरणें समर्पिलीं ॥४४५॥
परार्ध्य म्हणिजे अमूल्यतरें । निर्जरलोकींचीं दिव्याम्बरें । अनर्ध्यरत्नें कार्तस्वरें । त्वाष्ट्रनिर्मितें आभरणें ॥४६॥
अनर्घ्य नानाविधोपकरणें । गोपोपयोग्य दिव्य भाजनें । क्षौमकौशयें रोमजें तार्णें । व्रजपा कारणें समर्पिलीं ॥४७॥
अग्निधौतें हेमदुकूलें । अमरेन्द्रभोग्यें इये पट्टकुळं । कुबेरलोकींचीं मुक्ताफळें । मंडित वसनें महार्हें ॥४८॥
वरुणलोकींच्या पदार्थश्रेणी । नंदादिबल्लवां समर्पूनी । सर्व मनोरथ तिहीं करूनी । पूर्ण केले वज्रपाचे ॥४९॥
वज्रनिवासी जे बल्लव । आप्त स्वजन बंधु सर्व । तिहीं सहित बल्लवराव । पारिबर्हें गौरविला ॥४५०॥
देवकी रोहिणी मुख्य करूनी । अष्टादश वसुदेवपत्नी । यशोदे सहित व्रजकामिनी । वस्त्राभ्रणीं गौरविल्या ॥५१॥
रेवतीरुक्मिणीप्रमुख प्रेमें । अनर्ध्य दुकूलें दिव्य ललामें । अर्पूनि पूजिती स्नेहकामें । यशोदादिकां गौळणींतें ॥५२॥
ऐसें दिधलें जें जें उचित । नंदें घेऊनि तें समस्त । समस्तां पुसूनि स्वगणा सहित । जाता जाला व्रजभुवना ॥५३॥
समस्त यादवीं गव्यूतिमात्र । नंद बोळविला प्राणमित्र । बृहत्सेनेचा परिवार । वेष्टित नृपवर आहुकादि ॥५४॥
आज्ञा घेऊनि निघाला नंद । हृदयीं पावला परमानंद । बल्लवां सहित श्रीगोविन्द । हृदयीं धरिला तें ऐका ॥४५५॥
नन्दो गोपाश्च गोप्यश्च गोविन्दचरणाम्बुजे । मनः क्षिप्तं पुनर्हर्तुमनीशा मथुरां ययुः ॥६९॥
नंद गोपाळ गोपी सकळी । गोविंदाचे चरणकमळीं । चित्त गुंतलें त्यांतें समूळीं । पुढती आकळूं न शकती ॥५६॥
मन गुंतलें गोविन्दचरणीं । पुढती असमर्थ तदाहरणीं । वाणी वेधल्या तद्गुणस्मरणीं । विवश प्रयाणं तनुयष्टि ॥५७॥
ऐसे मथुरादेशाप्रती । व्रजभुवनातें बल्लव जाती । मार्गीं आप्त जे भेटती । त्यांतें कथिती महोत्सव ॥५८॥
नंदप्रमुख मित्र सकळ । सोयरे कुरुमत्स्यपाञ्चाळ । स्नेहवादीं सर्व भूपाळ । बोळविले असतां पैं ॥५९॥
बन्धुषु प्रतियातेषु वृष्णयः कृष्णदेवताः । वीक्ष्य प्रावृषमासन्नां ययुर्द्वारवतीं पुनः ॥७०॥
समस्त बोळविल्या नंतर । यादवभोजान्धावृष्णिकुकुर । ज्यांचें दैवत श्रीकृष्ण श्रीधर । करिती विचार ते अवघे ॥४६०॥
देखोनि समीप पर्जन्यकाळ । मार्गीं नद नद्या भरती वोहळ । म्हणोनि निघाले तत्काळ । पातले सकळ द्वारवती पैं ॥६१॥
जे जे जनपद भेटती पंथीं । अथवा स्वजनां नागरां प्रती । कुरुक्षेत्रींचा उत्सव कथिती । तो तूं कुरुपती अवधारीं ॥६२॥
जनेभ्यः कथयाञ्चक्रुर्यदुदेवमहोत्सवम् । यदासीत्तीर्थयात्रायां सुहृत्सन्दर्शनादिकम् ॥७१॥
यदुदेव तो वसुदेव । त्याचा समग्र यज्ञोत्सव । आणि कुरुक्षेत्रयात्रा सर्व । स्वमुखें अपूर्व प्रशंसिती ॥६३॥
यात्राप्रसंगें सहज गांठी । जाल्या सुहृदांचिया भेटी । परस्परें त्या संवादगोठी । कथिती वाक्पुटीं आह्लादें ॥६४॥
चतुरशीतितमोऽध्याय । येथ संपल्यानंतर पाहें । पुढील कथा अपूर्व आहे । सादर तिये परिसा हो ॥४६५॥
पंचायशीव्या अध्यायांत । रामकृष्णांतें प्रार्थितात । मग ते जनका माते सहित । प्रबोधितील ज्ञानातें ॥६६॥
साही मृत पुत्र आणोनी । आनंदवितील पिता जननी । सावध तिये कथेच्या श्रवणीं । श्रोतीं सज्जनें बैसावें ॥६७॥
प्रतिष्ठानीं एकनाथ । सज्जनवृंदीं सुरपूजित । तत्पादाब्जपरागनिरत । भ्रमर संतत दयार्नव ॥६८॥
काळयुक्ताक्षी वत्सरीं । फाल्गुनसिनीवाली अंगारीं । तद्दिनीं प्रतिष्ठानक्षेत्रीं । भाषावैखरी क्रतु कथिला ॥६९॥
याचिया श्रवणें करून । कुरुक्षेत्रींची यात्रा पूर्ण । सर्व यज्ञांचें अवभृथस्नान । श्रोत्यांलागून जोडतसे ॥७०॥
यालागीं कोण्ही न मानूनि उबग । श्रवणीं आदर कीजे चांग । करुणावत्सल कमलारंग । सर्व प्रसंग संपादी ॥७१॥
श्रीमद्भागवत दशम स्कंध । टीका हरिवरद अगाध । दयार्णवकृत परम विशुद्ध । अध्याय प्रसिद्ध चौर्यायशीवा ॥४७२॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां कुरुक्षेत्रयात्रायां वसुदेवमखवर्णनं नन्दवसुदेवसंवादो नाम चतुरशीतितमोऽध्यायः ॥८४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥७१॥ ओवी टीका ॥४७२॥ एवं संख्या ॥५४३॥ ( चौर्याऐंशीवा अध्याय मिळून ओवी संख्या ३७७०३ )
चौर्याऐंशीवा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP