निरंजन माधव - श्री भार्गवरामजन्मचरित्र

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


ओव्या.
वंदोनि आधीं नरकुंजरा । पार्वतीतनया लंबोदरा ।
मतिज्ञानाच्या विस्तारा । विघ्नहरा आदिपुरुषा ॥१॥
वाणी देवी अनंतगुणा । अनंतरुपा करोनि करुणा ।
जगासि देवोनि विद्यादाना । पावन करी त्रिभुवन ॥२॥
सद्‍गुरु जो विज्ञानरासी । भावें नमन करोनि त्यासि ।
भार्गवरामचरित्रासी । कथन करि निरंजन ॥३॥
कार्तवीर्यादि नृपति । ऐश्वर्यमत्त महासंपतीं ।
इंद्रासिहीं न लेखिती । गर्वबळें अतिमत्त ॥४॥
भूमीस झाला भार । म्हणून ब्रह्मादि सुरवर ।
सेवोनि क्षीरसिंधूचें उत्तरतीर । प्रार्थिते झाले जगदीशा ॥५॥
" देवदेवा नारायणा । आदिविष्णु करुणाघना ।
महापुरुषा जगजीवना । कृपापूर्णा परेशा ॥६॥
भूमीस झाला भार । हैहयादि मोठे नृपवर ।
सेनासंपत्तिबळें प्रचुर । न लेखिती ते देवातें ॥७॥
तयांसि वधोनि क्षिती । भार उतरावा लक्ष्मीपती ।
परात्परा परंज्योती । आमुची विनती परिसिजे " ॥८॥
सकळ देवांची प्रार्थना । ऐकतां कर्णी नारायणा ।
योगनिद्रा असतां पूर्णा । चेव झाला तात्काळ ॥९॥
तेव्हां अशरीरवाणी मधुर । गगनीं वर्तली गंभीर ।
म्हणे धातया सत्वर । अवतार करितों भूवरी ॥१०॥
भृगुकुळीं जामदग्न्यराम । होवोनि करीन देव सकाम ।
भूभार हरीन नि:सीम । आतां चिंता न करीं तूं ॥११॥
वाणी ऐकोनि विधाता । परम मोद मानोनि चित्ता ।
सुरेंद्रादि देवां समस्तां । सांगता झाला सविस्तर ॥१२॥
ऐकोनि धातयाची वाणी । देव संतुष्ट झाले मनीं ।
ह्मणती केधवा चक्रपाणी । अवतार करील भूवरी ॥१३॥
भृगुकुळीं रुचिक महामुनी । तपोनिधि पावनगुणी ।
वेदवेत्ता त्रिकाळज्ञानी । ब्रह्मबोधें परिपूर्ण ॥१४॥
तयासि सांगे चतुरानन । म्हणें प्रजा करी उत्पन्न ।
तुझ्या कीर्तीने त्रिभुवन । पूर्ण तूं करीं द्विजवर्या ॥१५॥
ऐसें सांगुनी गेला धाता । तंव मुनीस मनीं वाढली चिंता ।
मीं तपस्वी धमनीसंतता । कोण निजसुता अर्पील ॥१६॥
अकस्मात येतां नारदमुनी । पूजा करी ऋषी नमुनी ।
धातयाची आज्ञा कथनी । करिता झाला तयातें ॥१७॥
नारद म्हणे ऐक द्विजा । सोमवंशी जन्हुराजा ।
जेणें गंगा प्राशिली वोजा । त्याचा पौत्र गाधिराज ॥१८॥
त्याची कन्या सत्यवती । परम सुंदरी शुभमती ।
देवकन्या महाकीर्ती । त्याहि लाजती देखोनी ॥१९॥
रायासि मागोनि कन्यारत्न । विवाह करी अतियत्नें ।
तेव्हां तुझें मनोरथ पूर्ण । होतील जाण मुनिवर्या ॥२०॥
अवश्य म्हणोनि जराजीर्ण । तपोनिधि पावणगुण ।
राजालया येता जाण । नरनायकें वंदिला ॥२१॥
पूजोनि बैसविला रत्नासनीं । प्रार्थी तयातें बद्धपाणी ।
म्हणे स्वामीं काय कारणीं । येणें सदनां सांगावे ॥२२॥
ब्राह्मण म्हणे कन्यारत्न । तुझ्या सदनी गुणनिधान ।
ऐकोनि आलों देयीं दान । मनोरथ संपूर्ण तूं करी ॥२३॥
विचार करोनि नृपति । बोलता झाला रुचिकाप्रति ।
सहस्त्र श्यामकर्णी सुमती । देतां कन्या लाभेल ॥२४॥
अवश्य म्हणोनि वरूणालया । जावोनि अश्च याचिले तया ।
सहस्त्र अश्व गाधिराया । देवोनि कन्या परिणिली ॥२५॥
करोनि सदृश शरीर । सत्यवतीते परम सुंदर ।
भोगी सद्‍गुणी उदार । पतिव्रता ते सुशीला ॥२६॥
सेवा करितां बहुत दिवस । मुनीस जाहला परमहर्ष ।
पुत्र इच्छोनि करीत तोष । सेवोनि माझ्या मनातें ॥२६॥
काय इच्छा असेल मानसीं । तें तूं माग गुणरासी ।
अघटित तेही अप्रयासीं । तात्काळ पावसा वरिष्ठे ॥२७॥
मुनी देखोनि प्रसन्न । संतोष भावें करी नमन ।
माझिया पित्यासि पुत्रसंतान । देवोनि देवा रक्षावें ॥२८॥
मजहि द्यावा पुत्रमणी । तुम्हासमान सद्‍गुणखाणी ।
ऐसे प्रार्थितां रमणी । अवश्य म्हणे मुनिनाथ ॥२९॥
चरु करुन मंत्रपूत । दोनी पिंड केले त्वरित ।
एक अभिमंत्रिला मंत्रयुक्त । ब्रह्मतेजें पावनें ॥३०॥
शांति दांत शमादि गुण । ब्रह्मज्ञानी अतिनिपुण ।
तो अर्पिला अंगनेलागुन । तपोधनें त्या काळीं ॥३१॥
क्षत्रियतेज पॄर्ण । शौर्यौदार्य गुणनिधान ।
महाप्रतापी भाग्यवान । ऐसा दुसरा अभिमंत्री ॥३२॥
दोनी देवोनि वनिताकरीं । स्नानासि जातां सरितातीरीं ।
मातेसि सांगता नवलपरी । संतोषसागरीं मज्जली ॥३३॥
माता म्हणें सत्यवती । परम समर्थ तुझा पती ।
तुझा पिंड तो अतिप्रीती । केला असेल गुणाढ्यें ॥३४॥
तो तूं पिंड देई मला । माझा पिंड तूं घेई बाळा ।
म्हणतां मातृस्नेहें तिला । देती झाले अतिहर्षें ॥३५॥
आपण भक्षिला मातापिंड । मनासि संतोष झाला वाड ।
माध्यान्हिक सारोनि निवाड । रुचिक आला निजसदना ॥३६॥
पाहे स्त्रीमुख तेजपूर्ण । क्षत्रियतेजें दारूण ।
म्हणे कैसें झालें विंदाण । अत्यंत दारूण गर्भ इचा ॥३७॥
पुसतां सत्यवतीप्रती । विनयें सांगे महासती ।
माझा पिंड मातेप्रती । प्रार्थितां म्या दीधला ॥३८॥
तिच्या पिंडाचें आरोगण । म्यां तों केलें यथार्थ वचन ।
ऐसें विनवितां तपसंपन्न । मुनी बोले तियेते ॥३९॥
ऐक सुंदरी अनर्थ । तुवा जोडिला अत्यंत ।
परम क्षत्री बलवंत । होईल कुशी तुझ्याचि ॥४०॥
गाधिरायासि नंदन । होईल महा ब्राह्मण ।
ब्रह्मतेजें परिपूर्ण । ज्ञाननिधान शांतिकवच ॥४१॥
ऐकोनि सत्यवती भ्रांत । नयें नमिला ऋषीनाथ ।
म्हणे कृपाळा अत्यंत । अन्याय क्षमा करावा ॥४२॥
माझ्या उदरीं तुझ्या वीर्यें । पुत्र व्हावा परमौदार्य ।
ब्राह्मण शांति तपधैर्य । ब्राह्मी ऐश्वर्यसंपन्न ॥४३॥
ऐकोनि नारीचें वचन । मुनि म्हणे वो पुत्ररत्न ।
प्रसवसील उद्दाम ब्राह्मण । गुणनिदान तूं साच ॥४४॥
तुझा पौत्र तो अतिक्रूर । होईल पृथ्वीचा भारहर ।
म्हणतां वाटलें सौख्य फार । वनिताचित्ता ते क्षणीं ॥४५॥
गाधिरायासी विश्वामित्र । झाला परम तपस्वी पुत्र ।
क्षत्रिय असतां परमपवित्र । ब्राह्मण्य अतिशयें पावला ॥४६॥
जमदग्नी तो ऋषिनायक । महातपस्वी सद्‍विवेक ।
सत्यवती उदरी संम्यक । उत्पन्न झाला तेजस्वी ॥४७॥
जमदग्नी महाव्रतधारक । देखोनि रेणुराये अकलंक ।
रेणुकाकन्या भावपूर्वक । अत्युत्साहें अर्पिली ॥४८॥
तीच्या उदरीं श्रीकांत । अवतार करीं अनंत ।
वधोनि राजे दुष्ट समस्त । भूभार दूरकर्ता हा ॥४९॥
जमदग्नीवीर्ये रेणुका । प्रथम प्रसवली वसुमदादिकां ।
पुत्ररत्नां अनेका । सेवटींल हा श्रीराम ॥५०॥
गर्भा येतां देवलोकीं । दुदुंभी वाहिल्या अनेकीं ।
सुरवर झाले सर्व सुखी । हर्षे पूर्ण नाचती ॥५१॥
माधवमास शुक्ल पक्ष । तृतीया जया तिथीस दक्ष ।
साधावया देवपक्ष । अवतार करी श्रीराम ॥५२॥
अक्षतृतीया शुभदिनीं । प्रथम पहरयामिनी ।
रेणुकाकुसीं राममणी । जन्मला अत्यंत साजिरा ॥५३॥
देव पुष्पें वर्षती । नारदतुंबर कीर्ति गाती ।
गंधर्व अप्सरा नाचती । दुंदुभी वाजती अतिहर्षें ॥५४॥
झाला त्रिलोकीं सोहळा । सर्व संतुष्टला ऋषिमेळा ।
दुष्ट राजयांच्या कुळा । वाटला धूमकेतु उदेला ॥५५॥
ऐसें भार्गवरामजनन । भागवतीं कथा परम पावन ।
शुकें वर्णिली नृपालागुन । प्रायोपवेशनीं परिक्षिती ॥५६॥
तेच कवि माधवनंदन । बनाजी योगी निरंजन ।
रचिता झाला पावन । संत सज्जनतोषार्थ ॥५७॥
हें भार्गवरामजन्माआख्यान । कोणी पढे भक्तीकरुन ।
तयासी धनधान्य संतान । इहपरलोकीं सुखलाभ ॥५८॥
इतिश्रीनिरंजन माधवविरचितभार्गवरामजन्मकथानक समाप्त ।
श्रीरामार्पणमस्तु ॥ श्रीविठ्ठलार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP